The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
वात "वात एकच… पण स्थळ वेगवेगळं!" "वात म्हणजे – स्वतः जळून इतरांसाठी उजेड करणाऱ्या श्रद्धेची शांत ज्योत!" देवळाच्या मागच्या खोलीत आज खूप गडबड होती. नवरात्र जवळ आलं होतं. सजावट, रंगोळ्या, देवाच्या आराशात नवीन वस्त्रं – सर्व तयारी सुरू होती. पण या सगळ्याच्या पलीकडे एका कपाटात, काही जुन्या, काही नव्या, काही चकाकणाऱ्या, काही गहिऱ्या तेलाने माखलेल्या दिव्यांचं आपसात संभाषण सुरू होतं. त्या कपाटात होते – पितळी समई, कंदील, पणती, नंदादीप, दीपमाळ, आरतीचं निरांजन, तुपाचा दिवा, आणि ताम्हणातील खास पूजा निरांजन. पहिली समई म्हणाली – “मी दिवसभर नाही, पण पूजेच्या वेळी देवाच्या उजवीकडे ठेवली जाते. चार वाती, सुंदर सजावट… सगळं वातावरण मी उजळून टाकते.” काठावरच्या पणतीने डोळे मिटले. तिचं रूप साधं. ती म्हणाली – “मी रोज लागते – तुळशीपुढे. आईचं devotion मला उमगलंय. माझा प्रकाश लांब जात नाही, पण तिच्या प्रार्थनेत मी सहभागी असते. हे पुरेसं आहे.” कंदील हसत म्हणाला – “मी लक्षवेधी असतो. दिवाळीत घराच्या बाहेर झळकतो. पण दिवाळी संपली की मला कपाटात टाकून दिलं जातं… चारच दिवसांची झगमग.” दीपमाळ म्हणाली – “लोक कौतुक करतात वरच्या दिव्याचं, पण खालचे दिवे कोणीच पाहत नाही. प्रत्येक वातीमध्ये तसंच तेल, तसंच जळणं असतं – पण उजळणं मात्र वेगवेगळं दिसतं.” नंदादीप शांतपणे म्हणाला – “मी अखंड जळतो. मला ही सगळे नमस्कार ,करतात असे नही.पण मी देवाच्या बाजूला सतत तेवत असतो – त्याचं अंधारातलं एकटेपण मिटवणारा.” तेवढ्यात, कोपऱ्यात शांत बसलेला तुपाचा दिवा आवाजात मिस्कीलपणा घेऊन म्हणाला – “माझं काही खास नाही. पण मला जेव्हा एखाद्या व्रतासाठी, संकल्पासाठी लावलं जातं, तेव्हा घरातले लोक खरं मनापासून काहीतरी मागत असतात. माझ्या जळण्याला उद्देश असतो – काही तरी खरं साध्य करायचं!” आणि मग ताम्हणातील तुपाची निरांजन बोली माझं रूप स्वच्छ, त्यात साजूक तूप, आणि एक वातींचं टोक. त्याचं भाषण शांत, पण ठाम – “माझा उपयोग फक्त आरतीच्या वेळेस पण फार कमी वेळा होतो – विशेष पूजेसाठी. पण तेव्हा मी दिव्यत्वाचं प्रतीक असतो. "माझा क्षण छोटा असतो… पण त्या क्षणी देव डोळ्यांदेखत असतो, भक्त हातात धरून मला घडवतात, घंटानाद, टाळांचा ठेका – त्या वेळी मी फक्त प्रकाश नाही – मी 'ऊर्जा' असतो." “माझा वेळ आरतीपुरता. पण त्या क्षणी देव समोर असतो, भक्त हातात घेतात, आणि घंटा वाजते – त्या क्षणी मी एक वेगळीच ऊर्जा देतो.” माझं महत्त्व कमी वेळाचं असलं, तरी ती वेळ माझ्यासाठी अमूल्य असते.” सगळ्यांच्या मनात आता एकच प्रश्न उमटलं – "आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रसंगात का लागतो?" तेव्हा त्यांच्यातून एक आवाज आला – ती होती 'वात'. वात म्हणाली – "माझं नशिब सगळ्यांमध्ये एकसारखंच आहे – मी जळते. कोणाच्या पूजेसाठी, कोणाच्या आरतीसाठी, कोणाच्या संकल्पासाठी – माझं काम एकच आहे – स्वतःला वितळवून प्रकाश देणं.” सगळे दिवे गप्प झाले. त्यांना समजलं… दिवा चांदीचा असो, सोन्याचा, पितळीचा असो की मातीचा – त्याच्या आतली वात मात्र नेहमी कापसाचीच असते. जसं झगमगणारं रूप वेगवेगळं असलं, तरी जळणं सगळ्यांचं सारखंच असतं… कोणाच्या वाट्याला मंदिरातलं स्थान येतं, कोणाला तुळशीपुढे जागा मिळते, कोण दिवाळीतच लक्षात घेतला जातो, तर कोण अखंड विझत-लागत राहतो – पण त्या सर्वांमध्ये एकच गोष्ट समान असते – वात. ती वात म्हणजे त्याग, समर्पण, आणि जगासाठी स्वतः जळण्याची तयारी. कोणी जास्त तेलात न्हालेला, कोणी अगदी कोरड्या तेलातसुद्धा धगधगत पेटलेला. पण त्या वातीला ते माहीतच नसतं की, कोणत्या दिव्यात ती आहे – तिला फक्त जळायचं असतं. प्रकाश द्यायचा असतो. उष्णता द्यायची असते. आपलं आयुष्यही असंच आहे ना? कोण श्रीमंतीत वाढतो, कोण साधेपणात. कोणाचं घर मोठं, कोणाचं छोटं. पण आयुष्याची वात मात्र सगळ्यांची सारखीच – कापसाचीच असते… आणि कधीकधी – ती वातच दुसऱ्याच्या प्रकाशाचं कारण होते. जगात प्रत्येकाचं ठिकाण वेगळं असलं, तरी अंतःकरणात वात सारख्याच जळतात. कुणी फार काळ उजळतं, कुणी क्षणभर. पण जळणं – ते सारखंच असतं… "पितळी समई, दिवाळीचा कंदील, आरतीचं निरांजन, तुपाचा दिवा, ताम्हणातील निरांजन – सगळे वेगवेगळ्या वेळी लागतात. पण त्यांचं सारं तेज एका वातेमुळे… जगातसुद्धा माणसं वेगळी असली, तरी संघर्ष, प्रेम, वेदना आणि त्याग – हे सगळ्यांचं वातच आहे!" तृप्ती देव भिलाई सगळे दिवे विझले. देवाच्या गाभाऱ्यात अंधार झाला, पण देवाचं मन उजळून गेलं होतं. कारण त्याला उमगलं – "दिवा कोणताही असो – चांदीचा, सोन्याचा, तांब्याचा की मातीचा – माझ्यापर्यंत पोहोचणारा प्रकाश नेहमी एका गोष्टीमुळे येतो – त्या न बोलणाऱ्या, न गोंजारल्या, पण सतत जळणाऱ्या वातीमुळे…" "जग काय बघतं? दिव्याचं रूप… पण देव काय बघतो? वातीचं जळणं!" "वात म्हणजे – स्वतः जळून इतरांसाठी उजेड करणाऱ्या श्रद्धेची शांत ज्योत!" सौ तृप्ती देव भिलाई आवडलं तर नावा सोबत शेयर करा
Copyright © 2025, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser