सहामाही परीक्षा येऊ घातल्या होत्या. सुनी आणि मी अभ्यासाला लागलो होतो. Time table मिळाले तसे सुनी आणि मी गडप झालो. दोघे आपल्या आपल्या घरी अभ्यासात बुडालो. ह्यावेळी माझा आलेख मला चढता ठेवायचा होता. त्यामुळे मी शाळेतून आलो कि अभ्यासात असायचो.. सुनी आणि माझी धावती भेट व्हायची.
तिने मला सांगून ठेवलं होतं.
"जाडू मन लावून अभ्यास कर हा.. यावेळी आणखी पुढे यायला हवाय तू."
बस एवढं प्रोत्साहन मला पुरे होतं. बीजगणित आणि भूमिती दोघे माझे मित्र झाले होते तर, इंग्लिश माझं विना अभ्यास चांगलं होतं. व्याकरण करुन गेलं कि पुरे व्हायचं. विज्ञान आणि समाजशास्त्र सोबती होते.. कारण नुसतीच वर्तमानपत्र नाही तर वैज्ञानिक मासिके.. जगाच्या भूगोलाची अचंबित करणारी माहिती असणारे encyclopedia, हे वाचणाची मला आधीपासून आवड असल्यामुळे भूगोल मला फार त्रासदायक नव्हता. उलटं वाजवीपेक्षा जास्त्त माहिती मी डोक्यात भरून घेतली होती. इतिहास मी गोष्टींसारखा वाचायचो. नागरिकशास्त्रासाठी पाठांतर आणि नीट समजून घेणे या गोष्टी मी मन लावून करत होतो. संस्कृतसाठी मी क्लास मधले मार्गदर्शन मन लावून घेतले होते. माझा आत्मविश्वास माझ्या श्वासाश्वासातून वाहत होता.
शाळेत हल्ली सचिन सुनिकडे जवळजवळ रोज येताना दिसतं होता. पण मी दुर्लक्ष करत होतो. मला सुनीने सांगितलेलं आणि स्वतःला पटलेलं करायचं होतं. शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी पण त्याने चक्कर मारलेली मी पाहिली होती. सुनी त्याला अभ्यासात मदत करत असणार. हे वाटून मी माझं काम करत होतो...झालं. परीक्षा सुरु झाल्या. एकेक पेपर उरकत उरकत आले. त्या दिवसात सुनी आणि मी फक्त all the best पुरतंच बोललो. ती स्वतःच्या अभ्यासात आणि इतरांचे डाऊट क्लिअर करण्यात मग्न असायची. मी माझा एकीकडे असायचो.
पेपर झाल्यावर चर्चा करायला सुद्धा थांबत नव्हतो. सुनी कसा गेला एवढंच विचारायची. मी शांतपणे छान एवढंच म्हणायचो. मला माझा नाही तर माझ्या यशाचा आवाज तीला ऐकवावा वाटत होता. शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर संपला. मी बाहेर आलो.
समोर सुनी, पल्लवी, स्नेहा आणि सचिन प्रश्नपत्रिका घेऊन हे चूक ते बरोबर असं चर्चीत उभे होते. मला येताना पाहून सुनीने हाक मारली. मी गेलो.
" काय रे कसा होता पेपर? " तिने विचारले.
" कसा असणार..? त्याच्यासारखाच गोल भोपळ्या मार्कांचा? " सचिन म्हणाला.
पल्लवी आणि स्नेहा खिदळल्या.
" गप रे सचिन. " सुनी म्हणाली.
" अगं.. तुझ्या मदतीने माझे मार्क्स तर नक्की वाढणार याची मला खात्री आहे. पण त्याने नेहमी घेतो तशी मदत घेतली नाहीये तुझी. काय होणारे? तो म्हणाला.
" तो कधीच मदत घेत नाही माझी..आणि या वेळी तर साहेबांचा काही वेगळाच प्लॅन आहे. " सुनी म्हणाली.
