Onion garlic food thunderbolt? in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | कांदा लसन खाणं वज्र?

Featured Books
Categories
Share

कांदा लसन खाणं वज्र?

नवरात्रात कांदा लसून खाणं टाळावं?

         *आज आपण पाहतो की आज आजाराचं प्रणाम वाढलेलं आहे. कुणाला कोणताही आजार होतो आणि केव्हाही होतो. हे आजार भयानक स्वरुपाचे असतात व त्याचं योग्य निदान झालं नाही तर मृत्यू संभवतो. आजार हे अगदी लहान लहान मुलांना शिवतात. ज्यांचं निदान करणं कठीण जातं. त्यातच जास्त उष्णता वाढली की उष्माघात होतो व जास्त थंडपणा वाढला की लकवा मारतो. ज्यात उष्माघातानं बेशुद्ध पडल्यावर कांदा नाकाद्वारे सुंघविल्यास व्यक्ती शुद्धीवर येतो. त्याचं कारण कांद्यात उष्णता शोषून घेण्याचा गुणधर्म आहे. जो कांदा उष्माघातानं बेशुद्ध झाल्यास शरीरातील उष्णता शोषून घेवून त्या व्यक्तीला शुद्धीवर आणतो. तसंच लकवा मारलेल्या व्यक्तीची मालिश लसनाच्या तेलानं केल्यावर तो व्यक्ती सुधारतो. परंतु हे आजार आज जास्त प्रमाणात दिसतात. त्याचं कारण आहे आपले कांदा किंवा लसून हे घटक अति प्रमाणात खाणे. त्यातील एक पदार्थ जरी जास्त झाला तरी समतोल बिघडतो. म्हणूनच आपल्या पुर्वजांनी त्या वस्तू खाण्यावर बंधन आणलं. ज्याला अंधश्रद्धेची जोड दिली यात शंका नाही. त्याचा काळ ठरवला नवरात्र. महत्वपुर्ण बाब ही की त्या वस्तू नवरात्रच नाही तर केव्हाही काही काळ खाणं टाळावं म्हणजे झालं. ज्यातून आपलेच आरोग्य चांगले राहिल.*
          सध्या नवरात्र सुरु होत असून सगळीकडे धामधूम सुरु आहे. त्याचं कारण आजचा काळ पाहता भक्तीभाव कमी व मनोरंजनच जास्त आहे. तसं पाहिल्यास संबंधीत महिला वर्ग वेशभुषा नव्हे तर सोळा श्रृंगार करुन नवदुर्गेच्या मंदिरात जात असतात. त्यातच नवही दिवस त्या उपवास करीत असतात. या काळात घरी कांदा व लसून भाजीत टाकत नाही. ते पाप समजलं जातं. त्याचं वैज्ञानिक कारण दुसरं असलं तरी अंधश्रद्धाळू कारण आहे समुद्रमंथन. 
          समुद्रमंथन नेमकं काय व ते का केलं गेलं? समुद्रमंथन का केलं गेलं. त्याचं कारण आहे दुर्वासा ऋषींनी देवतांना दिलेला शाप. दुर्वासा ॠषी शिवजीच्या दर्शनाला जात असतांना वाटेत भेटलेल्या स्वर्गाधिपती इंद्रानं त्यांना वंदन केले. तसं पाहिल्यास त्या काळात ऋषींचं अलौकिक स्थान होतं व त्यांची शापवाणी खरी ठरत असे. तसं स्वर्गाधिपती इंद्रानं वंदन करताच दुर्वासा ऋषींनी त्याला पारिजातकाचं फुल बक्षीस दिलं. त्यावर स्वर्गातच पारिजात उपलब्ध असल्याने मला हे फुल कशाला? अशी भावना मनात आणून इंद्रानं ते फुल आपल्या हत्तीच्या पायात टाकलं. त्यानंतर हत्तीनं ते पायानं तुडवलं. जो ऋषी दुर्वासाचा अपमान होता. शेवटी उन्मत्त झालेल्या इंद्राला दुर्वासा ऋषींनी शाप दिला. म्हटलं की तुझं संपुर्ण राज्य जाईल. 
