दुसरा दिवस उजाडला. तयारी करून नऊच्या सुमारास आदित्य ऑफिसला निघतो. ऑफिसला पोहचेपर्यंत वेळ झाल्याने नेहमीसारखे आपले काम करत सगळे आपापल्या जागी बसलेले दिसतात. ऑफिसमध्ये प्रीतीला जॉईन होऊन काहीच दिवस झाले होते. सगळ्यांना आदित्य आणि प्रीतीबद्दल जाणीव होतीच. पुढे लग्नच करणार आहोत. इथवर साऱ्यांना सांगून झालं होतं. सगळं काही सुरळीत सुरू असतं. दुपारी एकच्या दरम्यान लंच ब्रेक होतो. आदित्य आणि त्याचे सहकारी एकत्र जेवायला बसतात. आदित्य आपल्या शर्टच्या दोन्ही बाह्या वर करून जेवायला सुरुवात करतोच की जेवताना अचानक हातावरच्या टॅटू सदृश्य व्रणावर प्रीतीची नजर पडली. तो पाहून प्रीती आदित्यला म्हणते.
प्रीती: अरे वा !!! आदित्य, मस्त गोंदलय रे.
आपल्या हाताकडे प्रीतीची नजर गेलेली पाहून आदित्य म्हणतो.
आदित्य: कुठे? गोंदत वगैरे मी नसतोच. पण माझ्या हातावर हा व्रण असा कुठून आलाय कुणास ठाऊक.
प्रीती : कुठूनही का आला असे ना, पण छान दिसतोय. असू दे त्याला. काढू नकोस आता.
आदित्यः काल रात्री मी झोपणार तोवर हा खूप पुसट होता. पण आज चांगलाच मोठा झालाय आणि गडदही.
यश : पण मस्त दिसतोय तो, मी पण असंच काहीतरी गोंदायचा विचार करतोय.
आदित्य : हो कर कशातही माझी नक्कल कर आणि ह्यातही कर.
सगळेच हसतात आणि जेवण उरकत एक एक करून आपापल्या जागी जाऊन बसतात. आदित्यही आपल्या डेस्कवर जाऊन बसला. आपल्या हातावरचा व्रण मिटवण्याचा त्याने परत प्रयत्न केला. पण त्याला त्रास होण्याशिवाय दुसरे काहीच झाले नाही. त्यामुळे प्रयत्न बंद करणे भाग होते. संध्याकाळी ऑफिस संपत आणि आदित्य घरी जाऊन व्रणाबाबत विचार करीत रात्र घालवतो.
तिसरा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे आदित्य ऑफिसला निघतो. ऑफिसमध्ये हसत खेळत सगळ्यांची कामे चाललेली असतात. आदित्य सगळ्यांना हाय, हॅलो करत आश्लेषा पाशी पोहचतो. तिला पाहून आज तिचा मुड थोडा वेगळाच वाटत होता. ती आल्यापासूनच सगळ्यांना चीड-चीड करताना दिसत होती. कुणाला न बरोबर उत्तर देणार ना कुणाशी नीट बोलणार. जणू आज मॅनेजर तिच्यावर कालच्या पेंडींग राहिलेल्या कामामुळे ओरडला असावा. म्हणून तिचा मूड खराब झाला असेल. असा आदित्यने अंदाज लावला. पण तिच्या चेहऱ्यावरचे रंग आज पार बदलून गेलेले दिसत होते. यापूर्वी सुद्धा बऱ्याचदा कामावरून तिची चीड-चीड झाली होती. पण आज तिचे हाव भाव पार बदललेले दिसून येत होते. आदित्यने तिच्याकडे पाहिले आणि आपला कॉफीचा मग हाती घेत आपल्या डेस्क वर जाऊन बसला. कामाला सुरुवात झाली. काही वेळाने दुपारचा लंच ब्रेक झाला. आदित्य, आश्लेषा, देवेन, ईशा, प्रीती, तेजस, यश, अरिंजय आणि सागरिका ठरल्याप्रमाणे एका टेबलवर येऊन आपापले जेवण सुरू करतात. आदित्यही आपला डबा उघडतोच की त्याच्या उजव्या हातावरचा व्रण अचानक दुखायला लागतो. ते दुखणे कुणालाही न सांगता, न दाखवता तो डबा उघडतो. डबा फिट बसला असावा म्हणून थोडा जास्त जोर लावताना त्रास झाला असे भासवतो. हळू हळू एकमेकांना घास भरवत जेवण सुरू झाले. आश्लेषाने तिचा उपवास असल्याने सोबत काही फळं आणली होती. त्यातल्या सफरचंदाचे लहान लहान पिसेस करून तिने सर्वांना भरवायला सुरूवात केली. तिच्या