चवेड रत्नागिरी रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालं अन् साप्ताहिक रत्नदुर्ग प्रेसच्या मागे वडारांची पालं पडली. मटांगे कॉन्ट्रक्टरकडे खडी फोडणारा कल्लाप्पा अलिकडे चांगलाच वधारलेला... चवेड रस्त्याचं टेंडर शेट्टी कॉन्ट्रक्टरला मिळालं. त्याला काळवत्री खडी पुरविण्याचा मक्ता कलाप्पाकडे. स्वतः कल्लाप्पा, त्याचे तीन भाऊ भिमु, भरमु, नामु आणि त्यांचे कुटुंबीय... अठरा माणसांचं टोळकं होतं... अधिक कर्नाटकातुन चाळीस जोड्या कलाप्पाने आणल्या. स्वतःचा क्रशर टाकला आणि रात्रंदिवस खडीच्या कामाला सुरवात झाली. आता स्वतः कल्लाप्पा, त्याची बायको सुंद्री आणि पोरगी ईमली याचे कष्ट बंद झाले.
       कल्लाप्पा स्वच्छ धोतर नेसुन बंडीच्या खिशात नोटांची बंडले सांभाळीत कामगारांवर डाफरत राहायचा. त्याची बायको नी पोरगी पान खाऊन लालबुंद झालेल्या तोंडाने नुसती हिंडत रहात. कल्लाप्पा नी सुंद्री दिवसाचा बहुतांश वेळ साईटवर राहायची. इमलीला मुळी मोकळं रान. ती रत्नदुर्ग प्रेसच्या व्हरांडयात बसुन राहायची. इमलीचा वावर प्रेसच्या अवती भवती सुरू झाला त्याच दरम्याने कंपोझिटर बाबा भुत्यांचा मुलगा सुऱ्या बाबा बरोबर नेमानं कामावर यायला लागला.
        सुऱ्या दहावीत नापास झाला. त्यानंतर तीन वर्ष तो आबा भोगल्यांच्या माडी दुकानात कॅश वर बसायचा. सुरवातीला बाबा भुत्यांनी दुर्लक्ष केल पण तीन वर्ष मागे पडली तरी महिना अडीजशे रूपया पुढे मिळकत होईना तेव्हा मात्र त्यानी सुऱ्याला चांगला खडसावला. अलिकडे रत्नदुर्गचा पसारा वाढत चाललेला. तीन पानांचा अंक सहापानी झाला. गुमास्ता कायदा लागु झाला. प्रेसमध्ये नोकरांसाठी मस्टर सुरू झालं, फंड कापला जाऊ लागला. तेव्हा “काही तरी मगजमारी करण्यापेक्षा कंपोझिंग शिकलास तर कामाला तोटा नाही” अशी समजूत घालून सुऱ्याला ते आपल्या सोबत प्रेसमध्ये नेऊ लागले.
           पाच महिन्यात सुऱ्या कंपोझिंग शिकला. प्रेसचे मालक भाऊ रायकर यांची स्कुटर घेऊन जाहिराती आणणे, बँकेतली कामे इथ पासुन तो कोल्हापूरहून न्युज प्रिंट रोल आणण्यापर्यंत त्याची मजल गेली.
उमेदवारीच्या काळात रायकर सुऱ्याला महिना तिनशे देत. शिवाय सटर फटर कामांचे कधी पंचवीस कधी पन्नास अलाहिदा देत. वर्षभरानंतर त्याचा मगदुर बघून भाऊंनी त्याला मस्टरवर घेतले अन् महिना बाराशे पगार सुरू केला. प्रेसची बाहेरची कामे करण्यात तो सराईत झाला. भाऊ रायकर अगदी अडेल तेव्हाच प्रेस बाहेर पडायचे. हल्लीतर प्रेसची डुप्लीकेट चावी सुऱ्याकडे असायची. प्रेसची वेळ सकाळी ६ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ अशी असायची. पण साप्ताहिकाचे अंक पोस्ट करणे, एस. टी पार्सले करणे, सभासद वर्गणी जमा करणे यामुळे वेळ व्हायचा. बाबा भुते प्रेस बंद झाल्यावर जेवायला घरी जात पण सुऱ्या मात्र जेवणाचा डबा घेऊन यायचा.
         गावातली कामे उरकुन तो प्रेसवर यायचा. डबा खाऊन तिथेच ताणुन द्यायचा. टाईमपास करायला ईमलीची संगत होती. किंबहुना त्याच कारणासाठी त्याने डबा आणणे सुरू केलेले. ईमली मात्र चार भावंडं घेऊन पडवीत गपचीप बसुन असायची. धोतर नेसणाऱ्या कळकट वडारांच्या तुलनेत कमावलेल्या भरदार बांध्याचा छानछोकीत राहणारा सुऱ्या तिला आवडायचाही पण जात पंचायतीची अन् त्यापेक्षाही हुमदांडग्या बापाची दशहत वाटायची तिला. वडाराच्या पोरीची काय हिम्मंत की परजातीच्या बाप्याकडे वर डोळे करून बघील तर... डोळेच काढले असते ना वडारांनी ! शिवाय इमलीचं चार सालामागेच लग्न झालेलं... न्हाण आल्यावर दोन सालापाठी ती दादल्याकडे नांदायला गेलेली पण सुरूंगाचं काम करताना जिलेटीनचा स्फोट झाला. त्यात तिचा दादला गमावला. सासु सासरे इमलीचा छळ करायला लागले. मग कलाप्पाने तिला सासरहून काढून आणलेली... सुऱ्याला हे कळले असते तर तीचा स्वीकार तो करणार नाही अशा विचारानेही इमली गप्प राहीलेली.
