शनिवार सकाळ.
शहराच्या जुन्या भागात लिलाव बाजार भरलेला.
लोखंडी गजांच्या आत जुनी चित्रं, फर्निचरं, मोडक्या वस्तूंचा ढीग.
अमोल गर्दीतून सरकत गेला. त्याचं डोकं पुस्तकं आणि प्रोजेक्ट्समध्ये गुरफटलेलं होतं. तो एक साधा कॉलेज मुलगा होता - मध्यमवर्गीय, नेहमीच पैशांची तंगी. पण त्याला जुन्या वस्तूंचा छंद होता.
आज त्याच्या नजरेत पडलं एक जुनं लाकडी घड्याळ.
ओक लाकडाची चौकट, काळपट डायल, काच थोडी तडकलेली.
सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे काटे उलट चालत होते.
तो जवळ गेला.
घड्याळाच्या काट्यांची हालचाल पाहताना त्याच्या छातीत एक अनामिक थंड लहर पसरली.
टिक… टिक… टिक…
पण ती टिक-टिक उलटी, मागे जाणारी.
“हे कितीला?” त्याने दुकानदाराला विचारलं.
दुकानदाराने हळू आवाजात उत्तर दिलं,
“हे घड्याळ तुला मागे नेईल… पण काय गमावशील, हे तुला माहिती नसेल.”
अमोल हसला. “फालतू गप्पा मारू नका. किती?”
“फक्त तीनशे.”
स्वस्त भाव ऐकून त्याने लगेच घेतलं.
तो विचार करत होता, रूममध्ये शो-पीस म्हणून ठेवायला छान दिसेल.
---
रात्री उशिरा तो घरी आला.
रूम छोटंसं होतं-एका भिंतीवर बुकशेल्फ, दुसऱ्यावर पोस्टर्स, आणि टेबलावर लॅपटॉप.
त्याने घड्याळ टांगलं आणि पलंगावर आडवा झाला.
टिक-टिक आवाज खोलीभर भरला.
पण प्रत्येक ठोक्याने त्याला वाटलं, जणू कुणीतरी त्याच्या हृदयात बोट खुपसतोय.
काही वेळाने डोळे मिटले.
त्याला स्वप्न पडलं-
तो एका अनोळखी कॉरिडॉरमध्ये उभा आहे.
भिंतीवर घड्याळं आहेत, हजारो.
सर्व घड्याळं उलट चालतायत.
आणि प्रत्येक टिक-टिकबरोबर लोकांचे शरीर तुकड्या-तुकड्यांनी नाहीसे होतायत.
कोणी बोट गमावतो, कोणी डोळा, कोणी संपूर्ण चेहरा.
तो किंचाळला आणि जागा झाला.
घड्याळ भिंतीवर शांतपणे उलट चालू होतं.
---
दुसऱ्या दिवशी सकाळी, त्याने लक्ष दिलं-
घड्याळ ७:१० दाखवत होतं, पण काटे हळूहळू ७:०९ कडे उलटे सरकले.
त्याच क्षणी त्याच्या उजव्या हातात एक झिणझिणी आली.
तो घाबरून पाहतो तर…
नख अचानक सैल झालं, जणू एखाद्या मांसाहारीने ओढून काढलंय.
ते जमिनीवर पडताच नख पांढरट धुळीत बदललं.
दुखलंच नाही.
रक्त आलं नाही.
फक्त नखाच्या जागी रिकामी त्वचा.
त्याचं हृदय जोराने धडधडू लागलं.
त्याने आरशात हात दाखवला-
नख नाही, पण त्याच्या डोळ्यांना मात्र स्पष्ट दिसत होतं.
कंप पावत त्याने घड्याळाकडे पाहिलं.
टिक-टिक उलट चालूच होती.
---
४. वाढती किंमत
त्या दिवसापासून दररोज विचित्र घटना घडू लागल्या.
८:०२ → उजव्या हाताचा अंगठा नाहीसा.
८:०१ → डाव्या पायाचं नख गायब.
८:०० → कानाच्या लोबाचं अर्धं मांस जणू शोषलं गेलं.
सगळं होतं बिनदुखी.
पण अंगावर काटा आणणारं म्हणजे-
हे सगळं फक्त त्याला दिसत होतं.
आईने विचारलं,
“काय रे, एवढा फिकट का दिसतोयस?”
त्याने घाबरून हात दाखवला.
“पहा, माझा अंगठा नाही!”
आई चकित झाली.
“कुठे आहे रे? अगदी ठिक दिसतोय.”
त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.
तो आरशात बघतो-त्याला खरंच अंगठा नव्हता.
