ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाबाबत
माझी ऑपरेशन सिंदूर ही पुस्तक वाचकांपुढे प्रदर्शित करतांना अतिशय आनंद होत आहे. नुकतीच पहलगाम घटना घडली व पाकिस्तान भारत वादाला तोंड फुटलं. त्यावरुन दोन्ही देशात संघर्ष सुरु झाला. ज्यातून ड्रोनहल्लेही झाले व दोन्ही देशांची अपरीमीत हानी तशीच जीवीतहानीही झाली.
ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाबाबत एक गोष्ट नक्कीच सांगाविशी वाटते की ही माझी काल्पनिक कादंबरी असून ही कादंबरी पाकिस्तान व भारत संघर्षामध्ये पुर्णतः जुळणारी कादंबरी नाही. ही कादंबरी मी माझ्या मनातील काल्पनिक कल्पनेनं बनवलेली आहे. त्याचा वास्तविक जगाशी काहीही संबंध नाही व तो संबंध वाचकांनी लावू नये. शिवाय मी यात पात्रांचीही नावं बदलवली आहेत. ते वाचकांनी समजून घ्यावे म्हणजे झालं.
ही घटना म्हणजे तो काही हिंदू मुस्लीम वाद नाही. वाद आहे साऱ्या जगात माझाच धर्म असावा. त्यासाठीच सारे प्रयत्न. त्या प्रयत्नात कुंकूही विनाकारण पुसलं गेलंय. यातूनच पहलगाम घडलं व महिलांचे कुंकू पुसल्या गेले. त्यासाठीच त्यांनी कदाचीत आतंकवादी संगटन स्थापन केलं होतं. अल्ला एकच आहे व तोच जगाचा तारणहार आहे. अल्ला हा एकच असून त्यानं आपलं कर्तव्य आम्हाला सोपवून या धरणीवर पाठवलं आहे. असा तो बुरसटलेला विचार. तो विचार एखाद्या अज्ञानी व्यक्तीला सांगितल्यास तो अगदी सहज विश्वास ठेवेल. जसा पाकिस्ताननं ठेवला. पाकिस्तान मूल जन्मास घालण्यालाच अल्लाची देण समजतो व अल्लाच त्याचा पालनहार आहे हेही समजतो. त्यांना हेही माहित नाही की सृष्टी कशी निर्माण झाली असावी. पहिलं पोकळी निर्माण झाली असावी. त्यात एक तप्त गोळा तयार झाला असावा व त्या तप्त गोळ्यापासून हळूहळू थंड होत जावून पृथ्वी तयार झाली असावी. त्यानंतर जीवसृष्टी व शेवटी आपण सारे. असं विज्ञान सांगतो. परंतु धर्मातील लोकं हे मानत नाहीत व वेगळंच कारण त्याला आपापलं अस्तित्व टिकविण्यासाठी नव्हे तर त्या अस्तित्वाचा प्रसार करण्यासाठी देत असतात. मुस्लीम समुदाय अल्लानंच ही सृष्टी निर्माण केली असं मानतात. तेच रोज अजाणमधून सांगतात. हिंदू समुदाय ब्रम्हानं सृष्टी निर्माण केली असं सांगतात आणि ख्रिश्चन लोकं सृष्टी ही इश्वरानं निर्माण केली असं सांगतात.
ज्याप्रमाणे मुस्लीम समुदाय अल्लाला प्रथमस्थान देतात व मानतात की अल्ला हाच जगाचा तारणहार आहे. तशीच ही सृष्टी चालविण्यासाठी अल्लानं खलिफा नामक एका व्यक्तीला धरणीवर पाठवलं असून आपण फक्त खलिफाचा आदेश पाळावा. तोच मार्ग दाखवेल व तोच संकटातून मुक्त करेल असे सांगतात. अर्थात खलिफा नावाचा एक प्रेषीत व्यक्ती. तेच इतर धर्मही मानतात आणि त्याला आपल्या संदर्भ ग्रंथांची पुष्टी जोडतात. ज्याला ते आपलं धर्मग्रंथ समजतात. हिंदू धर्मही स्वतःला उच्चकोटीचा समजतो व सांगतो की आमची उत्पत्ती ही जगात सर्वप्रथम झालेली असून आमच्याच धर्मानं ही सृष्टीही स्थापन केली आहे. त्यानुसार जेव्हा जेव्हा या धरणीवर असुरांचा अत्याचार माजतो. तेव्हा तेव्हा भगवान स्वतः या धरणीवर जन्म घेतो व तो येथील अत्याचार दूर करतो. त्यानंतर त्याचं कार्य पुर्ण झालं की तो आपला अवतार संपवून निघून जातो.
