आरती श्रेयाला घरी घेऊन येते आणि साधिकाला त्याविषयी कळवते आणि ती जेवायला बसते.
अजित : आलीस तू?
आरती : हो..अभि नीट जेवला ना?
अजित : हो आम्ही अगदी व्यवस्थित जेवलो आणि तू पण जेवून घे नीट पण त्या श्रेयाच्या जेवणाच काय?
आरती : अहो, तिला मी इकडे घेऊन यायच्या आधी वरण-भात भरवला होता. तिला आता खोलीत झोपवून आलेय… अहो तुम्ही त्या तुमच्या डॉक्टर मित्राला बोलावता का घरी? म्हणजे ते श्रेयाला तपासातील आणि औषध देतील…तिने घडल्या घटनेचा फारच धसका लावून घेतला आहे…मला तर काळजीच वाटते आहे…
अजित : हो मी त्याला संध्याकाळी बोलावतो… आणि आपण तिघे मिळून सावरू श्रेयाला…पण त्यासाठी तुलाही ताकद हवी ना आणि त्यासाठी तुलाही भरपेट जेवावं लागेल…
आरती : हो जेवते…
अजित : साधिका केव्हा येणार आहे…
आरती : येते बोलली थोडा वेळात….
अजित : बर…मला तिचा निर्णय पटला…
आरती : मलाही…सध्या तरी श्रेयासाठी हीच जागा चांगली आहे…
अजित : मला एक कळत नाही की इतकं वाईट कुणी कसं वागू शकतं…तेही आपल्या वर्ग मैत्रिणीसोबत…
आरती : जाऊ दे अहो…या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण अभिमन्यू आणि श्रेयाच्या सुरक्षिततेवर भर देऊ…
अजित : हो… तू तुझ्या गुरूंच्या कानावर घातलं आहेस ना हे सगळं…
आरती : आज बोलेन…
आरती तिची घरातली कामं आवरत असतानाच तिच्या डोक्यात बऱ्याच घोळत असतात. तेवढ्यात दारावर थाप पडते. दारावर बेल असतानाही थाप पडल्याने ती हातातलं काम टाकून बाहेर येते आणि घरात आलेल्या विनिता आणि शलाकाला पाहून चकित होते.
आरती : तुम्ही दोघी?
विनिता : काकू, मी विनिता आणि ही माझी मैत्रीण शलाका आम्ही अभिमन्यू सरांच्या विद्यार्थिनी आहोत…
आरती : मला तुमच्याविषयी अभिने तुमच्याविषयी सांगितलं…तुम्हीच मला घरी आणून सोडलं…बसा ना…पण तुम्ही आता मधेच कसं काय आलात?
विनिता : काकू ते सरांना बर नाही ना..म्हणून भेटायला आलो…
आरती : हो ग काल रात्री अचानक त्याला ताप भरला…अजूनही झोपूनच आहे तो…
विनिता : मी बघून येऊ का?
आरती : अग कशाला? मीच सांगते यांना त्याला खाली घेऊन यायला…तुम्ही काय खाणार? मी पटकन बनवते..
शलाका : काकी पोहे चालतील आम्हाला…
आरती : बर मी आले…तुम्ही लाडू खाणार का? तोवर…
विनिता : काकू, अहो पोहेच ठीक आहेत…
आरती : बर…अहो, ऐकलंत का?
अजित : हा बोल ग…या कोण आहेत दोघी?
आरती : अभिमन्यूच्या विद्यार्थिनी आहेत अहो…तुम्ही त्याला बोलावून आणा…
अजित : बरं…मुलींनो बसा…आलोच मी त्याला घेऊन…
विनिता : हो सर,
अजित : अग सर काय? काका बोल…
विनिता : हो…
शलाका : विनू, तू जा वर…. हीच संधी आहे सरांना तुझ्याकडे कायमच न्यायची…जा पटकन…
विनिता : हो..काहीही गडबड वाटली तर फोन कर मला लगेच…
शलाकाला काही सूचना देऊन विनिता लागलीच अभिमन्यूच्या खोलीच्या दिशेने जाते. काही वेळाने ती अभिमन्यूला गपचूप घेऊन जातानाच तिथे आरती पोह्यांची प्लेट घेऊन येते.
आरती : तुम्ही अभिला कुठे घेऊन जात आहात?
विनिता : कायमच माझ्याकडे…
आरती : असं कसं तू त्याला घेऊन जाऊ शकतेस… सोड त्याला….