        सुऱ्या मात्र इमलीसाठी पागल झालेला. कोपरापर्यंत हातावर गोंदण केलेली वडार समाजात न होण्याइतपत गोरी, टॉमेटो सारखी रसरशीत आणि मुख्य म्हणजे झुळझुळीत साड्या नेसून स्वच्छ राहणारी इमली त्याच्या मनातच भरलेली. बरेच दिवस प्रयत्न करूनही इमली त्याला काही प्रतिसाद देईना पण सुऱ्याने चिकाटी सोडली नाही. हळुहळु गप्पा सुरू झाल्या. इमलीच्या भावंडाना चॉकलेट्स दे ... गोळया दे करताना त्याने इमलीला सेंटची बाटली दिली अन् एक दिवस तीन ते सहाच्या शोचे सिनेमाचे तिकीट ईमलीला देऊन तु परस्पर थेटरात जाऊन बस... पिक्चर सुरू झाल्यावर मागाहून मी येईन सुऱ्या म्हणाला. ईमलीने नाही म्हटले पण पालवर जाऊन साडी बदलून ती बाहेर पडली.
      दोन तीन दिवसांनी वरचेवर दोघेही पिक्चरला जाऊ लागली. कुणालाच काही संशय आला नाही. येण्याची शक्यताही नव्हती. तशी पुरेपुर खबरदारी दोघंही घ्यायची. सुऱ्याचे मित्र थेटरवर भेटायचे पण त्यांचा या गोष्टीत आक्षेप कशाला असेल? पिक्चरला जाणे सुरू झाले नि त्यांच्यातला दुरावा संपला. ईमली विधवा आहे हे कळूनही सुऱ्याने माघार घेतली नाही. एवढेच नव्हे ईमलीशी लग्न करायला तो तयार झाला. त्याच्या घरात विरोध होण्याचा प्रश्न नव्हता... तसा आई वडिलांचा विरोध झाला असता पण सुऱ्याने जुमानला नसता. प्रश्न फक्त ईमलीच्या आई बाबांनी होय म्हणण्याचा होता. सुऱ्या लग्न करणार म्हणताना त्यांची परवानगी मिळेल अशी ईमलीला आशा वाटत होती.
     थोडे दिवस गेले आणि ईमलीने ही गोष्ट आईच्या कानावर घातली. ती कलाप्पाला बोलली मात्र ... त्याने आकाशपाताळ एक केले. ईमलीला गुरासारखे बदडले. जातीबाहेर पोरगी द्यायला जात पंचायतीची परवानगी मिळणार नाही. एवढे कशाला ही गोष्ट त्याने पंचायतीपुढे नुसती सांगितली असती तरी पंचानी त्याला मिशी उतरून ठेवायला लावली असती. वडारांच्या पंचायतीचे या संबधातले कायदेकानुन भलतेच कडक... कलाप्पाला जिता गाडलाच असता की त्याच्या भावकीने. त्याने ईमलीला सक्त ताकिद दिली.
      जवळजवळ पंधरावडाभर ईमली प्रेसच्या आसपास फिरकली सुध्दा नाही. सुऱ्या डोळयात प्राण आणून वाट बघायचा. प्रेस भोवती चक्कर टाकायचा पण ईमलीची आई पालावर थांबलेली असायची. त्याचे काही चालेना. थोडे दिवस गेले. सुंद्री पूर्ववत दिवस दिवस बाहेर रहायला लागली. एक दिवस दुपारची ईमली प्रेसच्या व्हरांडयात येऊन बसली. झाला प्रकार तिने सुऱ्याला सांगितला.
          यापुढे दोघांचे बोलणे झाल्याचे कळले तरी कलाप्पा सुऱ्याला ठार मारील अशी भिती तिने व्यक्त केली. पण सुऱ्या असल्या धमकीला डरणारा नव्हता. तो राहायचा त्या शिवरे वठारात भंडारी मराठा समाजची जवळजवळ शंभर सव्वाशे घरे. वठारातले सगळे पोरगे नित्य नेमाने व्यायाम शाळेत जाणारे. एकजुटीने रहाणारे. एवढा मोठा स्मगलर फकीर कासम त्याचे नुसते नाव घेतले तरी रत्नदुर्गातले लोक चळाचळा कापायचे. 
      शिवरे वठारातल्या कोणीतरी पोरगा सायकलवरून जात असताना फकीर कासमच्या गाडीने त्याला ठोकले. पोराला काही लागले नव्हते. सायकलचा चिमटा मात्र मोडला. पोरगा नुकसान भरपाई मागायला लागला. फकीर कासमचे बॉडीगार्ड गाडी बाहेर पडले अन् त्यानी पोराची धुलाई केली. वठारात ही गोष्ट कळल्यावर लोक चिडले. स्मगलिंगचा माल भरून नेणारे फकीरचे तीन ट्रक त्याच रात्री लोकांनी अडवले.(क्रमश:)