भाग ३
शरद, क्षिप्रा आणि बसस्टॉप
आयुष्य पुन्हा सुरळीत सुरू झालं होतं.
आता घरी वाट पाहणारं कोणीच नव्हतं, त्यामुळे लवकर घरी जाण्याचा काही प्रश्न नव्हता. शरदने कामात स्वत:ला झोकून दिलं. शरदने व्हेंडर डेव्हलपमेंट मध्ये इतका रिसर्च केला आणि त्यानुसार नवीन व्हेंडर शोधले. कंपनीचा त्यामुळे भरपूर पैसा वाचला. त्याच्या कामावर खुश होऊन त्याला नाशिक च्या फॅक्टरी मध्ये परचेस मॅनेजर असं प्रमोशन देऊन नाशिकला पाठवलं.
शरदची नाशिकला ट्रान्सफर होऊन आता चार महीने झाले होते. इतकी वर्ष त्याला मुंबईला ऑफिस मधे कामाची सवय होती पण आता तो फॅक्टरी मधे परचेस मॅनेजर होता. फॅक्टरीची संस्कृति जरा वेगळी असते. पण आता चार महिन्यात तो सरावला होता. चित्राचा एका रोड अॅक्सिडेंट मधे मृत्यू होऊन वर्ष उलटलं होतं. त्यामुळे एकटाच असल्याने फॅक्टरीत कितीही वेळ थांबायला लागलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. त्या दिवशी असंच त्याला रात्रीचे साडे नऊ वाजले फॅक्टरीतुन निघायला. बाहेर पडला. MIDC मधले रस्ते, एकदम सुनसान, फक्त शिफ्ट च्या वेळेसच रहदारी. चिटपाखरू पण नाही. थोडं दूर गेल्यावर बस स्टॉप वर एक मुलगी एकटीच उभी असलेली दिसली. अशा अवेळी एकटीच मुलगी पाहून शरदने बस स्टॉप वर बाइक थांबवली.
“मॅडम, बरीच रात्र झाली आहे. कुठे सोडू का तुम्हाला?” – शरद.
“मी बस स्टॉप वर उभी आहे, हे दिसतंय ना तुम्हाला.” – मुलगी.
“हो,” – शरद.
“मग तुम्हाला हे पण माहीत असेल की बस स्टॉप वर बस थांबते. बाइक नाही. तुम्ही का थांबलात? निघा तुम्ही.” – मुलगी.
तिचं उत्तर ऐकून शरद सर्दच झाला. हे पाणी काही वेगळंच दिसतंय असा विचार करून त्याने बाइक बस स्टॉप च्या थोडी दूर हलवली, आणि बस स्टॉप वर येऊन बसला.
मुलीने त्याच्या कडे पाहीलं आणि अत्यंत त्रासिक आणि चिडक्या स्वरात बोलली,
“तुम्ही का बसला इथे? काय मनात आहे तुमच्या? भारी पडेल तुम्हाला. नंतर पश्चाताप होईल.” – मुलगी.
शरद बस स्टॉपच्या बाहेर आला आणि बस स्टॉप कडे बघत त्याने मुलीला विचारले,
“तुमचं नाव काय?” – शरद.
“ऑं, माझं नाव? या पंचायती तुम्हाला कशाला हव्यात? मिस्टर, तुम्ही आता लिमिट क्रॉस करत आहात. सभ्य दिसताहात, सभ्य माणसासारखे वागा.” – मुलगी.
“तुम्ही मला निघून जा म्हणालात म्हणून वाटलं की या बस स्टॉपची मालकी तुमच्या कडे आहे का? म्हणून तुमचं नाव विचारलं. पण इथे तसं काही दिसलं नाही.” –शरद.
“मग काय दिसलं तुम्हाला?” आता त्या मुलीचा स्वर थोडा सौम्य झाला. तिच्या लक्षात आलं की ही भाषा कोणा गुंडांची नाहीये, तसंही शरद १०-१५ फुट अंतर ठेऊन बोलत होता. जवळीक साधण्याचा त्याने मुळीच प्रयत्न केला नव्हता.
