मोहनने असे विचारल्यावर ऊमा म्हणाली “मोहन मी सतीशला शोधायला ऑफिसमध्ये येत होते ,पण तुम्ही सगळे घरी का आला आहात ?असे ऊमाने मोहनला विचारल्यावर मोहन म्हणाला,”वहिनी ऑफिसमधले काही व्यवहारांचे पैसे काल साहेबांनी सतीशकडे दिले होते .साहेबांनी ते पैसे ताबडतोब त्याला बँकेत भरायला सांगितले होते .मात्र काल ते पैसे बँकेत जमा झालेलेच नव्हते आणि सतीश पण जो काल बाहेर गेला पैसे भरायला तो परत ऑफिसला आलाच नाही त्याचा फोनही बंद येत होता म्हणून आम्ही त्याला शोधायला घरी आलो होतो .ही रक्कम थोडीथोडकी नव्हती ,दोन लाखाच्या आसपास होती.हे ऐकून ऊमाला काय बोलावे सतीश बेपत्ता होता आणि ऊमाला पण तो कुठे गेलाय हेच माहित नव्हते .त्यामुळे सतीश परत आला की कळवा इतके सांगुन मोहन आणि ऑफिसची माणसे परत निघून गेली . सतीशच्या ऑफिसची माणसे पैशाच्या अफरातफरी मामल्यात घरी आली हे बघुन ऊमालातर शरमेने मेल्याहून मेल्यासारखे झाले .आता आणखी किती दुर्दैवाचे दशावतार पाहायला लागणार कोण जाणे ..असे तिच्या मनात आले कुठे हुडकणार होती ऊमा सतीशला ..?दिवसेदिवस नवे नवे प्रश्न समोर येत होते .कसे तोंड द्यायचे होते या सगळ्यांना तिने एकटीने ..ऊमाच्या डोक्याला नुसत्या झिणझिण्या येत होत्या ऊमाची विचारशक्तीच जणु नाहीशी झाली होती .दुसरा दिवस पार पडला तरी सतीशचा पत्ता नव्हताच .खरे म्हणजे आता ही गोष्ट काका काकूंना सांगायला हवी असे ऊमाला वाटले .मागे एक दोन वेळेस तो असा घर सोडुन गेला तेव्हा तिने ते त्यांच्यापासून लपवले होती. ऑफिसच्या कामाला गेला आहे असे सांगितले होते .पण आता मात्र असे करून चालणार नव्हते.सतीशच्या ऑफिसमध्येच पैशाचा अपहार झाल्याने ही गोष्ट त्या छोट्या गावात लगेच सर्वांना समजायची शक्यता होती . आज आता संध्याकाळी हे घालायचेच त्यांच्या कानावर असे तिने ठरवले .त्या दिवशी अचानक दुपारी मोहन तिला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये आला .त्याला पाहून ती थोडी बिचकलीच !!.आता आणखी काय काय ऐकायला मिळते आहे सतीशविषयी कोण जाणे .मनाची खूप तयारी ठेवली असताना सुद्धा नक्की काय पुढे येईल ह्याचा तिला अंदाज येईना .मोहनने तिला सांगितले की त्याला तिच्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे .ऑफिसमध्ये काहीही बोलणे ऊमाला प्रशस्त वाटले नाही म्हणून साहेबांकडून लवकर जायची परवानगी घेऊन ती मोहनसोबत ऑफिस मधून बाहेर पडली .मोहन आणि ती दोघेजण जवळच्या एका लहान हॉटेलमध्ये गेले .जिथे त्यांना थोडे निवांत आणि खाजगी बोलता येईल .मोहनने सतीशची खबरबात ऊमाला विचारली .ऊमाकडे काही उत्तर नव्हतेच,तीच मुळी याविषयी संपूर्ण अंधारात होती ..मग मोहनने तिला सांगितले ऑफिसमध्ये सतीशच्या गैरहजरी विषयी उलटसुलट चर्चा चालू आहे . पैशाचा मामला असल्याने कदाचित हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाण्याची शक्यता आहे .सतीश गायब असल्याने अजुन त्यावर कारवाई नाही झालेली .पण आणखी एकदोन दिवसात जर तो आला नाही तर सगळेच कठीण होणार आहे .निदान ही रक्कम जरी काहीतरी व्यवस्था करून भरून टाकली तर बरे होईल हे ऐकुन ऊमा आता ओक्साबोक्शी रडू लागली .मोहनने तिला कसेतरी शांत केले .ऊमा हुंदके देत म्हणाली , “मोहन बघा ना अजून पण सतीशचा काहीच पत्ता नाहीये . माझ्याजवळ तर काहीच पैसे नाहीत आणि आता ही दोन लाखांची एवढी मोठी रक्कम मी कुठून आणू ?”