Jeetwan fled - Part 6 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | जितवण पळाले- भाग 6

Featured Books
Categories
Share

जितवण पळाले- भाग 6

           बेलदारांकडे नेमस्त हांडी भांडी. दिवसाडी  पुरेल इतकं  पाणी  न्यायला  लागणारी  आयदणं नव्हती. पाणी संपलं की  तळावर माघारी  जावून पाणी आणण्यात घंटाभर  सहज मोडायचा.  यावर काय तोडगा काढायचा ? याचा विचार करीत असता  कोणाला तरी  विहीर मारायची युक्ती सुचली. नाहीतरी  भर घालायला डेगा खणायला लागत असे. तेच खणकाम एका जाग्याला केलं तर सहज दहा वीस हात डबरा मारता येईल , हा विचार सगळ्यानाच पटला.त्या दिवशी  मल्लूचा पाव्हणा आलेला होता. तो पाणक्या आहे हे कळल्यावर बेलदारानी  त्याला गळ घातली, दुसरे दिवशी तो काम सुरू होते त्या जाग्याला आला. तो  दोन हातांची ओंजळ करून त्यावर नारळ ठेवून त्या भागात फिरला. त्याचे ते पाणी आखायचे शास्त्र होते म्हणे. पाण्याचा साठा असलेल्या  जाग्याला आल्यावर हातातला नारळ गोल गोल फिरायला लागला. पाव्हण्याने त्या जागेवर खुंटी ठोकली आणि सांगितले, “ह्या जाग्याला  बारा हातावर बक्कळ पानी  मिळंल..... चार रोजान  येकादस लागती बगा त्या रोजाला  कामाचा  म्हुरत करा   आनी  पानी खरं झाल्यावर  यल्लम्माच्या नावानं बकरं  तोडून निवद करा........” जाणत्यानी   त्या ठिकाणी खुणेसाठी  दगडाची  रास डाळून ठेवली. 

        मुहुर्ताच्या दिवशी  सगळ्या  जमातीने बाकीची कामं थांबवून दोन चार रोजात शिकस्त करून विहीर  पाडायचा चंग बांधलेला. सकाळीच हत्यारं घेवून बेलदार सुटले. सगळेजण   पाणक्याने  खुंटी  ठोकून आखून दिलेल्या   जागेकडे  आले. खुणेसाठी  डाळलेली  दगडाची रास उमगली. पण पाणक्याने   ठोकलेली खुंटी काही उमगेना. बेलदार चितागती झाले.....  ‘ह्ये अजाबच झालं म्हना की....... ईतभार  खोल ठोकल्याली  खुट्टी  कुटं आनी नायशी  झाली म्हनावं......? गेल्या चार रोजात हिकड  कोन आनूस का मानूस फिरल्यालं न्हाई आनी खुट्टी कस्काय गायब झाली......? माणसं चिंतेत पडली. जाणत्यानी विचार केला  की खुंटी  नाही उमगली तरी त्याच्या बाजुलाच  खुणेसाठी   दगडाची उतरंड आपण रचली   ती तर शाबूत  आहे.......  त्याच्या भोवारी  सात हात  लांबीच्या  मापाने  रिंगण आखून बेलदारानी  खणकाम सुरु केले. शे सवाशे माणसांची जमात जीव तोडून कामाला लागली. दोन हातावर   कडक  मुरूम लागला.   दहा रोजात  बारा हात डबरा मारून पुरा झाला  पण पाण्याचा  काही मागमूस दिसेना. तरीही  नेट धरून  पंधरा हात डबरा पुरा झाल्यावर मात्र  त्यांचं  अवसान संपलं......त्यानी काम बंद केलं. 

