भाग ३ : गुप्त योजना
रात्र गडद होत चालली होती. बाहेर कुठेतरी दूरवर एखाद्या लांडग्याचा ओरडण्यासारखा आवाज येत होता. थंड वाऱ्याच्या झुळुकीत तुरुंगाच्या सळई हलके हलके किरकिरत होत्या.कैदेतली माणसं.सरिता, आदित्य, श्रुती, पूजा, रोहित, वैशाली, प्रतीक, सचिन, अमेय, आणि मानसी. एकमेकांच्या जवळ बसलेली. कुणी अंगावर चादर ओढून बसलं होतं, तर कुणी नुसतं भिंतीला डोकं टेकवून विचारात हरवलं होतं.
त्यांच्या चेहऱ्यावर दिवसाभरातला थकवा होता, पण आता राजवीरच्या कालच्या शब्दांनी त्यांच्या मनात एक वेगळाच ठिणगा पेटवली होती. भीतीचं ओझं थोडं हलकं झाल्यासारखं वाटत होतं.
एका कोपऱ्यात, अंधाराच्या सावलीत, राजवीर शांत बसला होता. डोळे मिटलेले, पण त्याचा मेंदू झपाट्याने काम करत होता. चेहऱ्यावर स्थिरता, श्वास मोजून घेतल्यासारखा हळू-हळू.त्याच्या मनात एकेक पायरी उलगडत होती.
“आपण आठ लोकं… एक गार्ड आपल्यातलाच…”त्याने मनातल्या मनात मोजणी केली.“त्याच्याकडे छोटं वायरलेस आहे… पडद्यामागे लपवलेलं. मी योग्य वेळी त्याच्याशी संपर्क करेन…”
त्याच्या डोळ्यासमोर त्या गार्डचा चेहरा आला. नेहमी कठोर दिसणारा, पण नजर भिडली की क्षणभरात वेगळीच चमक दिसणारा.राजवीरच्या ओठांवर क्षणभर हलकं स्मित उमटलं.
“आणि मग…?”
त्याने मनातल्या मनातच उत्तर दिलं.“मग सगळं सुरू होईल.”
अचानक बाजूला बसलेला रोहित हलक्या आवाजात म्हणाला,
“काय चाललंय रे तुझ्या डोक्यात? रात्रीभर डोळे मिटून काही तरी आखतोयस…”
राजवीरने त्याच्याकडे नजर टाकली, पण काही बोलला नाही. फक्त इतकंच उत्तर दिलं—
“योग्य वेळी कळेल… आणि जेव्हा कळेल, तेव्हा पळण्यासाठी तयार राहा.”
तो पुन्हा भिंतीला टेकला, डोळे मिटले… पण आत मात्र संपूर्ण रणनितीचे पट मांडले जात होते.बाहेरच्या अंधारात जशी एखादी वादळाची चाहूल लागते, तसंच… या तुरुंगाच्या भिंतींमध्ये आता एक गुप्त वादळ उभं राहत होतं.
खोलीतल्या पिवळसर, मंद उजेडात धूळकण हवेत तरंगत होते. बाहेर कुठेतरी गार्डच्या पावलांचा ठेका मंद लयीत ऐकू येत होता. इतर कैदी गप्प होते. थकलेले, अंधाराच्या कुशीत झोपायचा प्रयत्न करत. पण सरिताच्या मनात मात्र विचारांचे वादळ उसळले होते.
ती हळूच पुढे सरकली, राजवीर बसलेला होता तिथे. तो भिंतीला टेकून बसला होता, दोन्ही हात गुडघ्याभोवती गुंडाळलेले. डोळ्यांत शांतता, पण ती शांतता पाण्याखाली दडलेल्या वादळासारखी भासत होती.
सरिता कुजबुजली,
“तू खरंच कैदी आहेस का?”
तो हळूच म्हणाला,
“कदाचित नाही… पण इथे माझ्यासारखा कोणी तरी लागतो.”
सरिताच्या भुवया जरा जास्तच जुळल्या. तिच्या आवाजात संशय होता, पण कुठेतरी एक लहानसा विश्वासही डोकावत होता.
“कोण आहेस तू?”
राजवीर हळूहळू तिच्याकडे पाहू लागला. मंद प्रकाशात त्याच्या डोळ्यांतला तेज जास्तच उठून दिसत होता. त्याच्या ओठांवर एक अस्पष्ट स्मित उमटलं.
“ज्याचं नाव घेता येत नाही… पण जो जिथं जातो तिथं जखमांवर मलम लावतो.”
