Jaya Dev Tari - Part 4 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | जया देव तारी - भाग 4

Featured Books
Categories
Share

जया देव तारी - भाग 4

जया व तारी - भाग ०४

वैद्यबुवानी नाडी परीक्षा केली. मग ते म्हणाले की, मुलगा  मंद बुद्धी  आहे. मेद फार वाढलेला आहे. मी उपचार करतो पण शंभर टक्के गुण येईल याची शाश्वती नाही देता यायची. आता आहे त्यापेक्षा खूप सुढारणा होईल एवढे मात्र नक्की.  असे निदान करून  त्याच्या खाण्यापिण्याचे  कोष्टकच वैद्यानी करून दिले. तसेच सकाळ संध्याकाळ चलन वलन होण्यासाठी काय काय हालचाली करून घ्यायच्या तेही समजावून सांगितले. दोन वर्षे नेमाने वैद्यबुवानी आखून दिल्याप्रमाणे कार्यवाही केल्यावर मात्र  येशा हिंडाफिरायला लागला. बोलताना मात्र तो लागे..... काही काही शब्द तो असे उच्चारी की तो काय गल गल करतोहे त्याचा उलट होईना. कोणीतरी तो मुंज केल्यावर सुधारेल म्हणून सांगितले. 

           हल्ली खोत कायमच झोपून असत. म्हणून यशवंताची मुंज घरच्या घरीच छाटछूट उरकण्यात आली. येशाची मुंज झाल्यावर आलेल्या अवसेच्या ताणाला  खोतांचा दमा  भलताच उसळला. त्यावेळी  खारेपाटणला नव्यानेच खडपेकर डॉक्टरांचा दवाखाना सुरू झालेला होता. घोडेपोईच्या  बाऊ मुसलमानाची स्पेशल होडी पाठवून खडपेकर डॉक्टराना हळयात आणलेनी. डॉक्टर  आले तेंव्हा म्हाजन गतीलाच लागलेला होता. नाडी बघितल्यावर डॉक्टरानी  ते ओळखळेनी. शंभू देसायाला बाजूला घेवून त्यानी स्पष्ट कल्पनी दिली की, जेमतेम आजची रात्र जाईल.... त्यानंतरचा काही भरवसा नाही. दोन देवसाची औषधे  देवून डॉक्टर निघून गेले. त्यानी दिलेले चाटण चाटवल्यावर खोतानी जरा  डोळे उघडलेनी. पण संध्याकाळी त्याना उर्ध्व लागला आणि  उत्तररात्री कधितरी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. ते आजारी असल्यापासून दिवस-रात्र दोन  दोन गडी त्यांच्या दिमतीली ठेवलेले होते. रातपाळीचा एक गडी पहिला कोंबडा झाल्यावर जागा होवून इराकतीला जावून आला. आत आल्यावर त्याने  कंदिलाची वात मोठी करून खोतांकडे  नजर केली. सताड उघडे  डोळे नी कलंडलेली मान बघूनच तो समजला. त्याने सोबत्याला उठवले. दोघानीही  खोतांच्या छातीवर कान टेकून  खात्री करून घेतली. ओसरीवरचे दोन्ही लामणदिवे पेटवले आणि  खोतांच्या बायकोला हाक मारली. 

                खोत गेले आणि सगळा कारभार शंभू देसायाच्या कबज्यात आला. खोताच्या माघारी  वारस तपास करण्याचा   मोका साधून  खोतीणीला फसवून घरभाट नी वाडा वगळता बाकीच्या जमिनी आपल्या नावे बक्षिसपत्र करून घेतले.  यशवंता सात वर्षाचा. त्यात त्याच्याकडे पावली कमी. खोतीण कितीही झाली तरी बाईल माणूस. त्यात कामाला येणाऱ्या चार कुळवाडणी आणि खोतांबद्दल आदर असणारे  गडी  वगळता  गावात तिचा कोणाशीच लागाबांधा नव्हता. तरीही  वाडा आणि  वाड्यातली इष्टेट सहजासहजी  बळकावणे  शक्य नव्हते. खोतीण तरूण होती तिला वश करून घेवून कबजा मिळवणे हा एक पर्याय होता. पाताळयंत्री शंभू देसायाने त्या  दिशेने पावले टाकायला सुरूवात केली. त्याची चाल लक्षात आल्यावर खोतणीने रात्रीच्यावेळी सोबतीसाठी म्हणून कायमची कुळवाडीण ठेवली. खोतणीच्या  पलंगा जवळ कुळवाडीण झोपलेली असे. त्यामूळे शंभू देसायाचा नाईलाज झाला.  

