Totaya - 2 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | तोतया - प्रकरण 2

Featured Books
Categories
Share

तोतया - प्रकरण 2

तोतया
प्रकरण २
 मला तिथेच थांबायला सांगून तो गोरिलाला घेऊन बाहेर गेला. थोड्या वेळात मला गाडीत नेऊन बेशुद्ध करणारी म्हातारी बाई तिथे आली.तिच्या हातात तो छोटा कुत्रा होता.माझ्याशी असं वागल्या बद्दल ती माफी मागायला आली होती.
“ तुझी आई हयात आहे?” अचानक तिने मला प्रश्न विचारला आणि मी हादरलोच.
“ का? असं काय विचारताय?” मी विचारलं.
“ सांग तर ”
“ नाही ती पाच वर्षांपूर्वीच गेली.”
“ ती जिवंत असती तर मी आज तुझ्या बाबत जे केलं तेच केलं असतं. आम्ही तुला ज्या माणसाचा तोतया व्हायला सांगतोय तो माझा मुलगा आहे.”
“ माझ्या आईने असं कुणालाच बेशुद्ध करून पळवलं नसत.उगाच तिच्याबाबत वाईट बोलू नका.” मी भडकून म्हंटलं.
“ संकटं येतात तेव्हा आया कुठल्या थराला जातील याचा नेम नसतो.तू आमचं काम स्वीकारलंस याचा खूप आनंद झालाय मला, मला तुझी क्षमता माहित आहे.मी पडद्यावर पहिली आहे आणि काल हॉटेलात सुद्धा. ”
मी तिला स्पष्टपणे सांगितलं की हे सर्व मी पैशासाठी करायला तयार झालोय.मला नाती, भावना समजत नाहीत. ती म्हणाली, “ माहित्ये मला की तुला किती गरज आहे पैशांची. हे काम होवू दे एकदा तुला तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त देऊ आम्ही. तुला मी चंद्रहास म्हणाले तर चालेल ना? कारण नाटकातली का होईना मी तुझी आई आहे.माझं नाव प्राशिला आहे.मला तू नावाने हाक मारलीस तरी चालेल. तर चंद्रहास, तू आम्हाला पूर्ण सहकार्य करायचं मान्य केलं आहेस, बरोबर?”
“ पैशांच्या बदल्यात.” मी तिला जाणीव करून दिली. “ आणि आता मला तेच तेच ऐकायचा कंटाळा आलाय, कारण भालेकर बरोबर हे सगळ बोलून झालंय.”
तिने मला कल्पना दिली की दुपारीच एक मेकअप करणारा माणूस येणार आहे तो तुला हुबेहूब माझा मुलगा दिसतो तसंच तू दिसावंस यासाठी मेकअप करेल. मी त्याला कबूल झालो. त्या नंतर मला तिच्या मुलाच्या बाबतीतल्या आणखी काही गोष्टी शिकवण्यात येणार असल्याचं तिनं सांगितलं.मी त्या साठीही तयार झालो.
नंतर अचानक तिने मला विचारलं, “ तुझं लग्न झालंय?” मला जरा रागच आला. तिने प्रश्नांचा भडीमार केला माझ्यावर. शेवटी मी तिला सांगितलं की मी घटस्फोटित आहे.माझी बायको परदेशात असते, दुसर लग्न केलंय तिने.मला मुल बाल काही नाही, आई, बाबा, बहिण, भाऊ कोणी नाहीत. मी एकटा आहे. आणि माझी आर्थिक कडकी बघता मैत्रीण सुद्धा नाही. 
“ आता तू आमचं काम केल्यावर पैसेवाला होणार आहेस त्या नंतर तुला मैत्रीण मिळायला हरकत नाही.” प्राशिला म्हणाली.
हे मात्र मला पटलं. पुढे ती म्हणाली की माझ्या मुला बरोबर कायम एक बॉडी गार्ड असायचा.तू माझा मुलगा म्हणून जर वावरणार असशील तर तू ही आपल्या बरोबर बॉडी गार्ड ठेवायला हवास, त्याशिवाय तू माझा मुलगा आहेस असं आमच्या शत्रूला वाटणार नाही. तर आमचा मजहर हा तुझ्यासोबत कायम बॉडी गार्ड असेल.
