Jagrut Devsthan - 1 in Marathi Fiction Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | जागृत देवस्थानं - भाग 1

Featured Books
Categories
Share

जागृत देवस्थानं - भाग 1


 

       हनुमान जयंती झाली नी दुपारची समाराधना आटपल्यावर पैऱ्यानी भांडी घासून सभामंडपात एका कोपऱ्यात उपडी घालून ठेवली.  पैरी घरी जायला निघाल्यावर बाबी म्हाजन म्हणाला, “ आता चार सहा दिवसानी दोगा जणां येवा नी सगळी भांडी पेटाऱ्यात सोयन् भरून ठेवा.”  भाताची तपेली, आमटी भाजीचे टोप, ओगराळी, पितळ्या नी शंभर माणसांचा ताट, वाटी, तांब्या -पेला असा देवस्थानच्या मालकीचा भांड्यांचा संच होता. उत्सवापूर्वी पेटारे खोलून सगळी भांडी घासून  घेतली जात आणि समाराधना झाल्यावर आठ दहा दिवसानी सगळी भांडी पुन्हा पेटाऱ्यात भरून ठेवली जात. त्यावर्षी समाराधना झाल्यावर  चार दिवसानी  बाबी म्हाजन पुजा करायला देवळात आला. तो दार उघडून आत आला नी पहातो तर सभामंडपाच्या कोपऱ्यात उपडी घातलेली सगळी भांडी गायब झालेली. त्याच पावली घरी जावून त्याने ही गोष्ट घरच्यांच्या कानी घातली. 

      म्हातारे अण्णा म्हाजन म्हणाले,“जावंदेत गेली तर, ह्याच्या आधी असे किरकोळ प्रकार झालेले आहेत. गावात कार्याप्रस्थाला किती जण लागतील तशी भांडी न्हेतात - आणून देतात. आम्ही कधी मोजदाद सुधा केलेली नाय. कदाचित एखाद दुसरा नग गळफटावायचा प्रयत्न कोणी केलाच तरी तो त्याला पचत नाय..... महिना पंधरा दिवसानी  प्रचिती आली  की लुंगवलेले नग आपसूक आणून दिले जातात. इतक्या वर्सात एक वाटी की फुलपात्र म्हणशील तर कमी झालेले नाय. तू पुजा झाल्यावर मारुतीरायाला गाऱ्हाणे घाल. म्हणावें  तुझे सत्व तू राख. पुढच्या समाराधने पूर्वी  नगान नग जसा गेला तसा  परत यायला हवा. ” बाबीने मारुतीची पूजा झाल्यावर अण्णानी सांगितल्या प्रमाणे गाऱ्हाणे घातले. ही बातमी गावभर झाली नी उलट सुलट चर्चा सूरू झाल्या. या आधी कोणी कोणी कार्यासाठी भांडी आणून एखाद दुसरा नग गळपटावायचा प्रयत्न केलेला होता  नी त्याची अद्दल लागल्यावर तो साळसूदपणे परत देवून नजरचुकीने द्यायचा राहिला असे शोभवून घेतलेले होते. ते  लोक म्हणायला लागले, “ कोणी न्हेलीन असतील त्याला मात्र देव अद्दल घडवल्याशिवाय ऱ्हाणार नाय. ”

      चोरी मोठी होती, म्हणून तालुकाभर या गोष्टीचा चांगलाच बभ्रा झालेला होता. दोन तीन महिने गेले नी दोन मोठे टोप नी तपेली  तळेबाजार मधल्या तांबटाकडे मोडीत घातली गेली. नग बघितल्यावर ते कुठच्यातरी देवस्थानाचे असावेत इतपत अंदाज आला. म्हणून तांबटाने मोड घालायला आलेल्या माणसाकडे  खोदून खोदून चौकशी केली. पण काय गम लागला नाय. त्याने अगदी पडत्या भावाने दर केला तरी घासघिस न करता हातात पडले ते पैसे घेवून विकणारा निघून गेला. मोड घेतल्यावर दोन दिवसानी  तांबटाच्या मुलाला स्वप्ना त  दृष्टांत व्हायला लागले. मोठा हुप्या बुभु:क्कार करीत सांगे माझी वस्तू परत देवून टाक. दोन  तीनदा  असा प्रकार झाल्यावर तांबटाने गाव देवाला कौल लावून प्रार्थना  केली. तो  भांडी बिनशर्त परत करायला  तयार होता पण वस्तू  कुठची याचा  उलगडा होत नव्हता. त्याने भांडी दुकानाच्या दारासमोर ठेवलेली होती. त्यानंतर चार दिवसानी म्हाजनांचे  पाव्हणे, पाटथरचे पाटणकर नारळ विकायला आलेले होते. बाजार उलटल्यावर  ते तांबटाकडे गेले.  

