"लालपरीत भेटलेली आई"
©® - अविनाश भिमराव ढळे
- All rights reserved
लालपरी…
ती फक्त एक बस नाही.
ती चालती-बोलती कहाणी आहे.
जुन्या सीट्सवर बसलेली थकलेली माणसं, खिडकीबाहेर धावणारा काळ आणि आतमध्ये साचलेली असंख्य आयुष्यं. प्रत्येक प्रवासी आपली एक वेदना, एक आशा, एक अपूर्ण कथा घेऊन बसलेला असतो. काही कथा शब्दांत व्यक्त होतात, काही नजरेतून उमटतात, तर काही थेट हृदयात खोलवर रुतून बसतात.
त्या दिवशी मी लालपरीत बसलो होतो. प्रवास फार लांबचा नव्हता, पण मनाच्या अंतरावर तो आयुष्यभराचा ठरणार आहे, याची कल्पनाही नव्हती.
माझ्या शेजारी एक आज्जी बसलेली होती. अंगावर साधी, झिजलेली साडी; पायात थकलेली चप्पल; हातात एक छोटीशी कापडी पिशवी. चेहरा सुरकुत्यांनी भरलेला, पण त्या सुरकुत्यांत आयुष्यभराच्या कष्टांची, त्यागाची आणि मूक सहनशक्तीची अक्षरं कोरलेली होती.तिचे डोळे मात्र फार खोल होते. जणू आयुष्याने तिला खूप काही दाखवलं होतं, पण तिने ते कुणालाच सांगितलं नव्हतं.
बस सुरू झाली. इंजिनचा आवाज वाढला, रस्ता मागे सरकू लागला. आज्जी खिडकीबाहेर पाहत होती. पण तिची नजर झाडांवर नव्हती, गावांवर नव्हती. ती बहुधा आठवणींच्या रस्त्यावरून प्रवास करत होती.
क्षणभर शांतता होती. ती शांतता अस्वस्थ करणारी होती. नकळत मी विचारलं
“आज्जी, कुठं निघालीस?”
ती हळूच माझ्याकडे वळली. चेहऱ्यावर क्षीणसं हसू उमटलं.
“निघाले शांताच्या घरला…”
ते नाव मला ओळखीचं वाटलं नाही. सहज प्रश्न पडला.
“शांता कोण? तुमची लेक आहे का?”
क्षणभर तिचा श्वास अडखळला. डोळ्यांत काहीतरी तरळून गेलं.
“शांता माझी मैतरीन हाय… माझी लेक-बिक कोण न्हाय.. मेलेत सगळे…”
ते शब्द इतक्या सहजतेने बाहेर पडले की त्यामागचं दुःख किती खोल असावं, हे समजायला वेळ लागला. “मेले सगळे” हे शब्द तिने बहुधा स्वतःला हजारो वेळा सांगितले असावेत, म्हणून ते इतके बोचत नव्हते; पण ऐकणाऱ्याच्या काळजात मात्र खोलवर रुतत होते.
मन सुन्न झालं. मी पुन्हा विचारलं..
“असं का म्हणताय आज्जी? मुलगा-मुलगी कोणी तरी असेलच ना?”
ती काही क्षण गप्प राहिली. मग अगदी शांतपणे म्हणाली,
“हायती… पण कोणी कामाचे नाही. एक मुलगा हाय, एक सासुरवाशीण लेक हाय… पण कोणीच सांभाळत नाही..”
त्या वाक्यात ना राग होता, ना तक्रार. फक्त एक थकलेली स्वीकृती होती. जणू आईपणाचं ओझं शेवटपर्यंत उचलायचं असतं आणि बदल्यात काही अपेक्षा ठेवायच्या नसतात, असा तिचा स्वतःशीच केलेला करार होता.
माझ्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. आई म्हणजे घर, आई म्हणजे आधार, आई म्हणजे सावली हे शब्द पुस्तकी वाटू लागले. इथे एक आई होती, पण तिच्याकडे घर नव्हतं.
थोड्या वेळाने मी विचारलं..
“मग मैत्रिणीकडेच का निघालात आज्जी?”
या प्रश्नावर मात्र तिच्या चेहऱ्यावर वेगळाच उजेड आला.
