He wasn't a lover, he was a soldier. - 2 in Marathi Thriller by Akshu books and stories PDF | तो प्रियकर नव्हता,तो फौजी होता - 2

The Author
Featured Books
Categories
Share

तो प्रियकर नव्हता,तो फौजी होता - 2

भाग २ – कैदेतला योद्धा

पहाटेच्या अंधारात कैदगृहाच्या भिंती जणू थंडीने कापत होत्या. हवेत जड, गूढ नीरवता भरलेली होती. खोलीतील तापमान गोठवून टाकणाऱ्या थंडीच्या पातळीवर पोचलं होतं. एका कोपऱ्यात लागलेला जुना, धुळीने झाकलेला पंखा झरझर आवाज करत होता, पण त्याच्या त्या कंपकंपीत फिरण्याने अधिकच अस्वस्थ शांतता पसरत होती. पंख्याच्या वाऱ्याने भिंतीवर लटकलेला एक किडक्या कागदाचा झुबका हळूहळू हलत होता. आणि त्या मागून पसरत होता एक विचित्र जंगली वास. तो वास कोणत्यातरी सडलेल्या गोष्टीसारखा, न ओळखता येणारा, पण नकळत नाकात भरून राहणारा होता.

त्या अंधाऱ्या, दमट खोलीत एका कोपऱ्यात बसलेले होते दहा थकलेले, भांबावलेले चेहरे.सरिता, आदित्य, श्रुती, रोहित, पूजा, वैशाली, प्रतीक, सचिन, अमेय आणि मानसी.त्यांच्या चेहऱ्यावर दडपण, भीती आणि निराशेच्या छटा उमटल्या होत्या. काहींच्या डोळ्यांत झोप हरवलेली, काहींनी अजूनही आशेची एक लकीर जपली होती. कुणी आपले हात घट्ट गुंडाळून बसलेले, कुणी जमिनीवर नजर रोवलेली. एकमेकांशी खूप काही बोलायचं होतं, पण शब्द कंठात अडकले होते.

आणि त्या वातावरणात नुकताच एका खिळखिळ्या दारातून आत ढकलण्यात आलेला होता – राजवीर.

तो इतरांपासून थोडा वेगळा वाटत होता. शांत, स्थिर. त्याच्या चालण्यात किंचितशी जडावलेली ताकद जाणवत होती. जणू तो कुठून तरी दूरवरून थकल्यानंतर आला होता. त्याचं अंग शरीराने झिजलेलं, पण डौल शाबूत होता. त्याच्या कपड्यांवर माती आणि ओलसर चिखलाचे डाग होते. त्याचे केस विस्कटलेले आणि चेहरा काळसर सावलीने झाकलेला. पण सगळ्यात वेधक होते ते म्हणजे, त्याचे डोळे.

परंतु तो डोळे उघडत नव्हता.राजवीर मूकपणे एका कोपऱ्यात बसला होता. त्याने अजूनपर्यंत कुणाकडे न पाहता आपली नजर जमिनीवरच ठेवली होती – गंभीर, शांत, जडशंभर. त्याच्या उपस्थितीने खोलीत काही तरी बदलल्यासारखं वाटू लागलं होतं.जणू एखादी अदृश्य लाट त्या बंदिस्त हवेत फिरून गेली होती.

कुणीही काही बोललं नाही. पण प्रत्येकजण त्याच्याकडे अधूनमधून पाहत होतं – तो कोण आहे, कुठून आला, आणि... त्याचं न बोलणं का एवढं अस्वस्थ करतंय?

त्या अंधाऱ्या, ओलसर खोलीत थंडीने सगळे गारठले होते. एका कोपऱ्यात शून्यात नजर लावून बसलेल्या कैद्याकडे. राजवीरकडे. सरिताची नजर वारंवार जाऊ लागली. त्याचा चेहरा काहीसा झाकलेला होता, पण जेवढा दिसत होता, तेवढं काहीतरी विचित्र ओळखीचं वाटत होतं.ती मनातल्या मनात पुन्हा एकदा आठवणींचा पट मागे फिरवू लागली.

