Koundan Parv ek - 4 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 4

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 4

" परत असला प्रकार घडला तर आम्हाला कडक कारवाई करावी लागेल. हुशार आणि गुणी मुलगी म्हणून नाव आहे तुमच्या मुलीचं. तिने असं वागावं असं अपेक्षित नाहीये. त्या मुलाच्या आई वडिलांना झाला प्रकार व्यवस्थितपणे सांगितला आहेच आम्ही. पण तुम्ही सुनेत्राला देखील समजावून सांगा. परत हे क्षम्य नसेल. " प्राचाऱ्यांच्या ऑफिसमध्ये माझे वडील आणि सुनीचे वडील आमच्यासमोर उभे राहून प्राचाऱ्यांची बोलणी खात होते.

पहिल्यांदाच तक्रार ऐकण्यासाठी तिच्या बाबांना बोलवण्यात आलं होतं. कारणं सुनीने प्रकारच असा केला होता. तिच्याकडून अशी कृती माझ्या कल्पनेपलीकडची होती... शिवाय.. ते तिने केलं त्याला कारण मी होतो... सुनीने क्षणात माझ्या मनातल्या भीतीचे निराकरण केले होते. माझ्या इतकं महत्वाचं तीला अख्या शाळेत कोणी नव्हतं. पण चुकी तिचीच होती असं नाही. तीला राग आला त्याचं कारणं होतं.....

🍁🍁🍁🍁

शाळा सुरु होऊन आता दोन महिने झाले होते. एकदा रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. मी त्यादिवशी एकटाच शाळेतून घरी निघालो होतो. सुनी तिच्या मैत्रिणींच्या ग्रुप सोबत येत असावी. मी रस्त्यावर चालत असताना मधेच एक भाग लागला जिथे विटभट्ट्या होत्या. खड्डे पडलेल्या रस्त्यावरून जायला जागा नव्हती. मी कसाबसा कडेने चाललो होतो. रस्त्यावर भट्टीच्या लाल मातीच चिखल मिश्रित पाणी पसरलं होतं. 
मी थोडा भिजत चालत माझ्या नादात असताना अचानक थंड पाण्याचे मोठे सपके मला बसू लागले.

मी रस्त्याशी साचल्या पाण्यापाशी आलोच होतो. चार जणांनी पाण्याच्या कडेला सायकली लावल्या होत्या. माझ्याकडे मागचं चाकं आणून त्यांनी उभ्यानेच पॅडल मारायला सुरुवात केली.  दोन ह तुकडीतले आणि दोन माझ्या आत्ताच्या वर्गातले समर आणि अभिजित. माझ्याकडे वळून बघत माझी खिल्ली उडवत हसत होते.
" जाड्या, लठ्या भिजला. " असं ओरडत ते पटकन सायकलवर उड्या मारून बसले आणि निघून गेले.

माझ्या भुवयांमधून सुद्धा चिखलाचे पाणी ठिबकत होते. खोडी हा प्रकार मी समजू शकत होतो. पण त्यासाठी दोन वेगळ्या वर्गातली मुलं एकत्र येऊन माझ्या एकट्याचीच पद्धतशीर खोडी काढणं मला काहीसं वेगळं वाटलं. मी तिथेच खोखोच्या डांबासारखा काही क्षण उभा होतो. काहीवेळाने डबल स्टॅंडच्या सायकलवर जाणारा सचिन मला बघत हलकं हसत हळूहळू माझ्या समोरून गेला. त्याने काही माझ्यावर पाणी उडवलं नाही. पण द्वे्षाचा अदृश्य चिखल तो उडवताना मी बघत होतो. 

🍁🍁🍁🍁

मी घरी आलो. आल्या आल्या आईचा ओरडा खाल्ला. माझा अवतार चिखलात लोळलेल्या टोणग्यासारखा दिसत आहे. असा आरसा आईने दाखवला. नखशिखान्त चिखलमय शरीर  कपडे आणि दप्तर बघून माझ्या आईने कपाळावर हात मारून घेतला.

ट्युशनची वेळ झाली. पण मला त्यादिवशी जाऊ वाटेना. खूप शिंका येत होत्या. एकतर धुळीची ऍलर्जी होती मला. त्यात चिखल नाका तोंडात गेला म्हणाल्यावर शिंकेचे अटॅक येऊ लागले. थांबेनात. मी हैराण झालो होतो. डोळे नाकं तोंड लाल झालं होतं शिंकून शिंकून.

मला बोलवायला सुनी आली. मी आपला माझ्या खोलीत कसाबसा स्वाध्यायची वही संपवत बसलो होतो. माझं दप्तर धुवून सुकायला ठेवलं होतं. सगळी वह्या पुस्तके पण फॅनखाली सुकत होती. त्यांना पण काही ठिकाणी माती लागलेली दिसत होती.

" जाडू चल." तिचा आवाज आला तसा मी तिच्याकडे बघितलं. 

" अगं आज नको. मी नाय येत. मला जरा बरं नाही वाटत. " मी म्हणालो.

" का? काय झालंय? बराच तर दिसतोयस. चल की. " ती म्हणाली.

मी काही बोलणार इतक्यात मातोश्री आल्या खोलीत. " चांगलं बचकभर चिखलाचं पाणी तोंडात घेऊन आलाय आज शाळेतून. कुठे लोळत पडलेला असतो देव जाने. नसेल बरं वाटत आता. जरा लक्ष देत जा ग या ठोंब्याकडे." आई म्हणाली.