“ कोण आहे हा मजहर?” मी विचारलं.
“ तुला नाश्ता घेऊन आला होता तो.”- प्राशिला म्हणाली आणि माझ्या पायाखालची जमीन हादरली.
 “ तो गोरीला?” मी न राहवून विचारलं.
“ असं बोलू नको त्याच्या बद्दल.खूप सहकार्य करणार आहे तो तुला. ”
मी काही बोललो नाही 
“ तुला समीप सिन्नरकर माहित असेल ना?” अचानक तिने विचारलं.
मला तो माहित होता. माझ्या सारखाच बेकार. प्रीतम कपूर कडून कामं मिळवणारा.खास मित्र नव्हता पण सम दु:खी असल्याने एकत्र भेटायचो अधून मधून किंवा बियर पीत बसायचो.
“ त्याचं का अचानक नाव घेतलंत?” मी विचारलं.
“ आम्ही तुझ्या आधी त्याची निवड केली होती या कामासाठी पण त्याने तुझ्या सारखं संपूर्ण सहकार्य केलं नाही.फार अडचणी असायच्या त्याला.”
“ तुम्ही त्याचा उल्लेख भूतकाळात का करताय?”
“ म्हणजे तुला माहित नाही? तो मेला.” प्राशिला म्हणाली. “ कार अपघात झाला. ब्रेक फेल झाले. बिच्चारा.”
माझ्या छातीतून बारीक कळ आली. मी चमकून तिच्याकडे पाहिलं.ती दारातून बाहेर पडत होती. 
*****
तासाभराने मजहर म्हणजे गोरिला आत आला. मला काय हवं नको याची चौकशी त्याने केली आणि आता कायम आपण बरोबर असणार तर ओळख करून घेण्यासाठी आल्याचं त्याने सांगितलं. आता आपली मोहीम सुरु होईल, तेव्हा तयार रहा. मी सांगेन तसं वागायचं म्हणजे तुम्हाला काही भीती नाही असं म्हणाला. मी त्याला समीप सिन्नरकर बद्दल विचारून घेतलं.
“ मी सांगितलं तसं च्या तसं तो वागायचा नाही. शेवटी त्याच्या कारचा अपघात झाला ” मजहर म्हणाला.आणि थोडा वेळाने निघून गेला. तो जाताच पुन्हा प्राशिला आली तिच्या बरोबर एक माणूस होता.बहुतेक मेक अप मन असावा. त्याच नाव गंधार असल्याचं तिने सांगितलं आणि आमची ओळख करून दिली.
“ वेळ न घालवता तुझं काम सुरु कर.” प्राशिलाने त्याला दम दिला आणि ती निघून गेली.
गंधार ने माझ्या डोक्याचं माप घेतलं. माझ्या शरीराची मापे घेताना तो माझ्याशी ज्या पद्धतीने बोलत होता त्यावरून मी ताडलं की त्याला सुद्धा माझा मेकअप करण्यासाठी माझ्या सारखंच पळवून आणण्यात आलं होतं. हे लोक कोण आहेत हे त्यालाही माहित नव्हत जसं मलाही माहित नव्हतं.
तेवढ्यात मजहर दार घडून आत आला. त्याला गंधार चा संशय आला म्हणून आला होता का? की मला तो काही सांगेल? पण तो येताच गंधार एकदम म्हणाला,
“ ओह, मजहर, होतंच आलंय माझं काम. एकदम बरोब्बर होईल सगळं.”
मजहरच्या हातात एक सूट होता.त्याने तो माझ्या अंगावर भिरकावला. घाल हा. मी माझ्या अंगावरचे कपडे काढले आणि त्याने आणलेला सूट निमूटपणे घातला. “ नशिबवान आहेस तू.” मजहर म्हणाला. “ अपघातात मेलेल्या त्या सिन्नरकर ला नीट बसला नव्हता.”
