भाग ४ : सत्याचा उलगडा
"‘रमा – १८२२, श्रावण पौर्णिमा’…! हंss! त्या तांब्यावर कोरलेलं नाव आणि तारखेनं तर माझ्या झोपेचं बारा वाजवले. जणू माझं डोकंच त्या तांब्यासारखं रिकामं झालं होतं. पण आतून रहस्यमय धातूने भरलेलं! रात्रभर मी उशाशी तो तांबं ठेवून झोपायचा प्रयत्न केला, पण काय सांगू? प्रत्येक वेळी डोळा लागला की वाटायचं. एखादी साडी नेसलेली, केस मोकळे केलेली बाई येतेय आणि म्हणतेय, 'धोंडीराम, मला शोध… मी श्रावणात हरवलेय!'
आता बघा, तांबं हातात घेतल्यापासून माझ्या विचारांचं चक्रीवादळ उठलं होतं. पाण्याचा आवाज ऐकला की वाटायचं, कुणीतरी विहिरीतून 'हेलो!' म्हणतंय. सावली दिसली की वाटायचं, 'ही तीच का?' आणि सगळ्यात भारी म्हणजे… कॅमेरा! अरे हो, माझा नवाकोरा DSLR कॅमेरा विहिरीत पडला होता! त्याचा विचार केला की माझ्या काळजात थोडं पाणी येतं. विहिरीत पडलं की काय झालं? पण त्यात फोटो होते ना… आणि त्या फोटोमधल्या पलीकडंच हे सगळं गूढ दडलंय का काय?
आणि आता हे तांबं… कुणी मुद्दाम ठेवून गेलं का? की तीच रमा मला हे सगळं दाखवायला आली होती? की विहिरीतली रमा, माझ्या घरच्या बोळक्यात डोकावणारी बया आहे? माझं डोकं चांगलंच गरम झालं होतं. एक क्षण वाटलं, हे सगळं भूताचं प्रकरण आहे… पण मग आठवलं, आपल्या वाड्यात माणसांची लबाडीही भुतांपेक्षा कमी नाही.
मी म्हटलं, ‘धोंडीरामा, हे काहीतरी भारी खेळ चालू आहे. आणि तुझं नाव यात पहिल्या रांगेत आहे!’ मग काय, सकाळ उजाडली तरी मी चहा-पाणी विसरून तांबंच हातात फिरवत बसलो. मी तांब्याच्या त्या कोरलेल्या अक्षरांकडे बघत होतो… 'रमा – १८२२…'अरे देवा, ही रमा कोण? आणि माझ्या आयुष्यात कशाला आली? आणि सगळ्यात महत्वाचं – ही गेली कुठं?"
दुपारी पुन्हा एकदा मी वाड्याच्या दिशेने वळलो. आता गावातली हवा काही औरच झाली होती. मी रस्त्यानं चाललो होतो, पण लोक डोळ्यांनीच मला चघळायला लागले होते. म्हणजे पिठात मीठ कमी, पण गॉसिपमध्ये धोंडीराम जास्त!
“धोंडीरामचं डोकंच गेलंय…”“म्हणतो काय, सावली बघितली म्हणे रात्रीच्या अंधारात!”“आणि तो तांबं… आईगं, त्याला तर तो तांबं प्रेमात पडलाय बहुतेक…”“विहिरीत पाईप आहे म्हणे, आता भूतं पाईपमधून येतात का काय?”
मी सगळं ऐकत होतो… पण बाहेरून शांत. कारण आतून माझं मेंदूचं रसायन इतकं उकळत होतं की मला एकदा वाटलं, थेट वाड्याच्या वऱ्हाडीत बसावं आणि 'सीबीआय'सारखं चौकशी सुरू करावी!
मी विहिरीजवळ पोचलो. यावेळी मात्र ठरवलं. आता डोळे उघडे, कान टवकारलेले आणि संशयाचा पारा पूर्ण हाय!
पाण्याचा तो आवाज… गेल्या तीन दिवसांपासून येतोय – पण कुठून? एकदम म्युझिक सिस्टीम नाही पण, ‘झर झर’ आवाज कायम त्याच दिशेने यायचा. मी हळूच मागच्या बाजूच्या भिंतीकडे सरकलो. किडक्या भिंतीच्या मागे काहीतरी ‘खुसखुसं’ होतं…
आणि बघतो तर काय? एका कोपऱ्यातून एक लोखंडी पाईप सरळ विहिरीत घुसलेला होता!म्हटलं, 'आहा! हाच तर खलनायक!'