"ह्याला मी कुठे तरी पाहिलंय... पण कुठे?" – तिच्या मनात क्षणाक्षणाला हा विचार अधिक गडद होऊ लागला.त्याचं गालफडांवरचं हाडं, डोळ्यांची खोल बसलेली नजर, आणि एक विचित्र शांतता. जणू एखादा झंझावात आतून गुपचूप चालू आहे, पण चेहऱ्यावर अजिबात हलकंसाही भाव नाही.

राजवीरच्या वागण्यात एक प्रकारचं कट्टर शांतपण होतं.कोणी काही विचारलं तरी तो न फडफडता, न चिडता फक्त हलकं मान हलवत होता.खाण्याची वाटी त्याच्यासमोर पडून होती, पण त्यातला अर्धा भात न खाल्लेलाच.कधी पंख्याच्या घरघर आवाजाकडे नजर लावत, कधी भिंतीच्या फटीतून डोकावणाऱ्या प्रकाशरेषेकडे.तो तिथं आहे, पण त्याचं मन इथं नाही.  ही जाणीव स्पष्ट जाणवत होती.

सरिताच्या मनात आता अस्वस्थता दाटून येत होती.ती नकळत त्याच्याकडे अधिक वेळ पाहू लागली.त्याच्या हलचाली, बसण्याची ढब, भिंतीकडे बघण्याची एक विशिष्ट पद्धत…काहीतरी फार फार ओळखीचं. पण नाव, वेळ, जागा – काहीही आठवत नव्हतं.

ती हलक्याशा कुशीत बोलली,“मी ह्याला नक्की कुठेतरी पाहिलंय… पण कुठे?”आणि तिचा मेंदू त्या क्षणापासून उत्तर शोधण्यात मग्न झाला.

पण राजवीर मात्र अजूनही तसाच.शांत, स्थिर आणि बोलका न होणारा.जणू स्वतःचं गुपित घट्ट कवटाळून बसलेला एक योद्धा. जो फक्त योग्य क्षणाची वाट पाहत होता.

संध्याकाळच्या कुंद प्रकाशात खोलीत एक बेचैनीची शांतता दाटलेली होती. अचानक दरवाज्याकडून जोरात आवाज झाला. लाकडी दरवाजा धडकन उघडला गेला आणि दोन बंदूकधारी आत शिरले. दोघांच्याही चेहऱ्यावर काळी फडकी बांधलेली होती, डोळ्यात थंड आणि करडी नजर. त्यांच्या हातातल्या रायफल्स चमकत होत्या, आणि त्यांच्या पायांचे टकटक आवाज खोलीत भेसूर सन्नाटा पसरवत होते.

त्यातील एकानं घसा खवखवत, कमालीच्या रुंद आणि हुकूमशाही आवाजात आदेश दिला,“तुम लोग आज फिर से काम करोगे! कुछ ढोना है... चलो, सब बाहर निकलो!”

खोलीत बसलेले बंदिवान एकमेकांकडे घाबरत पाहू लागले. कुणाच्या हातात कंप होत होता, तर कुणी नजरेखाली दबकून बसलेला होता. कुणाच्या मनात घामाच्या धारा वाहत होत्या, तर कुणी खिन्नतेने तोंड लपवत होता.

दुसरा बंदूकधारी पुढे सरकला आणि त्याचा आवाज अजून खवखवलेला, धोकादायक बनला,“क्या सुस्ती है? चलो जल्दी! वरना यहीं पे गोली मार देंगे!”

आदेशाचं गांभीर्य लक्षात येताच सर्वजण एकेक करत उभे राहू लागले. त्यांचे हात एकाच दोरीने घट्ट बांधले गेले – जणू कोणी जनावरांच्या कळपाला हलवत असावं, तसा अमानवी प्रकार.

त्यानंतर त्यांना खोलीबाहेर ओढून नेण्यात आलं – कुणाच्या पावलात थरथर होती, कुणी अजूनही मागे वळून भितीने पहात होतं. बाहेरच्या थंड हवेत त्यांना रानात नेलं गेलं, जिथे खंदक खोदायचा होता, बॉम्ब वाहायचे होते, आणि दहशतवाद्यांच्या तंबू उभारण्याचं काम केलं जायचं होतं.