समोरच प्रीती बसलेली होती, अचानक आश्लेषा हातातल्या चाकूकडे टक लावून पाहत असल्याचे प्रीतीच्या लक्षात आले. कारण प्रीतीला ती आता पिसेस भरवणार होती. पण आश्लेषाचे असे टक लावून पाहत राहणे प्रीतीला थोडे विचित्र वाटले. प्रीती तिला हाका मारते पण त्या हाकांनाही आश्लेषाने काहीच उत्तर दिले नाही. हे आजूबाजूला बसलेल्या सगळ्यांच्याच लक्षात आले. सगळ्यांच्या नजरा आश्लेषाकडे वळल्या. आश्लेषा अचानक उभी राहिली. तिचे काय चाललेय हे कळायच्या आतच आश्लेषाने हातातला चाकू स्वतःच्या पोटात एकदम खुपसला. तिच्या हातात एवढा जोर कसा आला हे देव जाणे. शेजारी टेबलवर बसलेल्या मुली एकदम किंचाळल्या, तिचे असे रूप पाहून सगळेच घाबरले. सोबत तिकडे आदित्यचा दुखणारा हातही त्याला काही सुचू देत नव्हता आणि इकडे तिचे पोटात वारंवार चाकू खुपसणे सुरूच होते. आजूबाजूच्या लोकांनाही एकदमच शॉक बसला. जवळजवळ आदित्यच्या हाताचे दुखणेही आता थोडे कमी व्हायला लागलेल असते. सगळेजण उभे राहून ते भयानक चित्र पाहत होते. आश्लेषाच्या तोंडून काही शब्द एकायला येतात. 'तुला मरावे लागेल, तुला मरावे लागेल' तिचे जोरजोरात किंचाळणे सुरू असते. तेजस तिच्यापाशी गेला आणि जमिनीवर कोसळण्याआधी तिला सावरलं. आश्लेषा तिथेच दम तोडते. ईशा आणि इतर सगळेच शॉकमध्ये जातात. झालेला प्रकार हा सर्वांच्या समजण्यापलीकडचा होता. कुणी अशाप्रकारे आपले जीवन संपवेल याचा कुणालाच अंदाज नव्हता. प्रीतीतर चक्कर येऊन पडायची राहिली होती. आदित्य स्वतःला सावरत तिलाही सावरतो. टॅटूचे दुखणे आता बंद झाले होते. सगळे जण स्तब्ध राहतात. कुणाच्याच तोंडून एक शब्दही फुटेना. आपापल्या जागी जाऊनही प्रीती आणि ईशाचे रडणे सुरूच होते. त्या दोघी अजूनही थोड्या घाबरलेल्याच होत्या. सागरिकाने तेवढे
स्वतः ला सावरले होते आणि ऑफिसमधील इतर लोकही त्यांना धीर देत होते. ऑफिस सुटण्याची वेळ झालीच होती की पोलिस आले आणि सगळ्यांची चौकशी करायला सुरुवात केली. त्यातुन मॅनेजर आणि आश्लेषामध्ये काहीच झाले नसल्याचे सगळ्यांना कळून आले. काही वेळाने इन्स्पेक्टर आदित्यपाशी आला. त्याला पाहुन आदित्याला त्याच्या सारख्याच दिसणाऱ्या मित्राची आठवण झाली. त्याने त्याचे नाव
वाचले असता खात्री झाली. आदित्याने इन्स्पेक्टर जयेशला आपली ओळख सांगितली. जयेशनेही त्याला ओळखले. जयेश आदित्यच्या गावचाच मित्र निघाला. आदित्याने घटनेची पूर्ण माहिती जयेशच्या कानावर टाकली. जयेशने जबाब नोंदवून घेत उरलेल्या इतर लोकांकडे वळला. कार्यवाही पूर्ण होता होता बराच उशिर झाला होता. पोलीस आश्लेषचा मृतदेह तेथुन घेऊन जातात. आदित्यनेही सगळ्यांची रजा घेत घरी जाण्याची तयारी केली. तासाभराच्या प्रवासानंतर आदित्य घरी पोहोचतो आणि जेवण आटोपून झोपण्याची तयारी करतो.
परवा घडलेली घटना विसरायला होत नाहीच की आज आश्लेशा सोबत झालेली घटना त्याची झोपमोड करत होती. वारंवार हातावरचा व्रण आणि आश्लेशाचं मरण डोळ्यांसमोर येत होतं. आदित्यने बराच वेळ कुस बदलून पाहिली. झोप येईना. तास दोन तासांनी मन कसेबसे शांत झाले आणि आदित्य एकदाचा झोपी गेला.
*सदर कथेवर पुस्तक प्रकाशीत असून हवे असल्यास कळवावे
मयुर बेलोकार
कालचक्र खंड 1 भाग 2