मोहनला ऊमाची ही अवस्था बघून अतिशय वाईट वाटले आणि तिची दया आली .खरेच खुप मोठा कठीण प्रसंग आला होता ऊमावर .तिला होईल तितकी मदत करायची त्याची इच्छा होतीच .आता यात काय आणि कसा मार्ग काढता येईल याचा विचार मोहन करीत राहिला .ऊमा पण आता मोहन काय सुचवतो आहे इकडे लक्ष देऊन बसली .थोडा विचार केल्यावर मोहनने ऊमाला सुचवले की तो स्वतः हे पैसे कोठून तरी उसने घेऊन सध्या ऊमाला देईल .सध्या तरी हा निकराचा प्रश्न मिटेल .पोलीस कारवाई पासून पण आपसूकच सुटका होईल .पण नंतर हे पैसे व्याजासहित फेडायला लागतील ते ती कशी फेडू शकेल ?असे त्याने विचारले .त्याच्या या प्रस्तावाने ऊमा थोडी चकित झाली .पण मग तिलाही जाणवले की या मार्गाने निदान आत्ताच्या परिस्थितीतून तरी सुटका होईल .आणि पोलीस चौकशी तर होणार नाही तिने मोहनला सांगितले की उद्या ती विचार करून यावरचा निर्णय सांगेल.मोहनने हे मान्य केले पण निर्णय मात्र उद्याच हवा हे ही सांगितले .कारण हे प्रकरण गंभीर होण्याच्या आत मिटवायला हवे होते .जर का आपल्या दिरंगाईने हे प्रकरण चिघळले तर मात्र कठीण होईल मोहनचा निरोप घेऊन अनेक विचार डोक्यात घेऊन ऊमा घरी परतली .विचार करीत राहिली की हा पैशाचा मामला कसा जमवता येईल ?काका तर काहीच मदत करू शकणार नाहीत .त्यांचेच दोघांचे कसेबसे भागते आहे . ऊमाला तसा पगार बरा होता .तरीही लहान गावात छोट्या ऑफिसमध्ये एका क्लार्कला असा कितीसा पगार असणार ?पण बाहेरून कुठून पैसे उसने घेण्यापेक्षा आणि त्याचे अव्व्वाच्या सव्व्वा दराने व्याज भरण्यापेक्षा ऑफिसमधून कर्ज मिळते का ते विचारावे का ?,परतफेड पगारातून करता येईल .दोन लाख ही रक्कम थोडी मोठी होती पण बरेच दिवस ती या नोकरीत असल्याने आणि तिचे साहेब तिला व्यक्तीशः ओळखत होते व त्यांच्या दृष्टीने ऊमा एक विश्वासू आणि कामसू कर्मचारी होती .त्यामुळे ते तिला असे कर्ज कदाचित देऊ शकतील असा तिला विश्वास होता. आता मात्र हा प्रकार काकांना सांगायलाच लागणार होता .तेथून निघून ती नयनाला आणायला काकुकडे गेली .तिने गेल्या गेल्या काकुला सांगितले ती आज जेवायला थांबणार आहे .काकांनी सतीशची चौकशी केल्यावर तिने तो बाहेर गेला आहे असे त्यांना सांगितले .जेवण झाल्यावर मग तिने विषय काढला ,“काका एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे पण तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ “तिचे बोलणे ऐकल्यावर काका आणि काकू दोघेही अचंबित झाले .काय सांगायचे असेल ऊमाला ...?“बोल बोल पोरी काय झालेय ?काका म्हणाले “ काका सतीशकडून ऑफिसमध्ये काही पैशाचा घोळ झाला आहे .आणि सतीश कोठे गेलाय हे पण मला काय कोणालाच माहित नाहीये .ही रक्कम जवळ जवळ दोन लाख आहे .पण हे पैसे मात्र लगेच फेडायला लागणार आहेत .”ऊमाचे हे बोलणे ऐकून काका चकित झाले .काकु तर हमसा हमशी रडायला लागली .हे सगळे काय असे विचित्र घडले आहे याचा त्या दोघांना फार विषाद वाटला .काका तर त्रागा करू लागले लागले .“असा कसा हा विचित्र माणूस ?आपल्या सोन्यासारख्या बायकोला आणि लहान मुलीला संकटात टाकून निघून गेला .?याला काही लाजलज्जा आहे की नाही “स्वतःच्या कपाळावर हात मारून घेऊ लागले .हळहळ व्यक्त करू लागले परत परत ते आता स्वतःलाच दोष देऊ लागले क्रमशः