Chapter 2 : हरवलेले पावसाचे ठसे
चेतनच्या गायब होऊन आज दुसरा दिवस होता. गावात एक विचित्र शांतता पसरली होती. घराबाहेर माणसं कमी आणि कुत्र्यांचं भुंकण जास्त. गावातल्या प्रत्येकाच्या मनात भीतीचा एक धसका निर्माण झाला होता. ज्याने चेतनला झाडाकडे जाताना पाहिलं होतं , त्याचं आता बोलायचं धाडस होत नव्हतं.
प्रियंका फाटक उघडून गावच्या चावडीकडे आली .
तिथे दत्ता काका, गणपत सरपंच, आणि पोलीस उपनिरीक्षक साळुंखे चौकशी करत होते .
" शेवटचं त्याला कुणी पाहिलं ? " साळुंखेंचा कडक प्रश्न .
" मी पाहिलं होतं , " प्रियंका पुढे आली, आवाजात घाबरलेपणा होता. "रात्री साडेआठ वाजता ... त्याने सांगितलं होतं की तो त्या झाडाकडे जातोय. मी त्याला खूप थांबवलं . "
" आणि तुम्ही त्याला जाऊ दिलंत ? " साळुंखेंनी रागाने विचारलं .
प्रियंका शांत .
दत्ता काका पुढे आले , " साहेब , ह्या झाडाकडे गेलेल्या लोकांचा कधीच काही ठावठिकाणा लागलेला नाही. झाडच शापित आहे . "
" शापित ? " साळुंखे हसले , " मी भूत - प्रेतावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही लोक अंधश्रद्धेत अडकलेले . "
त्यांनी दोन कॉन्स्टेबलना सांगितलं , " झाडाजवळ चला. तपास सुरू करूया . "
झाडाजवळचं तांडव
सकाळचे साडेदहा वाजले होते. पावसाचे थेंब टपटप गळत होते. झाडाजवळ पोहोचल्यावर सगळ्यांच्या अंगावर शहारे आले.
झाडाच्या मुळाशी चेतनचा दुसरा बूट पडलेला होता. त्याच्या बाजूला त्याचा टॉर्च. पण टॉर्च चालू नव्हता – बॅटरी अजून होती, पण प्रकाश शून्य.
एक कॉन्स्टेबल पुढे गेला. त्याने बूट उचलला, पण बरोबरच झाडाच्या खोडावरची कोरलेली अक्षरं त्याच्या नजरेस आली:
"चेतन – मागं वळू नकोस..."
साळुंखे झाडाजवळ गेले. त्यांनी फोटोंसाठी फोन काढला, पण फोन पूर्ण ब्लँक झाला. स्क्रीन काळीच. दुसऱ्यानेही प्रयत्न केला – काहीच नाही.
"काय चाललंय इथे?" साळुंखेंचा आवाज किंचित थरथरला.
त्या झाडाजवळच मातीमध्ये एका कॉन्स्टेबलला काही पायाचे ठसे दिसले – मानवी, पण अगदी विचित्र. जणू एखाद्याने वळतावळता चालत आलो आणि अचानक हरवलो. ठसे थोड्या अंतरावर गेले... आणि अचानक नष्ट झाले.
"हे ठसे चेतनचेच असतील," एका पोलिसाने म्हटलं.
"पण थांबा..." दुसऱ्या कॉन्स्टेबलने काहीतरी वेगळं पाहिलं.
पायाच्या ठशांमधून एक लहानसा हात दिसत होता – अगदी बाळाच्या हातासारखा, पण त्या आकारापेक्षा मोठा, लांबट बोटं आणि वाकडी नखे.
सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं.
"हे मानवी नाहीत..." दत्ता काकांचे डोळे विस्फारले गेले.
प्रियंका आणि एक रहस्य
त्या रात्री प्रियंका तिच्या खोलीत एकटी बसली होती. चेतनचा फोटो समोर होता. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. ती स्वतःला दोष देत होती – जर तिने त्याला थांबवलं असतं तर?
अचानक खिडकीचा पडदा हालला. वारा नव्हता. ती उठून खिडकीकडे गेली.
तिच्या खिडकीच्या काचीत – एका कोपऱ्यात, जणू काही कोणी हात ठेवला होता – एक ओलसर छटा, बोटांचे ठसे.
ती मागे वळली – खोली रिकामी होती.
आता तिला कळलं, काहीतरी तिच्या मागे लागलंय. काहीतरी झाडाशी संबंधित.
ती उठली आणि तिच्या कपाटातून एक जुना डायरी काढली – ही डायरी चेतनच्या आजोबांची होती, जी त्याने तिच्याकडे एकदा ठेवली होती. डायरीत झाडाबद्दल अनेक गोष्टी होत्या – त्यात एक पान होतं:
"झाड हे केवळ वनस्पती नाही. तो एक जिवंत आत्मा आहे. जो मागं वळणाऱ्यांना खेचून घेतो. त्याचं बळीचं चक्र अजून थांबलेलं नाही."
प्रियंका थरथर कापत डायरी बंद करते...
शेवटी – एक साक्ष
दुसऱ्या दिवशी, गावात एक कोल्हापुरी माणूस येतो. तो म्हणतो –
"मी त्या झाडाजवळून आलोय. मला एक मुलगा दिसला – झाडात अडकलेला. त्याचे डोळे मोठे, रडणारे. आणि त्याचं नाव... चेतन!"
सगळं गाव हादरतं.