तोतया वारसदार
पात्र रचना
निशांत - शोधकर्ता
नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर
विनय - अनिलचा मुलगा सातारा.
श्रीरंग -महादेवराव - सखारामपंत – रंगनाथ – कावेरी –
श्रीरंग
शंकरन - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.
विश्वंभर - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.
माधव - विश्वंभर – राजाराम – माधव.
वसुंधरा - माधवची बायको.
चिन्मय आणि विवेक - माधव ची मुलं.
हेमांगी - चिन्मयची बायको.
भाग ७०
भाग ६९ वरुन पुढे वाचा .......
जेवण झाल्यावर शंकरन आपल्या हॉटेल वर गेला. बाकी मंडळी हॉटेलच्या दारात जरा वेळ बोलत बसली.
“तुला काय वाटतं निशांत?” – सारंग.
“१०० टक्के गोखले. याने पण संपत्ति नाकारली. गोखल्यांच्या पंगतीत अगदी फिट बसतो आहे.” – निशांत.
“अरे हो, एक सांगायचंच राहिलं. एक पत्र आलं आहे, आणि खरं म्हणजे मी ते दाखवायलाच आलो होतो. पण इथे वेगळीच स्टोरी सुरू होती, मग मी विसरून गेलो. पण आता दाखवतो. इंट्रेस्टिंग पत्र आहे.” – सारंग.
सारंग सरांनी निशांतला पत्र दाखवलं.
“हे तर जाहिरात वाचून पाठवलेलं पत्र आहे. म्हणजे अजून एक गोखले!” – निशांत.
“काय लिहिलं आहे पत्रात? वाच न जरा, आम्हालाही कळू दे.” – विनय
निशांतने पत्र वाचायला सुरवात केली.
“महोदय,
आपली टाइम्स मधे आलेली जाहिरात वाचली. पत्रा मधे महादेवराव वेळणेश्वर यांच्या वंशजा बद्दल माहिती मागवली आहे. तुम्ही कुलवृत्तांत लिहित आहात का? जर असाल, तर खालील माहिती तुम्हाला उपयुक्त ठरू शकते.
महादेवरावांना चार मुलं आणि दोन मुली.
मुलांची नावे. – सखाराम, विश्वनाथ, कौशिक आणि दिनकर.
सखाराम - त्यावेळचे प्रसिद्ध वैद्य.
विश्वनाथ - गोकर्णला स्थलांतर आणि तिथल्या मंदिरात सेवा. आणि स्थायिक.
कौशिक – कुठलीच माहिती नाही.
दिनकर – माहिती नाही.
मुली – नर्मदा आणि गोदावरी. याव्यतिरिक्त माहिती नाही.
विश्वनाथला दोन मुलं आणि एक मुलगी.
मुलगी – कावेरी. कारवारच्या परांजप्यांच्या कडे दिली.
मुलं – ओंकार आणि श्रीपती
श्रीपती – गोकर्णालाच स्थायिक. मंदिरातला वारसा पुढे चालू.
ओंकार – साताऱ्याला स्थलांतर.
ओंकारला दोन मुलं गंगाधर आणि विश्वंभर
गंगाधर साताऱ्यालाच स्थायिक
विश्वंभर - शिवाजी महाराजांचे भाऊ संभाजी महाराज यांच्या सैन्यात होता. तंजावरला
स्थायिक. विश्वंभरला एकच मुलगा राजाराम
राजाराम – एक मुलगा माधव आणि एक मुलगी वैदेही. वैदेही बाल विधवा. माघारी आली.
माधव - माधवला दोन मुलं चिन्मय आणि विवेक. मी चिन्मय आणि विवेक माझा धाकटा भाऊ. माझं नुकतच लग्न झालं आहे. बायकोचं नाव हेमांगी. विवेकचं लग्न अजून व्हायचं आहे.
आशा आहे या माहितीचा तुम्हाला वृत्तांत तयार करतांना उपयोग होईल.
धन्यवाद.
आपला चिन्मय गोखले.
फोन नंबर देत आहे, जरूर वाटल्यास फोन करण्यास संकोच करू नये.
“अजून तीन गोखले. निशांत, जादूगार जसे आपल्या पोतडीतून एक एक वस्तु बाहेर काढतात आणि तरीही त्यांची पिशवी रिकामी होत नाही, तसंच झालंय. भराभर गोखले बाहेर पडताहेत. सुरवात केलीस तेंव्हा वाटलं होतं का एवढे सारे गोखले सापडतील म्हणून? सारंग म्हणाला.
सगळेच हसले. सारंग सर जे म्हणाले, त्यात खोटं काहीच नव्हतं.
