Paapkshalay - 3 in Marathi Classic Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | पापक्षालन - भाग 3

Featured Books
Categories
Share

पापक्षालन - भाग 3

                         पापक्षालन  भाग 3

 

         पित्याचे कथन ऐकून प्रभावित झालेल्या तेजदत्तानी थरथरत्या आवाजात प्रतिज्ञा केली, विभवेच्या राजघराण्यातील हा  शेवटचा वंशज महाप्रतापी सूर्यदेव आणि साक्षातपरब्रह्मस्वरुप आचार्यांच्या साक्षीने प्रतिज्ञाबध्द आहे. विभवेवर चंद्रवंशीयांचा राजध्वज फडकविणे हे आमच्या जीवनाचे परम प्राप्तव्य राहील. वाटेल ते अग्निदिव्य करुन आम्ही ते साध्य करु अथवा आत्माहुती देऊ. आम्हाला शत्रूच्या कचाट्यातून सोडविणाऱ्या डोंगा भिल्लाच्या स्मरणार्थ विभवेच्या मुख्य चौकात स्तंभ उभारु हाआमचा पण आहे. ‘‘ द्रविड प्रांतात आल्यापासून दीड तपांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रथमच महाराजांच्या मुखावर समाधानाची छटा दिसली. आपला शौर्यबिंदू घेऊन वाढलेले, आचार्यांच्या संपन्न संस्कारांनी समर्थ झालेले तेजदत्त ! विभवे वरील अमंगल सावट दूर करण्यासाठी ते प्रतिज्ञाबध्द झाले. आपल्या जन्माचे सार्थक  झाल्याची कृतकृत्यता महाराजानीअनुभविली.

         आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचे बेतसुरु झाले. तेजदत्तांना युध्द कला, नीती यांचे ज्ञान झाले असले तरी परमुलुखात जाऊन बलाढ्य यावनी सत्तेशी टक्कर देणे हे अतिदुस्तर कार्य होते. चातुर्य,कौशल्य, रण नीति, योजकता,राजकारण याची जणू ती परीक्षाच होती. त्या दृष्टीनेत्यांच्यावर खास संस्कार करण्याकडे आचार्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले. केवळ अस्त्र - शस्त्र विद्या पुरेशी नसून ती सिध्द करण्याचे रणनीतिचे, ज्ञान त्यानी प्राप्त करणे आवश्यक होते. यासाठी आचार्यांनीत्याना खास प्रशिक्षण द्यायला आरंभ केला. गुरुकुलामागच्या पर्वत पठारावर खास कार्यशाळा सिध्द झाली. स्वतः आचार्य ऐरणीसमोर बसले. महाराज भाता ओढू लागले.

         प्रज्वलित निखाऱ्यामध्ये लालबुंद झालेली लोहपट्टिका कणाकणाने आकार घेऊ लागली. लवलवत्या अग्निशलाके प्रमाणे लवचिक,दुधारी, अदमासे अकरा वितस्ती लांबीची लोहपट्टिका तयार झाली. विशिष्ट वनस्पतींची पाने, साली यांचा रस दगडीपात्रात ओतून त्याचे तीन संस्कार, तीन तैल संस्कार आणि जलाचा एक संस्कार झाल्यावर लोहपट्टिकाकृष्ण सर्पाच्या लवलवत्या जिव्हेप्रमाणे निळसर दिसू लागली. तिच्या एका घावासरशी मांडी एवढया जाडीचे वृक्षाचे खोड क्षणार्धात छेदून गेले. ‘गगन सदृषम् तत्वमस्यादिलक्ष्यम्‘ हे गुरुचे वर्णन शब्दश: सार्थ ठरविणारे आचार्यांचे चतुरस्त्र ज्ञान पाहून महाराज सुध्दा विस्मयचकित झाले. लोहपट्टिका हातात पकडून शरीराभोवती फिरवित असता निर्माण होणारा ध्वनी हृदयात कंप उठविणारा होता. ती फिरविण्याचे वृध्दआचार्यांचे चापल्यही तरुणाला लाजविणारे होते. प्रात्यक्षिक दाखविल्यावर हात झटकताच सळसळत जाणाऱ्या सर्पराजाप्रमाणे त्या लोहपट्टिकेचे वेढे हाताभोवती पडले.

        शस्त्राच्या सहाय्याने एकावेळी कितीही शत्रूसैनिक वेढा घालीत चाल करुन आले तरी निमिषार्धात त्यांना धराशायी करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते, असे त्या लोहपट्टिकेचे वैशिष्ट्य आचार्यांनी विषद केले. खड्ग, परशु, भाला आदि इतर हत्यारे सुध्दा कशी सिध्द करावयाची याचे शास्त्रशुध्द ज्ञान आचार्यांनी तेजादत्ताला दिले. परमुलुखात जाऊन साम्राज्यावर कब्जा करु पाहणारा तेजदत्त ..... त्याला अचूक दिशादर्शन करावयाचे कार्य आचार्यांनी केले.तसेच त्याच्या कार्याची योजानाही स्वतः आपले बुध्दिचातुर्य पणाला लावून तयार केली.कुमारानी अश्वांच्या व्यापाराच्या मिषाने विभवेत तळ ठोकायचा असे ठरले. विभवेतील आठ मुख्य व्यापारी पेठांमध्ये त्यानी आपले बस्तान बसवायचे. व्यापाराच्या मिषानेलोकसंग्रह वाढवायचा अन् पूर्ण तयारी झाली की आचार्यांच्या सल्ल्याने निर्णायक युध्दाला आरंभ करावयाचा असा बेत ठरला. अरबस्तान, तुर्कस्तान आणि अन्य म्लेच्छ वलंदेज मुलुखातून अश्व भरलेलीजहाजे  थिरुकोट्टा बंदरात यायची.त्यांच्याकडून अश्व खरेदी करुन तेजदत्त विभवेला जाणार असा बेत झाला.