" सुने.. मी पेपर झाल्यावर कधीतरी त्याबद्दल चर्चा केलीये का? Result येईल तेव्हा पाहू. बरं!! ते मरू दे.. यावेळी लक्ष्मीपूजनानंतर मामाकडे चाललोय.. तू येतीयेस सोबत..बरं का. " मी सचिनसमोर म्हणालो.
" उम्म्म.. अरे यावेळी नाहीये शक्य.. सचिनने सुट्टीसाठी एक शिबीर सुचवलंय. रोज संध्याकाळी असणारे. आत्मसंरक्षण, लाठी काठी चालवणे आणि व्यायाम घेणारेत.मला आवड आहे असलं काही तरी करायची. तू येतोस का? " ती म्हणाली.
"अगं. त्याला काय गरज आहे? तू शिकतीयेस की. त्याचं सरक्षण आपोआप होईल. असं पण त्याला झेपणार नाही ते. चांगली चपळ तब्येत लागते त्याला." तो परत पचकला आणि त्या दोघी खिदळल्या.
" ए सचिन नको चिडवू त्याला. गमतीने बोलतोय रे तो जाडू. " सुनी हसत म्हणाली.
"चल सुनी येतो मी. चालू देत .. गम्मत. " असं म्हणून मी तिथून निघालो.
मला आश्चर्य त्याच्या बोलण्याचं नव्हतं वाटत. तर सुनीच्या समोर बोलण्याचं वाटत होतं. तिनेक आठवड्यामध्ये सुनीत जरा बदल होता. हलका का होईना. मला वाटतंय तिने माझ्याबाबतीतला बालिशपणा कमी केला होता. ती जरा पुढे सरकली होती. हलकी बेपर्वा झाली होती. मग माझंही सरकणं अपेक्षित होतं का?..
नाही.. माझ्यातला मी तिच्यासाठी तसाच ठेवणार होतो. तीला तो हवा असणार होता.. कधीतरी. पण बाकी जगासाठी? मी बदलणार नक्की.. स्वतःशी ठरवत मी सुनीचा निरोप घेतला. पुढल्या तीन आठवड्यात मी सुनीला दोनदा भेटलो. दिवाळीच्या दिवशी आणि मामाकडे जाताना.
🍁🍁🍁🍁
दिवाळीची सुट्टी संपली. शाळेचा पहिला दिवस. मी शाळेतच आलो सरळ. सुनीने दिवाळीत सायकल घेतली होती. ती सायकवर आली होती. तिने वर्गात बघून मला मोठी smile दिली आणि हात केला. तिच्या जागेवर येऊन बसली. आमचे वर्गशिक्षक आले. सोबत results ची चळत त्यांनी आणली होती. सगळे टाळ्या पिटू लागले.
" चला शांत व्हा!" काही वेळाने सर म्हणाले.
" तर.. सर्वानी पेपर छान लिहिलेत. नापास कोणीही नाहीये. आनंद वाटला अतिशय. सगळ्यांना मी नावानीशी बोलावून निकाल देतो. पण तत्पूर्वी. मला पहिली आलेली तीन मुले जाहीर करायची आहेत. तुम्ही त्यांच्याकडे पाहून प्रेरणा घेऊन यश मिळवावे असं मला वाटतं. तर नंबर तीन -
समर विजय शिंदे.
टाळ्या झाल्या. समर तीन नंबर वर आला होता.
"नंबर दोन- सगळे उत्सुकतेने ऐकू लागले. दोन नंबरवर कोणी बाजी मारली. सुनीच्या मागे अचानक कोण चमकलं होतं. समर माझ्याकडे पहात होता. मला जाणवलं.
"सुनेत्रा दयानंद शेळके. " सरांनी नाव पुकारलं. सगळे शॉक झाले होते. सुनी एक नंबर खाली घसरली. होती. सगळ्यांमध्ये थोडी बडबड सुरु झाली. असं कधीच झालं नव्हतं. सुनी result घेऊन आली. गोंधळ उडालेल्या टाळ्यांचा आवाज तितका दमदार नव्हता.