           ऋषी दुर्वासांनी दिलेला शाप. ज्यातून इंद्राचं राज्य गेलं. लक्ष्मी, पारिजात, ऐरावत अशा सर्वच वस्तू गेल्या. त्यातच सर्वात प्रथम ज्या हत्तीनं ते फुल पायाखाली तुडवलं. त्या हत्तीत तेजस्वी बल आलं व ते निघून गेलं. त्यातच त्याची शक्ती हीन होताच असूर जातीनं स्वर्ग जिंकून घेतला. ज्यात प्रश्न पडला की स्वर्ग असा दानवाच्या हातात जास्त दिवस राहाणं बरं नाही. त्यातच सर्व देवगण भगवान विष्णूकडे गेले. त्यांनी विष्णुला साकडे घातले व त्याचं कारण सांगून त्यावर उपाय विचारला. तद्नंतर विष्णू भगवान म्हणाले, 
         "चूक तर झालीच. घोडचूक झाली. आता यावर उपाय एकच. समुद्रमंथन. ते करुन त्यात असलेलं अमृत पिवून तुम्ही अमर व्हा व आपलं गेलेलं ऐश्वर्य व वैभव परत मिळवा. मला माहीत आहे की समुद्रात अमृत आहे."
          समुद्रमंथन करुन गेलेलं वैभव परत मिळवायचं ठरलं. परंतु समुद्रमंथन काही लहानशी गोष्ट नव्हती की ती फक्त देवगणच करु शकतील. ती करायला दानवांचाही सहभाग आवश्यक होता. मग ठरलं दानवांचाही सहभाग घ्यायचा. परंतु घेणार कसा? त्यातच श्रीहरी विष्णूंनी उपाय सांगीतला. तुम्ही दानवांना अमृत पिवून अमर होण्याची आस दाखवा. मग ते तयार होतील. त्यानंतर तीच गोष्ट देवगणांनी दुतांकरवी दानवांना सांगीतली व दानव गण अमृत लालसेनं समुद्रमंथन करायला तयार झाले.
          ते समुद्रमंथन. ज्यात वासूकीच्या देहाची दोरी बनविण्यात आली व मंदरांचल पर्वताची मथनी बनविण्यात आली व समुद्रमंथन सुरु झालं. ज्यातून पाणी ढवळलं जावून सर्वप्रथम विष निघालं. ज्यात प्रश्न पडला की अशा विषानं आपण सर्व मरणार. तेव्हा त्यावर उपाय म्हणून शिवभगवानाने ते विष गिळले. दुसरं रत्न निघालं कामधेनू. जी ऋषींना दान देण्यात आली. त्यानंतर निघाला उश्चश्रवा नावाचा घोडा. तो बली राजानं ठेवून घेतला. चवथे रत्न निघाले ऐरावत. जे इंद्रानं ठेवले. पाचवे रत्न कौस्तुभ मणी. जे भगवान विष्णूनं ठेवले. सहावे रत्न निघाले. कल्पवृक्ष व रम्भा नामक अप्सरा. जी देवलोकांची शान बनली. त्यानंतर निघाली महालक्ष्मी. जी विष्णू भगवानाचीच पत्नी बनण्यास तयार झाली. त्यानंतर वारुणी नावाची कन्या निघाली. जी असुरांना मिळाली. त्यानंतर चंद्रमा, पालिजात व शंख निघाले. ज्यातील पारिजात व चंद्रमा यांनी स्वर्गलोक निवडलं तर शंख विष्णू भगवानानं ठेवून घेतलं. सुरा निघाली. ती दानवांना मिळाली. शेवटी निघाले धन्वंत्तरी वैद्य. ज्यांच्या हातात अमृतकलश होता. जे असूरांनी हिरावलं व इथेच भांडण सुरु सुरु झालं. त्यातच दुर्वासा ऋषीच्या शापानं शक्तीहिन झालेल्या देवात एवढी ताकद नव्हती की जे तो अमृतकलश दानवांकडून हिसकावून घेतील. ते चूप बसले व दानवांचे लढणे पाहात बसले. तोच कुर्म अवतार घेवून आपल्या पाठीवर मथनी ठेवणारे विष्णू भगवान विचार करु लागले की जर हे अमृत राक्षसांनी प्राशन केलं तर अनर्थ होईल. वाईट विचार वाढतील. चांगले विचार नष्ट होतील. कारण चांगल्या गोष्टी या चांगल्याच विचारांच्या लोकांच्या हाती जायला हव्यात. कारण त्या काळात राक्षसांना वाईट विचारांचे व देवगणांना चांगल्या विचारांचे संबोधण्यात येत होते. शेवटी त्यांनी मोहिणी रुप धारण केलं. ज्या मोहिणीनं आपल्या तेजानं दानव व देवांना भुरळ पाडली. राहिला अमृतकलश जागच्याजाग्यावरच. 
