येथे बलात्कारासाठी बाई हवी आहे… कोणतीही चालेल! in Marathi Women Focused by AVINASH DHALE books and stories PDF | येथे बलात्कारासाठी बाई हवी आहे… कोणतीही चालेल!

Featured Books
Categories
Share

येथे बलात्कारासाठी बाई हवी आहे… कोणतीही चालेल!

“येथे बलात्कारासाठी बाई हवी आहे… कोणतीही चालेल!”

©® - अविनाश भिमराव ढळे 
       - All rights reserved

   सभ्यतेचे, संस्कृतीचे, सक्षम  न्यायव्यवस्थेचे दावे करणाऱ्या या देशात एखादा प्रश्न अजूनही धगधगत राहतो स्त्रीच्या सुरक्षिततेचा. आज ज्या सहजपणे आपल्याला बलात्काराच्या बातम्या वाचायला मिळतात, त्या इतक्या दैनंदिन झाल्या आहेत की जणू त्या समाजाच्या जीवनाचा भागच बनून गेल्या आहेत. याच वास्तवाला एक प्रखर व्यंग्यात्मक चपराक देईल असा प्रश्न उभा राहतो  “येथे बलात्कारासाठी बाई हवी आहे…!कोणतीही चालेल!” 
हा प्रश्न जितका क्रूर वाटतो, तितकाच तो वास्तवाच्या जवळ आहे. कारण आजपर्यंत या प्रश्नाला थेट उत्तर देण्याऐवजी आपण समाजरचनेच्या मुखवट्याखाली लपवून ठेवली गेलेली सत्येच जगत आलो आहोत.
स्त्री कोणतीही असावी, अशी या अपराध्यांच्या आणि या कुचकामी व्यवस्थेच्या नजरेतली निकषविरहित मागणी आहे. स्त्री भोळी असो की वेडी, हुशार असो की निरक्षर; घरंदाज असो, व्यावसायिक असो किंवा नोकरदार; कार्यकर्ती असो की शेतमजूर - तिची ओळख, तिचं शिक्षण, तिचं स्थान या समाजाला कधीच महत्त्वाचं नव्हतं. कारण अपराध्यासाठी ती फक्त एक ‘उपलब्ध वस्तू’ आहे. जातीची अट नाही, घराण्याची अट नाही; वयाची तर नाहीच नाही. जन्मलेल्या बाळापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत जगलेल्या वृद्धेपर्यंत कोणतीही बाई समाजाच्या विकृतीला कधीही उपलब्ध असू शकते, अशीच भयंकर परिस्थिती आपण निर्माण केली आहे.
वस्त्रांचा प्रश्न तर या माणुसकीच्या मृत्यूमधला सर्वात मोठा ढोंग आहे. साडी घातली म्हणून सुरक्षित, जिन्स घातली म्हणून उच्छृंखल, नववारीने आदर्श, पंजाबीने आधुनिक अशा विचित्र सामाजिक कल्पना आजही अश्लीलपणे मिरवल्या जातात. पण वास्तव स्पष्ट सांगतं—कपडे कधीच बलात्काराचं कारण नव्हते आणि नसतील. बाळवता घातलेली बालिका बलात्काराची बळी होते, नववारीतील गृहिणी अत्याचार सहन करते, जिन्समधील विद्यार्थीनी छळाची शिकार होते, आणि कामाला गेलेल्या मजुर स्त्रीची शरीरानिशी अब्रू फाडली जाते. कारण प्रश्न कपड्यांचा नाही, तर विकृत मानसिकतेचा आहे आणि या मानसिकतेला आपणच समाज म्हणून वाढवून, बळ देऊन, संरक्षण देत आलो आहोत.
अत्याचारांच्या पद्धतींचे वर्णन करण्याची वेळ आली हेच आपल्या संस्कृतीच्या मृत्यूचे चिन्ह आहे. नैसर्गिक-अनैसर्गिक, बळजबरी, धमक्या, दारू पाजून केलेले प्रकार, हातपाय मोडून केलेली हिंसा, एकामागून एक ‘नंबर’ लावणारी भयंकर पशुतासमान प्रवृत्ती आज सर्वकाही या शब्दांत गुंतलं आहे. स्त्रीचे लचके तोडण्याची वृत्ती एखाद्या भक्ष्याला गिळणाऱ्या पशूंत असते, पण मनुष्यजातीत असणं ही काळाची विदारक शोकांतिका आहे.
अत्याचारानंतर मात्र एक हमी समाज नक्की देतो “तिला न्याय मिळणार नाही.”

