Murder Weapon - 18 - Last Part in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | मर्डर वेपन - प्रकरण 18 - शेवटचे प्रकरण

Featured Books
  • মহাভারতের কাহিনি – পর্ব 120

    মহাভারতের কাহিনি – পর্ব-১২০ দশম দিনের যুদ্ধে ভীষ্মের পতনের ক...

  • জঙ্গলের প্রহরী - 5

    জঙ্গলের প্রহরীপর্ব - ৫- "এটা একটা গল্প মিঃ রায়। মিথ বলতে পা...

  • Forced Marriage - 1

    শ্বেতার মনে হয়, পৃথিবীর সব থেকে বিষাক্ত বিষের থেকেও তার বসের...

  • অন্তর্হিত ছায়া

    কলমে :- সূর্য্যোদয় রায়   পর্ব১:  নিরুদ্দেশের নোটবুক কলকাতা...

  • ঝরাপাতা - 2

    ঝরাপাতাপর্ব - ২পিউর বুদ্ধিতে গোপার সঙ্গে কথা বলতে যাওয়ার আগ...

Categories
Share

मर्डर वेपन - प्रकरण 18 - शेवटचे प्रकरण

प्रकरण १८ ( शेवटचे)
दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्ट सुरु झालं.
“ पटवर्धन यांच्या विनंतीनुसार कोर्टाने मिसेस मिर्लेकारांना समन्स काढलंय आणि त्या कोर्टात हजर आहेत. ” न्यायाधीश म्हणाले. “ तुम्ही तुमचं काम चालू करा पुढे,मिस्टर पटवर्धन.”
पाणिनी उठून उभा राहिला. “मी काल म्हणालो होतो की मला मिसेस मिर्लेकारांची साक्ष घ्यायची आहे, पण त्यापूर्वी मी आधी कालचे निवेदन पूर्ण करतो.आणि मग साक्षीला सुरुवात करतो.” पाणिनी म्हणाला.
“ तर,युअर ऑनर, खून मिर्लेकरने केला नसला तरी तो त्याच्या अशा साथीदाराने केला आहे की जो खून करण्यावाचून त्या व्यक्तीला गत्यंतरच नव्हते. किंबहुदा ती व्यक्ती खून करेल या अटीवरच मिर्लेकर रायबागीच्या ऑफिसात मोठा अपहार करायला तयार झाला. अर्थात या खुनाला ही साथीदार व्यक्ती जेवढी जबाबदार आहे तेवढीच सूज्ञा आणि मिर्लेकर जबाबदार आहेत. युअर ऑनर, हा खटला म्हणजे अनेक घटस्फोटांच आणि तो मागणाऱ्या स्त्रियांसाठी तात्पुरत्या निवासाची सोय करणाऱ्या उदगीकर नामक माणसाच,अजब मिश्रण आहे.सूज्ञा पालकर, मैथिली या दोघी उदगीकरच्याच आउट हाउस मधे राहिल्या तिथेच त्यांची हिमांगी उदगीकरशी मैत्री झाली.या मधे सुरुवातीला समोर न आलेलं आणखी एक नाव म्हणजे मिसेस मिर्लेकर!
आणि मिसेस मिर्लेकर म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून मृगा गोमेद आहे!!
सूज्ञा पालकरने आपण रती आहोत असं भासवून माझ्या ऑफिसात जेव्हा मर्डर वेपन असलेली रतीची बॅग ठेवली. मी त्यातल्या वस्तू तपासल्या तेव्हा त्यात रतीच्या ड्रायव्हिंग लायसेन्स वर मला केरशी,विलासपूर असा पत्ता दिसला. तेव्हा कनक ओजस कडून मी माझ्या ऑफिसच्या इमारती जवळच्या पार्किंग मधे विलासपूर चं रजिस्ट्रेशन असलेल्या कोणत्या गाड्या आहेत ते शोधायला सांगितलं.ते पार्किंग पेड पार्किंग आहे.तिथे विलासपूर रजिस्ट्रेशन असलेल्या दोन गाड्या होत्या एक होती उत्क्रांत उदगीकरची आणि दुसरी UP AT २०५ या नंबरची होती ती मृगा गोमेद ची. रती म्हणून माझ्या ऑफिसात आलेली सूज्ञा पालकरच होती. ती मृगाच्याच गाडीतून आली होती. मृगा गोमेद ने पद्मराग रायबागी ला मारल्यावर मर्डर वेपन सूज्ञा कडे दिले. ते सूज्ञाने रतीच्या बॅगेत टाकून माझ्या ऑफिसात बॅग टाकली.” पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे मिर्लेकर, मृगा गोमेद उर्फ मिसेस मिर्लेकर, आणि सूज्ञा एकत्रच काम करत होत्या?” न्यायाधीशांनी विचारलं.