                 खोत गेले त्यावेळी  देवस्थानात दात्यांची वरसल सुरू होती. त्यानंतर श्रावणापासून  खोतांची वरसल सुरू झाली. गावात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे तर देवस्थानावर कब्जा मिळवायला हवा हे ओळखून आपला दरारा  निर्माण करण्यासाठीच शंभू देसायाने गाभाऱ्याला कुलूप घालायची चाल खेळली होती. त्याचा हेतू  काही अंशी साध्य  झाला. दात्यांची नित्यपूजा बंद झाली. पण पुऱ्या गावात  त्याच्या विषयी असंतोष निर्माण झालेला होता. खोताची इष्टेट प्रॉपर्टी  तो गिळंकृत करणार याचे  अनेकाना वैषम्य वाटत होते. हा कोण कुठचा  देसाई  सापा सारखा  खोताच्या कारभारात शिरला आणि आता गावात दरारा निर्माण करून गाव कबज्यात घेवू पहातो आहे हे लोक ओळखून होते. खोत हे पूर्वसत्तेचे मानकरी. लोकांच्या मनात त्यांच्या बद्दल आदर होता. पण देसायाचे पारिपत्य जनलोक म्करू शकत नव्हते. 

                  त्याकाळी  अशी वहिवाट होती की, खोतांच्या वारसाना, मग तो अज्ञान मूल असेल तरी दादा- भाऊ असे आदराने संबोधायचा रिवाज असे. अगदी कुटूंबातले लोक सुद्धा हा रिवाज पाळीत. यशवंताला ‘भाऊ” असे संबोधित. पण खोत वारले आणि देसाई  त्याला येशा असे एकेरी संबोधायला लागला. उलट त्याच्यापेक्षा चार  पाच वर्षानी मोठा असलेला त्याचा मुलग़ा, त्याला अनंतराव म्हणून संबोधायची रूढ  सुरू केली. वाड्यावर वावरणारे गडी, पैरी  सुरूवातीला येशाला भाऊ म्हणत पण देसायाची माणसं  त्याला सरसहा हिडीसफिडीस करीत. शंभू काहीना काही निमित्त काढून  येशाला  बदडीत असे. मुळात येशाला  पाचपोच कमी होता. त्याचा वेडसरपणा लगेच ओळखू यायचा. शंभू देसायाला तर तो थरकाप घाबरायचा. वाड्यात फिरतानाही  येशा चावरा बोका  होवून  भेरकटासारखा इकडे तिकडे  बघायचा. त्यामुळे सगळेच त्याची टिंगल करायचे. गावात मात्र  लोक त्याला मान देत. कुळवाड माळवाडही तो समोर  आला की रामराम  जय गोपाळा  करून‘ येवा खोतानो ’ असे पुकारीत.  

           ईश्वराचा उत्सव सुरू  झाला. करवत काठी धोतर नेसून डोकीला  जरीबुटीचा रुमाल बांधून. खांद्यावर  उपरणे टाकून धोतराचा सोगा हातात घेवून खोताच्या रुबाबात देवळात गेला. लोक गाभाऱ्या समोर पुराण ऐकायला बसले.दात्ये त्यांच्या मानाच्या खांबाला टेकून बसले. शंभू देसाई खोतांच्या मानाच्या  खांबाला टेकून बसले आणि खुळा येशा त्यांच्या बाजूला बसला.  चिंतू जोशी  पीठावर बसले आणि पुराण सुरू झाले. पुराण संपल्यावर महाजन बुक्क्याचे ताम्हन घेवून पुढे जात आणि पुराणिकबुवांच्या कपाळावर बुक्का लावून  त्याना नमस्कार करीत. मग पुराणिक बुवा म्हाजनांच्या कपाळावर बुक्का लावीत.त्यानंतर सभामंडपात बसलेल्या श्रोतृवृंदाच्या  कपाळी बुक्का लावल्यावर हर हर महादेव असा घोष करीत श्रोते उठत असत.(क्रमश:)