Patrakaar Ghondira Ghotre - 2 in Marathi Comedy stories by Akshay Varak books and stories PDF | पत्रकार धोंडीराम धोत्रे - 2

Featured Books
Categories
Share

पत्रकार धोंडीराम धोत्रे - 2

भाग ०१ : वाड्याची दंतकथा"

माझं पोट... साफ होत नाही. "हो, हे ऐकल्यावर कुणालाही वाटेल, ‘काय बुवा, ह्याचं आरोग्य बिघडलंय वाटतं!’पण नाही!

हे माझ्या तब्येतीचं नव्हे तर पद्धतीचं वर्णन आहे. कारण माझं पोट म्हणजे साधं पचन यंत्र नव्हे...ते एक 'ब्रेकिंग न्यूज सेन्सर' आहे! 

मी धोंडीराम. तोडफोड दैनिक मधला फुकटातला वार्ताहर. आई नाही, बायको नाही.  जेवायला मिळालं तर बघतो, नाही मिळालं तर बातमी खातो.

माझं पोटही याच शिस्तीचं . काहीतरी 'खाद्य' आलं की हळूहळू पचवायला घेतं... पण बातमी जवळ आली की? सगळं अडकतं. थांबतं. गडबडतं.

एक गंमत सांगतो. जेव्हा माझ्या पोटात अकारण वळवळ सुरू होते ना...तेव्हा मी डॉक्टरकडे जात नाही, मी नगरपालिकेकडे जातो! कारण ती वळवळ म्हणजे नक्की कुठे तरी काहीतरी गडबडलेलं असतं.

माझ्या शरीरातल्या कुठल्याही अवयवाला एवढा अनुभव नाही, जितका माझ्या आतड्यांना आहे. हे काही नवीन नाही. वर्षानुवर्षांची ‘ट्रेनिंग’ आहे. सुरुवातीला मी घाबरायचो. पोट दुखतंय म्हणून चिंतीत व्हायचो. मग लक्षात आलं की ज्यादिवशी पोट साफ होत नाही, त्या दिवशी बातमी पक्की मिळते!

हे एकदा इतकं अचूक झालं होतं. गावातल्या एका शाळेचं उद्घाटन होतं. सर्व वर्तमानपत्रांनी लिहिलं. “शाळा आदर्श!”पण माझ्या पोटानं तोंड वाकडं केलं. मी गेलो आणि काय बघतो?शाळा आहे, पण वर्गांना छप्परच नाही. बाहेर फलक होता. ज्ञानमंदिर. आत मात्र दिसत होतं चिखलमंदिर.

त्या दिवसापासून मी खात्रीने म्हनलो, “पोट सांगतं, बातमी आहे रे धोंडीराम. ”बाहेरच्या जगात फसवणूक असते, पण माझं पोट... ते कधीही खोटं बोलत नाही.आता तुम्हीच सांगा, बाकीचे पत्रकार काय करतात? "सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार...""गुप्त अहवालानुसार...""आम्ही आमच्या प्रतिनिधीला पाठवलं..."आणि मी?

"माझ्या पोटानं दिलेल्या इशाऱ्यानुसार...!"

हे असंच रोजचं आहे.सकाळी उठून चहा पिताना जर काही गडबड झाली नाही, तर मी समजतो. आज फारसा काही घडणार नाही.पण जर कडकडून पोट खवखवायला लागलं, मग?मी तयार होतो.  नोटपॅड, मोबाइल, वडापाव, आणि साफ होण्याची अपेक्षा न करता बातमीत घुसतो!

शेवटी एकच पर्याय सांगतो...तुमचं पोट रिकामं असो किंवा भरलेलं. पण माझं पोट?ते केवळ ‘ब्रेकिंग न्यूज’साठीच राखून ठेवलंय!"

असो तर मी आता सरळ मुद्यावरच येतो.

त्या सकाळी, मी नेहमीप्रमाणे बाजारातल्या नारायणच्या टपरीवर चहा प्यायला बसलो होतो. माझी ती जागा कोणालाच मिळत नाही. एक लाकडी बाक, जो माझ्या वाकलेल्या पाठीला अगदी फिट बसतो, आणि समोरचा टेबल जरा डगमगत असला तरी त्यावर माझा कप नेहमीच्या कोनात स्थिर असतो.

चहा नुकताच समोर आला होता.  इतका ताजा की त्यातून येणाऱ्या वाफेने माझ्या चष्म्यावर धुके जमा व्हायला लागलं. त्या वाफेचा एक झरा माझ्या नाकात गेला आणि माझं डोकं एकदम म्हंटलं, “आता तरतरी आली” मोडमध्ये गेलं. कपातला चहा म्हणजे कढईतल्या फोडणीसारखा फसफसत होता. तो आवाज ऐकताच मला क्षणभर वाटलं, कुठे तरी बटाट्याची भाजीच तर तळत नाहीये?