पण आईच्या नजरेत तो अजून “संपूर्ण” होता.
जणू त्याचा शरीराचा अभाव फक्त त्यालाच दिसत होता.
---
रात्र जसजशी गडद होत गेली, तसतशी विकृतता वाढत गेली.
भिंतींवर सावल्या उलट चालू लागल्या-
मानवी आकृती आधी डावीकडे गेली, मग परत उजवीकडे आली.
जणू वेळ उलट.
आई स्वयंपाक करताना उलट शब्द उच्चारत होती.
“…रा उथश …आरा येनात तु…”
त्याचा अर्थ तो समजून घेतला-
“तु येणार आहेस… शून्यात.”
त्याने आरशात पाहिलं.
चेहरा पूर्ण उलट झाला होता.
डावा डोळा उजव्या बाजूला, नाक पाठीकडे, ओठ मानेला चिकटलेले.
आणि त्या उलट चेहऱ्याने त्याच्याकडे पाहून हसत म्हटलं-
“वेळ संपत नाही… तू संपतोय “
त्या रात्री घड्याळाचं काच फुटलं.
त्यातून काळ्या धुरासारखी मानवी आकृती बाहेर आली.
तिच्या चेहऱ्याला डोळे नव्हते, फक्त उलटी टिक-टिकचा आवाज.
अमोल थरथरत जमिनीवर कोसळला.
त्याने शेवटचा श्वास घ्यायचा प्रयत्न केला.
पण श्वाससुद्धा उलटा झाला-
हाआआऽऽऽश्श्श…
त्याचं हृदय वेड्यागत उलट धडकू लागलं.
त्याला जाणवलं, त्याचं अस्तित्व नाहीसं होतंय,
आणि त्याच्या जागी काहीतरी वेगळं जन्म घेतंय.
घड्याळ थांबलं.
३:०३.
सदैव.
अमोलच्या खोलीत अजूनही ते घड्याळ लटकलेलं होतं.
पहाटेच त्याने डोळे उघडले, आणि पहिली गोष्ट जी जाणवली ती म्हणजे—
त्याचा श्वास सरळ नव्हता.
सामान्य माणूस श्वास आत घेतो, मग बाहेर सोडतो.
पण अमोलला वाटलं, तो श्वास बाहेरून आत जातोय.
जणू आधी श्वास बाहेर पडतो, मगच शरीराने तो आत घेतला जातो.
तो पलंगावरून उठला, आरशात पाहिलं-
त्याच्या गालावरची त्वचा जणू उलट चिकटवली गेली होती.
नाक एका बाजूला वाकलं होतं.
आणि डाव्या डोळ्याची बुबुळ सतत उलट फिरत होती, मागे मागे.
घड्याळाच्या काट्यांनी त्या क्षणी ६:४५ → ६:४४ असा उलटा प्रवास केला.
त्याच क्षणी त्याच्या डाव्या हाताची तर्जनी पारदर्शक झाली.
आधी नख गायब झालं, मग हाडं, मग त्वचा.
थोड्याच वेळात संपूर्ण बोट हवेत विरून गेलं.
त्याने किंचाळलं—
पण आवाजही उलटा आला.
“ऽऽऽआआआहहह” ऐवजी “हहहआआआऽऽऽ” असा.
—
कॉलेजला जायचा प्रयत्न केला.
बसस्टॉपवर उभा असताना त्याने स्वतःकडे पाहिलं—
त्याच्या डाव्या पायाचा अर्धा पाऊल नाहीसा झाला होता.
तो चालताना जणू हवेत लटकत होता.
पण आजूबाजूचे लोक त्याला “सामान्य” बघत होते.
मित्राने विचारलं,
“काय रे, एवढा थकलेला दिसतोयस?”
अमोल डोळे मोठे करून म्हणाला,
“तुला दिसत नाही का? माझा पायच नाहीसा झालाय!”
मित्र हसला.
“काय बडबडतोस? सगळं ठिक आहे.”
त्या क्षणी अमोलच्या अंगावर काटा आला
तो एकटाच सत्य पाहत होता.
बाकी सगळ्यांना तो अजूनही पूर्ण दिसत होता.
जणू घड्याळाने त्याला एकटा कैद केला होता.
—
रात्री तो डायरी लिहायला बसला.
“आज माझं बोट आणि पाय नाहीसे झाले,” असं लिहायचा प्रयत्न केला.
पण पेन हातातून निसटून पानावर आपोआप शब्द उमटले—
“…ेल्याहिसे णाही याप आणी टोब ंझाम झाआ”
त्याला समजलं, आठवणीही उलट लिहिल्या जातायत.