काही तासांनी, घामाने आणि धुळीने माखलेले सर्वजण परत एकदा त्या अंधाऱ्या खोलीत ढकलले गेले. शरीर थकलेलं, पण डोळ्यांत अजूनही धडधडत्या भितीचा सावळा थर होता.

कैदगृहातील सगळे दहशतीखाली वावरत असताना, एकच व्यक्ती होती जी पूर्णपणे वेगळी वाटत होती. राजवीर. तो अगदी शांत होता, जणू त्याचं अस्तित्व त्या अंधारात विरून गेलं होतं. पण त्याचे डोळे . ते काहीतरी वेगळंच सांगत होते. एकटक नजर, हळूहळू फिरणारी, प्रत्येक हालचालीवर नोंद ठेवणारी. तो कुणाशीही न बोलता, एका कोपऱ्यात बसून साऱ्या परिसराचं बारकाईनं निरीक्षण करत होता.

गार्ड कुठे उभा आहे, कोणत्या वेळी कोणाची तुकडी बदलते, दर दोन तासांनी कोणी चहा प्यायला जाते, कुठल्या तंबूमध्ये आवाज जास्त येतो, कुठे मोकळी जागा आहे – त्याच्या मेंदूत हे सगळं नोंदवलं जात होतं. त्या खोलीतील एका भिंतीत असलेल्या छोट्याशा, पातळ भेगेकडे त्याचं लक्ष विशेष गेलं होतं. त्या भेगेतून क्षीणसा प्रकाश आत येत होता. जणू बाहेरच्या मोकळ्या जगाची आठवण.

त्याने एका क्षणासाठी त्या भेगेकडे बघून डोळे मिटले… पण नंतर पुन्हा नजर फिरवून गार्डच्या पावलांच्या आवाजावर लक्ष केंद्रीत केलं.

खोलीच्या दुसऱ्या टोकाला, आदित्य गप्प बसलेला होता, पण त्याच्या मनात मात्र विचारांचे वादळ उठले होते. त्याच्या कपाळावर आठ्या होत्या, आणि नजरेत एक बेचैनी. शेवटी तो हलक्या आवाजात सरिताकडे वळला.

"मला हा नवा कैदी खूपच संशयास्पद वाटतोय..." – तो कुजबुजत म्हणाला.

सरितानं त्याच्याकडे चमकून पाहिलं.

"का? काय झालं?" – तिनं काळजीने विचारलं.

"बघ ना... इतक्या दिवसा आम्ही सगळे कसे गाळून गेलोय. कोणी रडतो, कोणी ओरडतो, काहीतरी बोलतं, विचारतं... पण हा? हा तर जणू काही मिशनवर आलाय! ना कसली प्रतिक्रिया, ना कसली तक्रार. फक्त डोळे फिरवत राहतो... काही तरी गडबड आहे." – आदित्यने आवाज खाली ठेवत ताठ उभं राहून इशारा केला.

सरिताचं मन आधीपासूनच अस्वस्थ होतं. तिनं नकळत राजवीरकडे नजर टाकली. तो पुन्हा एकदा भिंतीकडे नजर लावून बसलेला. तिच्या चेहऱ्यावर एक क्षणभर विस्मय उमटला.

"खरं सांगू का..." – ती हळूच म्हणाली,  "मला तो कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय… पण आठवत नाही कुठे."

आदित्यनं तिच्याकडे विचाराने बघितलं. क्षणभरासाठी दोघंही गप्प झाले. एक विचार त्यांच्या दोघांच्याही मनात खोल रुजून बसला. ‘तो खरंच कैदी आहे का?’

रात्र सरकत होती. तंबूच्या बाहेरचा वारा मंद गुंजन करत होता, आणि काळोखात केवळ कुत्र्यांच्या दूरवरच्या भूंकण्याचा आवाज ऐकू येत होता. शिबिराच्या एका कोपऱ्यात, जिथे एक छोटीशी दाट सावली होती, तिथून राजवीर हलकेच उठला.