माझ्या छातीतून एक कळ आली.कुठल्या लोकांची कामं मी पैशांसाठी घेऊन बसलो होतो. मी नंतर सूट काढून ठेवला.आता गंधारने माझ्या डोक्याचे काम करायला सुरवात केली.मजहर थोडासा लांब गेला होता ती संधी साधून गंधार माझ्या कानाजवळ तोंड नेऊन म्हणाला, “ हे लोक मला किती पैसे देतायत! मला त्याचीच भीती वाटायला लागल्ये.तुझ्या आधी मी एका माणसावर अशीच मेहेनत घेतली होती, त्याचं काय झालं? ” 
मला उत्तरं देता आलं नाही कारण मजहर माझ्याकडे टक लावून बघत असल्याचा भास झाला.त्यानंतर त्या माणसाने माझ्या पायांच माप घेतलं.मला त्याने आणलेले बूट घालायला लावले.आणि मला आठ-दहा पावलं चालायला लावलं.ते बूट प्रचंड जड होते, त्याला एका बाजूने लावलेला पॅच फारच टोचत होता मी तोल जाऊन पडायचाच बाकी होतो. तेवढ्यात प्राशिला आत आली.
“ कसं चाललंय तुझं काम गंधार?” तिनं त्या मेकअप-मन ला विचारलं.
“ तुम्हीच बघा.केश रचना कशी वाटत्ये? अगदी हुबेहूब दिसत्ये ना?” गंधार ने कौतुकाने विचारलं.
“ तुझ्या कामा बद्दल प्रश्नच नाही.”-प्राशिला म्हणाली.
गंधार च्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या पुढच्या प्रश्नाने मावळला. 
“ चालता कसं येतंय त्याला?” तिनं विचारलं. “ चक्रपाणी, जरा चालून दाखव मला.”
तिच्या अपेक्षेनुसार माझी चाल नव्हती.तिने गंधार वर डोळे वटारले.
“ मी..मी...लावतो त्यांना सवय ..” तो घाबरून म्हणाला.
“ मजहर, गंधारला त्याच्या खोलीत ने. ”
मजहर गेल्यावर ती म्हणाली, “ तर मग चंद्रहास चक्रपाणी, तुला आता सगळ्यात महत्वाच्या कामाचा सराव करायचा आहे. माझ्या मुलाची सही करायचा सराव.” भालेकर आत आला त्याच्या हातात एक ब्रीफकेस होती.त्यात पेन, ट्रेस पेपर, काही कोरे कागद, अशा वस्तू होत्या. माझ्यापुढे त्याने सह्यांचे नमुने ठेवले, ट्रेस पेपर ठेवले. कोरे कागद ठेवले आणि दम दिला की मी पुढच्या दोन तीन दिवसात नीट सराव करून हुबेहूब सही करायला शिकायला हवं.तुला फुकटचे पैसे मोजत नाही आम्ही. तो आणि प्राशिला गेल्यावर मला उत्सुकता होती की मला ज्याचा तोतया म्हणून काम करायचं होतं, त्याच नाव तरी काय होतं. भालेकर ने आणलेल्या नमुना सहीकडे मी पाहिलं, प्रखर मार्तंड प्रजापती !
ज्याच्या एका बोटाच्या इशाऱ्यावर शेअर मार्केट इकडचे तिकडे होते असा मोठा व्यावसाईक! भारतातील दोन नंबरचा श्रीमंत.त्याचा तोतया होण्यासाठी मला आणलं गेलं होतं इथ!.विरोधकांच्या डोळ्यात धूळ फेक करून एक प्रचंड मोठं डील करण्यासाठी.मी किस झाड की पत्ती होतो त्यांच्या समोर.माझ्या आधी आणलेल्या सिन्नरकर ला संपवणं हा त्यांच्या साठी अगदीच किरकोळ विषय होता. मी स्वत:ला त्या मार्गाने जाऊ देणार नव्हतो. त्या लोकांना मी पूर्ण सहकार्य करणार होतो.थरथरत्या हाताने मी ट्रेस पेपरवर सही करायचा सराव करायला लागलो.दोन तास मी प्रयत्न करत होतो खाली चुरगळलेल्या ट्रेस पेपरचे बोळे पडले होते.माझी बोटं वाकडी व्हायला लागली होती.दोन तासांनी माझ्या लक्षात एक गोष्ट आली की मी केलेली प्रखर मार्तंड प्रजापती ची पहिली सही ही दोन तासा नंतर केलेल्या सही पेक्षा जास्त हुबेबुब झाली होती ! मी समजा भालेकरला सांगितलं की नाही जमत मला हे.तुम्ही दुसरा बघा कोणीतरी.तर? मला ही सिन्नरकर च्याच वाटेने जावं लागेल?