हा पाईप बघून मी थोडा चपापलो. कारण हे काही सामान्य पाईप नव्हतं… ह्याच्यात काहीतरी बिनवर्तमान आहे. असं काहीतरी ‘गुपित वाहतंय’ ह्या पाईपमधून… आणि कदाचित पाणी नाही, तर गूढ!
मी पाईपाजवळ वाकून पाहिलं. नाकाजवळ नेलं. म्हणालो, 'कोणतं डिओ वापरतोय हे भूत?'. पण वास काही अतरंगीच होता. धूप, चुलीचा धूर, आणि थोडं आयोडीन यांचा संगम!
त्या पाईपकडे बघत मी मनात विचार केला –"भूत पाईपमधून येतंय की गॅस कंपनीच्या योजना सुरू झाल्यात? आणि जर हे प्लंबिंग कुणीतरी मुद्दाम केलं असेल, तर त्याच्या मेंदूत नक्कीच बबल्स आहेत!"
एकंदर काय. आता ‘पाईपलाइनचं रहस्य’ माझ्या तपासाचा नवीन अध्याय ठरलं होतं.आणि गावकऱ्यांनी जरी मला ‘पाईपमधून थेट पळून गेलेला’ समजलं, तरी माझं लक्ष होतं. पाईपमधून भूत येतंय की प्लॅन?
माझं शेरोशायरीमधलं मन म्हणालं –“तांबं हातात, पाईप विहिरीत,धोंडीराम गुंतला गूढात – साक्षात CID च्या जीवितात
हातात टॉर्च, डोक्यावर संशयाची टोपी आणि मनात ‘शेरलॉक होम्स’चा आत्मा घेऊन मी त्या पाईपजवळ वाकलो… आणि अगदी हळूच कान लावला.
...आणि काय सांगू?
पाईपमधून अगदी ठसठशीत आवाज येत होता –“गुळगुळ… टप्प… टप्प… गुळगुळ… टप्प!”
एक सेकंद वाटलं की एखादं भूत तिथे टॉमॅटो सूप उकळतंय आणि त्यात उडदाचे दाणे टाकतोय!किंवा कदाचित, एखादा निसटलेला ड्रमर पाईपमधून ताल झाडतोय!एकंदर त्या आवाजाने माझा मेंदू ‘साऊंड सिस्टम’सारखा व्हायब्रेट झाला.
मी ताबडतोब गावच्या जुन्या पाण्याच्या नकाशाची मागणी केली. कारण आता हे प्रकरण कुठल्याही भुयारी गुहेइतकं गुंतागुंतीचं वाटू लागलं होतं.आणि मग काय, मी पंचायत कार्यालयात जाऊन ठणकावून सांगितलं –"मला जुनं पाण्याचं नकाशा पाहिजे! आणि हो, एक ग्लास पाणी पण!"
हे ऐकताच सातच्या सात कारभाऱ्यांनी हसायला सुरुवात केली. अगदी हसरा कोंबडा जिंकल्यासारखं.कोणी म्हणालं –"धोंडीराम, आता पाण्याला नकाशा विचारतोय? भुताला पत्ता विचारायला लागलास वाटतं!"दुसरं म्हणालं –"का रे? भुता-वाटोळ्याचा रस्ता चुकलाय काय?"
एवढं सगळं होऊन मी नकाशा मागतोय म्हटल्यावर, लोकांना वाटलं मी कुठल्या गुप्त प्रेमकहाणीच्या शोधात आहे… पण माझं लक्ष होतं त्या ‘गुळगुळ… टप्प’वर!
शेवटी, सरपंचांना दया आली बहुतेक. त्यांनी कपाट उघडलं, आतून एक जाडजूड फाईल काढली. जणू धूम २ ची ओरिजिनल स्क्रिप्टच!
ते म्हणाले –"घे बघू धोंडीराम! १९२४ साली चंद्रापूरच्या भुतांनी टाकलेलं पाईपलाइन प्लॅन असेल तर नसेल!"
मी ती फाईल दोन्ही हातांनी उचलली. ती इतकी जड होती की वाटलं मी काहीतरी ऐतिहासिक जिंकूनच घरी चाललोय.
आता माझ्या हातात टॉर्च होता, दुसऱ्या हातात भलामोठा नकाशा, आणि कानात –“गुळगुळ… टप्प… टप्प…”
मी स्वतःशीच म्हटलं –धोंडीराम, आता हे काही साधं प्रकरण नाही –भूत जर पाईपमधून टप्पा टप्प करत असेल,तर तूच एके दिवशी 'टप्पा' पडशील कुठे तेही काळजीपूर्वक बघावं लागेल!
