Bayko jhali paari - 2 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | बायको झाली परी भाग २

Featured Books
Categories
Share

बायको झाली परी भाग २

भाग  २

बायको झाली परी.

शरदनी डोळे उघडले आणि चित्राला बघितलं आणि पुन्हा भूत भूत करत बेशुद्ध झाला. पांच मिनिटांनी डोळे उघडले पुन्हा चित्रा समोर. त्याला कळेना की हे काय चाललंय, आज पर्यन्त तो भूता खेता च्या नुसत्या गोष्टीच ऐकत होता, पण आता प्रत्यक्ष चित्राचं भूतच समोर बसलेलं. काय करांव?

“अरे, मी चित्रा आहे, तुझी बायको, भूत भूत काय करतो आहेस?” – चित्रा

आता मात्र शरद सॉलिड गोंधळला. त्याला समजेना की गेले काही दिवस जे चाललं होतं ते स्वप्न की आता घडतंय ते स्वप्न? जर हे स्वप्न नसेल तर चित्राचा मृत्यू झालाच नाही. या विचाराने एकदम त्यांचा चेहरा फुलला आणि तो उठून बसला.

“तू खरंच चित्रा आहेस?” – शरद.

“तूच मला हात लाऊन बघ आणि खात्री करून घे.” – चित्रा.  

चित्रांनी आपला हात समोर केला आणि शरदनी भीत भीतच हाताला हात लावला. तसाच मऊ मुलायम मखमली स्पर्श जाणवला. त्याच्या अत्यंत ओळखीचा. त्याला हर्षवायू व्हायचाच बाकी होता. शरदला आता कंठ फुटला. म्हणाला,

“म्हणजे गेले काही दिवस जे काही घडलं ते सगळं स्वप्नच होत म्हणायचं.” – शरद  

“नाही, ते स्वप्न नव्हतं, ते सगळं खरंच होतं.” चित्रा म्हणाली.

“चित्रा अशी जीवघेणी थट्टा करू नकोस. स्वप्नात का होईना पण मी जे भोगलं ते फार कष्ट दायक होतं. आता तू समोर आहेस त्यामूळे आता त्याचा विचारही नको.” – शरद.

“मी खरं तेच सांगते आहे. गेले काही दिवस जे घडलं ते स्वप्न नव्हतं. ते खरंच आहे आणि मी इथे आहे हे ही.” – चित्रा.

आता शरद पुरता गोंधळला त्यांनी चित्राला हात लावून पुन्हा खात्री करून घेतली. मग हसत सुटला. म्हणाला,

“चित्रा बास आता. चेष्टा पुरे. खूप ताणलंस आता नको.” – शरद.

तेव्हडयात बेल वाजली. जेवणाचा डबा आला होता.

चित्रा म्हणाली की,  “तू आधी जेवून घे. मग शांतपणे बोलू.” तिने टेबलावर जेवणाची तयारी करायला सुरवात केली.

एकच पान पाहून शरदने विचारलं की,

“हे काय एकच पान मांडलं? तू नाही जेवणार?” – शरद.

“नाही. मला जेवणाची आवश्यकता नाहीये.” – चित्रा.  

शरदच्या चेहऱ्यावरचा गोंधळ लपत नव्हता. प्रश्नार्थक मुद्रेने तो बघत राहिला. आधी माहीत असतं की चित्रा जीवंत आहे तर हा डबा लावलाच नसता, अस शरद स्वत:शीच म्हणाला आणि एकदम त्याला जाणवलं की चित्रा गेली हेच खरं, नाहीतर डबा कशाला लावला असता? शरद ची मतीच  गुंग झाली.

“तू कोण आहेस? तुझ्या आणि चित्रा मधे एवढं साम्य कसं?” – शरद.

“मी दुसरी कोणी नाही. चित्राच आहे.” – चित्रा म्हणाली.

“कसं शक्य आहे? चित्राला अपघात झाला होता, आणि त्यातच ती गेली. तू कोण?”– शरद

“अरे मी चित्राच आहे तूच आत्ता हात लावून खात्री केलीस न?” – चित्रा.