मी बाथरूम मधे जाऊन गरम पाण्यात माझी बोटं चांगली शेकून काढली.जरा आराम वाटला आणि मी पुन्हा सही गिरवायला बसलो. मजहर आणि भालेकर आत आले.त्याने मी कोऱ्या कागदावर केलेले ‘ काम ’ पाहिलं.
“ वाईट नाही. ” भालेकर म्हणाला. “अजून दोन दिवस आहेत आपल्याकडे.आजच्या पुरते बास. उद्या पासून पुन्हा चालू कर.” मला जरा बरं वाटलं. नंतर त्याने मजहर ला सूचना दिली की खोलीतला पसारा आवर आणि याला काय हवं, नको ते बघ आणि निघून गेला. 
“ नशीबवान आहेस तू. त्याला खुष केलंस.आता जगशील तू.” मजहर म्हणाला. “ चल जरा बाहेर जाऊ.कंटाळला असशील एकाच खोलीत बसून. जिम मधे जाऊ.”
मला त्याने बाहेर नेलं.एका लिफ्ट मधे बसून आम्ही जिम मधे आलो. लिफ्ट एवढी अद्ययावत होती की सुरु झाली की नाही हे सुद्धा समजलं नाही, मजहर ने कोणतेही बटन दाबलं नाही.त्यामुळे आम्ही वर जातोय की खाली हे देखील कळलं नाही.
“ तुला सिनेमात मारामारी करताना बघितलंय मी. चल, माझ्या बरोबर बॉक्सिंग चे दोन तीन राउंड कर.” मजहर म्हणाला.
का मला हा सारखं टेन्शन देतो? शुटींग वेगळ आणि खरं वेगळं. मी बॉक्सिंग शिकलो होतो,त्यामुळे शुटिंग दरम्यान मी डुप्लीकेट म्हणजे डमी न घेता मारामारीची दृश्य करायचो हे खर आहे पण या...या... गोरिला सदृष्य माणसाशी बॉक्सिंग ! पण आता इलाज नव्हता.प्रत्येक क्षणाला मी गर्तेत चाललो होतो.बघता बघता त्याने मला ग्लोव्ज घालायला दिले, स्वत:ही चढवले, आम्ही एकमेकांचा अंदाज घेत गोल फिरत होतो, अचानक त्याने आपला डावा हात माझ्या तोंडावर मारला, मी माझं डोकं पटकन हलवलं आणि तो ठोसा चुकवतानाच माझ्या उजव्या हाताने त्याच्या नाकावर ठोसा मारला.त्याला हे अपेक्षित नसावं.त्याच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं.त्याने जोराने पुन्हा एक डाव्या हाताचा प्रहार माझ्यावर केला, तो मी माझ्या उजव्या ग्लोव्ह वर झेलला.पण त्याचा जोर एवढा होता की मी दोन पावलं मागे होलपटलो.तो अधिक जवळ आला आणि आपल्या दोन्ही हातात माझं डोकं गच्च धरलं.त्याचं तोंड माझ्या कानापाशी आलं होतं आणि त्याच्या तोंडातून गुरगुरल्याचा आवाज आला. गोरिला ! त्याच्या डोळ्यात एक अशी क्रूर छटा मला दिसली की मी ओळखलं आता हा एकच अंतीम ठोसा लगावून मला खाली पडणार.पुन्हा कधी न उठण्यासाठी. प्रतिस्पर्ध्याच्या हातापेक्षा डोळ्यात पहा असं आम्हाला शिकवलं जायचं.ते मी आठवलं आणि ठरवलं आता आर या पार करायचं.माझी सर्व ताकत आणि वजन वापरून मी माझ्या उजव्या हाताचा जबरदस्त पंच त्याच्या जबड्यावर मारला.तो एवढा वर्मी बसला की जणू त्याच्या पायातली शक्ती गेली आणि तो खाली कोसळला. बेशुद्ध झाला की काय या काळजीने मी पटकन माझ्या हातातले ग्लोव्ज् काढले, त्याच्या जवळ गुढग्यावर बसलो आणि त्याच्या गालावर चापट्या मारून सावध करायचा प्रयत्न केला, थोडे पाणी मारलं.आणि त्याचे डोळे किलकिले झाले. तोंडावर हास्य फुललं.आपल्या हाताने त्याने आपला जबडा चोळला, आणि माझ्याकडे हात उंचावून उठवण्यासाठी आधार मागितला. त्याच्या डोळ्यातले आताचे भाव खुनशी नव्हते. पराभूताचेही नव्हते.चक्क मैत्रीचे होते.