ज्याप्रमाणे हिंदू व मुस्लीम धर्म आपापल्या इश्वरानं सांगीतलेलं कर्तव्य सांगतात. तेच कर्तव्य ख्रिश्चन धर्मही सांगतो. ख्रिश्चन धर्मही उत्पत्ती आणि उगमाच्या बाबतीत मागे नाही. त्यांचा धर्मग्रंथ बायबल आपल्याला सांगतो की जगाची उत्पत्ती प्रत्यक्ष इश्वरानं केलेली असून आधी आदम व हव्वा जन्माला आले. त्यांनीच संबंध सृष्टी जन्माला घातली. तसेच ख्रिश्चन धर्म त्यात आणखी पुष्टी जोडतो की इश्वर हा स्वतः जन्म घेत नाही तर तो आपल्या प्रिय पुत्राला धरणीवरील संकट, अन्याय अत्याचार दूर करायला पाठवतो. पहलगामचा हल्ला याच धार्मिक भावनेतून झाला. संबंध जगात आमचाच धर्म असावा हा उद्देश गृहीत धरुन.
पहलगाममधील कुंकू पुसण्याची कारणमिमांसा लक्षात घेता एक गोष्ट आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे जगात हिंदूच नाही तर इतर धर्माची मंडळी आहेत का? मग ती समाप्त करा. कधी हत्या करुन तर कधी त्यांच्या बिरादरीतील लोकांशी विवाह करुन. कधी वाटलंच तर युद्ध करुन तर कधी लेकरं जन्मास घालून. त्यासाठी स्रिला एक लेकरं जन्मास घालण्याची मशीन समजून तिच्यापासून ती जेवढे अपत्य जन्मास घालू शकेल. तेवढे जन्मास घालणे. वाटल्यास युद्ध झालेच आणि आवश्यकता भासलीच तर त्यातील दोनचार मरण पावले तरी दुःख बाळगण्याचं कारण नाही. हा त्यांचा विचार. हा प्रत्येक मुस्लिमांचा विचार होवूच शकत नाही की जे शिकलेले आहेत. परंतु जे शिकलेले नाहीत. ते असा विचार करतीलच आणि जे शिकलेले नाहीत. ते भारतात राहूनही पाकिस्तान की जय म्हणतीलच. खरं तर त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाहीच. फेसबुकवर या संदर्भात अशा बऱ्याच गोष्टी प्रसारीत होत आहेत. त्यातीलच एक गोष्ट. एक पत्रकार एका मुस्लीम व्यक्तीला म्हणतोय की त्यानं पाकिस्तान मुर्दाबाद म्हणावं. परंतु तो म्हणत नाही. याचं कारण काय? याचं कारण पाकिस्तानवरचं प्रेम नाही. ते धार्मिक प्रेम आहे. त्यांना कदाचीत वाटत असेल की पाकिस्तान हा मुस्लिमांचा देश आहे. म्हणूनच तो आम्हाला प्रिय आहे. असावाच. कारण आमचा भारत आम्हाला आईवडील, बहिण भाऊ, मित्र मैत्रीणी, शेजारी पाजारी एवढंच नाही तर परकीय देश यावरही प्रेम करायला शिकवतो. आमचा देश वेगवेगळ्या धर्मावरही प्रेम करायला शिकवतो. मग तो मुस्लीम धर्म का असेना आणि इतर धर्म का असेना. आमचा देश शत्रूंवरही प्रेम करायला शिकवतो. आमच्या देशाने कितीतरी वेळेस पाकिस्तानला मदत केलेली आहे. महात्मा गांधीनी तर त्या काळात तब्बल पंचावन कोटी रुपये पाकिस्तानला दिले होते. शिवाय पाकव्याप्त जो काश्मीर आहे ना. तोही पाकिस्तानसाठी सोडून दिला. याव्यतिरिक्त सिधू, झेलम व चिनाबचेही पाणी पाकिस्तानला दरवेळेस नित्यनेमानं देत असतो. बदल्यात काहीही घेत नाही. तरीही