तेवढ्यात.....माझ्या खिशात ठेवलेला मोबाईल. जो साधा मोबाइल नाही, तर बातमी यंत्र!  हो, मी त्याला त्या प्रेमळ नावानं हाक मारतो. कारण मी म्हणतो, "बायको नसली तरी चालेल, पण बातमी यंत्र नेहमी जवळ हवंच!"तो वाजायला लागला.रिंगटोनही काही साधी नव्हे . एका जुन्या राजकारण्याच्या भाषणाची क्लिप."जनतेचं हित, हा माझा धर्म आहे!" 

हे वाक्य कानावर आलं आणि मी पटकन उचलला.आता माझ्या ब्रेडचं काय झालं?तो चहात घालून मी बोलण्यात गुंतलो, आणि तो बेचारा विरघळून त्या कपातली चवच बदलून गेला.आणि मी मनात म्हटलं –

"धोंडीरामा, चहा थंड होऊ दे, बातमी गरम असली पाहिजे!"

 “गण्या गावकरी कॉलिंग...”कॉल उचलताच पलीकडून गण्या थोडासा घशात मळमळवलेला आवाजात ओरडला,

"भाऊ... घडतंय काहीतरी विचित्र!"मी पटकन कप खाली ठेवला. ब्रेडचा कोपरा तोंडात अडकला तसाच राहिला.

"कसला प्रकार?" मी गंभीरपणे विचारलं, पण आवाजात थोडं चहामिश्रित आलस्य होतं.

"गावातल्या बाजीरावांच्या वाड्यातल्या जुना विहिरीतून आवाज येतोय... रात्रीचे... पाण्याचे!"

"पाण्याचे म्हणजे नळ सुरु झाला का?"

"अरे नाय रे! असा आवाज नाही! हा काहीतरी जीवघेणा आवाज वाटतो. जणू एखादं पाणी...पण गहिरं, खोल, आवाज करून हाक मारतंय!

"मी थोडा थांबलो. मग विचारलं,"आवाज तू ऐकला?"गण्या क्षणभर गप्प.

मग म्हणाला,"नाही... पण माझ्या मावशीच्या नणंदेचा मुलगा म्हणतो. त्याच्या मित्राने ऐकला!"

मी मोबाईल डोक्यापासून थोडा दूर केला आणि हलक्या स्वरात पुटपुटलो,

"अरेच्चा! म्हणजे बातमीच्या पायाला अजून बूटही नाहीत."पण... त्याच क्षणी माझं पोट जरा गडगडलं.संध्याकाळचं जिरलेलं कटलेट किंवा ‘मिस्ट्री’चं पहाटेचं आमंत्रण?

“धोंडीराम!” माझ्या आतून एक पोटजाणिवांनी भरलेला आवाज आला,

“उठ! ही बातमी हसवत पण हादरवणार. तुझी उष्ट्या बातमीची प्लेट तयार आहे.  विहिरीत उभी आहे!"

गण्या मला घेऊन गेला त्या वाड्याकडे . ज्याचं नाव ‘बाजीरावांचा वाडा’, पण अवस्था पाहता ‘बाजीरावांची भानगड’ वाटत होती.

वाडा म्हणजे काय सांगू? जणू काळाने स्वतः हा पानगळलेला इतिहास गिळंकृत केलाय.

दारं? ती इतकी खिळखिळी की, त्यांना "दरवाजा" म्हणणं म्हणजे खराट्याला गालिचा म्हणणं.

खिडक्या अर्धवट उघड्या, पण काच नसलेल्या. त्या उघड्या भागातून थेट आतमध्ये वाऱ्याचं पार्सल येत होतं.

छपराच्या कडेला काहीतरी निळसर शेवाळं लागतं होतं, आणि त्यावर एक मांजर बसून नाकातून गारठा सोडत होतं. बहुतेक तिचंही काही नातं असावं या भुतांशी!

पायथ्याशी थोडीशी झाडाझुडूप, जणू हिरव्या भानगडीची गालिची अंथरलेली.

पण... पण...

विहिरीभोवती मात्र एक विचित्र शांतता.

ती शांतता अशी नव्हती की मन प्रसन्न होईल.  ती अशी होती की, कानात कापूस घातल्यासारखं वाटेल आणि हृदयाने कानामागे थरथर करायला सुरुवात करेल.

गण्या अगदी कुजबुजत म्हणाला,"गेल्या आठवड्याभरात दररोज रात्री ११ वाजता विहिरीतून आवाज येतोय. 'गुळगुळगुळ… टप्प टप्प' असा!

सुरवातीला वाटलं कोणीतरी विहिरीत भांडी धुतायत, पण इथं कोणी धुणं करायला जातच नाही!

"मी लगेच खिशातून माझं छोटं रिपोर्टर नोटपॅड काढलं. जिथं मागच्या पानावर अजून शेवग्याच्या मेथीच्या भाजीचा रेट लिहिलेला होता. आणि आवाज नोट केला,

"गुळगुळगुळ… टप्प टप्प – संशयित ध्वनी. संभाव्य प्रेतकुंडली/जुन्या काळातील जलात्मा/घसारा नळ.