त्याने आधी लिहिलेलं वाचायचं ठरवलं.
मागच्या पानावर लिहिलं होतं—
“मी कॉलेजला गेलो…”
पण आता ते वाचताना अक्षरं मागे सरकत होती.
“ओल्गेल ालजेकॉ ईम”
त्याचा मेंदू त्या उलट्या अक्षरांमध्ये अडकला.
डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं.
अचानक त्याला भूतकाळातील आठवण दिसली-
बालपणीचा वाढदिवस.
आई केक घेऊन आली होती.
पण आठवण उलट सुरू झाली-
पहिले केक संपला, मग मेणबत्त्या पेटल्या, मग पाहुणे हळूहळू गायब झाले.
शेवटी फक्त अंधार.
---
त्या रात्री झोपताना त्याला एक विचित्र स्वप्न पडलं.
तो एका काळ्या बाजारात उभा होता.
टेबलांवर माणसांचे तुकडे- हात, पाय, डोळे, हृदयं,-विकले जात होते.
एक व्यापारी ओरडत होता,
“घड्याळ जे उलट चालतं, ते शरीरं विकतं. ज्याचा वेळ मागे जातो, त्याचं शरीर आमचं होतं!”
त्याने पाहिलं-
एका कोपऱ्यात त्याचं स्वतःचं डावं बोट ठेवलेलं होतं.
कोणी तरी ते उचलून तपासत होतं, जणू ते विकत घेणार.
त्याला थंडी वाजली.
तो धावतच उठला.
पण डोळे उघडल्यावरही त्याच्या पलंगाशेजारी जमिनीवर बोटाचा सावलीसारखा ठसा दिसत होता.
जणू स्वप्न वास्तवात ओसंडून आलं होतं.
---
घरात सगळं विचित्र होऊ लागलं.
आईच्या आवाजात गोडवा नव्हता-
तिचे वाक्ये उलटी होती.
“झोपलास का?” ऐवजी “का सलापझो ”
“जेवायला ये” ऐवजी “ये ालायवेझ”
वडील टीव्ही बघत होते, पण स्क्रीनवर बातम्या उलट चालत होत्या.
अपघातात मृत्यू झालेलं गाडी पुन्हा उलट फिरून रस्त्यावर आलं, माणसं पुन्हा जागी उभी राहिली.
आणि शेवटी रिपोर्टर हसत म्हणाला-
“मृत्यू कधी घडत नाही… मृत्यू फक्त उलटा होतो.”
अमोल डोकं धरून बसला.
त्याला समजत नव्हत-तो वेडा होतोय का, की घड्याळाने जगाचं नियम बदललंय?
---
मध्यरात्री.
तो पलंगावर पडला होता.
घड्याळाचं काटे वेगाने उलट फिरू लागले.
टिक-टिक-टिक-टिक-टिक…
त्याच्या छातीत अचानक तीव्र वेदना झाली.
त्याला जाणवलं-
त्याचं हृदय उलट धडकतंय.
सामान्य हृदय “धडधड” करतं, पण त्याचं हृदय “धडधड” मागे सरकत होतं.
प्रत्येक उलट धडकेत त्याचा श्वास मागे ओढला जात होता.
आरशात पाहिलं तर…
त्याचा चेहरा हळूहळू शून्य होत होता.
डोळ्यांच्या जागी काळं पोकळ, ओठ गायब, कान नाहीसे.
फक्त हाडांचा आराखडा उरला होता.
आणि आरशातल्या पोकळ चेहऱ्याने कुजबुजलं—
“वेळ तुझं शरीर खात नाही… वेळ तुझा आत्मा खातोय.”
---
घड्याळ ३:०३ वर आलं.
पुन्हा.
सर्व घड्याळं थांबली.
आई, वडील, घर सगळं स्तब्ध झालं.
तो फक्त घड्याळाकडे पाहत होता.
आणि त्या काचेतून पुन्हा काळ्या धुराची आकृती बाहेर आली.
या वेळी ती अधिक मोठी होती, जणू संपूर्ण खोली गिळणार.
त्या आकृतीने हात पुढे केला-
आणि अमोलच्या छातीमध्ये घुसवला.
त्याला वाटलं, त्याचं हृदय उपटलं जातंय.
पण नाही-
ते उलटून घेतलं जात होतं.
हृदय धडधडत मागे चाललं, आणि मग गायब झालं.
त्याने किंचाळण्याचा प्रयत्न केला.
पण आवाज परत घशात शोषला गेला.
फक्त एक थंड शांतता राहिली