“छे, काही तरी गोंधळ आहे. महिन्या भरापूर्वी मीच घाटावर तिचे दिवस करून आलो, आणि आता तू म्हणते आहेस की तू चित्रा आहेस. हा काही फसवा फसवीचा प्रकार तर नाही? खरं सांग, कोण आहेस तू? – शरद

त्याच्या चेहऱ्यावरचा संभ्रम पाहून चित्राच म्हणाली की ,

“मी सर्व सांगते. म्हणजे तुझ्या मनातला गोंधळ दूर होईल.” – चित्रा.

“अरे मी जेंव्हा वर गेले तेंव्हा तिथे मला पाहिल्यावर एकदमच गडबड उडाली. तिथे उच्चासनावर जे कुणी बसले होते त्यांचं आणि इतरांचं आपापसात काही बोलणं झालं. मग सगळे घाई घाईने निघून गेले. थोड्या वेळाने आले आणि म्हणाले की चित्रगुप्त महाराजांच्या कडे जायचं आहे. तिथे गेल्यावर मला कळलं की मला चुकून आणण्यात आलं आहे. महाराज म्हणाले की माझ्यासाठी इथे जागाच नाहीये. त्यामूळे पुढची व्यवस्था होईपर्यन्त परीच्या रूपात तुला तुझ्या नवऱ्याकडे पाठवू शकतो, तुला जायला आवडेल का? पण फक्त तुझा नवराच तुला पाहू शकेल, बोलू शकेल इतर कोणीही नाही. मी कशाला नाही म्हणतेय, मी हो म्हंटलं. दुसऱ्याच क्षणी मी इथे आले. आता सांग मी आलेली तुला चालेल का?” – चित्रा.

“हे बघ असल्या भाकड कथा सांगून मला कशात अडकवायचा प्रयत्न करत आहेस आणि का करते आहेस हेच मला समजत नाहीये. मी काही नवकोट नारायण नाही की माझ्या संपत्तीचा मोह तुला पडावा. काय खरं आहे ते सरळ कबूल कर.” -शरद वैतागून म्हणाला.

“मी चित्राच आहे. तू गोंधळात का पडला आहेस? आपल्या बायकोला ओळखत नाहीस का?” – चित्रा

“मी तिला चांगलाच ओळखतो. तू कोण आहेस ते सांग. का आली आहेस माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायला? कोण आहेस तू? आणि काय हेतु आहे? आणि मुळात तू घरात शिरलीच कशी?” – शरद.

“आर मघाशी सांगितलं नाही का की मला परी बनवून तुझ्याकडे पाठवलं आहे म्हणून? तुझा विश्वास का नाही बसत? तुला असं वाटतं आहे का की मी दुसरीच कोणीतरी तुझ्या बायकोची जागा घ्यायला बघते आहे?” – चित्रा.

“हो मला तसंच वाटतंय. नाही खात्रीच आहे माझी. आणि आता मी पोलिसांना बोलावणार आहे. ते आले की तुझं सगळंच बिंग फुटेल.” – शरद.

“असं नको कारूस. त्याने तुलाच त्रास होईल.” – चित्रा.

“का? तुझी तोतयागिरी उघडकीला येईल अशी भीती वाटते का? जे होईल ते पाहिल्या जाईल. तू स्वत:ला सांभाळ.” – शरद.

“हे बघ असा आतताई पणा करू नकोस. अरे मी पोलिसांना दिसणारच नाही. मग पोलिस काय करतील? त्यांना तुझं डोक फिरलं आहे असा संशय येईल. मग ते शेजाऱ्यांना बोलावतील. त्यांनाही मी दिसणार नाही, मग तर पोलिसांची खात्रीच पटेल. आणि मग जर त्यांनी तुलाच वेडा ठरवून दवाखान्यात अॅडमिट केलं तर तू काय करशील? नको असं करू नकोस. तू दूसरा मार्ग शोध. मी काय करू म्हणजे तुझी खात्री पटेल?” – चित्रा.

