Kaalchakra - Khand 1 - Part 1 in Marathi Fiction Stories by shabd_premi म श्री books and stories PDF | कालचक्र - खंड 1 - भाग 1

Featured Books
Categories
Share

कालचक्र - खंड 1 - भाग 1

आदित्य नार्वेकर, वय वर्षे पंचवीस. अभियांत्रिकी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण सुरू असणारा आणि सोबतच इतर गोष्टींमधे अग्रेसर असणारा एक बिंधास्त माणूस. संपूर्ण कॉलेजमध्ये सगळ्यांच्या परिचयाचे असलेले एकमेव व्यक्तिमत्त्व. आपल्या मेहनती, देखण्या आणि मनमिळावू स्वभावामुळे त्याने सगळीकडे स्वतःची ओळख निर्माण केली होती. ह्या साऱ्या गोष्टींमुळे कॉलेजमधल्या अनेक मुली त्याच्यावर जीव लाऊन असायच्या. त्यातल्याच एका प्रीती नावाच्या मुलीने आदित्यला प्रपोजही केले. आदित्यला प्रपोजेसची कधी कमतरता नव्हतीच. पण प्रीतीचा स्वभाव पाहता त्याला ती आवडलीही होती. त्यामुळे त्याने तिला होकार दिला. काही काळातच दोघांचीही जोडी पूर्ण कॉलेजमधे सगळ्यांच्या परिचयाची झाली. सगळ्यांना त्यांच्या नात्या बद्दल कळले होते. कॉलेजमध्ये चर्चा रंगू लागल्या. जसं जशी वेळ पुढे निघत गेली, तसं तसे त्यांचे नातेही घट्ट होऊ लागले. 

कॉलेजचे शेवटचे वर्ष होते आणि काही दिवसांतच कॅम्पस ड्राईव्ह सुरू होणार होते. एकंदरीत कॅम्पस आणि अभ्यास दोघांचीही तयारी जोरात सुरू झाली. आदित्यच्या घरचे त्याच्याबद्दल निवांतच होते. तो घरी त्यांना एकुलता एक असूनही त्याला दूर गावी शिकण्यास पाठवले. आणि त्यानेही सारं काही सुरळीतच सुरू ठेवले.

                अखेर ती वेळ आली. शेवटच्या वर्षीचे पेपर होण्या आधी सगळ्यांच्या हाती जॉब असणार होता. प्रीती आणि आदित्यने आपण एकाच ठिकाणी जॉईन होता यावं म्हणून प्रयत्नही केले. पण शेवटी त्यांच्या हाती ऑफर लेटर आले तेव्हा दोघेही थोडे नाराजच झाले होते. पण त्यात एक आनंदाची गोष्ट म्हणजे त्या दोघांना जॉब जरी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लागला असला तरी ते एकाच शहरात रहायला जाणार होते. त्यामुळे ते थोडे खुश होते.

कॉलेजमधे शेवटच्या परीक्षांना सुरुवात झाली. पाहता पाहता दोघांच्याही परीक्षा उत्तम रित्या पार पडल्या आणि पुढच्या पंधरा दिवसांच्या अंतराने त्यांनी कंपनीत जॉईन होण्यासाठी नव्या शहराकडे जाण्याची तयारी सुरू केली. 

 ठरल्या प्रमाणे आदित्यने नव्या शहरात पाऊल ठेवले. सर्व काही व्यवस्थित केले. सोबत राहणाऱ्यांची किट किट नको म्हणून त्याने एकटं रहायचं ठरवलं. तिकडे प्रीतीनेही आपलं ऑफिस जॉईन केलं होतं. तिचेही रोज ऑफिस जाणे सुरू झाले. आठवडी सुट्यांना दोघेही भेटत असत. आदित्यचीही रोज ऑफिसला जायला सुरुवात झाली होती. त्याला लागलेल्या नोकरीमुळे त्याच्या घरचेही खुश होते आणि हळू हळू नवीन शहरात त्याचे आयुष्यही स्थिर व्हायला सुरुवात झाली होती. नोकरीमुळे त्याला अनोळखी शहरात रहायला यावे लागले होते. कॉर्पोरेटर सेक्टर मधल्या एका नामवंत कंपनीत त्याला नोकरी लागली होती. जॉईन झाल्यानंतर सुरुवातीला ओळख नसल्याने आदित्यला कंटाळा येत असे. आपल्या मॅनेजर शिवाय त्याचा इतर कुणाशी जास्त संबंधही येत नसे. पण आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्याने इथेही आपला दबदबा, आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली. आणि काही वेळातच त्याचा पाच सहा मित्रांचा मिळून एक ग्रुप तयार झाला. कधी कंटाळा आल्यास विकेंडला सगळे मिळून प्लॅन बनवत आणि बाहेर फिरायला निघत. त्यानिमित्ताने प्रीतीची सगळ्यांशी ओळखही झाली. ऑफिसमध्ये लंच ब्रेकला सगळे सोबत जायला लागले. आदित्यला मित्र मिळाले आणि तसा त्याचा कामात रसही वाढू लागला. 

