Patrakaar Ghondira Ghotre - 6 in Marathi Comedy stories by Akshu books and stories PDF | पत्रकार धोंडीराम धोत्रे - 6

The Author
Featured Books
Categories
Share

पत्रकार धोंडीराम धोत्रे - 6

             भाग ५ : धोंडिरामचा खास रिपोर्ट

"पोट कुरकुरतं तेव्हा बातमी खवळते!"हा माझा ठाम सिद्धांत आहे. आणि माझ्या पत्रकारितेच्या ‘पोटातून आलेल्या’ करिअरमध्ये अनेक वेळा तो सिद्ध झालाय!...पण वाड्याच्या विहिरीच्या प्रकरणात तर त्याने अगदी सळसळतं यश मिळवलं!

झालं असं की –एक दिवस माझं पोट रेस्टॉरंटच्या ताटावर नव्हे, तर बातमीच्या उकळीवर कुरकुरायला लागलं.गण्या गावकरी, जो दर आठवड्याला पायातल्या चप्पलइतका बदलतो पण चेहरा कधीच नाही, त्याने मला एका गूढ टिपचं बोळं हातात दिलं –"धोंडीराव, या पन्हळवाडी गावात एक वाडा आहे… आणि त्याच्या विहिरीतून रात्री विचित्र आवाज येतो!"

मी लगेच जळगाव एक्सप्रेसच्या वेगाने निघालो,टॉर्च, टिपण नोंदवायचं वहितं, आणि… हो, माझी पोटसफाईची गोळी घेऊन – कारण भीती पचवायला पचनही लागतं ना!

गावात पाय ठेवताच…कुजबुज! कुजबुज!!“रात्री सावली जाते म्हणे…”“विहिरीत आत्मा आहे म्हणे…”“कोणी पाहिलंय म्हणे – रमा!”

म्हाताऱ्या भिकू काकांच्या आठवणी सुरु झाल्या –“बाळा, १८२२ साली श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रमा हरवली… तेव्हापासून तांबं आणि टप्पटप्प आवाज सुरू!”

आता एवढं सगळं ऐकून मीही थरारलो नाही, तर काय!पण माझ्या आतल्या ‘गावगप्प पत्रकार’नं सांगितलं –"धोंडीराम, इथं काहीतरी भलतंच शिजतंय – आणि तूप लावून बातमी वाढवायची वेळ आलीये!"

मग काय!मी रात्र रात्र तांबं हातात घेऊन, विहिरीकडे कान लावून,गावकऱ्यांच्या भीतीच्या चेहऱ्यांत विनोदाचे फटके बघत,शेवटी पोचलो सत्याच्या गळक्या नळापर्यंत!

आता तुमच्यासमोर आहे –धोंडीरामचा खास रिपोर्ट – साफ, खराखुरा, आणि हसवणारा!ज्यात भूत नाही, पण भुता-सारखं वागणं नक्की आहे,आणि आत्मा नसलाय, पण गावकऱ्यांचा आत्मा दोन दशके निघून गेलेला होता. गळक्या पाईपच्या भीतीने!

पाहत राहा… कारण पोटातून बातमी उगम पावते –आणि धोंडीराम तिचा पहिला पाईप शोधतो! 🚰📜📹

त्या दिवशी रात्री ठोक ११ वाजता, मी परत एकदा विहिरीपाशी हजर!हातात मोबाइल, टॉर्च, आणि मनात ठाम निश्चय –"आज या ‘गुळगुळ-टप्पटप्प’ प्रकरणाचा शेवट नक्की करायचाच!"

कॅमेरा ऑन केला, विहिरीच्या कठड्यावर जरा हिरो स्टाईलने बसलो – म्हणजे जसं Discovery Channelचे रिपोर्टर बसतात, तसंच.आवाज पुन्हा आला –“गुळ…गुळ… टप्प… टप्प…”

मी म्हटलं, "हेच ते! आज मिळणार TRP!"टॉर्च विहिरीकडे रोखला… आणि अचानक… एक हलकुस चालला!आणि बघतो तर काय –एक मांजर!हो, साधीच… वाघ्या मावशीची पोसलेली मांजर –जिचं वजन सुमारे दोन किलो आणि गर्व सुमारे दोन क्विंटल!

