यामध्ये मुख्य प्रश्न नयनाचा होता ..तिला काय आणि कसे सांगायचे .?हा मामला ऊमाला एकटीला हाताळता येणे केवळ अशक्य होते .हे मोहनला सांगण्यासाठी ती वारंवार मोहनला फोन लावत होती पण मोहनचा फोन काही केल्या लागतच नव्हता .घरी पोचायच्या आत त्याचा फोन लागणे आवश्यक होते .आणि हे सगळे तत्काळ बोलायला लागणार होते .कारण घरी गेल्यावर नयनासमोर त्याला फोन करता येणे अशक्य होते .मुळात आज घरी गेल्यावर तिलाच नयनाच्या सतरा प्रश्नांना उत्तरे द्यायला लागणार होती .कारण जसजशी नयना मोठी होत गेली होती तसतसा तिचा स्वभाव अतिशय चिकित्सक होत गेला होता .कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्याविषयी अनेक प्रश्न विचारायची तिला सवयच होती .तिच्या या प्रश्नांच्या भडिमारात कधीकधी तिची मैत्रीण रितू सुद्धा सापडत असे ..आणि एकदा तिचे प्रश्न सुरु झाले कि मग समोरच्याची खैर नसे ..त्यात ऊमाचे इतक्या वर्षाचे आयुष्य इतके आखीव होते .कि त्या पलीकडे काहीही घडले तर त्याचे स्पष्टीकरण नयना नक्कीच मागणार होती .आजपर्यंत ऊमा कधीच इतका वेळ दुकानात थांबली नव्हती .रिक्षात ऊमा विचार करीत होती काहीही झाले तरी आज मोहनला फोन लागायलाच हवा ..आणि त्याला इकडे ताबडतोब बोलावून घ्यायला हवे .पण फोन लागतच नव्हता .अखेर घर आलेच ..रिक्षातून उतरून ऊमाने पैसे दिले आणि ती खाली उतरली .आणि वाड्याच्या दारात उभी राहिली यानंतर काहीतरी कारण काढुन घराबाहेर जाउनच मोहनशी बोलायला लागणार आता काय कारण नयनाला सांगून घरातून बाहेर पडावे बरे ..वेळ रात्रीची असल्याने नयना हमखास मी तुझ्यासोबत येणार अशी म्हणली असती ..ऊमाला ती घराबाहेर परत एकटी सोडणे अशक्य होते .काय करावे बरे आता ,...? काही क्षण असा विचार करीत ऊमा थांबली होती तोच फोन वाजला .फोन मोहनचा होता ..बघताच ऊमाला अगदी हायसे वाटले !!फोन उचलताच मोहन म्हणाला “वहिनी मला फोन केला होतात ना तुम्ही .काय काम होते बरे .मी एका मिटिंग मध्ये बिझी होतो फोन नाही घेऊ शकलो “ऊमा गडबडीने म्हणाली “ अहो मोहन मला आत्ता सतीशचा फोन आला होता ..आता चकित व्हायची पाळी मोहनची होती ..काय सांगता काय वहिनी ..काय म्हणत होता सतीश .?कुठे आहे तो ?नयनाच्या सहाव्या वाढदिवसा दिवशी जो मोहनचा सतीशबरोबर फोन झाला होता .त्यानंतर मोहनचा काहीच संपर्क नव्हता त्याच्याशी ..मग ऊमाने सतीशचा पहिला फोन, दुसरा फोन हे सारे मोहनला सांगितले .ते ऐकताच मोहन म्हणाला ..“वहिनी मग तो आहे कुठ आत्ता ..?“अहो ते कुठे सांगितले त्याने ?ऊमा म्हणाली आम्हाला भेटायला आज रात्री निघून उद्या इकडे पोचतो इतकेच बोलला .मोहन म्हणला ..अहो काय हे वहिनी ...विचारायचे न नक्की कुठे आहे तो ते ..“मी विचारले हो पण त्याची सांगायची तयारीच नव्हती ..आता विषय कुठे वाढवा म्हणून नाही जास्त बोलले .ऊमा हताशपणे म्हणाली ..बरे मोहन तुम्ही येताय न उद्या सकाळपर्यंत इकडे ?तुम्ही आल्याशिवाय मला एकटीला सतीशला सामोरे जाणे अशक्य आहे हो ”ऊमाच्या या प्रश्नावर मोहन म्हणाला ..“ कसे सांगू आता तुम्हाला ..पण मी नाही येऊ शकत उद्या ,,कारण मी मुंबईत आहे आत्ता...ऑफिसच्या कामासाठी आलोय इकडे . आणि उद्या पण माझी एक महत्वाची मिटिंग आहे .त्यामुळे आत्ता मला मुंबई नाही सोडता येणार .