Sunayna - 1 in Marathi Love Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | सुनयना - भाग 1

Featured Books
Categories
Share

सुनयना - भाग 1

 “सुनयना ...

आज इन नजारोको तुम देखो और मै तुम्हे देखते हुए देखु “

येसुदास गात होता अगदी तन्मयतेने..

ऑफिस समोरच्या टपरीमध्ये दुपारची जुनी गाणी लागली असावीत ते सुर कानावर पडताच अजिंक्यच्या ओठावर हसु रेंगाळले. हे गाणे त्याचे खुपच आवडते होते आणि आजकाल तर जास्तच आवडायला लागले होते ,त्याला कारणही तसेच होते .काही दिवसापूर्वी त्याला त्या “सुनयना” चे दर्शन झाले होते झाले होते असे की,एक दिवस ऑफिस संपल्यावर तो इमारतीतुन बाहेर पडला होता .समोर एक स्टेशनरीचे दुकान होते .तिथे त्याला काही ऑफिस स्टेशनरी आणि अन्य काही वैयक्तिक उपयोगाचे साहित्य घ्यायचे होते म्हणून तो तिथे गेला. संध्याकाळची वेळ होती दुकानात बर्यापैकी गर्दी होती. त्याने आपल्या नेहेमीच्या माणसाकडे आपली ओर्डेर दिली आणि साहित्य येईपर्यंत तो दुकानाच्या कौंटरपाशी इकडे तिकडे पाहत थांबला होता .अनेक लोक येत जात होते, साहित्य घेत होते, काही बोलणी चालली होती .त्याचाही टाईमपास छान होत होता .नाहीतरी रूम वर जाऊन काय करणार होता तो एकटाच ?काही वेळाने त्याचे साहित्य त्याला मिळाले .कार्ड पेमेंट झाल्यावर तो पिशव्या उचलणार तोच त्याच्या शेजारच्या व्यक्तीच्या हातातील साहित्य खाली पडल्याचे त्याला दिसले  .खाली वाकुन त्याने ते उचलायला सुरवात करताच अचानक दोन गोरे गोरे हात ते गोळा करताना त्याने पाहिले .चमकुन वर पाहताच त्याला ती दिसली .गोरापान रंग ,रेखीव चेहेरेपट्टी ,गुलाबी गाल ,सरळ नाक आणि नाकात चमकणारी चमकी ..तिच्या हातात तिचे साहित्य दिल्यावर ती उठुन उभी राहिली व तिने ते सर्व साहित्य सोबत असलेल्या मुलाकडे दिले .ती उभी राहिल्यावर त्याला दिसले तिच्या अंगात लाल स्लीवलेस कुडता आणि निळी जीन्स होती .केस छान लहरणारे आणि रेशमी सुळसुळीत होते .उंची भरपूर आणि बांधा खरोखर “अटकर”होता .उभी राहिल्या वर तिने त्याच्याकडे नजर टाकली .आता मात्र तो खरोखर चकित झाला कारण तिचे डोळे ..मोठे मोठे ,दाट पापण्या असणारे आणि काजळ रेघ ओढलेले तिचे तपकिरी रंगाचे डोळे खरोखर खुपच “सुरेख “होते .एकाच व्यक्तीला इतके सौंदर्य उधळून वाटणाऱ्या परमेश्वराची त्याला अगदी कमाल वाटली !!ती त्याच्याशी एक शब्द पण बोलली नाही अथवा हसली नाही .त्याच्या मनात आले चालायचेच ..इतकी सुंदर मुलगी का बरे कोणाची दखल घेईल ?तिच्या बरोबर असलेला बहुधा तिचा भाऊ असावा .तो मात्र अजिंक्यला धन्यवाद म्हणाला आणि दोघेजण दुकानाबाहेर पडले .एका तंद्रीतच अजिंक्यने आपले सामान घेतले आणि तोही बाहेर पडला .त्या रात्रभर त्याला झोप नीट लागलीच नाही . कारण नसताना तीच सारखी डोळ्यासमोर येत होती .ती त्याच्यासोबत हसली नव्हती किंवा बोलली पण नव्हती .मात्र तिच्या डोळ्यांनी त्याला चांगलीच “भुरळ “घातली होती.तिचे नाव काय असेल ते असो आपण मात्र तिला “सुनयना “म्हणायचे असे त्याने पक्के ठरवुन टाकले .         नंतर मात्र काही दिवस तसे काहीच खास घडले नाही .