दिवस दुसरा : जागर स्त्रीशक्तीचा
आरे बापरे... "रात्र कशी संपली काय कळलंच नाही!"
मी स्वतःशीच बडबडत उठलो.लाडक्या बाप्पांकडे पहिले तर ते आधीच उठून ध्यानमग्न बसले होते.
उंदीर मामा माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता. क्षणभर मला कळलंच नाही, हा बरं का असं हसतोय? पण मी त्यावर जास्त विचार केला नाही.
बाप्पांचं ध्यान मोडू नये म्हणून मी खूप काळजी घेत होतो.पण उंदीर मामा काही गप्प बसत नव्हता... दातांनी स्वतःच्याच शेपटीला चावत होता आणि चूक... चूर... असा आवाज करत होता. मी त्याला फटकारलं.पण तो काय, अजूनच हट्टाने गप्प बसायच्या मूडमध्ये नव्हता.
शेवटी न राहवून त्याने मला विचारलंच,
"मंडळ दादा, नैवेद्य कधी येणार?"
मला खुदकन हसू आलं. मी म्हणालो,
"आपले हे दहा दिवस फक्त भक्तांचे आहेत. भक्त आपणाला देतील तेव्हाच जेवायचं, अथवा..."पुन्हा उंदीर मामा किंचाळला – "अथवा...?"
मी पुढे काही बोलतोय तोच, त्याच्या त्या किंचालीने माझा लाडका बाप्पा ध्यानातून बाहेर आला.फक्त एक नजर टाकली त्याने उंदीर मामाकडे... आणि तो बिचारा जे समजायचं ते समजून गेला. घाबरलेला उंदीर मामा लगेच बाप्पांच्या धोतराला लपवायला गेला.
आता मलाही बाप्पांशी बोलायचं होतं. मी बऱ्याच वेळेपासून त्यांच्या ध्यानातून बाहेर येण्याची वाट पाहत होतो. पण ते अशा पद्धतीने बाहेर येतील, असं मला अजिबात वाटलं नव्हतं.बाप्पांनी माझ्याकडे पाहत एक मृदू स्मितहास्य दिलं. आणि मग मीही हसलो.बाप्पा पोटावर हात फिरवत होते... मला त्यांच्या भुकेची जाणीव होत होती. असाच थोडा वेळ गेला, आणि मग बाप्पा बोलले –
"अरे, माझे भक्त कोठे आहेत? मला विसरले काय? मला आता भूक लागली आहे...बोलावं त्यांना. "
बाप्पांचे बोलणं संपतंय ना संपतंय, तोवर माझे निधड्या छातीचे, पिळदार दंडाचे, मावळे भरदार पावले टाकत... टाकत... जणू काही बाप्पांच्या मनाचा वेध घेत, बाप्पांसमोर हजर झाले. आणि ते निधड्या छातीचे मावळे जणू आपण काही शून्यच आहोत बाप्पा पुढे अशा भावनेत या माझ्या लाडक्या बाप्पांसमोर कमरेपर्यंत वाकून नमस्कार केला. त्यांच्यातला तो वक्तशीरपणा, आणि हजर जबाबीपणा खरंच टिपण्यासारखा होता.बाप्पा देखील त्यांना आलेले पाहून निश्चिंत झाले. उंदीर मामा तर घरात इकडे तिकडे पळत होता, त्याचा आनंद तर वर्णनातीत होता.बाप्पांनी हात हलविताच उंदीर मामा एका पडद्याच्या छिद्रात शिरला.हे तेच छिद्र होते, जे न राहवून उंदीर मामाने दातांनी पाडले होते...
आणि म्हणूनच तो सकाळी माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता.हे मला आता उमगले.
आरतीची सुरुवातश्री उदय आज आरतीचे ताट घेणार होते. त्यासाठी त्यांनी केलेला तो पेहराव सर्वांच्या डोळ्यात भरून गेला.