त्या जाडजूड, धुळीने कुरकुरणाऱ्या नकाश्याची पाने उलटताना मी अगदी CIDच्या 'दया'सारखं चेहरा बनवून बसलो होतो. (फरक इतकाच – मी दार नाही, फाईल उघडत होतो.)
...आणि अखेरीस एका कोपऱ्यात एका कोमेजलेल्या, पाण्याच्या डागांनी विद्ध झालेल्या पानावर मला गूढ गाठ सापडली!
ते तिथं स्पष्ट दाखवलं होतं –१९८० साली गावातली एक जुनी पाणीपुरवठा योजना चालू होती… आणि तिच्या अंतर्गत एक पाईप थेट त्या वाड्यापर्यंत नेलेली होती!
मी डोळे विस्फारले. अगदी 'राजा हरिश्चंद्र' सिनेमा पहिल्यांदाच पाहिल्यासारखं!म्हटलं, 'ही माहिती तर हॉलिवूडपटासारखी धक्कादायक आहे!'
पण सगळ्यात भारी म्हणजे. त्या पाईपबद्दल कोणीच काही बोलत नव्हतं… गेली कित्येक वर्षं!जणू ती योजना गावात झालीच नव्हती… किंवा ती पाईप कुणा लाजऱ्या भुतासारखी गुपचूप भूमिगत आयुष्य जगत होती!
आता मला जाणवलं –हा "गुळगुळ… टप्प… टप्प…" आवाज आत्म्याचा नाही तर…गळक्या पाईपचा?
मी एक क्षण स्तब्ध झालो.म्हटलं, “हे काय? म्हणजे मी तीन दिवस नाटक केलं, टॉर्च घेऊन पाईपला कान लावले, गावातली अब्रू गमावली… आणि शेवटी निघालं फक्त लीकेज?**हा आवाज एखाद्या शापित आत्म्याचा नव्हता…तो होता एक म्हातारा पाईप, जो फक्त 'पेशंटली लीकेज करत' होता!
डोक्यात अक्षरशः 'फुटलेल्या पाईपचं तांडव' सुरु झालं.तरीपण मी हार मानणाऱ्यांतला नव्हतो –माझ्या डोक्यात लगेच ‘ऑपरेशन पाईपएंड’ सुरु झालं!
मी स्वतःशी ठणकावून सांगितलं –"आता बस्स! उद्या मी यंत्रणांसकट त्या पाईपचा शेवट पाहणारच!"
‘यंत्रणा’ म्हणजे मी, राम्या वेल्डर, गावचा कुबड्या गण्या, आणि एक जुनाट पाण्याचा टेस्टर (जो एका वेळेला भिजेल तर दुसऱ्याला चिरतो).आता ही टीम गावात भुते शोधत होती की पाईपचा पोरगा – हेच लोक ठरवू शकतील!
दुसऱ्या दिवशी सकाळी मी ‘गंभीरतेचा शर्ट’ घालून आणि उत्सुकतेचा टॉवेल खांद्यावर टाकून निघालो. कारण आजचा दिवस ऐतिहासिक होता!माझ्यासोबत होता गावचा नळवाला गणप्या. ज्याच्या हातात जन्मतःच स्पॅनर जन्मलेला आहे, आणि ज्याच्या डोळ्यांमध्ये पाईपची ब्लूप्रिंट दिसते, असा खमक्या इसम!
आमच्याकडे तीनच गोष्टी होत्या –एक स्पॅनर,एक स्क्रू ड्रायव्हर,...आणि माझी सकाळची पोटसफाईची गोळी – (कारण गूढ उकलताना आतून ढवळाढवळ नको!)
गणप्या गंभीर चेहऱ्याने म्हणाला,“धोंडीराव, आता मी याला उघडतो… पण जर आतून भूत निघालं, तर पाईप मी सोडेन, भूत तुझं!”
मी मान डोलावली – "भूत असो किंवा बाथरूमचा नळ, आपण आज शेवट बघणारच!"
गणप्यानं स्क्रू ड्रायव्हरने पाईपच्या चकत्या फिरवल्या आणि...फस्स्स्स्सस्स!!!