विनिता : तो फक्त माझा आहे…तुमचा कोणीच नाही…
आरती : अभि, बाळा माझी हाक पोहचातेय का तूझ्यापर्यंत…डोळे उघड बाळा…
आरती अभिमन्यूशी बोलणे सुरूच ठेवते आणि विनिताच्या नकळत ती तिने तिच्या कंबरेत खोचलेलं रुद्राक्ष अभिमन्यूच्या गळ्यात घालते. ते गळ्यात पडताच अभिमन्यू गाढ झोपेतून जागा व्हावा तसा शुध्दीवर येतो आणि विनिताने पकडलेला हात झिडकरतो. त्यामुळे संतापलेली विनिता रागाने अभिमन्यूच्या अंगावर धावून जाणार इतक्यात आरती स्वामींची विभूती आणि गंगाजल तिच्या अंगावर फेकते. हे पाहून शलाका घाबरते आणि हळूच तिथून पळ काढते. मात्र विनिता सुडाला पेटल्याने सर्वतोपरी स्वतःला सावरण्याचा आणि अभिमन्यूला स्वतःसोबत नेण्याचा प्रयत्न करते पण ती विसरली होती की आईची माया, ताकद आणि प्रेम हे सगळ्यात वरचढ असतं. विनितला अगदी त्वेषाने अगम्य भाषेतील मंत्र म्हणताना पाहून आरतीही दत्तबावनी मोठ्याने म्हणायला सुरुवात करत अभिमन्यूला स्वतःजवळ खेचायला सुरुवात करते. आरतीला पाहून अभिमन्यूला धीर येतो व तोही तिच्यासोबत दत्तबावनी बोलतो. या दोघांच्या ताकदीपुढे निभाव न लागल्यामुळे विनिता त्या दोघांना धमकावत तिथून निघून जाते. ती गेल्यावर आरती लगेच अजित आणि श्रेयाला बघायला निघते व तिच्या पाठोपाठ अभिमन्यूही जातो. अभिमन्यूच्या खोलीत बेशुद्ध पडलेल्या अजितला पाहून आरती त्याला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करते. काही मिनिटांतच तो डोळे उघडतो आणि आरती, अभिमन्यूला मिठीत घेतो.
आरती : अहो, तुम्ही ठीक आहात ना? नेमकं काय झालं होतं इथे?
अजित : हो मला बरं वाटतं आहे…अगं मी अभिला उठवत होतो आणि तेवढ्यात ती खोलीत आली… मला काही समजायच्या आतच मी बेशुद्ध झालो…पुढे काय झालं हे आठवत नाही मला…श्रेया बरी आहे ना…तिला बघितलं का?
आरती : तिला आता बघायला जातेय मी…तुम्ही हवं तर इथेच पडा थोडावेळ…
अजित : नाही नको, चल आधी आपण श्रेयाला बघूया…
अभिमन्यू : एक मिनिट…आई, श्रेया आपल्या घरात आहे…
आरती : हो, आपण नंतर बोलू यावर आधी तिला बघूया का?
ते तिघे मिळून श्रेयाच्या खोलीत जातात. तिथे तिला झोपलेले पाहून तिघांच्या पण जीवात जीव येतो.
अभिमन्यू : आई मला सांगशील आता ?
आरती : हो, सांगते…मी श्रेयाच्या घरी जाण्याआधी साधिकाने मला फोन केला होता आणि श्रेया तिच्या घरापेक्षा इथे जास्त सुरक्षित राहील असं मला सांगितलं. हे बोलणं मलाही पटल्यामुळे मी श्रेयाला इथे घेऊन आले.
अभिमन्यू : तिची आजी?
आरती : हे बघ, अभि थोडा तरी आईवर विश्वास ठेव…सगळी योजना केल्याशिवाय मी हे असं पाऊल उचलणार नाही ना…
अभिमन्यू : आई असं का बोलतेस…माझ्यामुळे कोणाला त्रास नको इतकंच मला वाटतं ग..
अजित : हो बाळा, चला आपण खाली जाऊ…मी मस्तपैकी आपल्यासाठी चहा बनवतो…म्हणजे आपल्याला जरा फ्रेश वाटेल…
आरती : तुम्ही दोघे व्हा पुढे…मी श्रेयाला घेऊन येते..
अजित - अभिमन्यू : बरं…
अजित आणि अभिमन्यू खाली येतात आणि तितक्यात दारावरची बेल वाजल्याने अभिमन्यू दार उघडतो. शलाकाचे दोन्ही हात पकडून दारात उभ्या असलेल्या साधिकाला पाहून तो चकित होतो.
—------------------------------------------------------
रागाने थरथरणारी विनिता अभिमन्यू आणि त्याच्या आईला धडा शिकवण्याचे ठरवते.
“खूप मोठी चूक केली आहेस अभिमन्यू तू…लवकरच मी तुला आपलेसे करेन…माझी ताकद मी इतकी वाढवेन की त्यापुढे तूझ्या आईची ताकद फिकी पडेल.”
तिच्या डोक्यात नुकताच शिजलेला कुटील डाव आठवून तिच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य पसरते.
—------------------------------------------------------
आज सकाळी ध्यानात मिळालेल्या संकेताने आंजनेय अस्वस्थ होतात आणि साधिकाशी संपर्क साधण्याचा असफल प्रयत्न करतात. त्यामूळे नाईलाजाने ते श्रीपादसोबत संपर्क साधतात.
---------------------------------------------------------------
- प्रणाली प्रदीप