एक मोठ्या शहरात सुंदरा नावाची एक मुलगी होती, जिला स्वतःच्या रूपाचा खूप गर्व होता. तिला असे वाटायचे की तिचे रूप खूप आकर्षक आहे. ती रोज स्वतःला आरशात पाहून म्हणायची, “मीच माझ्या रूपाची राणी आहे.”
पण एक दिवस तिने अशी एक परिस्थिती पाहिली, ज्यामुळे तिच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली. सुंदरा शहरात राहत होती, तर तिचे आजी-आजोबा गावात राहत होते. एक दिवस तिच्या आजी-आजोबांनी तिला गावात येण्याचा संदेश दिला.
सुंदरा पहिल्यांदाच गावी गेली होती. गावात गेल्यावर तिला मनमंदिरा नावाची एक मुलगी भेटली, जिला पोलिओ होता. मनमंदिरा खूप गरीब होती; पण तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि तिचे हसमुख सौंदर्य वेगळेच होते.
तेव्हा सुंदराने मनमंदिराला पाहून विचारले,“तू इतकी आनंदी कशी आहेस? तुझ्याकडे तर काहीच नाही, तरीसुद्धा तू इतकी आनंदी कशी आहेस?”
तेव्हा मनमंदिराने उत्तर दिले,“माझ्याकडे काहीच नाही; पण माझ्याकडे आत्मविश्वास आहे, माझे हसू आहे आणि माझ्या जीवनावर माझा विश्वास आहे. मी माझ्या रूपाची राणी नाही; पण मी माझ्या आत्म्याची आणि माझ्या जीवनाची राणी आहे.”
हे ऐकताच सुंदराला मनमंदिराच्या शब्दांचा खूप मोठा धक्का बसला. तिला क्षणातच जाणवले की रूप हे काहीच नसते; तो फक्त एक दिखावा असतो. खरे तर आत्मविश्वास आणि निर्मळ मन हेच सर्वकाही असते.
त्या दिवसापासून सुंदरा मनमंदिराला रोज भेटू लागली आणि त्या दोघींमध्ये खूप चांगले मैत्रीचे नाते निर्माण झाले. त्या एकमेकींबद्दल आपले विचार शेअर करू लागल्या.
सुंदरा मनमंदिराला म्हणाली,“तुझे मन खूप मोठे आहेस आणि तू एक खूप चांगली मुलगी आहेस. तू मला भेटली नसतीस, तर मी नेहमी माझ्या रूपाचा गर्व करत राहिले असते. मी खूप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी वेगळी मैत्रीण मिळाली, जिने मला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितला.”
त्यावर मनमंदिरा म्हणाली,“सुंदरा, तूही खूप चांगली मुलगी आहेस. फक्त तुला थोडे समजून घेण्याची गरज होती. रूप हे सगळे काही नसते. कधी कधी एखादा माणूस फक्त रूपावर प्रेम करतो; पण त्याला त्यापेक्षा चांगले कोणी मिळाले, तर तो नातं तोडतो. मात्र काही लोक असेही असतात, जे आपल्याला रूप न पाहता आपल्या मन आणि स्वभावावरून निवडतात. त्यामुळे रूपाचा गर्व करू नये. आपले मन चांगले नसेल आणि स्वभाव उद्धट असेल, तर आपल्याशी कोणीही जास्त काळ टिकणार नाही.”
हे सर्व ऐकून सुंदराने विचार केला की आत्मविश्वास आणि सकारात्मकता स्वतःमध्ये कशी निर्माण करता येईल, हे तिने शिकले पाहिजे. तिला हळूहळू जाणवू लागले की ती स्वतःच्या रूपाचा अति गर्व करून बरेच काही गमावून बसली होती.
सुंदरा मनमंदिराला म्हणाली,“तुझे मी मनापासून आभार मानते. तू मला माझ्या जीवनाचा अर्थ समजावून सांगितलास आणि माझ्या जीवनाला एक नवीन दिशा दिलीस. मी आता माझ्या मनाची आणि आत्मविश्वासाची राणी बनेन.”
हळूहळू सुंदराच्या वागण्यात बदल दिसू लागला. ती आता लोकांकडे केवळ त्यांच्या बाह्य रूपावरून पाहत नव्हती, तर त्यांच्या विचारांकडे आणि स्वभावाकडे लक्ष देऊ लागली. इतरांशी बोलताना ती अधिक नम्र आणि समजूतदार झाली होती. तिला जाणवले की खरे सौंदर्य हे चेहऱ्यावर नसून मनात असते. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन असल्यास कोणतीही व्यक्ती सुंदर वाटू शकते, हे तिने मनमंदिराकडून शिकले होते.
गावातून शहरात परतल्यानंतरही सुंदराने मनमंदिराने दिलेला संदेश विसरला नाही. तिने आपल्या जीवनात आत्मविश्वास, साधेपणा आणि माणुसकी या मूल्यांना महत्त्व देण्याचा निश्चय केला. ती आता इतरांना मदत करण्यासाठी पुढे येऊ लागली आणि गरजू लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. मनमंदिरासारख्या व्यक्तींच्या सहवासामुळे जीवनाचा खरा अर्थ समजतो, हे सुंदराला उमगले आणि ती खऱ्या अर्थाने एक चांगली माणूस बनली.
या कथेच्या माध्यमातून आपल्याला एक महत्त्वाचा बोध मिळतो की बाह्य रूप हे क्षणभंगुर असते, पण आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि निर्मळ मन ही मूल्ये कायमस्वरूपी असतात. केवळ सौंदर्यावर गर्व करणारी सुंदरा मनमंदिराच्या सहवासामुळे अंतर्मुख झाली आणि तिने स्वतःमध्ये खरा बदल घडवून आणला. जीवनात यशस्वी आणि आनंदी व्हायचे असेल, तर केवळ रूपावर नव्हे तर आपल्या विचारांवर, स्वभावावर आणि कृतींवर भर दिला पाहिजे.
"खरे सौंदर्य हे चेहऱ्यात नसून माणसाच्या मनात असते, हेच या कथेचे अंतिम आणि अमूल्य शिकवण आहे."