         पाचशे अश्वांची खरेदी करण्याचे ठरले.त्या खर्चासाठी रक्कम कशी  उभी करायची? ही समस्या तेजदत्तांपुढे निर्माण झाली. त्यानी ही शंकाउपस्थित करताच महाराजानी कटीवस्त्रावरुन वेष्टिलेल्या पायाच्या अंगठ्याएवढ्याजाडीच्या कुशरज्जूचे फेरे सोडले. एका टोकाकडून ती रज्जू उसवायला सुरुवात केली.वीतभर भागाचा पीळ उकलल्यावर द्राक्षाच्या आकाराचे हिरे बाहेर पडू लागले. दत्तनेत्र विस्फारुन पहातच राहिले.‘‘तेजादत्त! आचार्य पूर्ण निष्कांचन,पाठशालेचे उत्पन्नही बेताचे. तुम्हाला युध्द कलेचे शिक्षण देण्यासाठी लागणारी साधने फारच खर्चिक. परंतु विभवेतून बाहेर पडतानाच मोठ्या कौशल्याने मी विपूल धनसंपत्ती सोबत आणलेली होती. या कुश रज्जूचा केवळ एक फेरा आजपावेतो खर्च झालेला आहे. अजून चार  फेरे शिल्लक आहेत.खेरीज डोंगा भिल्लाने कमरेला वेष्टिलेली रज्जू अद्यापि शिल्लक आहे.”

         ‘‘आम्हाला राज्य प्रशासनाचे ज्ञान देणारे राजगुरु सोमवर्मा हे सुध्दा आचार्यांच्या श्रेष्ठ परंपरेत शोभणारे होते. राजाशकट चालविताना राजाने कायम सतर्क कसे रहावे याचे पूर्ण ज्ञान त्यानी आम्हाला दिले होते.कठिण-विपत्तीच्या परिस्थितीतही आपले अस्तित्व कसे टिकविता येईल याची चिंता राजालाअसावी लागते. जेंव्हा सत्ता, सामर्थ्य आणि मित्र उरत नाहीत  तेव्हा द्रव्य हाच एकमेव सांगाती,तारणहार असतो. कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही,हा राजगुरुंचा सल्ला आम्ही तंतोतंत पाळला. अत्यंत खुबीने विपुल द्रव्यसंचय आम्ही नेहमी अंगावर वहायचो. आमचे जडाव, मोजड्यांचे जाीर्ण जोडही आम्ही अद्याप संग्रही ठेवले आहेत. वापरुनलक्तरे झालेले पोषाखही अद्याप पेटाऱ्यामध्ये जपून ठेवले आहेत त्या मागेही हेचरहस्य आहे. तेजदत्त, तुम्ही सत्ताभ्रष्ट असलात तरी एका वैभवशाली साम्राज्याचे संपन्न वारसदार आहात. तुमच्या कार्यात द्रव्य ही समस्या कधीही येणार नाही.” महाराजानी कमरबंदातली सुवर्णमुद्रिका काढून तेजदत्तांच्या हाती देत ते म्हणाले, ‘‘तुम्हाला कधीही द्रव्याची कमतरता भासलीच तर विभवेच्या उत्तरेकडे भिल्ल वस्तीत जा. डेंगा भिल्ल, कटू भिल्ल हे अद्याप हयात असतील. नसले तरी त्यांचे वंशजअसतील. त्यांची एकांती गाठ घेऊन तुम्ही ही सुवर्ण मुद्रिका दाखवा. तुम्हाला भूमीत गाडून ठेवलेल्या खजिन्यातून पाहिजे तेवढे द्रव्य प्राप्त होईल.    

         ‘‘दत्त ! पुष्कळदा संकल्पांची सिध्दी द्रव्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. तुमचे संकल्पित कार्य तर द्रव्य सहाय्याखेरीज पूर्णत्वाला जाऊच शकणार नाही. तुमच्या यशाची पूर्ण मदार तुमच्या बुध्दिचातुर्या इतकीच तुमच्यापाशीअसणाऱ्या द्रव्य संचयावरही अवलंबून आहे. द्रव्य लोभापायी  मी- मी म्हणणारी माणसे मतिभष्ट होतात.द्रव्यासाठी दुस्तर साहस करणारी माणसेही संग्रही ठेवता येतात. उच्चाधिकारी सुध्दा द्रव्यलोभापायी  आपल्या निष्ठा दुसऱ्यांकडे गहाण ठेवतात. अधिकार सामर्थ्य प्राप्तीसाठी सुध्दा पुष्कळ वेळा द्रव्याचे सहाय्य अनिवार्य असते. कारण इतर मार्गांपेक्षाही द्रव्यामुळे त्यांची प्राप्ती पटकन होते.तेजदत्त ! एका गोष्टीचे स्मरण मात्र सतत ठेवा. द्रव्य हे तुमचे साध्य नाही.माणसाचे परम प्राप्तव्य तर ते कधीच होऊ शकणार नाही. आचार्यांसारखी श्रेष्ठ-लोकोत्तर माणसे तर निष्कांचन असल्यामुळे अद्वितीय ठरतात.”

         ‘‘तेजदत्त ! द्रव्यबळावर मिळालेले  सामर्थ्य  कितीही श्रेष्ठ असले तरी ते तुमच्या कडील द्रव्यसंचय क्षीण होताच नष्ट होते.  (क्रमश:)