        दुकानाच्या दारात ठेवलेले म्हाजनांच्या मारुतीचे टोप नी  तपेली त्यानी ओळखली. “हळयात आमच्या पावण्यांच्या मारुतीच्या देवळातली  भांडी मागे चोरीक गेली हुती. तुमी रागा जाव नुको पण हे टोप नी तपेला त्या पैकी  असल्यासारा वाटता माका......” त्यानी हे बोलल्यावर तांबटाने ती मोडीत पडत्या दराने आपण घेतली. त्यानंतर मुलाच्या स्वप्नात हुप्या येतो नी आपल्या वस्तू परत द्यायला सांगतो ही गोष्ट सांगितली. संदर्भ जुळला. दुसऱ्या दिवशी बाबी म्हाजनाला घेवून  पाटणकर आले. बाबीने भांडी ओळखली. तांबटाने एक पै ही न घेता सगळी भांडी परत दिली.  त्यानंतर चार दिवसानी ओग़राळी  ताटे  अशी काही भांडी कुणीतरी रात्रीच्या वेळी देवळात आणून टाकलेली  होती. पुढच्या दीड दोन महिन्यात  तीन वेळा कोणी कोणी चोरून न्हेलेली भांडी  नी नारळ असेच देवळात आणून टाकलेनी. चोरीला गेलेला नगान नग जशास तसा परत मिळाला. चौघा पाच जणानी मिळून चोरी करून भांडी आपसात वाटून घेतलेली असणार, नी  नंतर त्रास व्हायला लागल्यावर ती परत आणून टाकली असावीत असा तर्क लोकानी केला. मारुतीने सत्व राखले होते.  

        निव्यातले  भार्गव रामाचे मंदिर जिल्ह्यात प्रसिद्ध. महाराष्ट्रात  पर्शुरामाची मोजकी देवळे आहेत. निव्यातल्या मंदिरात काळ, काम पर्शुराम अशा तीन मूर्ती असून हे देवस्थानही  जागृत देवस्थान असा लौकिक आहे. देवाला आंघोळीसाठी चांदीचे घंगाळ आहे. तिथेही वार्षिकाच्या वेळी समाराधना होते. प्रासादाला पाचशे  माणसे जमतात. समाराधनेच्या स्वयंपाकाला लागणारी मोठ मोठी पातेली, तपेली, भात उसपायच्या पराती अशी चार पाच गोणी भरतील इतकी भांडी. कायम देवळातच ठेवलेली असायची. देवांच्या आंघोळीचे चांदीचे घंगाळ नी  रोजच्या नेवैद्याची तीन भली भक्कम चांदीची ताटे गाभाऱ्यात असतात. गाभाऱ्याला कुलूप असते. पूजेच्या वेळी सेवेकरी ते उघडतो नी पूजा झाल्यावर ते बंद करतो. निव्यात  घर्डा कंपनीने केमिकल  उत्पादनाची फॅक्टरी सुरू केली. त्यानंतर आणखीही  चार पाच कंपन्यानी फॅक्टऱ्या सुरू केल्या.  बिहार, उत्तरप्रदेश कडचे असंख्य कामगार निव्यात आले.  

       निव्यात फॅक्टऱ्यांच्या आजुबाजूला झोपडपट्टी  उभी राहिली. गावात चोऱ्या माऱ्यांचे प्रमाण वाढले. कोणातरी कामगारांची भार्गवरामाच्या मंदिरातल्या ऐवजांवर नजर पडली. अमावास्येचा दिवस धरून चोरी झाली. मंदिरा पर्यंत रस्ता होता. त्यामुळे बिनभोभाट काम झाले. चोरी झाली त्यावेळी देवस्थानचे पुजारी गणपुले ह्याना  उत्तररात्री घंटांचे आवाज ऐकायला येवून जाग आली. ते मंदिरा पासून जवळच रहात. उठून सावध झाल्यावर चूळ भरताना पुन्हा जोराने घंटांचा आवाज झाला. अवेळी घंटांचे आवाज ऐकून ते मंदिराकडे जायला बाहेर पडले. ते मंदिरा जवळ पोहोचले त्यावेळी एक ट्रक सुसाट वेगाने  अगदी जवळून गेला. गणपुले देवळाच्या पायऱ्या चढून आत जात असता घंटां काढून लोखंडी  पाईप  खाली पडलेला होता.  गाभाऱ्या समोरच्या घंटाही दिसल्या नाहीत. सगळे लाईट सुरू होते. घंगाळ ताटे दिसत नव्हती. त्यानी  बाहेर जावून हाकारा सुरू केल्यावर दहा मिनिटात आजूबाजूची माणसे जमली. 

                पोलिस पंचनामा  सगळे सोपस्कार झाल्यावर रत्नागिरी, पनवेल नी आंबा घाटातल्या चेक  पोस्टना वायरलेस गेले. दुसऱ्या दिवशी  श्वान पथक आले. पण काही धागादोरा लागला नाही. ट्रस्टी नी देवाला जाबसाल दिली. ग्रामदेवतेला कौल लावला. ऐवज खूप लांब गेलेला आहे. पण सगळ्या वस्तू  उत्सवापूर्वी देवस्थानला परत मिळतील. अशी  खात्री गुरवाने दिली. घर्डा कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरनी गृहमंत्रांना भेटून पोलिस चौकशी करविली पण काहीही उपयोग झाला नाही. (क्रमश:)