अरे देवा!जणू विहिरीच्या आतमध्ये एखादं पाणीमय दानव कैद झालं होतं आणि त्यानं जोरात ढेकर दिली!पाण्याचा इतका दाब होता की गणप्याच्या अंगावर जोरात फवारा गेला. आणि तो वाटला की आंघोळ करण्याचा एक कट्टर कट चालू आहे!
गणप्याच्या डोळ्यांतून पाणी, डोक्यावरून पाणी, आणि आता त्याच्या तोंडातूनही आलं.“ही पाईप नाही धोंडीराव, ही तर पाण्याची मिसाईल आहे!”
पण…पाईपच्या एका खालच्या भागात एक छोटं लिकेज दिसलं. अगदी छोटंसं. जसं एखादा म्हातारा पाईप शिंकताना गळून देतो तसं!त्या छोट्याशा छिद्रातून हळूहळू थेंब टपटप करत होते… आणि ते थेंब थेट विहिरीत पडताना “गुळगुळ… टप्प… टप्प…” असा आवाज करत होते.
मी डोळे विस्फारले. गणप्या म्हणाला,“हा बघ! भूत नाही… ‘लीक’ आहे! आणि तू तीन दिवस भुता-भुता करतोयस!!”
गावकरी मागून बघत होते . काहींनी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केलं होतं, काहींनी तर थेट विडिओला टायटल दिलं होतं:"धोंडीराम वर्सेस द गळका पाईप – द फाइनल लीकेज!"
मी कपाळावर हात मारला…म्हटलं,"म्हणजे मी जे समजलो ते भूत नाही, तर बुडबुडतं पाणी होतं?हे काय... ‘गूढ’ नव्हे तर ‘गुळगुळ’ प्रकरण निघालं!"
पाईपमधून फस्स्स करत पाणी उडालं, लिकेज उघड झालं, आणि…एक क्षणासाठी सगळ्यांनी आ वासला!
हो अगदी "आ" म्हणजे ऑपेरा गायकांनी तोंड उघडलं की जसं दिसतं – तसंच!एवढं वर्ष जिथं आत्मा समजून लोक चप्पल उलटी ठेवून झोपायचे, त्या जागी आता पाणी सांडतंय हे समजल्यावर, गावकऱ्यांचे मुखमंडल अविश्वासाच्या धक्क्याने टांगित झाले!
मदनराजा, जो नेहमी पाटलांचं कुत्रं वाटायचा आवाज ऐकून थरथरायचा, तोच जोरात ओरडला –“म्हणजे काय! गेली पंचवीस वर्ष आपण भूत समजत होतो,...आणि ही तर टाकी फुटली होती!”
आता एवढं म्हणाल्यावर गावातल्या सगळ्या भुतांच्या कथांना तीन अक्षरी झटका बसला: ‘लीक’कोणी ओरडत हसले, कोणी पोट धरून हसले, आणि दोन-तीन तर इतके हसले की चुकून स्वतःचे जुने तांबं उघडून बसले!
पण काही जणांच्या चेहऱ्यावर चक्क रागातलं हास्य होतं.
“आम्ही इतकी वर्ष उगीच घाबरत होतो!”“माझी मुलगी लग्नाला नाही आली कारण ती म्हणाली, ‘त्या वाड्यात आत्मा आहे’ – आता सांग की तिला, ‘बाळा, आत्मा नाही, गळका नळ होता!’”
हास्याचं वादळ थोडं कमी झालं, आणि मी लगेच माझा धोंडीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड मोड ON केला –मोबाईलचा फ्रंट कॅम लावला, गळ्याचा टोन बदलला, आणि LIVE सुरु केलं:
📹 “प्यारे दर्शकहो… ही आहे खरी घटना .वाड्याच्या विहिरीतून येणारा आवाज ‘रमा’ नावाच्या आत्म्याचा नसून,पुरातन पाईपलाइनचा तांत्रिक दोष होता…”
म्हटलं तर ही ब्रेकिंग न्यूज!माझ्या पाठून फॉलो करणाऱ्या ३६ इंस्टाग्राम फॉलोअर्ससाठी मी आता गावातला ‘पाणी एक्सपर्ट’ झालो होतो!माझं रिपोर्टिंग चालूच होतं –“हा आहे माझा स्पेशल भूत की बोगस रिपोर्ट!आणि या गावात आता फक्त गोड आवाज येईल –...नळातून पाण्याचा!”
(आणि बाजूला गणप्या पुटपुटत होता – “आता आवाज आलाच, तर तो माझ्या पंपाचा असेल…”
◆पुढील भागात पाहणार आहोत धोंडिरामचा खास रिपोर्ट....