“तुमचं नाव आहे का त्यावर?” – मुलगी.
शरद हसला. वातावरण थोडं निवळलेलं दिसत होतं. तो म्हणाला,
“हे ठीक आहे. उगाच चीडचीड करून टाइम पास करण्यापेक्षा हसऱ्या चेहऱ्याने केलेला केंव्हाही चांगला. तुम्हाला काय वाटतं?” – शरद.
“हे बघा मिस्टर, बाश्कळ बोलून ओळख वाढवायचा प्रयत्न करू नका. तुम्ही निघा.” – मुलगी.
“निघणारच आहे. एक मुलगी रात्रीच्या वेळेस निर्मनुष्य रस्त्यावरच्या बसस्टॉप वर एकटीच उभी दिसली म्हणून मी केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्हाला सोबत करतो आहे. तुमची बस आली की मी पण जाईन.” – शरद.
ती मुलगी आता जरा विचारात पडली तेवढ्यात दुरून एक बस येतांना दिसली. ती मुलगी बस मधे चढली, जातांना शरदला हात हलवून थॅंक यू म्हंटलं. ती गेल्यानंतर शरद पण निघाला. या प्रसंगानंतर चार पांच दिवस गेले. शरद तो प्रसंग विसरून पण गेला. त्यानंतर विशेष काही काम नव्हतं म्हणून तो संध्याकाळी सहा वाजताच निघाला. एखादा सिनेमा टाकावा आणि एक त्यांच्या आवडतं सी फूड हॉटेल होतं तिथे मस्त जेवण करावं असा विचार करतच तो निघाला.
क्षिप्रा सुद्धा त्या दिवशी वेळेवरच निघाली होती. पावसाची लक्षणं होती. आणि बसची वेळ पण झाली होती, म्हणून बसस्टॉप वर पोचण्यासाठी ती भराभर पावलं उचलत होती. आता पावसाला पण सुरवात झाली होती. पण साधारण शंभर पावलावर बसस्टॉप असतांना बस तिला ओलांडून गेली. क्षिप्रा बस पकडायला धावली पण बस ती पोचायच्या आत सुटली. हताश होऊन ती थांबली. मागून दुसरी बस येत आहे का हे बघण्यासाठी ती मागे वळली. पावसाची भुर भुर थांबून आता जोर वाढला होता. तिने छत्री उघडली. आणि तिला समोरून शरद येतांना दिसला.
“अहो, थांबा, थांबा.” – क्षिप्रा ओरडली.
शरद थांबला. पण समोर अनोळखी मुलीला पाहून त्याला वाटलं की मागून तिच्या ओळखीचा कोणीतरी येत असेल, म्हणून त्याने मागे वळून पाहिलं. मागून कोणीच येत नव्हतं.
“मला काही म्हणालात?” – शरद.
“हो तुम्हालाच थांबा म्हणाले.” – क्षिप्रा.
ही मुलगी ओळख पाळख नसतांना आपल्याला का थांबवते आहे हे शरदला समजेना. तिच्या जवळ छत्री होती आणि बसस्टॉप पण समोरच होता. तो गोंधळला. त्यांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून क्षिप्रा म्हणाली,
“मला ओळखलं नाही का?” – क्षिप्रा.
“ओळख? निदान मला तरी आठवत नाही आपली भेट झाल्याचं. आपण यापूर्वी कधी भेटलो आहोत का?” – शरद.
“अहो मागच्याच आठवड्यात आपली भेट झाली नाही का? एवढ्यात विसरलात?” – क्षिप्रा.
शरदने मेंदूला खूप ताण दिला पण त्याला या मुलीशी भेट झाल्याचं काही आठवत नव्हतं. इतक्या सुंदर आणि आकर्षक मुलीशी आपली भेट झाली आणि आपल्याला ती आठवणार नाही असं कसं होईल? काही तरी घोळ दिसतो आहे. कदाचित ही मुलगी दुसऱ्या कोणाला भेटली असेल आणि चुकून आपल्याला थांबा म्हणते आहे असा विचार करून तो म्हणाला,
“हे बघा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. आपण भेटल्याचं मला तरी आठवत नाही. कोणी तरी दुसराच असेल.” -शरद.