त्याच्या हालचालींत अचूकता होती. अंथरुणाची घडी न विस्कटता तो उठला आणि आपला पाय अलगद बाजूला सरकवत त्याच्या बुटाच्या आत लपवलेला एक पातळ, धारदार चाकू बाहेर काढला. ती वस्तू आर्मीने त्याच्यासाठी खास तयार केली होती. नखाएवढा, पण अत्यंत घातक.

राजवीर सावधपणे भिंतीजवळ गेला. तीच जुनी, पातळ भेग. त्याने लक्षात ठेवलेली. एका गुडघ्यावर बसत त्याने त्या भेगेतून बाहेर डोळा टाकला. समोरचा गार्ड आता हळूहळू चालत होता. अधूनमधून तो थांबत होता, कधी सिगारेट शिलगावत होता, तर कधी आळस देत मागं-पुढं करत होता. प्रत्येक हालचाल, प्रत्येक वेळेचा फरक राजवीर नोंदवत होता.

गार्डचा बदल नेमकं किती वेळाने होतो, कोणत्या कोनातून येतो, त्याच्या पावलांचा आवाज किती दूर ऐकू येतो.या सगळ्या गोष्टींचं गणित राजवीरच्या डोक्यात तयार होतं. काही क्षणांनी तो पुन्हा चाकू लपवून शांतपणे परत आपल्या अंथरुणात शिरला. बाहेर जसा अंधार होता, तसाच शांत अंधार त्याच्या डोळ्यांतही पसरला.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, मावळतीचे उबदार किरण तंबूच्या कापडावर मृद्गंधासारखे पसरले होते. कैद्यांची गर्दी संथ झाली होती. काहीजण थकून बसले होते, तर काहीजण एकमेकांत कुजबुजत होते.

सरिता मात्र विचारांत गढून गेली होती. त्या नव्या कैद्याबद्दल तिच्या मनात कालपासून एक कुतूहल निर्माण झालं होतं. तो फारच शांत होता. वेगळा होता. आज नकळत ती त्याच्या शेजारी जाऊन बसली.

ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तो काहीतरी जमिनीवर बघत होता, अगदी खोल विचारात गढलेला. सरितानं आवाज कमी ठेवून विचारलं,"तू... आधी कुठे राहत होतास?"

राजवीरने मान न हलवता, नजर न बदलता उत्तर दिलं,"भरकटलोय... आता कुठेच नाही."

त्याच्या उत्तरात एक निर्विकार, पण खोल अर्थ होता. सरिताला जाणवलं की हे उत्तर शब्दांपेक्षा जास्त सांगून गेलं. तिनं पुन्हा विचारलं,"तुझं नाव काय?"

या वेळी राजवीरने हळूच तिच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे खोल, शांत आणि झऱ्याच्या तळासारखे स्वच्छ होते. त्याने एका दीर्घ थांब्यानंतर उत्तर दिलं,"माझं नाव... विसरून टाकलंय मी."

सरिता काही क्षण काही बोललीच नाही. तिच्या अंगावर काटा आला. तिला समजत नव्हतं की हे उत्तर खरंच आहे की एका खालच्या, दडपलेल्या वेदनेचा आवाज.राजवीरचे डोळे किंचित पाणावलेले होते. पण ते अश्रू नव्हते  ती एक अंतर्गत शांतता होती, जी फक्त अशाच माणसात असते, ज्याने खूप काही गमावलं असतं आणि तरीसुद्धा त्याचं धैर्य हरवलं नसतं.

  दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास, कैदगृहात एक अस्वस्थ शांतता होती. बंदोबस्त अधिक कडक झाला होता, गार्ड अधिक सजग होते, आणि प्रत्येक कैद्याच्या चेहऱ्यावर भीतीचं अस्पष्ट सावट पसरलेलं होतं. अचानक दरवाज्याची साखळी खडखडली आणि दरवाजा मोठ्या धडाक्याने उघडला.