            आलेला   पाणक्या  तर खात्रीचा होता. त्याला   खूप  लांब लांबून आवतणं  येत..... त्याने आखलेली   बावडी  फेल गेली    असं कधी   झालेलं नव्हतं....   एक मात्र खरं  की त्याने मारलेली खुंटी   सोडाच   पण खुणेच्या   जाग्याला   जमिनीत   खोच सुद्धा उमगली   नव्हती. मग शोध चौकश्या  सुरू झाल्या.  गावदेवी जुगाईला कौल लावला. देवी  म्हणाली की, ही  पांढर माझी..... मला  हाकही न मारता  तुम्ही  काम सुरू केलंत....   माझा कोप झाला नी  तुमचे कष्ट वाया गेले.  मात्र  त्यावर काय उपाय करायचा  याचा काही खुलासा  देवी करीना. तसं सांगणं करून लावलेला कौल च गळून पडे. आजूबाजूच्या गावानी थळांवरही कौल प्रसाद घेवून बघितले पण पुढचा मार्ग कोणीच सांगेना. बेलदार खट्टू झाले. विहीरीचा विषयच  मागे पडला. 

        पंधरा वीस रोजानी  काम सुरु असताना   एका बाईला  पायाखालचं झालं....... म्हणजे  फुरशाचा दंश झाला..... कोकणात  सापाचं नाव न घेता  त्याचा उल्लेख “थोरला”  म्हणून   करतात. तसेच विषारी  जीवाणूचा  दंश झाला  तर  तसे म्हणने टाळून त्याला “काटा लागला ” किंवा   “पायाखालचे झाले ” असे म्हणायची प्रथा आहे. फुरसं  दंश करून उलटं फिरलं  म्हणताना  बाई बचावणं   मुष्किल होतं. त्यांचा कालवा ऐकून  वाटेने जाणारे  कोंड सखलातले  बापये  पुढे आले. त्यानी  माहिती दिली की . इथून मावळत  धनगरांचे मांगर आहेत. तिथला नाऊ  धनगर वैदगिरी  नी देवर्षीपणा करतो. तो  दंशकऱ्यावर  उपचार पण  करतो. तुम्ही वेळ न दवडता धनगर वाडी गाठा. 

          फैलातला  जीवा बेलदार दांडगा दुंडगा ...त्याने बाईला पाठूंगळीला घेतली. जाणते  धनगरवाडीच्या दिशेने निघाले. अर्धा कलाक चाल मारल्यावर  उलाल  छपरांचे धनगरांचे मांगर  दिसायला लागले. मांगराची  छप्परं एवढी  उभी  शूळ  की शाकारणी करणारांचे पाय क्से काय थोपले असतील याचं बेलदाराना आश्चर्यच वाटलं. वाडीच्या  शेवटाला  नाऊचा मांगर होता. मंडळी  मांगरात शिरली  तेंव्हा  ओटीवर दहा बारा मंडळी   देवपण शोधायला थांबलेली होती. ओसरीवर  मंडपी खाली  चौरंगावर  देवांचे टाक हारीने मांडलेले होते नी समोर अंथरलेल्या घोंगड्यावर  वीरासन घालून बसलेला नाऊ  'हुं ऽऽ हुं 'आवाज काढीत कुदत होता. भक्तांपैकी कोणीतरी खुलासा केला की नाऊच्या कुडीत  देवाचा संचार झालेला आहे. बेलदारानी  डोईचे पटके काढून  भक्तीभावाने  माथा टेकला. पृच्छकाला  तोडगा सांगितल्यावर देवाने कुड सोडली नी नाऊ धाडकन्  आडवा झाला. मिनीटभराने सावध झाल्यावर डोकीच गलप   सोडून   नाऊ बाजुला सरकला.  वडारणीला बघताक्षणीच काय प्रकार आहे  हे नाऊने ओळखले.  चौरंगावर  पानाच्या खोलप्यात  ठेवलेल्या पिंजरीत बोटे बुडवून त्याने वडारणीच्या माथ्यावर टेकवली   नी  “ म्यां आसूद घिवून यीस्तोवर दम धरा.... घाबरायच कारण न्हाय ....  म्या   तुला  वाचिवतो...... ” असं म्हणून नाऊ  बाहेर पडला.    (क्रमश: )