श्री रवी भोसले तर काय कमी होते? शेवटी भोसले आडनावाला शोभेल असाच त्यांचा पोशाख मला आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर प्रसंगांची आठवण करून देत होता. त्या दोघांची जोडी जीवा शिवा या भावांची वाटत होती. आणि आत्ताच्या काळात म्हणावे तर शोले मधल्या वीरू आणि जय ची जोडी वाटत होती. तेथे सोबतीला माझे बरेच कार्यकर्ते हजर होते. सर्वजण स्वतःला शोभेल असं नीटनेटके आवरून आले होते.कुणी घंटा घेतली होती, तर कुणी धूप. प्रसादाचं ताट खाली होतं, ते माझ्या मामांनी धरलं होतं. पाहून मलाच हसू आलं."गणपती बाप्पा मोरया!" करून आरतीला सुरुवात झाली.
सर्वजण तन-मन विसरून माझ्या बाप्पाच्या जयजयकारात तल्लीन झाले होते. वाजणाऱ्या टाळ्यांचा गजर माझ्या कानांना एक मोहक सुख देत होता. त्या धुपाचा मंद पण आकर्षक सुगंध सर्वांना तिकडेच खेचून नेत होता. श्री राज वाजवत असलेल्या घंटेचा नाद मेंदूला एक नवी ऊर्जा, नवं उत्तेजन देत होता. आरती संपली.छोट्या कार्यकर्त्यांनी प्रसाद वाटण्यास सुरुवात केली.
इतक्यात दोघे पाटील बंधू.. राज आणि अमेय त्यांच्यावर शांतपणे ओरडले –
"अरे..! काय हे? बाप्पांना नैवेद्य तरी दाखवू द्या आधी..! .. आगाऊ कुठले"
उंदीर मामा, बाप्पा आणि मीही त्याचीच वाट पाहत होतो. भक्तांना सेवा देण्यापूर्वी पोटोबा करणं गरजेचं होतं आणि मगच विठोबा! नैवेद्य दाखवून झाला.आम्ही सर्वजण पोटभर जेवलो, इतकं की ढेकर येईपर्यंत भोजन केलं.ज्यांनी तो प्रसाद बनवला होता त्या मातांना आम्ही मनापासून धन्यवाद दिले.
मातांची आठवण येताच लगेचच बाप्पांनी (थोड्या रागाने पण काळजीने) मला प्रश्न केला –
"आरे, ही पोर माझ्या शूर मातांना कधी बोलवणार आहेत माझ्या भेटीला? त्यांना कधी देणार आहेत आरतीचा मान? की फक्त माझ्या शूर वीरांच्याच हातूनच...?"
बाप्पांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मी त्यांना थांबवत बोललो –
"अ... आं... होय बाप्पा, येणार आहेत! माफ करा, मी तुम्हाला क... क... काल सांगायलाच विसरलो."
मी आडखळतच बोललो.लगेच बाप्पा ठाम आवाजात बोलले –
"येणार आहेत...? कोण आहेत त्या... माझ्या शूर जिजाऊ?"
आता मला थोडं बरं वाटलं.बाप्पा थेट मुद्द्यालाच स्पर्श करत होते, वातावरण शांत झालं होतं. मी हळुवार श्वास सोडत बोललो –
"माझ्या बाप्पा, डॉ. सौ. स्वाती दीपक पाटील स्वतः येणार आहेत आपल्या आरतीला आज संध्याकाळी..."
( येथे माननीय डॉक्टर स्वाती पाटील मॅडम यांना बोलवण्यात पाटील बंधू राज व अमेय यांचे महत्त्वाची भूमिका होती... )
बाप्पा थोडे प्रश्नार्थक स्वरात म्हणाले –"कोण आहेत या शूर स्त्री...? मला जरा सांगशील का?"
बाप्पांना सर्व काही ज्ञात असतं, तरीही त्यांना माझ्या मुखातून ऐकायचं होतं... जणू काही त्यांना माझी परीक्षा घ्यायची होती.मी म्हणालो –
"बाप्पा...!"
"डॉ. स्वाती दीपक पाटील या एक प्रतिष्ठित डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात भाजपा प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत. डॉ स्वाती पाटील यांनी एम.एस. (मास्टर ऑफ सर्जरी) ही शस्त्रक्रियेतील सर्वोच्च पदवी मिळवली आहे. त्यांनी आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत निस्वार्थपणे रुग्णसेवेचं कार्य केलं आहे.डॉ. स्वाती पाटील यांच्या वैद्यकीय पार्श्वभूमीमुळे सार्वजनिक आरोग्य सेवा, महिला आरोग्य आणि ग्रामीण भागातील आरोग्यसुविधांच्या विकासावर त्यांचं विशेष लक्ष आहे.वैद्यकीय व्यवसायात पूर्णपणे गुंतून असूनही, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. आणि म्हणूनच त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं."बाप्पा हे सर्व शांतपणे ऐकत होते.व अखेरीस त्यांनी आनंदाने डोळे मिटले आणि पुन्हा ध्यानात लीन झाले...