“सर ८ तारखेला सर्व जमायला लागतील. या गोखल्यांचं काय करायचं? आपल्या जवळ वेळ अजिबात नाहीये. विश्राम काकांनी सुद्धा विश्वंभर हे नाव घेतलं होतं, आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं. हे गोखले पण जाहिरात वाचूनच संपर्क करतात, यांची चौकशी केंव्हा करायची? कसं कळेल आपल्याला की हे खरे आहेत म्हणून? का अजून एक सुभाष अवतरला आहे, असं समजायचं?” – निशांत.
“हो, सारंग सर हा नवीनच तिढा उत्पन्न झालेला दिसतोय.” – विनय.
“नाही, मला असं वाटत नाही. चार दिवसांपूर्वी ही अॅड त्यांनी वाचल्यावर लगेच हे पत्र पाठवलं आहे. ते तंजावरला राहतात. बबनचा आणि त्यांचा संपर्क होणं शक्यच नाही. त्यांना इस्टेटी विषयी काही कल्पना असणं संभवत नाही. विश्रामने विश्वंभरचा उल्लेख केला होता. हा माणूस, चिन्मय गोखले, याने वंशावळी अगदी करेक्ट दिली आहे. हा माणूस खोटा असू शकत नाही असं माझं मन सांगतं आहे.” – सारंग.
“तुम्ही म्हणता ते पटतंय मला, पण आता करायचं काय?” – निशांत.
“उद्याच सकाळी तू मुंबईला जा. तिथे चौकशी कर की तंजावरला कसं जायचं ते. ती फ्लाइट पकड आणि शक्यतो उद्याच तंजावरला पोहोच. परवा या चिन्मय गोखल्यांची गांठ घे आणि त्यांना ८ तारखेला इथे येण्या बद्दल राजी कर. जे काही तुला सांगायचं ते सांग, पण ते इथे आले पाहिजेत.” – सारंग.
“म्हणजे, पार्टी जेन्यूइन आहे, याबद्दल तुमची खात्री झाली आहे.” – निशांत.
“पूर्ण पणे नाही, पण बरीचशी. तू तिथे गेल्यावर तुला कळेलच. तू सुभाष प्रकरण वगळून बाकी तपशीलवार खरं कारण सांगीतलं तरी हरकत नाही. माझी अशी योजना आहे, की सगळे जमले की मग सुभाषला बोलवायचं आणि त्याचे दात त्याच्या घशात घालायचे. तो ड्रामा पाहिल्यावर, जर हा चिन्मय खोटा असेल, तर तसाच पळून जाईल. कारण त्यावेळेस इंस्पेक्टर धनशेखर पण उपस्थित असणार आहेत. मी त्यांना सर्व कल्पना दिली आहे. आणि त्यांनी हजर राहण्याचं कबूल केलं आहे.”
सर्वांना सारंग सरांची कल्पना आवडली. त्यांनी तसं बोलून पण दाखवलं. मग सारंग सर विनय आणि नयनाला म्हणाले,
“आता निशांत नवीन कामगिरीवर जाणार आहे, तेंव्हा तुम्हाला दोघांनाच आघाडी सांभाळायची आहे. समस्त गोखले मंडळी प्रथमदर्शनीच खुश आणि प्रसन्न झाली पाहिजेत. कुठलीही कसर ठेऊ नका. आपल्या रेप्यूटेशन चा प्रश्न आहे.” – सारंग.
“सर तुम्ही मुळीच काळजी करू नका. सर्व कामं पूर्ण झाली आहेत. आम्ही चार चारदा खात्री करून घेतली आहे. परवा पासून हॉटेल ची टीम येऊन त्यांना हवी तशी व्यवस्था करून घेणार आहेत. जर काही आमची मदत लागली तर आम्ही आहोतच. आम्ही त्यांना आयत्या वेळेस गोंधळ नको म्हणून, मॉक ड्रिल पण करायला सांगितली आहे. अजून काही तुमच्या मनात असेल तर सांगा.” – नयना.
सारंग सर खुश झालेत. त्यांनी विनय आणि नयनाला शाबासकी डिली, आणि ते निघाले. तयारी करायची आहे असं सांगून निशांत पण निघाला.
दुसऱ्या दिवशी रात्री निशांत तंजावरला पोचला. सकाळी सगळं आवरून, नाश्ता करून साधारण ११ वाजता, चिन्मयने दिलेल्या पत्त्यावर निशांत पोचला. चांगलाच मोठा बंगला होता, बाहेरच माळी झाडांना पाणी घालत होता. त्यालाच निशांतनी सांगीतलं की चिन्मय साहेबांना भेटायचं आहे.
“मोठे साहेब, चिन्मय साहेब, आणि विवेक साहेब हॉस्पिटलला गेले आहेत.” – माळी
“हॉस्पिटल कुठे आहे?” – निशांत. माळ्याने पत्ता सांगितला, पण निशांतला त्याचं मोडक तोडक हिन्दी समजेना.