ती मॅडम (म्हणजे मांजरबाई), अगदी गुप्तहेरिणीसारखी पावलं टाकत विहिरीच्या झाकणावर चढली…...आणि वाकून आत काहीतरी उकरायला लागली.जणू खुद्द तिचंच काही गुप्त भूत अडकून पडलंय!

आता लक्षात आलं –ती विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या एक जुन्या, खिळखिळ्या लाकडी दरवाज्याशी खेळायची…दरवाजा उघडताना त्याचा आवाज,“गुळगुळ… गुळगुळ…”...आणि तिच्या उड्या?म्हणजे, जणू मांजरची ओलिंपिक स्पर्धा चालू आहे –“टप्प! टप्प! टप्प!”

मी तर एक क्षण विचार केला –"हे सगळं म्हणजे ‘भूताची कहाणी’ नसून,‘मांजरीच्या मौजेशीर मजा’ आहे!"

पाच-सहा वेळा ती उडी मारायची, दरवाजा हलायचा, पाणी थरथरायचं,आणि गावकरी म्हणायचे –“रमा आली! रमा आली!!”

त्यात लिकेज असलेला तो पाईप. हा "गुळगुळ… टप्प… टप्प…" आवाज आत्म्याचा नाही तर…गळक्या पाईपचा होता.

सत्य उघडलं आणि मी मोबाईलच्या कॅमेऱ्यात तो ऐतिहासिक क्षण टिपला –गावातल्या गूढकथांचा नायक निघाला… चार पायांचा, मिशा असलेला, आणि शेपूट मिजासदार मांजर! आणि लिकेज असलेला तो पाईप🐱

म्हटलं,"भूत नाही, शाप नाही, आत्मा नाही –फक्त वाघ्या मावशीची पोसलेली मांजर आणि एक खिळखिळं लिकेज पाईप!"

…आणि मी मनात पुटपुटलो –“धोंडीराम, तुला भयंकर शंका आली होती… आणि शेवटी आली ती – शंकेवर बसलेली मांजर!”

📸 माझा धमाल रिपोर्ट आणि गावाचं हसणं भांडं फोडून!

सगळं कळल्यावर मी एक भारी रिपोर्ट बनवला –"वाड्याच्या विहिरीतलं भूत... आणि त्याचा मिशीतला म्याव!"

रिपोर्टमध्ये साउंड इफेक्ट, मांजराच्या म्यांव्या,म्हाताऱ्यांच्या भीतीदायक पण अर्धवट गोष्टी,आणि सर्वात महत्त्वाचं –ती विहिरीजवळची एक लिकेज पाईप!

हो!हिचं खरं नाव कुणालाच माहीत नव्हतं.गावातल्या पोरांनी तिला ‘चिकचिक बाई’ असं टोपणनाव दिलं होतं –कारण तिच्या मधून सतत “चिक... चिक... टप... टप...” असं आवाज यायचा,जणू एखादं चुकार भूत ठिबकायला लागलंय!

पण गंमत ही होती –मांजर रोज रात्री त्या लिकेज पाईपजवळ जाऊन त्याच्या खाली बसायचं.एक दिवस मी लपून पाहिलं –तर म्यावसाहेब त्या पाईपखाली तोंड वर करून थांबले होते,जणू "हे अमृत कधी टपकेल?" अशी भक्तीभावनेने वाट पाहत.

आणि टपकलं की –"चपाक!"मांजर चपापून उडी मारायची, आणि त्याच वेळीविहिरीत एक "गुळगुळगुळ" आवाज यायचा –जो खरेतर त्या पाईपचं आणि मांजराच्या पावसाळी नृत्याचं कॉम्बिनेशन होतं.