...वर्षातून एकदाच भेट होत असल्याने उंदीर मामा काय, माझी पाठ सोडत नव्हता. तो माझ्याशी गप्पा मारतच होता.गप्पा-गप्पांमध्ये संध्याकाळचे आठ कधी वाजले, हे आम्हाला कळलंच नाही.बाप्पा ध्यानातून आधीच बाहेर आले होते आणि शांतपणे आमचं बोलणं ऐकत होते. पण त्यांची नजर मात्र बाहेर खिळून होती. हे पाहून आम्हा दोघांना थोडं कसंसं वाटलं.ज्या बाप्पाची आम्हाला काळजी घ्यायची होती, तो सोडून आम्ही गप्पा मारण्यात गुंतून गेलो होतो.
आम्ही बाहेर पाहिलं तर... जय शिवरायांचे मावळे पुढे रस्त्याकडे पळत होते. सर्वात पुढे पाटील बंधू, जय आणि वीरू होते. आम्ही ओळखलं – प्रमुख पाहुण्या आले असणार म्हणून.आम्ही बरोबर होतो.डॉ. सौ. स्वाती पाटील त्यांच्या गाडीतून उतरत होत्या. त्यांना पाहण्यासाठी अफाट महिलांची गर्दी झालेली होती.गर्दी मार्गी लावण्यासाठी कार्यकर्तेही कमी पडत होते. प्रत्येक महिला कार्यकर्ती प्रमुख पाहुण्यांना भेटण्यासाठी उत्सुक होती. कुणी त्यांच्या हातात हात देत होती, तर कुणी आपली संस्कृती जपत नमस्कार करत होती. काही मुली गर्दीतूनच जेमतेम जागा काढत त्यांना पाया पडत होत्या. काही वयोवृद्ध स्त्रिया आपल्या दोन्ही हातांची बोटे ओवाळून स्वतःच्या डोक्यावर मोडत होत्या. त्या नजर काढत होत्या.
लहान मुली जशी वीरा ईशानी सिद्धी आराध्या अबोली ईश्वरी अन्वी प्रणाली प्रांजल आर्या रेहा शताक्षी आणि बासुरी आपल्या नाजूक हातांनी फुलांच्या पाकळ्या पाहुण्यांच्या चालण्याच्या मार्गात टाकत होत्या. आर्या शतक्षी बासुरी या मुलींनी अगोदरच नीट रांगोळी काढून घेतली होती.वीरा ईशानी अनवी ईश्वरी यांची कसरत खरंच बघण्यासारखी होती. त्या प्रत्येक मुलींचे बाबा आपापल्या मुलींना लांबूनच न्याहाळत होते आणि हातानेच काहीतरी सूचना देत होते.
आजचा कार्यक्रम नारीशक्तींचा होता आणि त्यामध्ये असलेला त्यांचा सहभाग जल्लोष खरंच खूप पाहण्यासारखा होता.
तेवढ्यात बाप्पा मला म्हणाले ...
"जय शिवराय...! ऐकलस का याच मुली उद्याच्या माझ्या आई जिजाऊ असणार आहेत. माझं हे वाक्य लक्षात ठेव.. ".
(बाप्पांना म्हणायचं होतं की या मुलींमध्ये काहीतरी आहे की तो गुण त्यांना आयुष्यात खूप खूप पुढे मोठ्या पदावर घेऊन जाणार आहे. )
प्रमुख पाहुण्या मान्यवर हे सर्व पाहत होत्या.. हे सगळं दृश्य पाहून मा. डॉ. स्वाती पाटील सुध्दा भारावून गेल्या असतील, तर ते काही गैर नव्हतं.समोरून मंडळाकडे आमच्या नारीशक्तींचा जणू महाप्रवाहच येत होता. तोच माझे कान मंडळाच्या समोर उभ्या असलेल्या काही महिला कार्यकर्त्यांकडे वळले.
पहिली कमला म्हणाली –"चंपे ..! ऐकलस का.. ? मी माझ्या नातीला अशीच डॉक्टर करणार बघ ग... चंपे!"