पुढे हळू हळू कामाच्या वाढत्या ताणामुळे आदित्य चांगलाच व्यस्त होऊ लागला होता. बिझी शेड्युल असल्याने दिवसभर ऑफिसमध्ये काम करून करून थकून जायचा. दररोज ऑफिसला शेअरिंगने जाणे सुरू झाले होते. त्याला कंटाळून काही वर्षातच आदित्यने घरच्यांच्या मदतीने आणि आपल्या पगारातून स्वतः साठी चार चाकी गाडी खरेदी केली. त्यामुळे आता त्याचे ऑफिसला निवांतपणे जाणे जाणे सुरू झाले. पण काही दिवसांनी त्याचाही त्याला कंटाळा येऊ लागला. कारण दिवसभराचा ताण त्यात रस्त्यात लागणारं ट्राफिक, सिग्नल्स सोबत गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न. यांमुळे सगळं काही जिव्हारी आल्या सारखं व्हायचं. घरी पोहचायला दोन-अडीच तास लागायचे. मग ऑफिस सुटल्यावर कधी कधी नेहमीच्या रस्त्याने घरी जायचाही त्याला कंटाळा वाटायचा. तो नेहमीचा रस्ता आता त्याला खूप डोके दु:खीचा वाटत होता. सगळ्यांची ऑफिस सुटण्याची वेळ सारखीच, त्यामुळे सगळे एकाच वेळी सिग्नलवर येऊन थांबायचे. घरी लवकर जाण्याची प्रत्येकालाच घाई. त्या चौकात गाडी सिग्नलला उभी असताना आदित्यला अचानक आठवलं की ऑफिसमध्ये गप्पा सुरु असताना कुणीतरी त्या चौकातून एक सरळ रस्ता जातो. तो जरा निवांत आणि शॉर्टकट आहे असं बोललं होतं, मग एक दिवस ऑफिस सुटल्यावर आदित्य रोजच्या रस्त्याने जाण्यापेक्षा शॉर्टकटने जाण्याचं ठरवतोच.

त्या दिवशी ऑफिस मधून सगळ्यांची रजा घेत आपल्या चारचाकी गाडीत बसून आदित्य समोरच्या सिग्नल वरून येऊन थांबला. आज चौकातून वळण न घेता गाडी समोरच्या रस्त्याने टाकायची म्हणून त्याने ठरवलेलं असतं. आणि काही सेकंदात सिग्नल सुटतो तसा आदित्य गाडी सरळ शॉर्टकट रस्त्याने घेतो. ह्या रस्त्याचा जास्त वापर होत नसल्याने रस्ता पूर्ण सामसूम  दिसत होता. मग आदित्यनेही गाडीची स्पीड चांगलीच वाढवली. रस्त्याने एखाद दुसऱ्या दुचाकी शिवाय इतर कुठलीही गाडी दिसत नव्हती. इतक्या दिवसांनी मोकळा रस्ता पाहून कंटाळलेला आदित्य आता गाडीचा वेग मंद करत हळू चालवायला लागतो. रोजची गर्दी आणि हॉर्नच्या आवाजापासून आपली झालेली सुटका पाहून आदित्यने आता आरामदायी तीसच्या स्पीडने गाडी चालवायला घेतली.