""काहीजण म्हणतात भूत आहे," गण्या डोळे मोठे करत म्हणाला,"आणि काहीजण म्हणतात. विहिरीत जुना शाप दडलाय. पूर्वीच्या काळात इथं कोणीतरी कोसळलं... किंवा कोणी कोसळवलं!

"मी डोळ्यांवरचा 'टॉर्चवाला चष्मा' दाबला आणि विचारलं,"पाणी आहे का आत?""आहे. पण खूप खोल. आणि तळ काही दिसत नाही. कोण उतरायचं धाडस करत नाही...

"मी जरा सुस्कारा टाकला.माझं पोट गडगडलं. त्यालाही माहीत होतं. "धोंडीराम, ही बातमी उकळतीये... विहिरीत नाही, तुझ्याच रिपोर्टमध्ये उडणारं टप्प टप्प आहे!"

माझं पोट कुरकुरत होतं. हे काही साधं नव्हतं. ही नेहमीची ‘पचनशक्तीची कुरकुर’ नाही.  ही होती बातमीची सिग्नल!

माझं पोट म्हणजे एक प्रकारचं रेडिओ स्टेशन आहे; जेव्हा बातमी जवळ असते, तेव्हा तिथून ‘गडगड...कुरकुर...गुळगुळ’ असा थेट अलर्ट मिळतो.

"झालं!" मी ठरवलं. विहिरीचा आवाज मी स्वतःच्या कानांनी ऐकायचाच! आणि ऐकायचा तर वेळ रात्रीचाच. थेट ११ वाजता, त्या शापित बाजीराव वाड्यात.

गण्या त्याचं सामान सांभाळत माझ्याकडे आला. चेहरा असा की, जणू मी त्याला युध्दावर पाठवत होतो.

“तू वेडा आहेस!” तो थरथरत म्हणाला.

“तू जातोयस त्या विहिरीपाशी रात्रीच्या ११ वाजता?

आम्ही गावकरी ८ वाजल्यावर चप्पलची सुद्धा चुळबुळ करत नाहीत... आणि तू?

”मी त्याच्याकडे एक हसरा कटाक्ष टाकत खांदे उडवले.“मी बातमी मागे नाही सोडत... आणि भूतंही मला पाहून भांबावतात,” असं ठोकून दिलं.

चांदण अर्धं लपलेलं, आकाशात ढग लपतखपत फिरत होते. मी बाजीराव वाड्याच्या मागच्या बाजूला एका जुन्या वडाच्या झाडाच्या आडोशाला टेकून बसलो.

एकटा मी... आणि माझा कॅमेरा. त्यालाही मी ‘बॅटरीबाई’ म्हणतो.काळोख वाढतो तसं निसर्गशास्त्र सांगतं, माणसाचं बीपीही वाढतं. पण मी शांत होतो. म्हणजे तसा दाखवत होतो.

आतून मात्र माझं बीपी आणि डीपी दोन्ही उसळलेलं.मी माझा ‘कवर स्टोरी’ मोड ऑन केला. कॅमेरा चालू. टॉर्च हातात. श्वास नाकातून.  आणि आवाज कानात.११ वाजले.

आणि..."गुळ… गुळ… गुळ… टप्प… टप्प…

"आवाज असा, की एखादा म्हातारा कुबड्या घालून विहिरीत पाय टाकतोय की काय, असं वाटलं! पण हे पाण्याचं नाही... हे काहीतरी खोलत ओलं होतं.जणू कुठलातरी जीव विहिरीच्या तळातून वर येतोय... किंवा तळाला खेचला जातोय.

मी हळूहळू पायाच्या बोटांवर उभा राहिलो. विहिरीकडे सरकू लागलो. अंगावर गार वाऱ्याचा हात फिरला आणि मी मनात म्हणालो. "ही बातमी खूप खोल आहे... अगदी विहिरीइतकी!

"तेवढ्यात...‘क्लिक!’

एका क्षणात माझ्या पाठीवर प्रकाशाचा गोळा पडला.

“कोण जातो इथे?” कोणीतरी गडद आवाजात विचारलं.

त्या क्षणाला माझ्या हृदयाने टाळी वाजवली आणि हसून म्हटलं – “चल, बातमी आली!”मी क्षणाचाही उशीर न करता मान ताठ करत उत्तर दिलं –“मीच! धोंडीराम धोत्रे पत्रकार!

विहिरीतली बातमी घेऊन आलोय, पाणी प्यायला नाही!”


पुढील भागात आपण पाहणार आहोत : वाड्याची दंतकथा. गावाच्या म्हाताऱ्यांंकडून त्या विहिरीच्या रहस्यांची कहाणी ऐकतो. जी धोंडिरामच्या चहाच्या कपात थरथरी घालते.

◆जर पत्रकार धोंडीराम धोत्रेची कथा आपणास आवडली तर नक्की रेटिंग द्या. हीच विनंती.