         मोहिणी रुप धारण करताच त्या मोहिणीनं अमृतकलश आपल्या हातात घेवून देव व देवतांना रांगेत बसवलं. दानवही मोहिनीच्या इशाऱ्यावर चूप बसले. त्यांनी अमृतकलशाकडे लक्षच दिलं नाही. त्यातच त्यांचं लक्ष मोहिनीच्या कृत्याकडेही गेलं नाही. मोहिनी जेव्हा अमृताचं ती वाटप करु लागली. ज्यात तिनं अमृतकलश वाटपाची सुरुवात देवांच्या रांगेतून केली होती व ती एकेक करीत देवांनाच अमृत देत होती. ज्यातून एकेक देव अमर होत होते व सर्व दानव ते दृश्य पाहात चालले होते.
          ती अमृताची वाटणी. ते देवांना मिळणारं अमृत. त्यावर नजर ठेवणारे देवगण. ज्यात ते अमृत दानवांना अजिबात मिळू नये असं केलं गेलेलं नियोजन. दानवांना ही गोष्ट लक्षातच आली नाही. ते मोहिनीरुपावर भाळून भुलून गेले होते. त्यांचं अवधान हे अमृतकलशावरुन विचलीत झालं होतं. शिवाय अमृत हे चांगल्या विचारांच्या माणसांनाच मिळावं. वाईट विचारांच्या माणसांना नको. ही चालच होती व ती चाल स्वरभानू नावाच्या राक्षसाला समजली. त्यानं देवाचं रुप धारण केलं व तो देवांच्या रांगेत जावून बसला. ज्याला अमृत मिळालं व ते अमृत त्यानं प्राशन केलं. परंतु ते अमृत प्राशन करीत असतांना ते सुर्यानं ओळखलं व त्यांनी सुचना दिली की हे अमृत स्वरभानू नावाच्या राक्षसानं प्राशन केलेलं आहे. ते ऐकताच चांगूलपणाचा विचार करणाऱ्या विष्णूनं त्या राक्षसाची मान कापली. ज्यातून धड वेगळं व मुंडकं वेगळं झालं. शेवटी या मुंडक्याची छिन्नभिन्न अवस्था हचवू नये म्हणून धड सोडून त्या स्वरभानूचं अमर झालेलं मुंडकं पळून जायला लागलं. ज्यातून त्या मुंडक्यातून रक्त वाहात होतं. ज्या रक्ताचे थेंब खाली सांडत होते. ते पृथ्वीवरही सांडत होते. ज्या एका थेंबातून लसून व दुसऱ्या थेंबातून कांदा या अन्नघटकाची निर्मिती झाली असं म्हटलं जातं.
         कांदा व लसून हे रक्तमिश्रीत असुरांच्या रक्तातून उगविलेली झाडं. ज्यात अमृताचा एक अंश होता. जे दोन्ही पदार्थ खाल्ले की आरोग्य चांगलं राहातं. असं आपल्या पिढीतील लोकांचं म्हणणं. म्हटलं जातं की लसून हे प्रतिकारशक्ती वाढवतं व कांदा हे अन्नाचं पचन करतं. अन्नाचे पचन करणे व पोट साफ होणे ही गोष्ट चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. त्यातच प्रतिकारशक्ती वाढणं म्हणजेच कोणताच आजार शरीराला न शिवणं आहे. त्यामुळंच ते पदार्थ खाणे गरजेचे आहे व ते पदार्थ खायलाच हवेत. परंतु ते पदार्थ नवरात्रीच्या काळात खाणे टाळले जाते. त्याचं कारण सांगीतलं जातं की ज्यावेळेस महिषासूराचं युद्ध नवदुर्गेसोबत सुरु होतं. त्या काळात लोकांनी उपवास ठेवले. सात्वीक आहार ग्रहण केला. चांगले विचार ठेवले. ज्यातून नवदुर्गेला प्रेरणा मिळाली व तिला बळ आलं. ज्यातून महिषासूराचा वध झाला. आजही तीच परंपरा सुरु असून आजही काही मंडळी नवरात्र पाळतात. ते देवीला बळ यावं म्हणूनच. आख्यायिका आहे की जो या काळात सात्वीक राहतो. ज्यातून चांगली शक्ती निर्माण होते व ती निर्माण झालेली चांगली शक्ती नवदुर्गांना महिषासूर नावाच्या दैत्याशी लढायला प्रेरणा देते. त्यातच बळही देते. बदल्यात जेव्हा युद्ध समाप्त होते अर्थात दैत्य महिषासूर मरतो. त्यानंतर देवी नवदुर्गा ज्यांनी ज्यांनी त्या काळात देवी नवदुर्गेला बळ यावं म्हणून जे जे काही केलं. त्यांना आशीर्वाद देते. शिवाय असंही मानलं जातं की ज्यांनी ज्यांनी या काळात कांदा आणि लसणाचं सेवन केलं. ते त्यांनी पाप केलं. कारण त्याचं सेवन केल्यानं महिषासूर नावाच्या दैत्यालाच जोर येत होता. त्यामुळंच ते पापच झालं. या गोष्टीमुळे नवरात्र निघून गेल्यावर देवी अशा वस्तू खाणाऱ्या मंडळींना आशीर्वाद देत नाही. असं जुन्या पिढीतील लोकांचं म्हणणं. तसं पाहिल्यास कांदा लसून खायला आपल्या जुन्या लोकांची मनाई नाही. फक्त हा नवदिवसांचाच काळ तेवढा त्याज्र मानला जातो.