“मागच्या आठवड्यात बुधवारी रात्री साडे नऊ वाजता तुम्हीच माझ्यासाठी इथे बसस्टॉप वर थांबला होता. आता आठवलं?” – क्षिप्रा.
“माय गॉड,” आता शरदला टी रात्र आठवली. बुसस्टॉप वर दोघं जण चांगले १५-२० मिनिटं होते. पण बसस्टॉप वर अंधार असल्याने तिचा चेहरा काही त्याला दिसला नव्हता. “त्या तुम्ही होत्या? नवलच आहे.” – शरद.
“नवल काय त्यात? मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. पण तुम्ही कोण, कुठे काम करता काहीच माहीत नव्हतं. आज योगायोगानेच तुम्ही अचानक दिसला. खरंच त्या दिवशी मी खूपच तुसडे पणाने वागले. त्याबद्दल सॉरी.” – क्षिप्रा.
“अहो तुम्ही नका मनाला लावून घेऊ. माणूस परिस्थिती नुसार वागतो. तुम्ही कणखर पणा दाखवला हे मला आवडलं. त्या परिस्थितीत तुम्ही जे वागलात तेच योग्यच होतं.” – शरद.
“तुम्ही समजून घेतलं हे ऐकून फार बरं वाटलं. मनावरच एक ओझं उतरलं. थॅंक्स.” - क्षीप्रा.
“ओझं घेण्याचं काहीच कारण नाहीये. मी म्हंटलं न, तुम्ही योग्यच वागलात. तुमच्या कणखर पणाचं मला कौतुकच वाटलं. मी तो प्रसंग विसरून सुद्धा गेलो होतो. तुम्हीच आत्ता सांगितलं, म्हणून आठवलं.” – शरद.
“बरं पावसाचा जोर वाढला आहे मी बसस्टॉप वर पळते गर्दी झाली तर उभं राहायला सुद्धा जागा मिळायची नाही.” असं म्हणून ती वळली. संभाषण तुटलं. शरद कासावीस झाला. त्याला हे संभाषण कधीच संपू नये असंच वाटत होतं. म्हणून तो घाई घाईने म्हणाला.
“अहो थांबा, मी त्या दिवशी एक ऑफर दिली होती, ती अजून कायम आहे.” – शरद.
“ऑं, कोणची ऑफर? आपली नुसती वादावादीच झाली त्या दिवशी.” – क्षिप्रा.
“नाही मी शांतच होतो, मनातून तुमचं कौतुकच करत होतो. चिडल्या तुम्ही होत्या.” – शरद.
क्षिप्रा थोडावेळ त्या प्रसंगाची उजळणी करत होती. मग म्हणाली,
“ओके. काय ऑफर दिली होती?” – क्षिप्रा.
“तुम्हाला कुठे सोडू का? ही ऑफर होती.” – शरद असं म्हणाला पण मग घाबरला की त्याने पहिल्याच भेटीत जास्तच लिबर्टी तर नाही घेतली? खरं तर तिला पाहिल्यावरच खोल कुठे तरी क्लिक झालं. तिचा सहवास हवा हवासा वाटू लागला होता. आणि अनवधानाने तो ऑफर बद्दल बोलून गेला.
“तुमच्या बरोबर बाइक वरुन? पाऊस किती पडतो आहे बघितलं का? बाइक वर मी भिजणार नाही का?” – क्षिप्रा.
शरद हिरमुसला झाला. एक चान्स वाया गेला. पावसाला सुद्धा आत्ताच पडायचं होतं.
“हां हे माझ्या लक्षातच आलं नाही. ओके तुम्ही बसने जाणंच बरोबर आहे. ओके देन बाय.” आणि त्याने बाइक चालू केली. – शरद.
क्रमश:---
दिलीप भिडे