सरिताच्या श्वासाचा वेग थोडा वाढला. तिने त्याच्या डोळ्यांत पाहिलं. ते डोळे फक्त बोलत नव्हते, ते भूतकाळातील लढायांची, गमावलेल्या चेहऱ्यांची, आणि न संपलेल्या झुंजींची कथा सांगत होते.त्या क्षणी ती पहिल्यांदाच त्याच्या आतल्या माणसाला ओळखू लागली. एक सैनिक, जखमी होऊनही न पडलेला, अजूनही पुढे झुंजत असलेला.
खोलीत पुन्हा शांतता पसरली. पण सरिताच्या मनात आता एक नवीन प्रश्न पेटला होता. "हा माणूस खरं कोण आहे?"
कैदेतली ती रात्र नेहमीपेक्षा वेगळी होती. बाहेर थंडी चिरत जाणारा वारा गुरगुरत होता, आणि तंबूंच्या कोपऱ्यांवर बांधलेल्या लोखंडी दिव्यांचा पिवळा प्रकाश वाऱ्यात डोलत होता. आत, राजवीर शांतपणे भिंतीजवळ बसला होता, पण त्याच्या नजरा सतत त्या गार्डकडे जात होत्या. तोच गार्ड जो खऱ्या अर्थानं भारतीय गुप्त माहितीवाहक होता.
जसं दोन सावल्या हलकेच एकमेकांवर सरकतात, तसंच राजवीर हळूच पुढे झुकला. त्याच्या बोटांनी जमिनीवर दोन हलक्या खुणा केल्या. एक छोटा, पूर्वनियोजित सांकेतिक संदेश.गार्डने नजर न उचलता, फक्त एका सेकंदासाठी डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिलं. मग तो खांद्याने अगदी क्षीण हालचाल करत म्हणाल्यासारखा दिसला,
"दोन दिवसांत बॉर्डरवर हेलिकॉप्टर."
राजवीरच्या चेहऱ्यावर हलकासा निर्धार उमटला. ओठ न हलवता, पण नजरेतूनच तो म्हणाला,
"तुम्ही तंबूंवर आग लावा. मी आतून बाहेर निघेन. एका वेळी आठ जण बाहेर काढणं जवळपास अशक्य… पण मी जमवेन."
गार्डने एक लहानशी, जवळपास न दिसणारी मान हलवली. मग तो पुन्हा आपल्या पहाऱ्यात तल्लीन झाल्यासारखा वागू लागला.
पण त्या निर्धाराच्या क्षणीच, बाहेरून एक कठोर आवाज आला.
"तुम में से तीन लोग… बाहर आओ!"
दोन बंदूकधारी आत शिरले आणि त्यांनी प्रतीक, श्रुती, आणि पूजाला बाहेर खेचलं. दहशतवाद्यांचा हा नवा डाव होता. कैद्यांना एक-एक करून वेगळ्या अंधाऱ्या खोल्यांत नेणं, त्यांचं मनोधैर्य मोडणं, आणि त्यांना एकटेपणात भीतीनं कुरतडणं. हा त्यांचा बेत होता.
श्रुतीच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. पूजाचा हात थरथरत होता. प्रतीकने मागे वळून पाहिलं, पण तिथं फक्त राजवीरची स्थिर नजर त्याला भिडली.
राजवीर मनाशी पुटपुटला—"हे जास्त काळ थांबणार नाही… उद्याची रात्र आपली शेवटची संधी आहे."
तंबूच्या बाहेर पसरलेला अंधार जणू काही श्वास रोखून उभा होता. थंड वाऱ्याच्या झुळुकीत लटकणारे लोखंडी दिवे मंद उजेड टाकत होते. त्या क्षणी, गार्डच्या टॉर्चचा हलका, तीन वेळा चमकणारा सिग्नल राजवीरच्या नजरेत भरला. सुरक्षित वेळ आली आहे.
राजवीरने हळूच खिशात हात घातला. त्याच्या बोटांना थंड, परिचित धातूचा स्पर्श जाणवला. तीच छोटी, धारदार चाकू जी त्याने पायाच्या सोल्यात लपवून आणली होती. एका क्षणात, ती चाकू दोरावर फिरली, आणि एक हलका “चक” आवाज करत दोर सुटला.
त्याने सावधपणे वाकून, सर्वात आधी प्रतीकच्या खांद्यावर हात ठेवला. मग सचिन, आणि अमेयला हलकेच हलवले. त्यांच्या डोळ्यांत अजून झोपेचा गोंधळ होता, पण राजवीरच्या नजरेंतील कठोर आदेशाने ते जागे झाले.