मागे पडत जाणारी झाडं पाहता पाहता काही वेळ निघून जातो आणि अचानक एक मोठा आवाज झाला. गाडीला काहीतरी झाल्याचं आदित्यच्या लक्षात येतं. गाडी थांबवून तो गाडीच्या बाहेर येतो. भोवताली वाराही मंद वाहत होता. वाऱ्याची झुळूकही अलगद अशी अंगाला स्पर्शून जात होती. जणू थोड्या वेळात पाऊस पडेल असा संकेत देत होती. आदित्य बाहेर येऊन गाडीला पाहतो तर त्याला समोरचं टायर पंचर दिसतं. आणि आदित्य थेट डोक्यालाच हात लावतो. या रस्त्याने येऊन जो विचार केला होता, त्याच्या विपरीतचं झालं होतं.

             

जवळपास कुणाची मदत मिळते का म्हणून आदित्य मागे पुढे पाहू लागला. दहा ते पंधरा मिनिटे उलटतात, पण कुणीच त्या रस्त्यावरून येत जाताना दिसलं नाही. त्यामुळे समोरच्या चौकापर्यंत जाऊन यावं, याशिवाय दुसरा पर्याय नसावा, असं आदित्यला वाटलं. आणि गाडी रस्त्याच्या कडेला लावून त्याने पायी चालायला सुरुवात केली. आजूबाजूची गर्द झाडी, रातकिड्यांची येणारे आवाज हे सारं भयानक वाटत होतं. सोबतच वाऱ्याचा वेगही आता थोडा वाढल्याची जाणीव होत होती. पाऊस येण्या आधी पंचर काढून निघता यावं या विचाराने पटपट पाय टाकायला आदित्यने सुरुवात केली.

  चौकापर्यंत पोहचायला थोडेच अंतर बाकी होते की डाव्या बाजूला, रस्त्याच्या कडेला कुणी व्यक्ती साधूंच्या वेषात बसून काहीतरी बडबडताना त्याला दिसले. त्यांचे डोळे बंद होते. त्यामुळे सुरुवातीला आदित्यने त्यांच्याकडे लक्ष देण्याचे टाळले. पण थोडं पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की कदाचित अजून दोन-चार किलोमीटर चालावं लागू शकतं म्हणून त्या साधू महाराजांना मदतीसाठी विचारायचं, असं आदित्यने ठरवलं. आणि आदित्य परत मागे वळला. त्या साधू महाराजांपाशी जाऊन आपले गुडघे खाली टेकवून आदित्यने त्यांना हाक मारायला सुरुवात केली. पण ते ध्यानस्थ बसलेले असावे म्हणून त्यांना ऐकायला जात नाही आहे, असे त्याला वाटले. आदित्यने  तीन-चार वेळा हाका मारल्या. पण तरीही समोरून काहीच प्रतिसाद मिळला नाही. आणि तेवढ्यात अचानक वातावरणात बदल होताना दिसून आले. वारे जोराने वहायला लागले. धूळ, कचरा, पालापाचोळा सगळीकडे उडायला लागला होता, घाबरलेला आदित्य त्या साधू महाराजांना परत एकदा आवाज देतो. आणि सोबत त्यांच्या हाताला तो हात लावून त्यांना हलवतो. पण हात लावताच आदित्यला अंगावर जणू वीजच कोसळली असावी असा जोरदार झटका बसला. आदित्य झटक्याने दोन-तीन पावलं मागे सरकला. आपल्या हाताला डाव्या हाताने आणि स्वतः ला सावरत तो रस्त्याच्या मधोमध येऊन बसला.