मित्राला हे सांगावे असे अजिंक्यला वाटले ,पण मग त्यानेच चुप बसायचे ठरवले. हो.. आत्तापर्यंत फक्त एकदा तर दिसली होती ती ..काय सांगण्यासारखे होते त्यात ?एके दिवशी दुपारी लंच ब्रेक पुर्वी फाईली आवरताना सहज त्याची नजर रस्त्यावर गेली आणि अचानक ती पुन्हा त्याला दिसली .सोबत दोन चार मुली होत्या. पांढरा स्कर्ट आणि गुलाबी ब्लाउज घातलेल्या तिला त्याने चटकन ओळखले .आज तिने केस पांढर्या रिबन मध्ये बांधले होते सोबत असणार्या मुलीनी पण साधारण तसाच पोशाख घातला होता .बहुतेक कोणत्या तरी शाळेचा युनिफोर्म असावा .त्या सर्व जणी एकमेकीसोबत बोलत एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवून  रस्ता क्रॉस करण्यासाठी उभ्या होत्या .त्याने चटकन फाईली ठेवल्या आणि ऑफिस बाहेर पडला. त्याचे ऑफिस चौथ्या मजल्यावर होते .वेळ जाऊ नये म्हणुन तो पटकन लिफ्ट मध्ये शिरला .लिफ्ट खाली येताच बाहेर पडून तो रस्त्यावर आला त्याला “सुनयना “ला पहायचे होते ..पण हाय रे किस्मत!! त्या सर्व जणी रस्ता ओलांडून खुप दूरवर गेल्या होत्या .        परत आठ दहा दिवस त्याला ऑफिस कामासाठी पुण्याला जावे लागले या काळात तो तीला थोडे फार विसरून गेला .कामाच्या ओघात नवे नवे विषय समोर येत राहिले ,तिचा विषय डोक्यात आला नव्हता .        जवळ जवळ पंधरा दिवसांनी तो मुंबईत परत आला .त्या दिवशी रविवार होता, सकाळी निवांत उठून घरापासून थोडे दूर एका हॉटेल मध्ये तो मित्रांसोबत नाश्ता करायला गेला .मस्त गरम गरम डोसा आणि कॉफी झाल्यावर ते सर्व बाहेरच सिगारेट ओढत उभे राहिले .गप्पा चालुच होत्या इकडच्या तिकडच्या ..आजुबाजुला बरीच गजबज होती .शेजारी पाजारी वेगवेगळी दुकाने होती .रविवार असल्याने लोकांची खरेदी चालु होती .समोरच मोठे भाजी मार्केट होते .तिथेही लोक पिशव्या घेऊन भाजीसाठी शिरत होते.आणि अचानक त्याला “ती” दिसली .पिवळा पंजाबी सुट घातलेली ती पिशव्या घेऊन एका बाई सोबत मार्केट मध्ये शिरत होती .तिला पाहताच हातातली सिगारेट विझवून तो मित्रांना म्हणाला ”आलो रे मी जरा बाजारात जाऊन येतो “मित्र हसायला लागले “काय रे तुझ्या सारख्या ब्रम्ह्चार्याचे बाजारात काय काम ?कुठल्या भाजीचे काय नाव हे पण तुला अजून नीटसे माहित नाही.त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत तो झपझप समोरच्या मार्केट कडे निघाला .आज तिला बघायची संधी त्याला अजिबात सोडायची नव्हती .मार्केटच्या गेट मधुन आत शिरताच डाव्या बाजूला त्याला ती दिसली .सोबत बहुधा तिची आई असावी .दोघी मिळून पालेभाजी घेत होत्या .ती पिशव्या  घेऊन उभी होती. आई पालेभाज्या पारखून घेत होती .सकाळच्या उन्हात त्याची ती “सुनयना”  खुप तेजस्वी दिसत होती .पिवळा पंजाबी ड्रेस चमकत होता .आज तिने केसांची एक वेणी घालून पुढे घेतली होती .कपाळाला कुंकु आणि हातात पिवळ्या बांगड्या पण होत्या .तिच्या एकंदर दिसण्यावरून तिला टापटीप राहण्याची आवड आहे असे वाटत होते .भाजी कडे तिचे फारसे लक्ष नव्हते .ती थोडी इकडे तिकडे पाहत होती असे वाटत होते .अचानक तिची नजर त्याच्याकडे गेली .त्याला वाटले ती त्याच्याकडे पाहुन हसेल पण तिने त्याची “दखल” पण घेतली नाही .