          कांदा लसून या काळात खाणं वाईट. त्यात तथ्य काय आहे ते माहीत नाही. परंतु लोकं अशा गोष्टी मानत नाहीत. त्यांना भाकडकथा असं म्हणतात. परंतु या भाकडकथा नाहीत. ज्या आपल्या पिढीतील जुन्या लोकांनी सांगीतल्या. कदाचित त्यात काहीतरी सार लपलेले आहे. कदाचित लसून हे उष्णतावर्धक असल्यानं अति उष्णता शरीरात निर्माण होवू नये वा कांदा हे शीतवर्धक असल्यानं अती थंडपणा शरीरात निर्माण होवू नये. त्यातच आपल्या शरीरात नियंत्रणात्मक शक्ती निर्माण व्हावी म्हणून लसून व कांदा खाण्यावर आपल्या पिढीतील लोकांनी बंधनं घातली असतील. परंतु यावर लोकं म्हणतात की हाच काळ का की कांदा लसून खाणं वज्र. त्यावर सांगणं एवढंच असेल की कोणत्यातरी निमित्यानं आपल्याला अशा वस्तू खातांना बंधन पाळता येतं. ज्यात आपली जीभही नियंत्रणात असावी. हा त्यामागील हेतू. जसं श्रावण महिन्यात मांस खाणं टाळलं जातं. कारण जरी मांस हे शरीराला ताकद देत असेल तरी तो काळ हा साथीच्या रोगांचा काळ असतो. ज्यातून प्राणीही आजारीच असतात. अशा आजारी प्राण्यांच्या मांसातून आपल्याला आजार होवू नये. म्हणून पावसाळ्याचा हा दोन तीन महिन्याचा काळ मांस मटन खाण्यास त्याज्य समजला जातो. एवढंच नाही तर फळ आणि भाजीपालाही या काळात खाण्यास त्याज्रच समजलं जातं. त्याचंही कारण आहे फळ व भाजीपाल्यावर या काळात रोग असणं. ज्यातून वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या नावानं हेच महिने पाळले जातात. जसा हिंदूत श्रावण, जैन धर्मात चातुर्मास, व बौद्ध धम्मात वर्षावास. तसंच आहे कांदा, लसनाचं. या दोन पदार्थातील शास्रीयपणा लोकांना पटत नसल्यानं त्याला अंधश्रद्धेची जोड दिली व म्हटलं की ते स्वरभानू नावाच्या दैत्याच्या थेंबातून तयार झाले. तसंच म्हटलं की हे खाण्यानं दैत्यांना जोर येतो. 
           महत्वपुर्ण बाब ही आहे की कांदा, लसून न खाणं. ज्यात अंधश्रद्धा नसायलाच हवी. परंतु लोकं असं कुणाला खावू नका सांगीतल्यावरही ते अलबत खातात. ते पाळत नाहीत. ज्यातून रोग होतात. म्हणूनच आपल्या पुर्वजांनी त्या पाश्र्वभूमीवर अंधश्रद्धा आणली व सांगीतलं की कांदा, लसूण खाणं वज्र करा काही दिवस खाण्यातून. कदाचीत शरीरात नियंत्रीत शक्ती निर्माण करण्यासाठी. कदाचित या गोष्टीवरुन आपल्या पुर्वजांना आपली किती काळजी होती. ते दिसून येते. विशेष म्हणजे कदाचित या वस्तू न खाण्यामागे विज्ञान असून त्याला अंधश्रद्धेची जोड न देता काही दिवस त्या वस्तू खाण्याचा मोह टाळावा. जेणेकरुन आपल्याच शरीराचे उष्णता निर्माण करणारे वा थंडपणा निर्माण करणारे घटक नियंत्रणात येतील व आपलंच आरोग्य सुदृढ होईल. हे तेवढंच खरं.

           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०