Chapter 1 : परतफेड
चेतन सहा वर्षांनंतर गावात परतला होता. शहरी आयुष्य, कॉलेज, नोकरी... या सगळ्यांमध्ये अडकून गेलेल्या चेतनसाठी गाव म्हणजे फक्त आठवणीतलं एक पान होतं. पण आजोबांच्या मृत्यूनंतर गावात येणं अपरिहार्य झालं.
धुळे जिल्ह्याच्या एका लहानशा गावात त्याचं लहानपण गेलं होतं – ओढ्यामागची माती, पावसात भिजणं, आणि संध्याकाळी आजीकडून ऐकलेल्या भीतीदायक गोष्टी. विशेषतः एक गोष्ट त्याच्या मनात कायम कोरली गेली होती…
"ते झाड – मागं वळून बघू नकोस..."
ते झाड गावाच्या सीमेजवळ होतं – एक वाकलेलं, कुरूप, काळसर झाड. गावातल्या प्रत्येक लहान मुलाला त्या झाडाची भीती वाटायची. लोक म्हणायचे, तिथं आत्मा राहतो. जो त्याच्याकडे वळून पाहतो, तो कधीच परत येत नाही.
चेतन त्यावेळी लहान होता. त्याला वाटायचं, या गोष्टी केवळ मुलांना घाबरवण्यासाठी आहेत. पण आज... इतक्या वर्षांनंतर गावात पाय ठेवताना त्याचं मन अनामिक अशांततेने भरून गेलं होतं.
"चेतन?"
एका ओळखीच्या आवाजाने तो वळला.
प्रियंका.
ती त्याची बालमैत्रीण. आता ती पूर्ण बदलली होती – शांत, स्थिर, आणि डोळ्यात कुठेतरी दुःखाची छटा.
"इतक्या वर्षांनी परत आलास. .. तुझी वाट बघत होतो आम्ही सगळे . "
" सगळे ? " चेतनने विचारलं .
ती काहीच न बोलता थोडं हसली.
" म्हणजे ... मी , आणि ... झाड ."
ते वाक्य ऐकताच चेतनच्या अंगावर शहारा आला .
" अजूनही तू त्या झाडावर विश्वास ठेवतेस ? "
" मी नाही . पण गावातल्या गप्पा मात्र थांबलेल्या नाहीत." ती थोडं गंभीर झाली, "तेजस आठवतोय का ? "
" हो ... तो माझा वर्गमित्र . कुठं आहे तो ? "
प्रियंका शांत झाली .
" तीच गोष्ट आहे... गेल्या वर्षी झाडाजवळ गेला होता. हरवला . "
" काय ? " चेतन दचकला.
" हो . आणि त्याआधी सूरज. त्याचंही तेच. झाडाजवळचं शेवटचं दर्शन . "
चेतन काही वेळ विचारात गेला. मग थोडंसं हसून म्हणाला ,
" ते काहीही असो , मी रात्री त्या झाडाजवळ जाईन . "
"नको!" प्रियंका जवळपास ओरडली , " चेतन , खूप लोकांनी तो प्रयोग केलाय. पण परत आलेले फार थोडे . "
पण चेतनच्या चेहऱ्यावर एक हट्टी हसू होतं .
त्या रात्री, जेवण झाल्यानंतर , गावातलं वातावरण अधिकच गूढ झालं. वाऱ्याची गती वाढली होती. कुत्र्यांचा भुंकणं सुरू झालं . आणि आकाशात ढग गडगडायला लागले .
चेतनने आपला टॉर्च घेतला . कानात प्रियंकाचं शेवटचं वाक्य घुमत होतं – " नको जाऊs ... "
पण तो निघालाच.
झाड गावाच्या सीमेजवळ होतं – जुनं, पिंपळाचं झाड. अंधारात त्याच्या फांद्या जणू हातांसारख्या वाटत होत्या. एखादी अज्ञात शक्ती जशी फडफडत असते, तसं काहीतरी त्या हवेत जाणवत होतं .
चेतन झाडाजवळ पोहोचला. काहीच घडलं नाही.
तो हसला – " अरे बापरे ... एवढ्या सगळ्या भीतीच्या गोष्टी ? काहीही नाही . "
तो वळायला लागला ...
" चेतन ..."
एक अस्पष्ट, पण स्पष्ट आवाज त्याच्या मागून आला .
तो थांबला.
"कोण आहे?"
पुन्हा शांतता. फक्त वाऱ्याचा आवाज. पण त्याच्या पाठीमागे काहीतरी हलतंय ... अशी भावना होती. तो हळूच वळला ...
झाड शांत होतं. पण त्याच्या एका फांदीवरून ओघळणाऱ्या साळसूद सावल्या चेतनकडे सरकत होत्या ...
"कोण आहे तिथे?" चेतनने टॉर्च चमकवला.
टॉर्च अचानक बंद झाला.
अंधार.
गाढ अंधार.
आणि तेव्हाच त्याला कुणीतरी पाठीवर हात ठेवले ...
दुसऱ्या दिवशी सकाळी, गावात खळबळ उडाली. चेतन गायब होता. फक्त त्याचा एक बूट, झाडाजवळ पडलेला आढळून आला.
आणि झाडाच्या खोडावर... एक नवीन नांव कोरलेलं होतं –
" चेतन . "