“तिघं इकडून… बाकी मागून. मी आणि सरिता मध्ये. आवाज… अजिबात नाही.”त्याचा आवाज मंद, पण धारदार होता. जणू प्रत्येक शब्द आदेश होता.
भिंतीच्या कोपऱ्यातील त्या पातळ भेगेतून तो खाली सरकला. तिथं एक जुनी, गंजलेली नळी होती. जणू वर्षानुवर्षं विसरलेली. राजवीरने आधी हात आत घालून मार्ग साफ केला. मग, हळूहळू, एकामागोमाग एक कैदी त्या नळीत सरकू लागले. त्यांच्या कपड्यांवर धूळ, गंजाचा वास, आणि पायाखालून येणाऱ्या थंड वाऱ्याचा झोत होता.
सगळं नीट चालू होतं… पण मगच एक कडाडणारा “क्लिक” आवाज कानावर आला—धातूवर बोट फिरल्यासारखा. राजवीरने मान वर केली, आणि त्याच्या कपाळावर थंड बंदुकीची नळी टेकलेली पाहिली.
अंधारात, दहशतवाद्याच्या डोळ्यांतल्या रक्तिम चमकत्या नजरेनं सगळं सांगितलं. तो जागाच होता, आणि हे सगळं त्याने पाहिलं होतं.
“कहाँ भाग रहे हो…?” – त्याचा आवाज मंद, पण भेदक होता.
राजवीर स्थिर उभा राहिला. त्याच्या पाठीमागे अजून दोन जण नळीत सरकण्याच्या तयारीत होते. बाकीचे आधीच अर्ध्या रस्त्यावर गेले होते.
आणि तेवढ्यात—
“राजवीर…!”सरिताचा आवाज हवेत चिरत गेला. तिच्या आवाजात भीती, धास्ती, आणि एक विचित्र ओळखीचं ताण मिश्रित होतं.
त्या एका क्षणी, संपूर्ण पलायनाचा प्लॅन थांबला… आणि अंधारात फक्त बंदुकीच्या धातूचा थंड स्पर्श आणि जड श्वास ऐकू येत होता.
तंबूंच्या सावल्यांमध्ये अजूनही अंधार दाटून बसला होता. राजवीरच्या कपाळावर थंड बंदुकीची नळी टेकवलेला दहशतवादी हळूहळू ट्रिगर दाबू लागला. बंदुकीच्या यांत्रिक “टक” आवाजासोबत एक घातक क्षण श्वास रोखून उभा होता.
अचानक, मागून एक काळी आकृती विजेच्या चपळाईनं सरकली. तोच गार्ड, जो प्रत्यक्षात भारतीय गुप्त सैनिक होता. त्याने एका झटक्यात दहशतवाद्याच्या खांद्यावर झडप घातली, आणि बंदुकीची दिशा वर गेली.
“धाड्!”गोळी हवेत सुटली, रात्रीचा साचलेला शांत अंधार चिरत गेली. आवाज इतका तीव्र होता की कैद्यांच्या अंगावर काटा आला.
“पकडो! पकडो उसको!” – दुसऱ्या तंबूमधून दहशतवाद्यांचा गर्जना होऊ लागल्या.
क्षणभरात गोंधळ उसळला. पळापळ, आरडाओरडा, लोखंडी भांड्यांचा आवाज, आणि तंबूच्या दोऱ्यांचा तणतणाट. काही कैदी भीतीने खाली वाकले, तर काहीजण नळीकडे पळू लागले.
त्याच वेळी, दूरवरच्या तंबूंच्या बाजूने एकाएकी तीन प्रचंड स्फोट झाले,“धडाम्! धडाम्! धडाम्!”जणू आकाश फाटून जमिनीवर आदळत होतं. आगीचे ज्वालामुखी हवेत उडाले, आणि संपूर्ण छावणी लाल-केशरी प्रकाशात न्हाऊन निघाली.
ही तीच स्फोटके होती जी आर्मीने गुप्तपणे आधीच बसवून ठेवली होती. तंबूचे तुकडे हवेत उडत होते, आणि दहशतवाद्यांच्या रांगा क्षणात विस्कळीत झाल्या. धुराच्या ढगांमध्ये आणि जळत्या कपड्यांच्या वासात, आता फक्त एकच गोष्ट स्पष्ट होती.मिशन सुरू झालं होतं.
भाग ३ – समाप्त
◆पुढील भागात - राजवीर जखमी होतो. पण सगळे कैदी धावत सुटतात.
फायरिंग, आरडाओरडा, आणि अंधारात चाललेली धावपळ.
पण आता हे युद्ध फक्त सुटण्याचं नाही… हे आहे मानाचं, प्रेमाचं आणि योजनेचं युद्ध.