दादा ग्रामदेवीला नारळ ठेवायला गड्यांसोबत निघाला तेंव्हा त्यानाही असाच अनुभव आला रस्त्यात भेटणारा माणूस त्यांच्या पृच्छेला उत्तर न देताच तोंड फिरवून जाई. सोबतच्या गड्यांपैकी एकजण माहितगार असल्यामुळे त्याना देवळात जाता आले. गाभाऱ्यासमोर नारळ ठेवून दादा अपेक्षेने वाट पहात राहिला. पण समोरच्या माणसाचा नारळ मानवून देवीला गाऱ्हाणे घातल्यावर दादाकडे नजरही न वळवता गुरव बाहेर जावून बळाणीवर बसला. मग दादाने बाहेर जावून त्याला आपला नारळ मानवून गाऱ्हाणे घाल म्हणून सांगितल्यावर गुरव त्याच्या नजरेला नजर भिडवीत म्हणाला, “मी तुमचा गाराणां घालूक शकत नाय. गावाचो तसो हुकूम नाय. ह्येच्या पलिकडे माका काय इचारू नुको नी मी बोलणार पण नाय.......”
दादा महाजन या गोष्टीचा जाब विचारायला तणतणत पोलिस पाटलाकडे गेला. त्याला येताना बघितल्यावर पोलिस पाटिल रत्नू येरम बाहेर येवून अंगणाच्या पेळेवर थांबला. रागाने थरथरत दादा चढ्या आवाजात म्हणाला, “काय रे रत्न्या ... तुमी गाववाले माका ...ह्या दादा म्हाजन सावकाराक ज़ेटा बोड्यार मारूक लागलास ह्येचो अर्थ काय?....... ” त्याच्या नजरेला नजर भिडवीत रत्नू ही जरबेच्या आवाजात बोलला, “ह्या बगा सावकारानुं , तुमी पैशेवाले आसलास तर आपल्या घरचे...... मी पोलिस पाटील आसय.... गाव माका रत्नूदा म्हंता, तुमी माज्याशी सोयन् बात करा..... आदी आवाज खाली करा नी काय तुमची तक्रात हा ती सांगा.... मग्ये मी कायदेशीर काय तां उत्तर द्येयन्” रत्नूचं हे उत्तर ऐकल्यावर दादाची गुर्मी उतरली. तो सौम्य आवाजात म्हणाला, “ह्या बगा पोलिस पाटलानु, मी सरकारी लिलावात दांडेकराचो वाडो नी मिळकत घितली.... आता फुडच्या येवस्ते साटना आज चार मान्सा नी गडी घ्येवन् मी आज तुमच्या गावात इलय... गावातलो येक मानूस आमच्याशी येका शब्दान पन भाषण करीत नाय.... तुमचो दुकानदार जिन्नस देवक् तयार नाय..... गावद्येवीच्या द्येवळात नारळ मानवूक ग्येलय तर गुरव माजा गाराणा घालूक तयार नाय...... ह्येचो अर्थ काय? आता मी ह्या गावातलो ऱ्हयवाशी व्हनार.... माका गाववाल्यांशी बरे पणात संबंद ठेवच्ये हत. पण गाववाले माज्याशी बोलोक दुकु राजी नाय..... ह्येचो अर्थ काय? ”
रत्नू शांतपणे म्हणाला, “दुकानदार , गाववाले नी गुरव काय माज्या हुकमात नाय..... कोनाशी कसा बोलायचा? कसा वागायचा ? ह्या ठरवूक ज्येचो त्यो मुकत्यार हा. ह्या बाबतीत मी काय करू शकत नाय.आता त्ये नाय बोलत तर मी काय करनार? तुमचा झाला ना बोलॉन? आता तुमी जावक् शकतास.” हे प्रकरण आपल्याला वाटले होते तेवढे सोपे नाही. दादा काय समजायचे ते समजला नी , “ह्येचा उत्तर आज ना उद्या मी द्येयन्....मी काय फाटको नाय. धा गावात माजी पत हा..... माज्ये वरपावत हात पोचलेले हत..... मी तुमका धडो शिकवल्या शिवाय ऱ्हवनार नाय..... माका दादा म्हाजन म्हंतत , नाय तुमचा गाववाल्यांचा हगणां मुतणां बंद क्येलय तर ही म्हाजनाची औलाद नाय असा समज, तुमी बीन कारणी माज्याशी वाकडीक घितलाहास ...ह्येच्ये परिणाम चांगले होणार नाय..... ” अशी दमबाजी करीत दादा निघून गेला.