मृत्यूच्या भीतीने थरथरणारी, आयुष्यभर जखमा सावरणारी स्त्री न्यायालयाच्या पायर्‍या चढताना पुन्हा पुन्हा अपमानित होते. तक्रार देण्यापासून ते न्याय मिळेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तीच तपासली जाते की ती खरी आहे का? काय घातलं होतं? कुठे चालली होती? कोणाला ओळखत होती? तिच्याच जीवनाला संशयाच्या भोवऱ्यात टाकून अपराध्यास मात्र संपूर्ण संरक्षण दिलं जातं.
अपराध्यांसाठी न्यायव्यवस्थेची व्याख्या वेगळीच. मानवी हक्कांच्या नावाखाली त्यांना ढाली मिळतात. राजकीय संरक्षण मिळतं. सुरक्षा मिळते. चौकशीला विलंब केला जातो, पुरावे ढासळतात, आणि शेवटी न्यायव्यवस्थेच्या हातूनच अपराधी सुटतात. समाजही त्यांच्या बाजूने ‘गोष्ट संपवून’ टाकतो. पीडितेला मात्र आयुष्यभर ‘शरमेची’ शिक्षा मिळते.
अत्याचारी सुरक्षित आणि अत्याचार सहन करणारी? कायम न्यायासाठी धडपडणारी.
अशा वेळी देशभर आंदोलने होतात. मेणबत्त्या जळतात. रस्त्यावर घोषणाबाजी होते, सोशल मीडियावर चळवळी उठतात. काही दिवस या आगीचा धूर दिसतो, पण नंतर सगळं शांत होतं. अपराध कमी होत नाहीत, प्रशासन बदलत नाही, न्यायव्यवस्था सुधारत नाही.
आणि त्या Z+ सुरक्षेत राहणाऱ्या ‘अपराधी संस्कृती’चा चेहरा पुन्हा निर्दयतेने हसतो.
दर तीन मिनिटांना एका स्त्रीवर अत्याचार होतो—ही एक आकडेवारी नाही, तर समाजाची मृत्युघंटा आहे.
घामेजणारी कामगार स्त्री, सजणारी तरुणी, घरी जाणारी विद्यार्थीनी, कार्यालयातून परतणारी नोकरदार महिला, शेतीकाम करणारी अडाणी बाई त्यांच्यासाठी सुरक्षिततेची हमी देणारी व्यवस्था या देशात नाही हे आपण थेट मान्य केलं पाहिजे.
तरीही, या सर्वांत एकच गोष्ट भारावून टाकते स्त्रीच शेवटी उभी राहते.
तिच्या शरीरावर, मनावर, आयुष्यावर झालेले घाव घेऊनही तीच न्यायालयात उभी राहते. तीच समाजाला प्रश्न विचारते. तीच चळवळी उभ्या करते. तिच्या अश्रूंमधूनच समाजाचे सुने कान जागे होतात. तिने केलेल्या लढ्यातूनच संविधानाच्या कलमांना नवा अर्थ मिळतो.

ती कोण ?

रानात हरवलेली वावटळ नव्हे,
तर माझ्या देशातल्या भीषण भीतीला
छातीशी ठेवून धडधडणारा प्रश्न आहे!
वादळाचा तुकडा नव्हे, 
तर दारूच्या दुर्गंधीने,
राजकारण्यांच्या संरक्षणाने,
आणि न्यायाच्या गंजलेल्या दारांनी
तुडवलेली एक जळजळीत वेदना!
तिच्या देहाचा बाजार मांडणारे
पुरुष नावाचे गजिदे
माणुसकीच्या चितेवर
काळ्या सावल्यांसारखे उभे आहेत.