" पण तू शाळेतून निघताना तर ok होतास. मी तुझ्या फारतर पाचेक मिनिट मागे असेन. तेवढ्यात इतकं चिखलात कुठे जाऊन लोळलास तू? खरं खरं सांग जाडू.." सुनी म्हणाली.

"अगं कोणीतरी पाणी उडवून गेलं म्हणतोय. मला तर नाही वाटत. बसला असेल खेळत चिखलात. माहिती आहे नां आपल्याला चिखल माती नाही सहन होत. तरीसुद्धा नाही तसली मस्ती करायची. बसतो शिंकत मग. डोक्याला वात आणलाय कार्ट्याने.. स्वतः भरला ते ठीके दप्तर घाण होईपर्यंत समजलं नाही त्याला. इतका कसा मंद आहे. "मातोश्रीनी परत आणखी भर घातली.

सुनीने माझ्याकडे तिरक्या नजरेने संशयित पणे बघण माझ्यासाठी खरं लपवणं अवघड करत होतं. आई बाहेर गेली तशी सुनी माझ्याजवळ आली.

" अय.. काय झालं? कोणी उडवलं पाणी? खरं सांग." तिने विचारलं.

" अगं असं काय विचारतेस..? पावसाळ्यात उडायचंच पाणी अंगावर.. सायकलिंवर कितीतरी जणं जात असतात. मी कशाला कोणाला पाहत बसलोय. गेला उडवणारा उडवून." मी म्हणालो.

" हे एवढं भिजे पर्यंत? सायकल उडवते का एवढं पाणी?" ती म्हणाली. 

मी गप्पच बसलो. मी पुढं काही बोलत नाहीये असं बघून ती गेली.

दुसऱ्यादिवशी मी शाळेत आलो. ग्राउंड वर चिखलामुळे प्रार्थना होत नव्हती. त्यामुळे सरळ सगळे वर्गातच यायचो. सुनी त्यादिवशी मला निघताना दिसली नाही. मला आत आलेला बघताच अभिजित आणि समर माझ्याकडे भुवया उडवून हसू लागले. मी सरळ जागेवर गेलो आणि बेंचवर बसतच होतो. तितक्यात हातात शाळेतल्या बागेत असणारी जड बादली घेऊन सुनी लगबगीने आत आली. सगळे स्तब्ध झाले होते. तिच्या चेहऱ्यावर आलेला करारी फणकारा बघत मी धास्तावलो. ही काय करत होती?

काही क्षणात तिने समरला गाठला आणि त्याच्या अंगावर बादलीतला सगळा ऐवज भिरकावला. तो चुकवण्यासाठी बाकीचे पटकन सरकले. तरीही अभिजित आणि सचिनच्या अंगावर राडा उडालाच. सगळे 440 volts च्या धक्क्याने शॉक झाले होते.

"त्याच्या नादाला पुन्हा लागशील ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही सांगून ठेवते." सुनी समरच्या अंगावर रिकामी बादली उगारून ओरडत होती. समरच्या अंगावर, कानात, नाकात, डोळ्यात सगळ्या बेंचवर आणि आजूबाजूला चिखल उडाला होता. सुनीला पल्लवी आणि स्नेहा ने धरून ठेवले होते. तर समरला सचिन आणि अभिजितने धरले होते. त्यांच्याही अंगाला चिखल लागला होता.

सुनीच्या गोऱ्या, पण आत्ता तापून लाल झालेल्या चेहऱ्यावर भयानक राग पसरला होता.  तिच्या मस्तकाची तापलेली निळी शीर तडतड उडत होती. 

" खुन्नस धरायचीये तर सरळ धर ना.. माझ्या मित्राला का मध्यें घेतो शेळपट कोल्ह्या... थोबाड फोडून ठेवेन परत त्याच्याकडे पाहिलंस तर.." सुनीचं तोंड आवरत नव्हतं. ती बडबड करत वर्गाच्या बाहेर जाऊन बादली फेकून आली.

सुनीने माझ्यावर झालेला प्रकार अशा तर्हेने मनावर घेतला होता. तिने बरीच चौकशी करुन माझ्यासोबत काय झालंय ते उकरून काढलं. मी तीला काही सांगणार नाही हे तीला वाटण्याईतपत ती मला समजून घेते याचा मला आता खूप आनंद वाटत होता. पण तिची ही टोकाची कृती भीतीदायक होती. असला उग्र पणा तिच करू जाने. 

मग काय पुढल्या कारवाई साठी घरी पत्र आणि मग घरच्यांना पाचारण.. आमची मैत्री सर्वमान्य असल्यामुळे तसा घरच्यांना फार काही समजवायचा प्रश्न नव्हता. पण सुनीच्या कृतिबद्दल तीला बोलणी मात्र खावी लागलीच.

"बरं तर बरं नुसता चिखल उडवला त्याने.. जाडूला हात लावला असता तर डोक्यात बादली घातली असती त्याच्या." संपूर्ण प्रकरणाच्या शेवटी सुनीने हे सुभाषित म्हणून त्याचा अंत केला.

🍁🍁🍁🍁

"तुझ्या रागाचा दाह 
जर इतका तीव्र असेल
तर तुझ्या प्रेमाची शीतलता
किती सुखद असेल..

हा प्रखर भाव फक्त
माझ्याचसाठी राहिल का?
फक्त माझ्याच रंगानी
तुझा अवकाश रंगेल का?"

- क्रमशः

शब्दभ्रमर 🍁🍁