वाऱ्याचा वेगही आधीपेक्षा आता चांगलाच वाढला होता. उडालेल्या मातीच्या कणांमुळे आणि पालापाचोळयामुळे त्याला ते साधुही अस्पष्ट दिसत होते. जोराने वाहणारा वारा आता संथ गतीने वाहू लागला होता. आणि थोड्याच वेळात सगळं काही शांत झालं, आदित्यने समोर नजर टाकली. तर त्याला ते साधू महाराज कुठेच दिसले नाही. आदित्य घाबरला. त्यांना आजूबाजूला शोधायला लागला. पण ते कुठेच सापडत नव्हते. ते बसलेल्या जागेहून मागे काही अंतरावर चांगल्या उंचीची कंपाउंड भिंत होती. आणि आजूबाजूला वाढलेलं हिरवं गवत, पळायला कुठेच जागा नव्हती तर ते साधू महाराज गेले तर गेले कुठे. त्याला प्रश्न पडला होता. आदित्यने शेवटी त्यांना शोधणं थांबवलं आणि दुखापतीतून स्वतःला सावरत चौकाकडे चालायला लागला.  हळूहळू पावलं टाकत तो चौकापर्यंत पोहचला. तिथं पंचारवाल्याला शोधू लागतो. थोडं पुढे गेल्यावर जवळच त्याला एक पंचरवाला दिसला. त्याला विनंती करून त्याचीच गाडी घेऊन आदित्य त्याच्यासोबत गाडीजवळ आला. पंचरवल्याने गाडीचं पंचर काढायला सुरुवात केली, तेवढ्यात आदित्य त्याला त्या साधू महाराजांबद्दल विचारणा करतो.

आदित्य:- तुम्ही इथे या रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या साधू महाराजांना कधी पाहिलंय का ?

तो:- (विचार करून )नाही तर, कधीच नाही! या रस्त्याने कुणी येत नाही ओ जास्त. तुम्हीच कसे आलात तेच कळत नाहीये मला.

आदित्य:- काही नाही आज थोडं शांततेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होतो. 

टायरचं पंचर काढून त्यात सापडलेले काही खिळे दाखवत पंचरवाला म्हणतो.

तो:- बघा साहेब हे खिळे, ह्यांच्यामुळे तुमची शांतता भंग झाली.

पंचरवाल्याने गाडीचे टायर परत बसवले. झालेल्या कामाचे आदित्यने  त्याला पैसे दिले, आणि तेवढ्यात पैसे देताना आदित्यच्या उजव्या हातावरची व्रण पडल्यासारखी एक खूण त्याला दिसली, ती पाहून आदित्यला म्हणतो,

तो:- साहेब मस्त गोंदलंय ओ, मस्त दिसतंय.

हे ऐकून आदित्यने हातावर बघितले, तो थोडा चक्रावलाच, त्यालाही कळत नव्हतं की ही खून आपल्या हातावर कधी आले ते. आदित्यने त्याला हो हो करत पैसे दिले आणि हात झाकून घेतला, सोबतच हाताला होणारी दुखापतही आता थोडी कमी झालेली त्याला जाणवली. 

आदित्य गाडीत बसला आणि घराकडे निघाला. आजच्या घडलेल्या प्रकाराने आदित्य जरा धास्तावला होता. 

 आदित्यने मनोमनी परत ह्या मार्गाने न जाण्याचं ठरवलं. रात्रीचे नऊ वाजले होते. हाताची दुखापतही जवळजवळ नाहीशीच झाली होती. हातावर पंजाच्या थोडं वर थोडा पुसट असा मोठा व्रण तयार झाला होता.  सुबक अशी आकृती असलेला तो व्रण पाहून हातावर जणू टॅटू काढला असावा असेच वाटायचे. आदित्यने त्याला पुसायाचा प्रयत्न केला पण तरीही तो पुसल्या गेला नाही. शेवटी प्रयत्न करून करून थकल्यावर आदित्यने गादिला पाठ टेकवली. आणि दिवसभरातल्या घडलेल्या गोष्टींनी मान वर केली. एक एक करून साऱ्या गोष्टी समोर येत होत्या. संध्याकाळी हातावर आलेला व्रण अचानक डोळ्यांसमोर आला. त्याला काढण्यासाठी उद्या काहीतरी करावं लागेल. असं मनोमनी ठरवून झालं पण व्रण दिसताना सुबक आणि मोठा दिसत होता. मधेच तो तसाच हातावर ठेवावा असाही विचार डोक्यात डोकावून गेला होता. दिवसभर झालेल्या साऱ्या गोष्टींची उजळणी आणि उद्या करावयाच्या कामांची यादी बनवून काही वेळात आदित्य झोपी गेला.



लेखक मयुर बेलोकार

पुणे

कालचक्र खंड १ भाग 1१