“ मी तुला कमी लेखलं, पण तू चांगलाच तयारीचा निघालास.” तो म्हणाला.
“ तुझे दोन फटके मी चुकवले नसते तर भालेकरने ज्या कामासाठी मला आणलंय ते करायच्या अवस्थेत मी राहिलो नसतो.त्यामुळे स्वत:ला वाचवण्यासाठी तुला मारावंच लागलं मला.” मी म्हणालो.
“ याला म्हणतात गट्स.” मजहर म्हणाला. “ याचा अर्थ तुला मनापासून आमचं काम करायचंय. भालेकरला सांगेन मी हे. पण मला पाडल्याचं मात्र तू सांगू नको.”
हळूहळू मजहर माझ्या बाजूने झुकू लागला होता. 
त्या नंतर त्याच्या आग्रहाखातर आम्ही दोघांनी जिम मधे इतर व्यायाम केला.आता दोघेही घामाने चिंब झालो होतो आणि पोटात कावळे ओरडायला लागले होते.
“ तू नुसती ऑर्डर दे, तुला ते मिळेल.” मजहर म्हणाला आणि मला माझ्या खोलीत घेऊन आला.
“ चिकन बिर्याणी ” मी फर्माईश केली.
“ तुलाही आवडते?” त्याने कौतुकाने विचारलं.माझ्या खांद्यावर थोपटून तो खोली बाहेर निघाला.
“ तू जगणार आहेस.” दारातून तो म्हणाला.
***
दुसरा दिवस म्हणजे आदल्या दिवसाची पुनरावृत्ती होती.
नाश्त्याची ट्रॉली घेऊन मजहर आला तेव्हा त्याच्या हातात आणखी एक ड्राफ्ट होता. पाच हजाराचा.माझी कळी खुलली.नाश्ता झाल्यावर मी पुन्हा सही करायचा सराव करायला सुरवात केली.आज मी कालच्यापेक्षा जरा खुष होतो, आत्म विश्वासही वाढला होता.ट्रेस पेपर न घेता मी आता कोऱ्या कागदावर सह्या करायला लागलो होतो.तासाभराने भालेकर आला तेव्हा त्याने खाली पडलेले कागदाचे बोळे पहिले.मी प्रामाणिक प्रयात करत असल्याचं पाहून तो खुष झाला.त्याने त्याच्या समोर मला सह्या करायला लावल्या. त्या लक्षपूर्वक तपासल्या.
“ चांगली सुधारणा आहे. अजून प्रयत्न कर. बऱ्यापैकी जमतंय तुला.” मला आनंद झाला.
“ मी तुझं सगळं घर भाडं भरून टाकलंय. तुझ्या घरात धान्य भरलंय.तुझे कपडे आणि रोजच्या वापरातील वस्तू इथे आणून ठेवल्यात.तुझ्या एजंटला, प्रीतम कपूरला मी भेटून आलोय. तू त्याला जे कमिशन द्यायचं आहेस ते ही मी देऊन टाकलंय.त्याला मी सांगितलंय की आता त्याचा आणि तुझा आर्थिक दृष्ट्या एकमेकांशी काहीही संबंध नाही. तू आता पूर्णपणे आमच्या साठी आहेस. ” भालेकर म्हणाला.