त्यावर दुसरी चंपा तिला मध्येच थांबवत म्हणाली –
"हो ग! छानच आहे म्हटलं तर... पण नुसती डॉक्टर असून चालत नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून समाजाचे प्रश्न सोडवावे लागतात. लोकांचे टोमणे सहन करावे लागतात आणि त्याच लोकांचा आपल्याबद्दल जयजयकारही ऐकावा लागतो. आगीसारखं रक्त पाणी करावं लागतं ग, बाई पाणी! तुला वाटतंय एवढं सोपं आहे का ग कमळे?"
यावर उंदीर मामा लगेच म्हणाला –
"क्या बात है..!"
...कमळा बाईने तिच्याकडे पाहत नाक मुरडले व स्वतःचे लक्ष मान्यवरांकडे दिले. कारण चंपा थोडी नकारात्मक बोलली होती.खरंतर चंपा काही प्रमाणात बरोबरच होती. पण कमला बाईचं म्हणणंही योग्यच होतं. कदाचित नातीला डॉक्टर करून, तिला फक्त आरोग्य सेवेशी निगडित सामाजिक सेवा करायची इच्छा असेल — जशी की थोर समाजसेवक डॉ बाबा आमटे यांनी केली होती.
मी मामाला म्हणालो –"उंदीर मामा, आपल्या आजूबाजूलाही अशा अनेक चंपाबाई आहेत की, ज्या कुणी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, करत असेल किंवा किमान स्वप्न जरी पाहत असेल, तर त्या लगेच नकारात्मक किडा त्यांच्या डोक्यात सोडतात. जसा येथे कमळाबाईच्या डोक्यात सोडला.
थोडक्यात मामा... ‘विकृत बुद्धी विनाशाय’!...अशा लोकांपासून जपून राहायलाच हवं."
आमचं संभाषण सुरूच होतं, तोवर महिलांचा समूह दारात येऊन थांबला.डॉ. स्वाती पाटील यांना मंडळाकडे घेऊन येताना आमच्या महिला कार्यकर्त्या — सौ. रुक्मिणी झुरे, सौ. जयश्री किब्बीले, सौ. अश्विनी माने, सौ. रंजना लोंढे, सौ. नंदा पाटील, सौ. जयश्री माने — यांची चालण्याची गती आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास अधिकच सुंदर दिसत होता. त्या माझ्या प्रत्येक भगिनींचे पती त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहत होते.
आज जणू प्रत्येक स्त्री मधली खरी वास्तव करत असलेली पण एव्हाना शांत असलेली नारीशक्ती जागी झाली होती. फक्त मान्यवरांच्या सहवासानेच त्यांनाही स्वतःमधल्या नारीशक्तीची जाणीव होत होती.
पूर्ण मनोभावाने आमच्या या महिला कार्यकर्त्यांनी मा. डॉ. स्वाती पाटील यांचे आरती ओवाळून, शाल-फेटा देऊन स्वागत केले. तो प्रसंग जणू क्षणभर स्तब्ध झाला होता.
डॉ. स्वाती पाटील मॅडम मंडळासमोर आल्या.मंडळाला वाकून, पायरीला नमस्कार केला आणि मग आत प्रवेश केला. त्यांच्या या साधेपणातला नम्रतेचा गुण प्रत्येकाला जाणवत होता. त्यांना पाहून इतर महिलाही तसाच नमस्कार करू लागल्या.
तेव्हा उंदीर मामा म्हणाला –"दादा, आपणही नेहमी अशाच आपल्या पेक्षा वरचढ लोकांच्या सहवासात असायला हवं ना?"
मी हसतच म्हणालो –"हो मामां! पण, सहवास नसेल तरी चालेल, किमान त्यांची सावली तरी आपल्यावर पडावी, इतकं तरी झालं पाहिजे. त्या शिवाय आपली प्रगती नाही. नाहीतर... अनेक कैकयी आपल्या मार्गात उभ्या आहेत."
उंदीर मामा हसत म्हणाला –
"हो दादा, कैकयीसारख्या लोकांपासून दूर राहिलो, तर स्त्रीशक्तीचा जागर व्हायला वेळच लागणार नाही!"
गणपती बाप्पा हे सर्व शांतपणे ऐकत होते... त्यांच्या डोळ्यांत समाधानाची चमक होती.
