"दिसत नाही… पण जीवाशी खेळतो!"
माणूस आजारी पडतो तेव्हा शरीर आधी काहीतरी संकेत देतं. कधी थोडा ताप येतो, कधी अंग दुखतं, कधी थकवा जाणवतो… मग आपण डॉक्टरकडे जातो. मेडिकल चेकअप करतो. ब्लड टेस्ट, ईसीजी, एक्स-रे… शरीराचं निदान करून आजार शोधतो. आणि योग्य वेळी लक्षात आलं तर बरंही होतो.
पण आपण जिथं राहतो, आपलं घर – त्याचं काय? आपलं घर म्हणजे आपल्या कुटुंबाचं शरीर. आणि त्यातही आपण आधुनिक युगात राहतो – प्रत्येक खोलीत विद्युत उपकरणं. गिझर, इंडक्शन, कुलर, मिक्सर, वॉशिंग मशीन… ही सगळी आपल्या सोयीसाठी आहेत, पण त्यांची योग्य देखभाल केली नाही, तर हाच सोयीचा करंट जीवघेणा ठरतो.
काल आमच्या घरात असाच एक प्रसंग घडला. कुलर सुरू केला, आणि शॉक लागला . आधी वाटलं, कदाचित कुठे थोडा प्रोब्लम असेल. नंतर इंडक्शन स्टोव्ह सुरू केला, तर त्यालाही करंट लागत होता. मनात थोडी भीती दाटली. हे सगळं अचानक का घडतंय?
थोडं बारकाईने पाहिलं, आणि मग लक्षात आलं – बाथरूममधला गिझर!
त्याच्या कॉईलमध्ये काहीतरी बिघाड झाल होता. गिझर ऑन केल्यानंतर, तो बिघाड घरात शॉकसारखा पसरत होता. जणू गिझरनं सांगितलं, “माझी काळजी घ्या!”
इशारा मिळालाच होता, पण आपण दुर्लक्ष केलं…
आपल्या शरीराचं आपण जसं टेस्टिंग करतो, तसंच घरातल्या वस्तूंचंही टेस्टिंग गरजेचं असतं. पण आपण काय करतो? एखादं स्विच न चालल्यास फक्त बदलतो. पण डोकं लावून विचार करत नाही – यामागे काही खोल समस्या तर नाही ना?
गिझर ही अशी वस्तू आहे जी पाण्यात असते आणि करंटशी संबंधित असते. त्याचं कॉईल जर खराब झालं, तर ते पाण्यातून घरभर धोक्याचं जाळं विणू शकतं. आमच्याही घरी झालं तेच. लहान बाळं, वृद्ध लोक – यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपलीच आहे.
घराबाहेर नाही, घरातही धोका असतो…
माणूस आजारी पडतो, तर आपल्याला त्याची काळजी वाटते. पण घरातली एखादी वायर, एखादा स्विच, किंवा गिझरचा कॉईल यांचा ‘शॉक’ आयुष्यभरासाठी व्रण देऊ शकतो. आपण आपल्या घराच्या इलेक्ट्रिक वस्तूंना फार गृहित धरतो.
“गिझर चालतोय ना? मग झालं!”
असं नाही चालत. त्याची मेंटेनन्स केली पाहिजे.
त्याचं वायरिंग, अर्थिंग तपासायला हवं.
त्याच्या सुरक्षिततेचा रूटीन चेकअप झाला पाहिजे.
घराबद्दल ही काळजी घ्या –
. वर्षातून किमान एकदा इलेक्ट्रिशियनकडून सर्व उपकरणांची तपासणी करा.
गिझर, कुलर, वॉशिंग मशीन यांना अर्थिंग आहे का, ते तपासा.
. लहान मुलं किंवा वृद्ध लोक ज्या खोलीत वेळ घालवतात, तिथल्या प्लग पॉइंट्स सुरक्षीत आहेत का ते बघा.
बाथरूममध्ये इलेक्ट्रिक गिझर आहे तर नियमितपणे त्याची तपासणी करावी.
. कोणत्याही वस्तूला शॉक लागत असेल तर तात्काळ दुरुस्ती करा – ‘नंतर पाहू’ असं करू नका!
सावध रहा – कारण आधुनिक सोयी मृत्यूची सावली ठरू शकतात…
आपण म्हणतो – जग बदलतंय, तंत्रज्ञान वाढतंय. हो, अगदी खरं आहे. पण या तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य जितकं सुखकर केलंय, तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं – जर आपण अलर्ट राहिलो नाही तर.
आज आमचं नशिब बलवत्तर म्हणून वेळेत गिझरची कॉईल बदलली गेली. पण याच गोष्टीकडे दुर्लक्ष झालं असतं, तर? घरात लहान बाळ आहे. म्हातारी आई आहे. एक क्षणात काहीतरी मोठं घडलं असतं. म्हणूनच – "आधी सुरक्षा, मग सुविधा!"
🙏 एक विनंती…
तुमचं घर एकदा पाहा. गिझर पाहा. वायरिंग पाहा. इंडक्शन, कुलर, स्विच बोर्ड्स… सगळं एकदा तपासा. काहीतरी विचित्र जाणवत असेल, तर लगेच एक चेकअप करून घ्या.
जसं आपण आपल्या आरोग्यासाठी ब्लड टेस्ट, ईसीजी करतो, तसं घराचंही इलेक्ट्रिक चेकअप हवंच.
जीवापेक्षा मोठं काही नाही!
थोडक्यात…
"गिझर वर आहे, पण करंट घरभर पसरतो…
जशी वेदना शरीरात असते, पण मुळं आत खोल असतात…
दिसत नाही म्हणून दुर्लक्ष करू नका – कारण शॉक एकदाच लागतो, पण परिणाम कायमचा राहतो!"
बी अलर्ट. बी केअरफुल. तुमचं घर, तुमचं आयुष्य – अनमोल आहे.
“गिझर चालू होता… आणि जीव धोक्यात गेला असता!”
“करंट लागल्यावर शहाणपण आलं… पण ते वेळेवर आलं म्हणून निभावलं!”
“तांत्रिक सोयी बरोबरच तांत्रिक जबाबदारीही घ्या!”
गिझरही दमतो.
वायरिंगही थकते.
अर्थिंगही निघून जातं.
प्लगही थकतो…
आणि ते सगळं सांगतं –
“माझीही काळजी घे…”
कॉइल पण आजारी पडते.
माणूस बोलतो… गिझर फक्त ‘शॉक’ देतो.
“गिझरला वार्षिक आरोग्य तपासणी हवीच – जसं आपल्याला हवी असते!”
– "तुमचं घरही असंच सांगतंय. पण तुम्ही ऐकता का?"
आता दुर्लक्ष करू नका.
सौ तृप्ती देव
भिलाई छत्तीसगड