पाकिस्तान धर्मावरुन भांडत असतो सतत. अल्लाचं एक कर्तव्य आहे हे समजून आणि अल्लाच्याच त्या कर्तव्यासाठी निरपराध लोकांची विनाकारण बेवारसपणे हत्या करीत सुटतो. हे काही बरोबर नाही. जर मुस्लीमच या जगाचे मुख्य स्रोत आहेत असे आतंकवाद्यांना वाटत असेल तर बाकी इतर धर्मियांनी काय विचार करावा? त्यांनी आपलं अस्तित्व त्यागावं काय? की स्वतः जोहार करुन आपलं अस्तित्व समाप्त कराव? परंतु असं कधीच घडणार नाही. कारण इतर धर्मालाही स्वतंत्रपणे मुक्त विहार करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यांनाही अधिकार आहे आपलं अस्तित्व टिकविण्याचा. मात्र हे जरी खरं असलं तरी या भारत देशावर तो जेव्हा अखंड हिंदुस्थान होता. तेव्हापासूनच आक्रमकता आली व धर्म जबरदस्तीनं बदलविण्याची मुजोरी तयार झाली. कोणी या देशातील तमाम हिंदू लोकांना याच देशात येवून ख्रिश्चन करु पाहिलं तर कोणी मुस्लीम बनवू पाहिलं. कोणी जबरदस्तीनं धर्मांतरण करुन पाहिलं तर कोणी प्रचार आणि मार्गदर्शन करुन धर्म परीवर्तन करुन पाहिलं. काहींनी पुस्तका वाटल्या, वस्तू वाटल्या तर काहींही बुवाबाजी व अंधश्रद्धेनं धर्म बदलवून घेतला. भूत पिशाच्च, बहारबाधा, जादूटोणा लागत नाही, अशी बतावणी करुन धर्म परीवर्तन घडलं. परंतु सुज्ञ विचार कोणीच प्रसवले नाहीत. बळजबरी किंवा धाकानं तर अनेकांचे धर्म बदलले हे नाकारता येत नाही. खुद्द औरंगजेबाच्या काळात कितीतरी लोकाचे हिंदू धर्म बदलले होते व ते मुस्लीम झाले होते. त्याचं कारण होतं जीवहत्या. मुस्लीम बना, नाहीतर आम्ही तुमचा जीव घेवू हीच ती बोली. गोव्यामध्ये आजही हातकातरी खांब आहे, धर्म बदलविण्याचा एक साक्षीदार म्हणून. ख्रिश्चन बना, नाहीतर आम्ही तुमचे हात कापू. त्यात काही लोकांनी धाकानं का होईना, धर्म बदलवला तर काही लोकांनी हात कापू दिले. आपला बळी दिला. परंतु धर्म बदलविला नाही. ज्यात संभाजीसारख्या राजानं आपले प्राण दिले. परंतु धर्म बदल केला नाही. ज्यात धाकानं परधर्मात गेलेल्या व कुलीखान झालेल्या नेतोजी पालकरांनी स्वराज्य स्थापन होताच स्वधर्मात यायची इच्छा व्यक्त केली व ते स्वधर्मात आले. म्हणूनच हा हिंदू धर्म टिकला. ज्यात आजही कितीतरी एससी, एसटीचे समुदाय दिसून येतात. आजही धर्मांतरण सुरु आहे. काही ठिकाणी अंधश्रद्धा प्रसवून सुरु आहे तर काही ठिकाणी बळजबरी वा धाक देवून. पहलगामची घटना अशीच की ती घटना जबरदस्तीच्या धर्मांतरणावर काही अंशी बोट ठेवते. खुणावते की तू हिंदू आहे ना. मुस्लीम नाही ना. मग मर. गोळी खा. जर तू मुस्लीम असता तर सोडलं असतं. पहलगामची घटना म्हणजे भारत पाकिस्तान वाद नाहीच. असे धार्मिक वाद बरेच झाले आहेत. त्यामुळं पाकिस्ताननं चिडायचं कारणच नव्हतं. तो एक दहशतवाद होता की ज्याचं