आरतीला सुरुवात झाली...श्री बुरांडे स्वामी पुन्हा त्याच जोशात मंत्रोच्चार करत, आरती म्हणत होते. सोबतच सर्व नारीशक्तींचा गजर दुमदुमत होता. वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालं होतं.प्रत्येक जण टाळ्या वाजवत, डोलत होता आणि बाप्पाचे भव्य रूप डोळ्यांमध्ये साठवत होता.या सर्व नारीशक्तींचा स्वर बाप्पांच्या कानांना मंत्रमुग्ध करत होता.
आरती संपली. नैवेद्य दाखवण्यात आला. प्रसाद वाटप सुरू झालं. प्रत्येक जण माझ्या या भव्य बाप्पापुढे स्वतःसाठी व इतरांसाठी काही ना काही तर मागणं मागत होतं. भक्तजणां मध्ये असलेली नवीन जोडपी त्यांना बाप्पा सारखाच पुत्र मिळूदे म्हणत होते, तसा नवस करत होते. तर दुसरीकडे त्याच मगाच्या छोट्या मुली उंदीर मामाच्या कानात काहीतरी कुजबुजत होत्या.
तेवढ्यात उंदीर मामा मला म्हणाले –
"मंडळ दादा, मी आता पाहिलं. इतक्या छोट्या मुली आणि तरुण मुली होत्या इथे. यांमध्येच मला उद्याच्या शूर जिजामाता, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी आणि कल्पना चावला दिसत होत्या."
मी हसून म्हणालो –
"हो मामा! आता प्रत्येकीने स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःमधील शक्ती जागवली पाहिजे आणि पुढे जायला हवं."
बाप्पा हसतच म्हणाले –"तथास्तु...!"
लगेच उंदीर मामा म्हणाले...."बाप्पांनी त्यांचा आशीर्वाद दिला आहे".
पुढील कामकाजाचे नियोजन असल्याने प्रमुख पाहुण्या लवकर जाण्याच्या तयारीत होत्या. तरीदेखील त्यांनी यथाशक्ती प्रत्येक शक्य तेवढ्या महिलांना वेळ दिला, मार्गदर्शन केलं. शिवाय मंडळाच्या सामाजिक कार्याला हातभार लागावा म्हणून मंडळास आर्थिक मदतही केली.त्यांच्या सामाजिक कार्याची झलक येथे स्पष्टपणे दिसून आली.त्या आता पुढील प्रवासाला जाण्यास तयार झाल्या. गाडीपाशी पोहोचल्या... आणि मागे राहिल्या त्या फक्त सुंदर आठवणी.
मी पाहत होतो... काही आया आपल्या मुलींच्या डोक्यावरून हार फिरवत होत्या. काही आपल्या मुलींना मान्यवरांकडे बोट दाखवत काही सांगत होत्या.....का कुणास ठाऊक..?, कोणीतरी आपल्या मुलीला घट्ट मिठीत पकडून ठेवत होतं.प्रत्येक जणी आपल्या-आपल्या विचारांना वाट करून देत होती. त्याच नजर काढणाऱ्या महिला डोळ्यात पाणी आणून पाहत होत्या. त्यांचे डोळ्यातले अश्रू गालावरून ओघळत खाली जमिनीवर पडत होते. वातावरण मागे अधिकच भावनिक झालं होतं.हे पाहून मी आणि उंदीर मामा दोघेही भावनिक झालो होतो...
तेवढ्यात मध्येच कुणीतरी जोरात ओरडले –
" आर ये .. चिकण्या ... . आज रातीला लाईटीच्या माळा लावायच्या हाईत नवका ..! तंवा उठ आता .. जा जिउन येजा मर्दा .. . "
कुठल्या ना कुठल्या कारणाने कामे बरीच अडकली होते सर्वांनाच घाई झाली होती.आता प्रत्येक जण आपापल्या घरी जाऊ लागला होता. पाठीमागे राहिलो होतो ते म्हणजे आम्ही तिघेच मी उंदीर मामा व माझा लाडका बाप्पा. मी बाप्पाकडे पाहिलं...बाप्पा नैवेद्याचं ताट ग्रहण करत होते.मग आम्ही दोघेही त्यांना सोबत देण्यासाठी पुढे झालो.
क्रमशः…