“बाई साहेब आहेत का? त्यांनाच विचारतो त्या बरोबर सांगतील.” – निशांत.
माळ्याने बोलावल्यावर पन्नाशीची बाई बाहेर आली. ती बहुधा चिन्मयची आई असावी असा अंदाज निशांतनी बांधला.
“कोण तुम्ही? काय हवंय तुम्हाला?” – चिन्मयची आई.
“मी नागपूर वरुन आलो आहे. मला चिन्मय साहेबांना भेटायचं आहे.” – निशांत.
“काय काम आहे? चिन्मय हॉस्पिटल मधे गेला आहे.” - चिन्मयची आई.
“मी अॅडव्होकेट सारंग सरांचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. आम्ही टाइम्स मधे महादेवरावांच्या वंशा बद्दल एक अॅड दिली होती, त्याला चिन्मय साहेबांनी उत्तर दिलं होतं. त्याच संदर्भात मी भेटायला आलो आहे.” निशांतनी चिन्मयच्या पत्राची कॉपी मॅडमला दाखवली.
“हो बरोबर आहे, मला माहीत आहे. पण चिन्मयनी तर सगळं व्यवस्थित लिहून पाठवलं आहे. आता अजून काय माहिती पाहिजे आहे?” - चिन्मयची आई.
“आपण चिन्मय सरांच्या आई का?” – निशांत.
“हो वसुंधरा माझं नाव. पण तुम्ही नेमके कशाकरिता आला आहात ते सांगीतलं नाही.”
“सांगतो, पण आपण बसून बोलूया? तुम्ही किती वेळ उभ्या राहणार?” – निशांत.
“ठीक आहे.”- वसुंधराबाई म्हणाल्या आणि त्यांनी व्हरांड्यात खुर्ची आणायला सांगितली आणि आपण झोपाळ्यावर बसल्या.
“हूं, सांगा आता.” – वसुंधराबाई म्हणाल्या. माळ्याने पाणी आणून दिल. आणि निशांतनी बोलायला सुरवात केली. आतापर्यन्त निशांत जे काही दिसलं त्याचं निरीक्षण करत होता. आणि आता या वसुंधराबाईंशी बोलणं झाल्यावर तर त्याची खात्रीच पटली, की ही माणसं जेन्यूइन आहेत म्हणून. मग काही हातचं न राखता सर्व त्यांना सांगण्याचा निशांतनी निर्णय घेतला. पण म्हणाला,
“चिन्मयच्या आई, खरं सांगायचं तर, चिन्मय सरांनी फोन नंबर दिला आहे पत्रां मधे, पण विचारांती असं ठरलं की प्रत्यक्ष जाऊन बोललं तर महत्वाचे तपशील मिळतील. म्हणून मी नागपूर वरुन थेट इथे आलो.” – निशांत.
“माझ्या माहिती प्रमाणे, कुलवृत्तान्त लिहिणाऱ्यांना नेहमीच पैश्यांची कमतरता भासते. या छोट्याश्या तपशीला करिता तुम्ही इतका खर्च करता आहात हे नवलच आहे. तुम्ही फोन वरुन पण विचारू शकला असता.” – वसुंधराबाई.
“तुमचं म्हणण बरोबर आहे, पण आमचे सर, सारंग वकील, खूपच काटेकोर आहेत. त्यांना अगदी नि:संदिग्ध माहिती लागते. आणि तसंही देवाची कृपा आहे, भरपूर देणगीदार आहेत, अर्थात सर्व गोखलेच आहेत. आणि सर्वांचं मत आहे की काम अगदी परफेक्ट झालं पाहिजे. येणाऱ्या पिढ्यांना सर्वकष माहिती मिळाली पाहिजे. म्हणून हा प्रपंच.” – निशांत.
“ठीक आहे. पण आमची सर्व मंडळी आठाच्या खाली येत नाहीत.” – वसुंधराबाई.
“ओके, मग मी साडे आठ वाजता येतो. चालेल?” – निशांत.
“ठीक आहे. या.” – वसुंधराबाई.
निशांत रात्री साडेआठच्या ठोक्याला चिन्मयच्या घरी पोचला. वसुंधराबाईंनी थोडीशी कल्पना सर्वांना दिलीच होती. परस्परांची ओळख झाल्यावर, माधव म्हणाला,
“हूं, मग निशांतराव, प्रथम तुमच्या कामाचं स्वरूप आम्हाला कळलं तर बरं होईल. कारण आमचं अजूनही असं मत आहे की बारीक सारिक तपशीला करता कोणी नागपूर ते तंजावर असा प्रवास करणार नाही. तेंव्हा तुम्ही खरं काय आहे ते सांगा.”
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com