त्या दरवाजातून मुख्य दहशतवादी – उंच, बारीक चेहरा, भेदक डोळे, आणि अंगावर चकचकीत काळा कुर्ता होता. गर्जना करत आत शिरला. त्याच्या पाठोपाठ दोन अन्य बंदूकधारी, चेहऱ्यावर मास्क चढवलेले. वातावरणात क्षणात तणाव पसरला.

त्याने मध्ये उभं राहत, एका थंड स्वरात वज्राघात केल्यासारखं जाहीर केलं,

“अगर भारत सरकार ने 72 घंटे में हमारे माँगें नहीं मानी,तो एक-एक करके तुम्हारे दोस्तों को गोली मारेंगे... और विडीओ भेजेंगे!”

त्या शब्दांत मृत्यूची सावली होती.

आदित्य चटकन जमिनीवर बसला. डोळे भरून आले. त्याचा श्वास अनियमित झाला, आणि ओठांवर फक्त एकच शब्द अडकल्यासारखा होता – “आई…”

मानसी भीतीने किंचाळली. तिचा स्वर कैदगृहाच्या भिंतींवर आदळून परत आला. ती हातवारे करत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्दच फुटत नव्हते.

श्रुतीने दोन्ही हात जोडले. डोळ्यांतून अश्रू ओघळले. तिने नजर आकाशाकडे केली – जणू देवाला साकडं घालत होती.

सरिता मात्र पूर्णपणे शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलीही प्रतिक्रिया नव्हती. तिने डोळे बंद केले. तिच्या आत काहीतरी उधळून चाललं होतं, पण ती काहीच बोलली नाही.

आणि त्या सगळ्यांत...राजवीर मात्र अजूनही जागच्या जागी बसलेला होता. चेहरा गंभीर, पण स्थिर. त्याच्या डोळ्यांत फक्त एक खोल विचार होता – ना भीती, ना आश्चर्य. केवळ संयम.जणू हे सगळं आधीच माहित होतं त्याला.

तो हलला नाही. बोलला नाही.फक्त त्याचा दृष्टिकोन – आता काहीतरी वेगळं घडणार, याची निःशब्द घोषणा करत होता.

ती घोषणा करून ते दहशतवादी बाहेर आले. सर्वत्र शांतता पसरली होती.

रात्र गडद होत चालली होती. तुरुंगातलं आकाश लोखंडी गजांमधून डोकावत असलं, तरी जणू काळोखाचा एक वेगळाच पडदा संपूर्ण वातावरणावर पसरला होता. प्रत्येक दारावर नजर ठेवणारे गार्ड आपापल्या फेऱ्या घेत होते. तेवढ्यात, कैद्यांच्या एका खोलीत. सर्वांच्या नजरा झोपेच्या दिशेने झुकलेल्या असताना, राजवीर मात्र शांतपणे भिंतीशी टेकून बसला होता.

तो बाहेरून जरी स्थिर आणि निश्चल दिसत होता, तरी त्याच्या मनात विचारांची घडी घालणं सुरू होतं. वेळ जवळ येत चालली होती. लष्कराने आधीपासून ठरवलेला एक विशिष्ट गुप्त सिग्नल. तो आता वापरायचा होता. पण अगदी योग्य क्षण ओळखून.

पाच-दहा मिनिटांनी एका गार्डचा पायऱ्यांवर आवाज झाला. एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात टॉर्च. गार्ड खोलीच्या दरवाज्याजवळ थांबला. त्याचं डोळ्यांचं लक्ष झपाट्याने स्कॅन करत होतं. पण ते एकदम सरावलेलं आणि काटेकोर.

राजवीर उठला, अंग ताठ करत, थोडं पुढे सरकला. त्याचं एक बोट पाठीमागे नेत तो अगदी हळूवार हालचाल करत, डाव्या हाताची तीन बोटं एकामागोमाग एक हलकेच उचलून परत घट्ट बंद केली.ही हालचाल क्षणभरात पूर्ण झाली. अगदी एखाद्या अनवधानपणासारखी. पण गार्डच्या नजरेतून काहीच सुटत नव्हतं.