उद्याची मिटिंग आटोपली कि मात्र मी लगेच निघेन .पण परत दुसऱ्या दिवशी ऑफिसला रीपोर्ट करायला लागेल मला पण परवा संध्याकाळपर्यंत मात्र मी येईन नक्की तिकडे .”हे मोहनचे बोलणे ऐकून ऊमाच्या जणु पायाखालची वाळुच सरकली ..धास्तावून ती म्हणाली ..मग आता कसे करायचे हो ...“मोहन तुम्ही नाही आलात तर मी एकटी काय करू ?सतीश आला तर कसे काय मला जमेल त्याच्यासोबत बोलायला ?आणि मुख्य प्रश्न आहे तो नयनाचा ..तिला काय सांगू तिच्या वडिलांबद्दल ?आणि कशी तिची समजुत पटवून देवू ?फारच अवघड प्रसंग आला आहे हा माझ्यावर ..”फोनवर ऊमाचा हताश स्वर ऐकुन मोहनला पण काही सुचेना खरेच काय सांगायचे नयनाला सतीशबद्दल ?इतक्या वर्षात तिने बाबाचे नाव पण काढले नाहीय कदाचित सतीशची बाजु ऐकुन घेऊन तिची समजूत पटू शकेल .पुढे काय करायचे ते ठरवता येईल पण सध्या तरी नयनाला काय सांगायचे हा प्रश्न सोडवायला लागेल .मग अचानक मोहनला एक उपाय सुचला .“वहिनी असे करा सध्या तुम्ही नयनाला सांगा ..मोहनमामा मुंबईला गेलाय पण नेमका त्याचा एक मित्र कामासाठी इथे उद्या येतोय असा त्याचा मला फोन आला होता .त्याच्या मित्राचे हॉटेल बुकिंग नाही झालेले नाही त्यामुळे त्याच्या मित्राला फक्त एक दिवसासाठी आपल्या घरी ठेवून घ्या असे सांगितले आहे .एकदोन दिवसात मोहनमामा परत येईल तोपर्यंत त्याचे ते मित्र थांबतील आपल्या घरी .मग मोहनमामा त्यांना आपल्या सोबत घरी घेऊन जाईल एक दिवस त्यांची सोय करावी लागेल आपल्यला ” समजा मला चुकून माकून नयनाने काही विचारायला फोन केलाच तर मीही हेच सांगेनसध्या तरी हाच मार्ग दिसतो आहे मला मग मी परत आल्यावर पुढे बघूया काय करायचे ते .. “ हे मोहनचे बोलणे ऐकुन ऊमा त्याला होय म्हणालीतिला तर काहीच सुचत नव्हते .या बिकट परिस्थितीत निदान मोहनची ही सध्या तरी आयडिया बरी होती ....काही इलाज नव्हता ऊमाचा होकार आल्यावर बेत परत पक्का करून मोहनने मग फोन बंद केला .ऊमा पण फोन पर्समध्ये ठेवून घरात शिरली .नयना आत काहीतरी वाचत बसली होती .वाचता वाचता आईची वाट पाहत होती ..स्वयंपाकघरातुन खिचडी आणि तळलेल्या पापडाचा खमंग वास येत होता .त्या वासाने ऊमाला आत्ता जाणीव झाली आपल्याला खूप भूक लागली आहे अशी ..मगापर्यंत तिच्या डोक्यात हा विचार पण नव्हता नयनाकडे हसून पहात पर्स ठेवून ऊमा बाथरुममध्ये शिरली .. ती हातपाय धुवुन बाहेर येताच नयना म्हणाली ,“आई अग आज किती वाजले बघ तरी का बरे इतका उशीर ?आपले दुकान तर कधीच बंद झाले असेल ना ..?मग तू काय करीत होतीस इतका वेळ ?त्या भागात संध्याकाळी सातनंतरसामसूम होत असते आणि तुरळक लोक असतात हे नयनाला चांगलेच माहित होते .आणि आईचे रोजचे रुटीन पण तिला पक्के माहित होते .रुटीनच्या पलीकडे आई कधी काही करीत नाही हे ही माहीत होते .आई इतक्या उशिरापर्यंत दुकानात काय करीत होती .नयनाच्या या प्रश्नांच्या सरबत्तीला ऊमाला आता जशी सुचतील तशी उत्तरे देणे भाग होते .“ अग एक कस्टमर पूर्वीचे उधार राहिलेले बिल दुकानात येऊन देतो म्हणले होते .त्यांचीच वाट पहात बसले होते म्हणून उशीर झाला ग ““मिळाले का मग पैसे ...?पण तु तर कुणालाच कधी उधार देत नाहीस ना ?मग हे कोण असे खास कस्टमर होते .”?नयनाने विचारले ..क्रमशः