डंपर मंगेशाच्या घरासमोर उभे राहिले. पोरे धडाधड खाली उतरली. साळवी वठारातली मंडळी रागाने बेभान झालेली. कुणीतरी तावातावाने सांगायला लागला. आम्ही समजुतीने सांगण्याचा प्रयत्न केला पण वडारानां भलतीच चरबी आहे. आमची जमात अपुरी आहे असे बघून त्यानी हाणामारीला सुरवात केली. आम्हाला शेपुट घालून माघार घ्यावी लागली. आता किती दम आहे वडारांचा तेच बघूया ! शिवरे मंडळीनी भाऊंची सुचना असतानाही ट्रक मधुन येणाऱ्या मंडळीची वाट न बघताच वडारांच्या पालावर जायचा निर्णय घेतला. हाणामारीची खुमखुमी असणारी तरणी पोरे धावतच पालांच्या दिशेने निघाली.
साळवी मंडळी माघारी पळाली ती जमात करून चाल करणार हे वडारानी ओळखलेले होते. मंगेशाच्या घरासमोर दोन डंपर थांबले त्यातून ५०/६० मंडळी उतरली साळवी वाडीतले वीस पंचवीस लोक सगळे पालाकडे निघाले याची वर्दी वडाराना मिळालेली, ते दबा धरून राहिलेले. मंगेशाच्या बागेतुन माणसे गडग्या बाहेर पडून वडारांच्या पालांकडे जायला लागली अन् अकस्मात दगड धोंडयाचा बेदम मारा सुरू झाला. जमात बघून वडार हातघाई करायचे नाहीत असे सगळ्यांनी मनोमन गृहित धरलेले पण उलटेच घडले. बऱ्याच माणसांना दगड धोंडयांचा चांगलाच खुराक मिळाला. खुमखुमी असणारे पोरगे चेन फिरवीत चॉपर सांभाळीत दगड धोंडे चुकवीत बेताबेताने पालांच्या दिशेने पुढे सरकु लागले. पालं अगदी नजिकच आलेली. आता मात्र घण पहारी सावरीत वडार सरळ पुढे आले.. चेन चॉपर यांचा काहीच उपयोग झाला नाही. वडारांचा हल्ला एवढा तिखट होता की, हाणामारीची सवय असलेली शिवरे मंडळीही अवाक् झाली. पुरूषांच्या बरोबरीने वडारणी सुध्दा खोरी – पिकाव असली नामांकित हत्यारे घेऊन चाल करून आली. वडारांच्या केसालाही धक्का लागला नाही. शिवरे, साळव्यांच्या पोराना बेदम मार खावा लागला. पंचवीस तीस तरणेताठे पोरगे जायबंदी झाले. एकच हलकल्लोळ माजला. जिगरबाज शिवरे मंडळीना माघार घेणे नामुष्कीचे वाटले पण परिस्थिती हाताबाहेर जात चालली तेव्हा मात्र काही विचारी माणसानी मागे फिरा मागे फिरा अशी हाकाटी सुरू केली. वर्मी मार खाल्लेली पोरे ओरडून, किंचाळून राहीली शाबुत होते ते जीव वाचवण्यासाठी माघार घेऊ लागले. नेमक्या त्याच वेळी ट्रकांचा घरघराट ऐकायला आला. पळणाऱ्यानी जीवाच्या आकांताने हाकारायला सुरवात केली. शिवऱ्यांची नवीन कुमक आल्याचा सुगावा लागल्यावर मात्र वडार हादरले आता चिडलेली मंडळी नक्की एकुण एक पाल पेटवून देणार हे ओळखुन म्हातारे वडार, बायका तरण्या वडारांना आवरायला धावले. भाऊ शिवरे आणि इतर मंडळी बंदुका सरसावीत येताना बघितल्यावर मात्र गळाठलेल्या वडारांनी हात जोडीत भुईवर बसकण मारली.