माझी सगळी देणी मिटली म्हणून मी आनंद मानू की माझं आयुष्य या लोकांनी विकत घेतलं म्हणून .....मला समजत नव्हतं.
“ उद्या पर्यंत सह्यांचा सराव कर. त्या नंतर आपण इथून जाणार आहोत. तुझी नवीन भूमिका करायला तयार हो.” भालेकर म्हणाला.
“ कुठे जायचंय आपण?” मी विचारलं.
“ नंतर सांगू तुला. तुझं छान चाललंय आमच्या दृष्टीने. जास्त प्रश्न विचारू नको.” भालेकर मला दम देऊन बाहेर पडला.
जेवणाच्या वेळी मजहर पुन्हा आला. माझी आवडती बिर्याणी घेऊन. तो गेल्यावर मी आज जरा आरामात जेवण केलं.पुढचे दोन तास पुन्हा सह्या. माझ्या मनात आलं, प्रखर प्रजापतीने सुद्धा आपल्या आयुष्यात इतक्या वेळा सह्या केल्या नसतील तेवढ्या मी केल्या होत्या.दोन तासांनी मजहर आपल्या बरोबर गंधार गोवंडेला घेऊन आला. मजहर च्या हातात काल मी घातलेला सूट होता. बूट होते.त्याने ते मला घालायला लावले. गंधारने आपल्या बरोबर मेकअप बॉक्स आणलीच होती. त्याच्या हातात एक मास्क होता.तो त्याने उघडला.माझ्या चेहेऱ्यावर त्याने तो बसवला.
“ हा अगदी पातळ रबराचा आहे.तुम्हाला त्रास होणार नाही याचा.” गंधार म्हणाला पण त्याला स्वत:ला खूप त्रास होतोय हे त्याच्या कपाळावर साठलेल्या घामावरून लक्षात येत होतं.मास्क चढवल्यावर त्यातल्या डोळ्याच्या जागी असलेल्या भोकातून मला व्यवस्थित दिसत होतं.
“ आता फक्त मिशा आणि भुवया.” गंधार म्हणाला आणि आपल्या मेकअप बॉक्स मधून सामान काढून त्या कामाला लागला. थोडावेळ त्याने आपले कौशल्य वापरून माझा चेहेरा बदलला. मला आरशा समोर उभं केलं आणि म्हणाला, “ बघा.”
आरशात मी नव्हतो.
एक सुंदर पण किंचित रापलेला चेहेरा असलेला, पातळसर नाक, घट्ट तोंड.पातळ भुवया आणि मिशाही तशाच.
मला प्राशिला आणि भालेकर ची चाहूल लागली म्हणून मी मागे वळलो.
“ फॅन्टॅस्टिक ! ” प्राशिला एकदम उद्गारली. 
“ चालून दाखव.” भालेकर म्हणाला.
मी चालून दाखवलं. दोघेही खुष झाले.
“ कोणी म्हणणार नाही तू माझा प्रखर प्रजापती नाहीस म्हणून.” प्राशिला म्हणाली, “ गंधार, तू खूपच कायापालट केलास याचा.”
गंधार खुष झाला. त्याने प्राशिलाला हात जोडून नमस्कार केला. 
“ मी निघेन म्हणतो आता.मला घरी सोडायची व्यवस्था करा.” तो म्हणाला.
प्राशिलाने मजहरला बोलावलं.
“ याला घरी सोडून ये.आपलं काम झालंय.” ती म्हणाली. सुटकेच्या भावनेने गंधारच्या डोळ्यात चमक आली.
“ गुड बाय मॅडम.” तिला हात जोडून तो म्हणाला. “ तुम्हालाही, मिस्टर चक्रपाणी, तुम्ही चांगल सहकार्य केलंत.”
“ गुड बाय.” मी त्याला हात हलवून निरोप दिला.
एक दिवस माझं काम झाल्यावर मी ही असाच घरी जाईन. माझ्या मनात आलं.
त्याला दिलेला हा शेवटचा निरोप नसेल ना? हे ही मनात आलं.
( प्रकरण २ समाप्त.)