गार्डने त्याच्याकडे बघितलं. काही सेकंद स्तब्ध शांतता पसरली. मग, गार्डच्या डोळ्यांत अचानक एक सूक्ष्म चमक उमटली.त्याने आपल्या उजव्या डोळ्याचं वरचं पापणं एक क्षण हलकंसं उघडं ठेवलं. एक संकेत. तो सामान्य पाहणाऱ्याला सहज न समजणारा, पण गुप्तचर यंत्रणेतील लोकांना नेमका ओळखता येणारा.

दोघांनी एकमेकाला ओळखलं होतं.राजवीर आणि तो गार्ड — दोघंही आता समजू शकले होते की त्यांचं मिशन सुरु झालं आहे.

पण तरीही, त्यांचा चेहरा निर्विकार. कोणतीही हालचाल नाही. संवाद नाही. कोणतीही उत्सुकता नाही.फक्त शांततेखाली लपलेली एक स्फोटक तयारी सुरू होती.

हाच क्षण... लढ्याच्या सुरुवातीची नवी खूण होती.राजवीर एकटा नव्हता....तो रणभूमीच्या मध्यावर पोहोचला होता — पण आता एक पाठीराखा त्याच्या बाजूला होता.

गर्द अंधार पसरलेला होता. आतापर्यंत अनेकांनी संयम राखला होता, पण आता हळूहळू कैद्यांचं मनोधैर्य तुटू लागलं होतं.नित्याचे उपेक्षित आणि दडपलेले क्षण, अपमान, भूकेची झळ, आणि मरणाची सततची चाहूल – याने सर्वांच्या मनावर गारठा पसरला होता.

एका कोपऱ्यात आदित्य सरिताला घट्ट बिलगून बसलेला होता. त्याचे डोळे पाणावलेले, ओठ थरथरत होते.त्याने कुजबुजत सरिताच्या कानात म्हटलं,

“आपण वाचणार नाही… हे संपलं...”

त्या शब्दांनी जणू त्या खोलीतील थिजलेली शांतता एक क्षण विस्कटली. एक नकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरली.

आणि तेव्हाच…राजवीर उठला.त्याच्या डोळ्यांत वेगळीच झळाळी होती – अंगावर साखळ्या असल्या तरी चेहरा निर्धाराने तेजस्वी दिसत होता.

तो पुढे येत म्हणाला,

“काय वाचायचंय का?”“किती दिवस असंच घाबरून बसणार आहात?”“मरण्यापेक्षा झुंज द्या!”

त्याच्या शब्दांत अशी तीव्रता होती की जणू त्या प्रत्येक वाक्याने हृदयाला चपराक बसावी.सर्वजण एकदम स्तब्ध झाले. सर्व नजरा त्याच्यावर फिरल्या.श्रुती, जी आत्ता पर्यंत शांत होती, तीने हळूच विचारले –

“तू… तू कोण आहेस?”

राजवीर काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित उमटल, पण ते एका खोल इतिहासाची जाणीव देणारं होतं.त्याने उत्तर दिलं –

“कोण आहे ते नंतर सांगेन…”“पण सध्या हे लक्षात ठेवा – मी इथं कैदी म्हणून आलोय, पण मनानं योद्धा आहे.”

तो पुढे सरकलाया, आणि त्याचा आवाज आता थरथरणाऱ्या लोकांच्या काळजाला भिडत होता–

“आणि मी तुम्हाला इथून बाहेर काढणार आहे.”

त्या शेवटच्या वाक्यात असा दृढ आत्मविश्वास होता की तो केवळ घोषणा वाटत नव्हती – ती जणू भविष्यातील सत्याची जाणीव होती.

कैद्यांचे डोळे आता किंचित उजळले होते. आदित्यने पहिल्यांदाच डोळ्यांत आशेचं प्रतिबिंब पाहिलं.सरिता, श्रुती, समीर, आणि इतरही — सर्वांच्या मनात एक नवचैतन्य जागं झालं होतं.

भाग २ समाप्त.पण ही फक्त सुरुवात होती…

राजवीरचं खरं मिशन आता सुरू होणार होतं.गुप्त योजना, थरार, विश्वासघात, आणि भावनांच्या कल्लोळात – पुढचा भाग आणखी गहिरा, आणखी तीव्र होणार होता…