दोन म्हातारे वडार पागोटी काखेत दाबुन भाऊंना सामोरे गेले. भाऊंच्या पायावर डोके ठेवून, “मालक चुक झाली, आमाला जिवानिशी मारू नगासा तुमच्या मुलकात भीक मागुन, खडी फोडून, रगात गाळून पोट भरतूया आमी झालं तर चेपलीनी हाना आमाला पर जिवं मारू नगासा अशा विनवण्या सुरू झाल्या. आया बाया पुढे धावल्या. समोर दिसेल त्याचे पाय धरून दणदणा छातीवर मुटके मारीत रडत ओरडत त्यानी विनवण्या सुरू केल्या. आता बाजु पलटलेली बघून मार खाऊन माघार घेण्याची नामुष्की करणारी मंडळी चिडून पुढे सरसावली. आधी हल्ला करून जमात बघितल्यावर मानभावीपणा करणाऱ्या वडारांची त्यांना चीड आली. मगाचच्या मारामारीचा वचपा काढण्यासाठी त्यानी हात धुवून घ्यायला सुरवात केली.
वडार पक्के बिलंदर यावेळी आगळीक झाली तर पळून मुलूख गाठायचीही सवड होणार नाही हे ओळखुन काही प्रतिकार न करता मार खाणं त्यांनी पत्करल. मगाशी हल्ला करणाऱ्यांपैकी पालात दडून राहीलेल्या वडारांना माणसानी पालात शिरून बाहेर खेचीत लाथा बुक्क्यानी तुडवायला सुरवात केली. मगाचच्या हाणामारीत जायबंदी झालेल्या पोरांना उचलून घेऊन काही मंडळी मंगेशच्या घराकडे निघाली. भाऊ शिवरे हाडाचे पोलिस ! सोबतच्या मंडळीना थोडे हात धुवायची संधी दिल्या नंतरच त्यानी आवरते घेऊन परिस्थती ताळ्यावर आणली.
बेफाट मार खाऊन अर्धवट शुध्दीत असलेला सुऱ्या आणि ईमली भिमुच्या पालात सापडली. जाणत्यानी त्याचे हातपाय सोडून बसते करून पाणी पाजल्यावर सुऱ्या सावध झाला. दरम्याने दडुन राहीलेला कल्लाप्पा सुध्दा पुढे आला. त्याला जरबेत घेत भाऊ शिवरे म्हणाले, “कल्लाप्पा, क्रशरचा पैसा खाऊन भारी माज आला काय रे ? तुझ्या विधवा पोरीला असा कोण मोठा तालेवार जावाय मिळवणार होतास रे? सुऱ्या काय तुझ्या पेक्षा खालच्या जातीचा समजलास काय रे बेलदारा?” तशी फडा फडा थोबाडीत मारून घेत कल्लप्पा अजीजीच्या सुरात म्हणाला, “चुकल आमचं .... येक वार माफी करा गरीबाला. झाला पर्कार हितंच मिटुं द्या सायेब.... तुमच्या समाजाशी दुस्मनी निभवनार न्हाई आम्हांसी......”
त्याने डोईचा पटका सोडून तो शिवरेभाऊंच्या पायावर ठेवला. “माजी चुकी भक्षीस करा जी..... आता लई तानू नका जी....” कल्लप्पा पुरता जेरीला आला हे ओळखून शिवरे भाऊनी तडजोडीची भाषा सुरु केली, “ठीक आहे, आधी सुऱ्या नी ईमलीला चव्हाण डॉक्टरांकडे अॅडमिट करा. आठ पंधरा दिवस आराम करून पोरं हिंडती फिरती होऊद्यात मग साळव्याच्या कार्यालयात धूमधडाक्यात लग्नाचा बार देऊया उडवून कल्लाप्पा कॉन्ट्रक्टरच्या इतमामाला शोभेल असा लग्नाचा धडाका झाला पायजेल... काय मंजूर आहे ना?" “जी सायेब, बगाच तुमी..... धा बकरं तोडून जेवणावळी घालतु की आख्ख्या भण्डार वाड्याला..... पन आमच्या जात पंचायतीला जरा समजावा तुमी....” एक म्हातारा वडार पुढे येत म्हणाला, “शिवरेभाऊ, त्येची काळजी अजाबात करू नगासा म्या पंचायतीत हायी की. बाकीचं काय मज्या शब्दाभाईर न्हायीत गा... काय धा पंधरा हजाराचा जुर्माना व्हयील तो भर नी हो की मोकळा तू कल्लपा आन्ना. आता व्हा बिनघोर.... आरं बाबा म्हन हाय न्हवं .... मिया बिबि राजी तर काय करतूया काजी" नी सगळी मंडळी गडगडा हासली. (समाप्त)