उत्तर भारतानं ऑपरेशन सिंदूर करुन दिला. ठणकावून सांगीतलं की यापुढे या कारणासाठी तरी भारताकडे नजर ठेवू नका. तरीपण पाक ऐकेल तेव्हा ना. त्यांनी भारतावर ड्रोनहल्ले केले. प्रत्युत्तरादाखल भारतानंही ते हल्ले परतावून लावले. परंतु त्या हल्ल्यात मुस्लीम समुदायांचे सीमेवरील लोकं देखील मरण पावले. याचा अर्थ त्यांना आपल्या बिरादरीतील लोकं मरण्याचा विचार नाही. खऱ्या विचारी देशाने असं केलंच नसतं. त्यांनी आतंकवादी मारले म्हणून कौतुक केले असते भारताचे. ज्यांनी धर्म सोडला म्हणून आतंकवाद्यांना मारले असाही विचार केला असता. परंतु तो विचार न केल्यानं आजपर्यंत पाकिस्तानची अपरीमीत हानी झाली. भारताचीही हानी झाली. भारत हा सहिष्णू देश आहे व हाच असा एकमेव देश आहे की ज्या देशात सर्व धर्माचे लोकं गुण्यागोविंदानं राहतात. या देशात जेवढा हिंदू महत्वाचा आहे. तेवढाच महत्वाचा आहे मुस्लीम आणि तेवढाच महत्वाचा ख्रिश्चनही आहे व तेवढेच महत्वपूर्ण आहेत इतर धर्म. हे सर्व धर्मीय लोकं एकमेकांच्या धर्मावर तेवढ्याच आत्मीयतेनं प्रेम करतात. एकमेकांच्या धर्माचा आदर करतात. ते एकमेकांच्या घरी एकमेकांच्या सणउत्सवात सहभागी होतात. नाताळात हिंदू ख्रिश्चनच्या चर्चमध्ये जातो. ईदमध्ये हिंदू मुस्लीमांच्या दर्ग्यात जातो. तसेच दिवाळी आणि होळीच्या सणात मुस्लीम हिंदूंच्या सणात सहभागी होतो. इथे हिंदू मुस्लीम असा भेदभाव नाही. मग परकीय पाकिस्ताननं आतंकवाद्यांच्या माध्यमातून अशा गुण्यागोविंदानं नांदत असलेल्या भारतातील हिंदू मुस्लिमात फुट का पाडावी? त्यांनी पहलगामात केवळ हिंदूंचीच हत्या का करावी? तर ते एक धर्मांतरणच होतं. असे म्हणायला काहीच हरकत नाही. येथील तमाम हिंदू मुस्लीम समुदायात फुट पाडण्यासाठी केलेली जणू कृतीच होती. हे तमाम मुस्लिमांनीही समजून घेण्याची गरज आहे. तसंच हेही समजून घेण्याची गरज आहे की आम्ही या भारतात राहणारे मुस्लीमच नाही तर आधी भारतीय आहोत. जर असं यापुढे पाकिस्तान वा कोणत्याही देशानं काही केल्यास आम्ही त्यांच्याशी मुस्लीम म्हणून लढणार नाही तर आधी भारतीय म्हणून लढू. मग मुस्लिमांशीही लढायचं असेल तरी विचार करणार नाही. हीच प्रतिज्ञा या पहलगाम घटनेनिमित्यानं प्रत्येक मुस्लिमांनी घ्यायला हवी. तसेच हिंदूंनीही या देशात राहणाऱ्या तमाम मुस्लिमांना सौहार्दपूर्ण वागणूक द्यावी म्हणजे झालं. कारण तेही आपलेच भाऊ आहेत स्वातंत्र्य मिळवीत असतांना, ते मिळविण्यासाठी मदत करणारे. एवढंच पहलगाम घटनेबद्धल सांगणे आहे.
आपण ही माझी ऑपरेशन सिंदूर नावाची कादंबरी वाचावी व गोड प्रतिक्रिया द्याव्यात की ज्यानं मला प्रेरणा मिळेल व दुसरी नवीन कादंबरी मला लिहिता येईल.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०