आणि मी?
पुरुष असूनही,
या नरभक्षक संस्कृतीला
थेट छातीवर हात ठेवून प्रश्न विचारतो!

कधी बाळवता, कधी नववारी,
कधी जिन्स, कधी पोलका, कधी साडी…
कपड्यांच्या लेबलात
गुन्हा शोधणाऱ्या
त्या निर्लज्ज नजरा
तिचा ओरखडलेला आत्मा पाहायलाही तयार नसतात.
ती कोण तर एक शरीर?
अरे थुंकीही वाया जाईल अशी तुझी विचारसरणी!

ती शरीर नाही,
ती शपथ आहे
माझ्या देशाने घेतलेली,
आणि आज कुणीच न पाळलेली!

तिच्याच वेदनांना
तिच्याच तोंडात कोंबून
न्यायालय ओरडतं “पुरावे?”
काय पुरावा हवा आहे?
तिचा फाडलेला श्वास?
की तिच्या थरथरणाऱ्या पावलांवरचा
अजूनही सुकला नसलेला काळ?
आणि ती?
तगतच राहते.
दगडावर धावणाऱ्या पाण्यासारखी
तुटते, फुटते, पण संपत नाही.

मी “पुरुष” आहे
पण माणूस आहे म्हणून
ही कविता लिहितोय.
कारण माझ्या घरात,
माझ्या गावात,
माझ्या देशात
एका स्त्रीचा ओरडणारा आवाज
हा फक्त तिचा नाही,
माझ्या मर्दानगीचाही पराभव आहे!

मी पुरुष आहे,
म्हणून लढतोय,
भीतीने नव्हे,
तर अपराध्यांच्या छातीत
धडधड निर्माण करावी म्हणून.
मी पुरुष आहे, 
आणि म्हणूनच म्हणतो "
स्त्रीवर हात टाकणाऱ्याच्या नरकात
पहिली ज्योत मी पेटवेन!"

स्त्री ही फक्त अत्याचाराची शिकार नसते ती व्यवस्थेला हादरे देणारी शक्तीही असते.
आज प्रश्न असा आहे की आपण कोणत्या दिशेने उभे आहोत? आपल्याला मेणबत्त्या जाळणारा समाज व्हायचं आहे, की या व्यवस्थेच्या गंजलेल्या दारांना लाथ मारून उघड करणारा? बलात्काराची प्रत्येक घटना हा केवळ गुन्हा नाही; तो समाजाच्या अपयशाचा, विवेकबुद्धीच्या मृत्यूचा, आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा मोठा पुरावा आहे.
स्त्री ही ‘मिळणारी’ नव्हे, तर राष्ट्राची निर्माती आहे. तिच्या सुरक्षिततेशिवाय देशाची प्रगती, संस्कृती, न्याय हे शब्दच अर्थहीन आहेत.
तिला वस्तू बनवणारं समाजशास्त्र बदललं पाहिजे, तिच्यावर अन्याय करणारी मानसिकता संपली पाहिजे, आणि अपराध्यास भीती वाटेल अशी न्यायव्यवस्था उभी राहिली पाहिजे.
जोपर्यंत या देशात  “येथे बलात्कारासाठी बाई हवी आहे…कोणतीही चालेल”  ही मानसिकता जिवंत आहे, तोपर्यंत आपण सभ्यता, संस्कृती, प्रगती या शब्दांचा उच्चार करण्याचं नैतिक सामर्थ्यच गमावून बसलो आहोत.
पण जेव्हा एक दिवस समाजाचा विवेक पुन्हा जागा होईल, व्यवस्था निर्भय बनेल, न्याय वेळेवर आणि कठोर मिळेल.
तेव्हा ही जाहीरात कायमची फाडली जाईल.
स्त्रीची प्रतिष्ठा पुन्हा उभी राहील.
तो दिवस येण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे. 
आणि हा संघर्ष स्त्रीचा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे.

-----------------------
 अविनाश शांताबाई भिमराव ढळे 
( एक अश्वस्थामा )
कवी, लेखक, साहित्यिक
मो. नं. ८२९१३६८३३६