parmeshvarashi Anusandhan in Marathi Motivational Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | परमेश्वराशी अनुसंधान

Featured Books
Categories
Share

परमेश्वराशी अनुसंधान

               "परमेश्वराशी अनुसंधान"

  परमेश्वराशी अनुसंधान ठेवणे आवश्यक आहे. परमेश्वरावर आपला दृढ विश्वास हवा. त्या परमेश्वराच्या चैतन्याचा स्पर्श व्हावा ही आस मनात बाळगावी. तो परमेश्वर आपल्या निकटच असतो. फक्त त्याला रामनामातून सतत साद घालणं मात्र आवश्यक असतं. नामसाधनेच्या महत्त्वात समर्थ तल्लीन होऊन गात राहातात, त्यांचं वास्तविक तेच कारण असतं. भक्ताच्या हृदयातल्या नामस्मरणाच्या घंटा सतत निनादत राहाव्या लागतात. हा मनुष्यजन्म पूर्वसुकृताने लाभला आहे. त्या मनुष्यजन्माचे सार्थक नामसाधनेत साठलेले आहे याची जाणीव सतत होणे आवश्यक आहे. समर्थ आपल्या मनाला ही देवजाणीव सतत करून देतात. इतर प्राणीसृष्टीला परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव अजिबात नाही. परंतु माणसाला मन आहे. आपल्या आत्म्याची जाणीव आहे. नामसाधना हे मनुष्यजन्माचे उत्कट सार्थक आहे. परंतु भोगाच्या विळख्यात सापडलेल्या दुर्दैवी जीवांना हे कधीं लक्षातच येत नाही. सामर्थ्य आपल्या या अपूर्व मनाच्या श्लोकांमधून रामनामाचा जप म्हणूनच अखंड चालू ठेवतात. रामनामाचा महिमा एवढा अगाध आहे की प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा या आपल्या भक्तांपुढे साकार होतो.          विठोनें शिरीं वाहिला देवराणा ।        तयां अंतरीं ध्यास रे त्यासि नेणा ।        निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी ।        जीवां सोडवी राम हा अंतकाळीं ।।    प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी एक वेगळा विचार मांडला आहे. ते म्हणतात की, पंढरपुरातल्या पांडुरंगाने श्रीशंकराला आपल्या माथ्यावर धारण केले आहे. त्या श्रीशंकराला मात्र प्रभु श्रीरामचंद्रांचा ध्यास लागला होता. पंढरपुरात श्रीविठ्ठलाच्या चरणांना मिठी मारणाऱ्या वारकऱ्यांना याची जाणीव आहे. मग ज्या श्रीशंकराला श्रीविठ्ठलाने माथ्यावर धारण केले त्या शंकराची रामभक्ती किती तीव्र होती हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण एवढा वैराग्यसंपन्न तपस्वी श्रीशंकर, त्याचा दाह मात्र ज्या रामनामाने नष्ट झाला, त्या श्रीरामाची महती कितीही सांगितली तरी ती पूर्ण होणार नाही. समर्थ म्हणतात की, म्हणूनच रामनामाचा ध्यास लागणे, अंतःकरणात श्रीरामाचे नुपूर वाजणे आवश्यक आहे. जो स्वतः रामनामाने शांत झाला त्या शंकरानेच जणू सांगितले आहे की, सततच्या रामनामाने मनुष्याला अंतःकाळी श्रीराम सोडवतो. त्याची जन्ममृत्युच्या अटळ फेऱ्यातून सुटका करतो. श्रीरामाचे सान्निध्य मात्र त्यासाठी असावं लागतं. थोडक्यात समर्थ म्हणतात की, प्रापंचिक माणसाला आपले अंतसमयीचे दिवस सुखाचे जावेत असे वाटत असेल तर अखंड रामनामाच्या अनुसंधानात राहिलं पाहिजे. अंतःकरणात एकदा नामजप अनुसंधानाची अंतरज्योत पेटली की साधक नामस्मरणाच्या पंचकल्याणी घोड्यावर आरूढ      झालाच म्हणून समजा !       नामस्मरण हा एक अलौकिक असा ध्यास आहे. स्वतःला विसरून परमेश्वरी अस्तित्वात विरघळून टाकणारी ही एक अमोघ अशी  शक्ती आहे. या नामस्मरणाला लौकिकसृष्टीतली काहीही गोष्ट लागत नाही. कसलेही श्रम त्यात नसतात. तीर्थावर जावे लागत नाही. यमनियमांच्या आठ पायऱ्यांवर रेंगाळावे लागत नाही. किंबहुना बसल्या जागेवर या तोलचक्राशी आपलं मन जोडून दिलं की रामनामाच्या अपूर्व गुंफा आपल्यासाठी मोकळ्या होतात. परमात्म्याशी अनुसंधान साधण्याचा तो एक दिव्य मार्ग आहे. मनातल्या आशा – निराशांचा खेळ केवळ या नामस्मरणातच नष्ट होतो. आपल्या चहूअंगाने केवळ आनंद पसरू लागतो. हे केवळ स्वानुभवाने जगणे असते. ईश्वरप्राप्तीच्या महामार्गावर नामस्मरणाचे वायूवेगाने दौडत नेणारे हे पंचकल्याणी घोडे आपली वाट पाहात उभे असतात. केवळ नामस्मरणाच्या या पंचकल्याणी घोड्यांवर अंतःकरणपूर्वक आरूढ झालं की आपण सुसाट जातो. ईश्वरी अस्तित्वाची खूण जाणवायला लागते. जीवाचा दाह शांत करून परमेश्वरीं सावलीची घनदाट माया केवळ हे नामस्मरणच देते. त्या नामस्मरणासंबंधी, रामनामाच्या अखंड जपासंबंधी समर्थ म्हणूनच सतत बोलत राहातात.  समर्थ प्रस्तुत ठिकाणी म्हणतात की, योगेश्वर असलेल्या श्रीशंकरालासुद्धा रामनामाच्या अखंड जपातून आराम मिळाला, शांती मिळाली. विषप्राशनामुळे उत्पन्न झालेल्या देहाच्या ज्वाला शमत नव्हत्या, त्या केवळ श्रीरामाच्या अखंड चिंतनाने शांत झाल्या. उमा आणि महेश हे दोघेही वास्तविक रामचिंतनात अहोरात्र दंग असायचे. श्रीरामाचे त्यांना वेड लागले होते. त्यामुळे त्या एका श्रीरामजपाचा एवढा प्रचंड परिणाम झाला की, अमृतमंथनाच्या वेळचे ते विष  शंकराने केवळ नामजपाने पचवले. या नामजपाची ताकद स्वतः श्रीशंकराने अनुभवली. म्हणूनच समर्थ म्हणतात या रामनामाची महती कितीही व्यक्त केली तरी समाधान होत नाही. प्रभु रामचंद्रांच स्मरण सर्वसामान्य माणसांच्या जीवनात संजीवनी घेऊन येते. सर्व आयुष्य तर चांगले जातेच, परंतु आयुष्याचा अंत जेव्हा जवळ जवळ येतो तेव्हा प्रभू रामचंद्र आपल्या भक्तांची सुटका जन्ममरणाच्या फेऱ्यातून करतात. आपल्याला या रामनामाने सहजगत्या मोक्ष मिळतो. म्हणून या श्रीरामाला सतत स्मरत राहावं, आठवत राहावं आणि आपल्या अंतकरणात ईश्वर नामानुसंधान साठवत राहावं.                       ____________________________                         मच्छिन्द्र माळी, छत्रपती संभाजीनगर