"अ तुकडी मधूनच शाळेत पहिला येणारा विद्यार्थी दरवर्षी आम्हाला दिसतो. पण यावेळी सगळ्या शिरस्त्याला धक्का देत ब तुकडीत नव्याने आलेल्या विद्यार्थ्याने यश मिळवलं आहे." सर म्हणाले आणि..
मी result हातात घेतला होता. अ तुकडीतल्या रामदास देशपांडे ला दोन टक्क्यानी मागे टाकत मी आमच्या इयत्तेत पहिला आलो होतो. सुनी सगळ्यात जास्त टाळ्या पिटत होती. समर आणि सचिन खजिल झाले होते. मी सुनीच्या छायेखाली नाही तर एक स्वतंत्र घटक आहे आणि मनात आणलं तर काहीही खेचून आणण्याची ताकत सुद्धा ठेऊन आहे, असा एक शांत संदेश मी त्यांना दिला होता.
वर्गात माझं सगळे कौतुक करत होते. ब तुकडीचा विद्यार्थी टॉपर निघाला होता. सुनी आणि मी त्यादिवशी एकत्र डबा खाल्ला. तीला आभाळं ठेंगण झालं होतं
जाडू बोललेले ना मी तू खूप पुढं जाशील. मी काहीच नाहीये तुझ्यासमोर. " ती म्हणाली. तिच्या त्या दोन मैत्रिणीपण मधेच एकमेकींकडे बघत आणि नजर खाली पाडून जेवत होत्या.
" असं काही नाही सुने. थोडा आळस झटकला यावेळी तू सांगितलंस म्हणून जमवलं." मी म्हणालो.
" म्हणजे तू अभ्यास नाही केलास?" पल्लवी म्हणाली.
" अगं वेडे त्याचं वर्गात नीट लक्ष असतं. थोड्या अभ्यासात पण पुरे होतं त्याला त्यामुळे तो मार्क्स पाडू शकतो.. आपल्यासारखं डोकं खपवावं नाही लागत त्याला. तुम्ही काहीच ओळखत नाही त्याला. " सुनी त्यांना समजवत बोलली.
आजचा दिवस माझा होता. मला प्राचार्यानी पण बोलावून शाबासकी दिली.
अ तुकडीतले तीनचार जणं मला दुपारच्या सुट्टीत जेवणानंतर येऊन भेटले. रामदास ने माझं मन भरून कौतुक केलं. एकत्र कधीतरी अभ्यास करण्याची ईच्छा दाखवली. मला तो आवडला. माझ्या यशामुळे मला आता शाळेत सुनीचा मित्र म्हणून नाही तर, टॉपर म्हणून ओळखू लागले होते.
सुनीने घरी जाताना तिच्या सायकल वर लिफ्ट दिली. तिथे सचिन जळफळाट करत आला आणि म्हणाला,
"अगं सायकल वाकेल याला बसवून मागे."
"मग आमचे मार्क्स आहेतच तेवढे वजनदार. वाकू देत वाकली तर." सुनी त्याला म्हणाली.
तरी पण अजून बदल घडणं अपेक्षित होतं. जे मी घडवणार होतो. ही तर फक्त सुरुवात होती. सचिन काय किंवा कोणी काय माझ्या जीवावर मी त्यांचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन बदलायला लावणार होतो. त्यात मला सुनीची मदत नको होती. सध्यातरी हा बदल मला आवडला होता. सुनीही खुश होती. अजून काय हवं होतं?
🍁🍁🍁🍁
"राखून वागणं माझं जगासाठी आहे
तुझ्यासाठी नाही.
तुझ्यावर उधळण्यासाठी माझं स्वत्व आहे
जगासाठी नाही."
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