मी या सगळ्याचं झणझणीत शूटिंग केलं –स्लो मोशनमध्ये पाणी टपकणं,मांजराचे ‘करण जोहर स्टाईल’ कटे,आणि त्या पाईपजवळ बसलेल्या म्हाताऱ्याचे संवाद –"हे बघा! मी सांगितलं नव्हतं का? ह्या जागेत काहीतरी अघोरी आहे!"

रिपोर्ट पाहून गाव फाटून हसला.गण्याने तर त्या पाईपलाच ‘लिकेज देवी’ म्हणत समोर अगरबत्ती लावली,आणि मांजराला "मिशा मातेची मूर्ती" जाहीर केलं.

गावकऱ्यांनी ठरवलं – वाडा उघडायचाच.स्वच्छता मोहीम झाली.विहिरीचं झाकण नीट लावलं,आणि ती लिकेज पाईप, जिला गावाने एकेकाळी शापित मानलं,तिला आता एक गोल्डन टेप लावून 'रिटायर' केलं गेलं –वरती लिहिलं आहे –"इथे टपकणं बंद. पण इतिहास कायम आहे!"

मांजर अजूनही तिथेच असते –आता ती पाईपजवळ नाही, तर थेट वाचनालयात!पुस्तकांच्या मध्ये मध्ये शिरून बसते –आणि कोणीतरी जोरात पान उलटलं की,"म्याव!" असं म्हणून सूचना देते –"थोडं प्रेमाने वाचा, भूत नाही – साहित्य आहे!"

आता कुणी विचारतं –“धोंडीराम, तुझ्या बातम्यांची सुरुवात कुठून झाली?”...तर मी सांगतो –“एक मांजर, एक लिकेज पाईप, आणि एक भुतेगिरीची अफवा –ह्या तिघांनी मिळून मला पत्रकार बनवलं!"

(समाप्त – पण त्या लिकेज पाईपच्या जागेवर अजूनही थोडं ओलं दिसतं... कोण जाणे! 😄)

◆🎉 प्रिय वाचकहो,

जर हे ‘धोंडीराम धोत्रे – पर्व १’ वाचताना तुम्ही हसता हसता खुर्चीतून घसरलात,किंवा शेजारच्यांना वाटलं की तुम्ही पावसाळ्यात छप्पर विसरून आलात –तर समजा, माझं मिशीतलं मिशन यशस्वी झालंय! 😄

तुमचं हसू, प्रेम आणि हलकीशी ढेकर (हसून आलेली, जेवणानंतरची नव्हे) –हेच माझं पुरस्कार, पगार आणि प्रेरणा!

❗ काही चुकलं असेल, विनोद चुकून वळवट गेला असेल,किंवा मांजराच्या उड्यांतून तुमचं पानगळ झालं असेल –तर त्या मांजरासह मीही माफीनामा टाकतोय.

पण... एक विनंती!हसलात की नाही हे लाजून लपवू नका.कमेंट करा, प्रेम उधळा, आणि सल्ला दिल्यास मी ‘धोतरात गुंडाळून’ ठेवीन!

🎬 पाहत राहा पुढचं झणझणीत पर्व –2

🚽 "शहरातला शौचालय घोटाळा!"धोंडीरामचा फ्लश रिपोर्ट – जो तुमच्या हसण्याच्या नळाला पूर्ण प्रेशर देईल!

🔧 लिकेज पाईप फोडेल रहस्य,💦 पाण्याचा प्रवाह नेईल राजकारणापर्यंत,💬 आणि गावकऱ्यांच्या भांडणात सांडेल... थोडं जास्तच!

👃 पर्व २ येतंय –जिथे सांडपाणीही बातमी बनेल,आणि “बोलतंय टॉयलेट” हे सत्य ठरेल! 😁

आता सांगा, हसलात की नाही? 😄पर्व २ ला वाट पाहा… तोवर, पाणी बंद ठेवा – कारण धोंडीराम आलाच तर सगळं उघड करेल!

✍️ लेखक – अक्षय वरक