“म्या आयुष्यात माणसं लय कमावली आहेत. माझा सांभाळ कोणी ना कोणी करतंच. शांता कड चार रोज राहीन… परत निघेल कुठं तरी. सरकारनं मोफत परवास दिला, लय चांगलं केलं बापा आमच्यासाठी.”
त्या वाक्यात जगण्याचं धैर्य होतं. स्वतःच्या लेकरांकडून आधार न मिळालेला माणूस आजही समाजावर विश्वास ठेवून जगत होता. तिच्यासाठी मैत्री म्हणजे नातं होतं आणि माणुसकी म्हणजे घर.
मनातला एक प्रश्न थांबवेना.
“मुलगा का सांभाळत नाही तुम्हाला?”
ती नजर खाली झुकवत म्हणाली,
“माझ्याच संस्कारात कमी पडली आसन म्या कुठं तरी…”
ते शब्द म्हणजे स्वतःला दोष देणारी आई होती. जिचं आयुष्य लेकरांसाठी झिजण्यात गेलं, ती शेवटपर्यंतही स्वतःलाच दोषी धरत होती. आई कधीच तक्रार करत नाही; ती फक्त सहन करते.
मी म्हणालो,
“काही नाही आज्जी. आपण मस्त खाऊन-पिऊन, मस्त राहायचं.”
खूप विचार करून माझ्या विचारांची घालमेल होत होती.. मी अचानक भानावर आलो आणि खिशातले पाचशे रुपये काढून तिच्या हातात ठेवले.
“हे ठेवा, काहीतरी खायला घ्या.”
ती गडबडली. हात मागे घेत म्हणाली,
“नको रे बाबा… म्या अजून खमकी हाय..!"
मी आग्रह धरला. शेवटी तिने पैसे घेतले. तिचा हात थरथरत होता. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला.
“देव तुझं भलं करो…”
माझ्या नास्तिक मनाला ही कुठेतरी बोचनारी वाक्य होती पण आणि आजीचे शब्द मनाला घाव घालणारी होती...
तो स्पर्श म्हणजे आईचा स्पर्श होता. जन्म देणारी आई नसली, तरी मायेची उब तितकीच खोल होती.
थोड्याच वेळात आज्जी उतरली. उतरतानाही तिने मागे वळून पाहिलं. तिच्या नजरेत आभार होते, पण त्याहून अधिक एक न बोललेला प्रश्न होता.
बस पुढे निघाली. रस्ता बदलला. प्रवास सुरूच राहिला. पण माझं मन मात्र तिथेच थांबलं.
त्या आज्जीचं दुःख फक्त तिचं नव्हतं. ती एकटी नव्हती. अशा कितीतरी माता आज लालपरीत, रेल्वेत, वृद्धाश्रमात आपलं उरलेलं आयुष्य काढत आहेत. ज्यांनी लेकरांसाठी आपलं आयुष्य अर्पण केलं, त्या शेवटी कुणासाठी तरी ओझं ठरतात.
आपण “संस्कार” या शब्दाचा मोठा गवगवा करतो. पण ते संस्कार नेमके कुठे हरवतात? आई-वडील जिवंत असताना वेळ नसतो आणि मेल्यावर फोटोला हार घालतो.
त्या दिवशी मला एक कटू सत्य समजलं..
आईला फार काही नको असतं.
थोडा वेळ, दोन शब्द मायेचे आणि “आई” म्हणून ओळख.
पण जेव्हा तेही मिळत नाही, तेव्हा ती आई म्हणते..
“म्या माणसं कमावली आहेत.”
त्या वाक्यात जगण्याचं धैर्य आहे, पण त्याहून मोठं अपयश आपलं आहे.
कारण ज्या मातेला लेकरं कधीच ओझं वाटली नाहीत,
तिलाच शेवटी स्वतःचं अस्तित्व हलकं वाटू लागणं...
यापेक्षा अधिक हृदयद्रावक सत्य दुसरं कोणतं असू शकतं?
------------------------------------
अविनाश शांताबाई भिमराव ढळे
( एक अश्वस्थामा )
कवी, लेखक, साहित्यिक
मो. नं. ८२९१३६८३३६