शरद विचारात पडला. चित्रा म्हणत होती, त्यात तथ्य होतं. म्हणजे ही खरंच पारी होऊन आलेली चित्रा आहे का? तो म्हणाला,

“तू परी आहेस न? मग एकदा अदृश्य होऊन दाखव.”

“ही बघ मी आता अदृश्य होते. आणि पांच मिनिटांनी पुन्हा येते. मग तर तुझा विश्वास बसेल?” – चित्रा असं म्हणाली आणि अदृश्य झाली. पांच मिनिटांनी पुन्हा अवतरली. शरदचं डोक गरगरायला लागलं, बायको असली म्हणून काय झालं आत्ता तर भुतच आहे. भुता बरोबर राहायचं? विचार कर करून त्याचं डोकं फिरायची वेळ आली. त्याला दरदरून घाम सुटला. जीभ कोरडी पडली. तोंडातून शब्द फुटेना. हे असलं काही आपल्याच आयुष्यात का होतंय हाच विचार मनात. चक्कर येतेय असं वाटलं म्हणून तो सोफ्यावर पुन्हा बसला. चित्रा त्याच्या कडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत होती.

थोड्या वेळाने तो जरा शांत झाला. सावरला. काही विचार पक्का करून त्यांनी बोलायला सुरवात केली.

“नाही चित्रा आपण तू म्हणतेस तसं आयुष्य नाही जगू शकत. तुझ जग आता वेगळं आहे. दोन्हीची सरमिसळ शक्य नाही. तेंव्हा तू परत जावस हेच उत्तम.” – शरद.   

चित्राला त्यांची अवस्था कळली. परीच होती ती. तिला सगळंच कळलं. तिच्या लक्षात आलं की आपल्या बरोबर राहायची शरदची मानसिक तयारीच नाहीये. तिला शरद ला त्रास द्यायची अजिबात इच्छा नव्हती. ती म्हणाली

“ठीक आहे. मी जातेय पण जायच्या आधी मला एक वचन दे की तू दुसरं लग्न करशील आणि ते ही लवकरच.” – चित्रा.

“हे कसं शक्य आहे? अग कोणाही मुलीला प्रथम वर हवा असतो. तू तरी तयार झाली असतीस का? आणि मुळात मी लग्न करून तुला काय फरक पडणार आहे?” – शरद.

“तू माझ्यात गुंतला आहेस. त्यामुळे जोवर तू लग्न करत नाहीस तोपर्यन्त मला मुक्ती मिळणं शक्य नाही. तेंव्हा निदान माझ्यासाठी तरी तू हा विचार कर. मला वचन दे.” – चित्रा.  

शरदने थोडा विचार केला आणि तिच्या हातावर हात ठेवून वचन दिलं.

क्षणार्धात चित्रा अदृश्य झाली. शरद भानावर आला. आता मन एकदम स्वच्छ झालं होत. सगळी कोळीष्टक दूर झाली होती. ज्या भ्रमात तो इतके दिवस अडकला होता तो समूळ दूर झाला होता. आलेलं मळभ निघून गेलं होतं. तो बाहेर पडला. हॉटेल मध्ये जावून ताव मारून जेवला. इतक्या दिवसांचा उपास सोडून आला. रात्री शांत झोप लागली. सकाळी उठून अत्यंत प्रफुल्लित चेहऱ्याने ऑफिसला गेला. कोणी त्याला विचारलं नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरची तरतरी बघून सगळ्यांनाच आनंद झाला होता.

आयुष्य पुन्हा सुरळीत सुरू झालं होतं.

आता घरी वाट पाहणारं कोणीच नव्हतं, त्यामुळे लवकर घरी जाण्याचा काही प्रश्न नव्हता. शरदने कामात स्वत:ला झोकून दिलं. शरदने व्हेंडर डेव्हलपमेंट मध्ये इतका रिसर्च केला आणि त्यानुसार नवीन व्हेंडर शोधले. कंपनीचा त्यामुळे भरपूर पैसा वाचला. त्याच्या कामावर खुश होऊन त्याला नाशिक च्या फॅक्टरी मध्ये परचेस मॅनेजर असं प्रमोशन देऊन नाशिकला पाठवलं.

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com