दोनच दिवसानी उत्तर रात्री “कायतरी टोचला” म्हणत हरी उठून बसला . त्याच्या ओरडण्याने दादा म्हाजन नी गडी जागे झाले, त्यानी कंदिलाची वात मोठी केली नी सगळे हरीच्या जवळ आले. त्याच्या करंगळीवर जनावराच्या दंशाची खूण होती. त्यानी आणखी दोन कंदिल लावून शोधाशोध सुरू केली. कोपऱ्यात भाताच्या मुड्याखाली दीड हात लांब जनावर मिळाले. ते मारून नीट पारख केली, तो विषारी कांडर होता. त्याचा दंश असेल तर माणूस स्शिकस्त सुर्योदयापर्यंत जगतो, हे माहिती असल्यामूळे मंडळी धास्तावली. हरी तर छाती पिटीत आळपायला लागला..... “आता मी काय जगत नाय ...काडराच्या विषावर काय उतारो नस्ता ह्या माका म्हायत् हा. त्यात करून ह्या गावात कोन वैद्य हा की नाय ह्या पन म्हायत् नाय..... आनी ल्वॉक आमच्याशी बोलोक राजी नाय... कोन काय मदद करनार नाय..... ” . त्याला गप्प करीत दादा म्हाजन दोन गडी घेवून टाकोटाक पोलिस पाटलाकडे गेले. त्यांचे बोलणे ऐकल्यावर पोलिसपाटील त्याना घेवून वैदगिरी करणाऱ्या इंज्या धनगराकडे गेला. धनगरांचे मांगर गावाबाहेर सड्या माळावर. तिथे जावून इंज्याला सोबत घेवून दांडेकरांच्या वाड्यावर येईतो चांगलं फटफटलेलं होतं. हरीच्या तोंडातून फेस येत होता नी त्याला अखेरची घरघर लागलेली होती. ईंज्याने पाळं मुळं उगाळून तो थलक हरीला चाटवला. कसलासा पाला पाट्यावर त्याचा रस हरीच्या डोक्यावर थापला. पण हरीला उतार पडला नाही. सुर्योदय होण्या आधीच त्याने डोळे मिटले. त्याला मेण्यात घालून माणसं मूळ घरी रवाना झाली.
त्या नंतर तालुक्याचे पोलिस ठाणेदार दादा म्हाजनाच्या वतीने रदबदली करण्यासाठी धावडशीत खेप करून गेला. त्याच्या तोडावर लोक होय होय म्हणाले पण लोकांचा बहिष्कार सुरूच राहिला. त्यानंतर म्हाजनाने आजूबाजूच्या गावचे मातब्बर असामी मध्यस्त म्हणून पाचारून गावदेवीच्या देवळात बारा पाचाच मेळ भरवला. दादा म्हाजनाने दाती तृण धरून माफी मागितली. पण गाव बधला नाही. अगदी शेवटचा उपाय म्हणून त्याते वाडा नी नी मिळकत विक्री करायची बोलवा फोडली . पण कोणीही खरेदीदार भेटेना. हरी कांडर चावून गेल्यावर मात्र दादा पुन:श्च वाड्यावर रहायला आला नाही. आठ दहा वर्षं मागे पडली. काळपुळी झाल्याचं निमित्त होवून दादा म्हाजन असह्य वेदनानी तळमळून तळमळून मेला. त्याच्या पश्चात त्याचा कोणीच वाली वारस पुनश्च कधीही दांडेकरांच्या मिळकतीकडे फिरकला सुद्धा नाही.
अजूनही अशी असंख्य जागृत देवस्थानं कोकणात आहेत. परिसरातले भाविक लोक त्यांच्या मान- मान मर्यादा सांभाळून त्यांचं पावित्र्य भंग होवू देत नाहीत. ज्या त्या देवस्थानांच्या प्रथा परंपरांनुसार त्यांचे उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात. श्रध्दाळू लोक नवस मानस बोलतात त्यांच्या इच्छेप्रमाणे कार्य सिद्धी झाल्यावर, अपेक्षित फलप्राप्ती झाल्यावर निरपवादपणे नवस पुरे केले जातात. हे समाज चक्र कैक पिढ्यां पूर्वी सुरू झालेलं असून जुन्या रुढी आजही अगदी निर्वेधपणे सुरू आहे. (समाप्त)