“ हो.कणाद मिर्लेकर आणि सूज्ञा पालकर यांच्या मधे बरेच महिने प्रेमप्रकरण चालू होतं.मिर्लेकर आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ इच्छित होता. ती यासाठी तयार झाली. तिला फक्त पैसे हवे होते. उदगीकरच्याच आउट हाउसमधे तिची सोय करण्यात येणार होती.सूज्ञा पालकरच ते करून देणार होती. पण मृगाला खूप मोठी रक्कम पोटगी म्हणून हवी होती. आणि तेवढी मिर्लेकर कडे नव्हती.याला पर्याय म्हणून मृगानेच आपल्या नवऱ्याला अपहार करण्यास उद्युक्त केलं आणि ती रक्कम आपल्या खात्यात जमा करायला सांगितलं.मिर्लेकर ते करायला तयार झाला पण ही गोष्ट जर रायबागीला कळली तर तो नक्की पोलिसांना कळवेल आणि मग सारेच संपेल अशी भीती मिर्लेकरला होती म्हणून त्याने आपल्या बायकोला अट घातली की तसं झालं तर रायबागीचा खून करायचं काम तिला करावं लागेल. आणि कणाद च्या दुर्दैवाने त्याचा अपहार पकडला गेला.आता ठरल्यानुसार मिसेस मिर्लेकर ऊर्फ मृगाने रायबागीला मारायचं होतं.त्यासाठी रायबागीचीच रिव्हॉल्व्हर वापरायची असं ठरलं.रायबागीच्या अपार्टमेंट च्या किल्ल्या ऑफिस मधेच ठेवलेल्या असंत.कणाद मिर्लेकरला त्या सहज उपलब्ध होत होत्या.त्याने पद्मराग रायबागी च्या अपार्टमेंट मधून त्याचं रिव्हॉल्व्हर पळवलं आणि आपल्या बायकोला दिलं.सकाळी रती जेव्हा खासनीसला भेटायला सकाळी बाहेर पडली त्या नंतर मृगा रायबागीच्या अपार्टमेंट मधे आली आणि तिने झोपेत असलेल्या रायबागी च्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या.त्यानंतर ते मर्डर वेपन मी मगाशी सांगितल्या प्रमाणे मृगा कडून सूज्ञा कडे पोचवण्यात आलं आणि सूज्ञाने रतीची बॅग चोरून ते रतीच्या बॅग मधे टाकलं आणि ती बॅग माझ्या ऑफिसात आणून टाकली.”
“ थोडक्यात युअर ऑनर, रायबागीने प्रथम खरेदी केलेल्या रिव्हॉल्व्हर नेच खून झाला.हे रिव्हॉल्व्हर त्याच्याच घरातून मिर्लेकरने चोरलं.आणि बायकोला दिल. यात कणाद मिर्लेकर,सूज्ञा, आणि मिसेस मिर्लेकर म्हणजे मृगा गोमेद तिघेही सारखेच गुंतले आहेत पण प्रत्यक्ष खून मात्र मिसेस मिर्लेकर ने केला, हा खून झाल्यावर एक महत्वाची गोष्ट या त्रिकुटाच्या लक्षात आली की रतीच्या अपार्टमेंटमधे रतीचं स्वत:चं रिव्हॉल्व्हर होतं, त्यामुळे रती असं म्हणू शकली असती की माझ्या बॅग मधे कोणीतरी हे रिव्हॉल्व्हर टाकलं आहे मला अडकवण्यासाठी.हे माझं नाहीये, माझं रिव्हॉल्व्हर माझ्या घरी सुरक्षित आहे. तसं म्हणायची संधी मिळू नये म्हणून रतीच्या घरातलं रिव्हॉल्व्हर हलवलं जाणे महत्वाचं होतं. म्हणूनच तातडीने सूज्ञा पालकर सोमवारी ऑफिस संपल्यावर विमानाने विलासपूर ला गेली.तिने तिच्या अपार्टमेंट च्या डुप्लीकेट किल्या बनवून घेतलेल्या होत्याच, तिच्या फ़्लॅट मधे प्रवेश करून तिने तिच्या घरून तिचे रिव्हॉल्व्हर चोरलं आणि ते कुणालाच दिसणारं नाही अशा ठिकाणी ठेवलं. ”
“ पण मग अंगिरस खासनीस ने त्याच्या तिजोरीत ठेवलेले मर्डर वेपन ज्या पाकिटात ठेवले होते ते पाकीट का कापण्यात आलं?” न्यायाधीशांनी विचारलं.
“ त्या मर्डर वेपन च्या जागी रती चे रिव्हॉल्व्हर ठेवायचा त्यांचा प्लान होता.म्हणजे रती त्यात अडकली असती.” पाणिनी म्हणाला.
“ त्यांचा म्हणजे नेमका कोणाचा?” न्यायाधीशांनी विचारलं.
“ अर्थात कणाद चा.रिव्हॉल्व्हर त्याच्याच ऑफिसात अंगिरसच्या तिजोरीत ठेवले होते.त्याच्या तिजोरीच्या डुप्लीकेट किल्ल्या करून घेणे कणाद ला अवघड नव्हते.”
“ अॅडव्होकेट भोपटकर यात सामील नाहीत?” न्या.फडणीस यांनी शंका व्यक्त केली.
“ नाही, याचं कारण असं की त्याची सेक्रेटरी सूज्ञा च्या सर्व हालचाली या ऑफिस सुरु होण्यापूर्वी किंवा ऑफिस कामकाजानंतरच्या आहेत. तसेच ऑफिसला सुट्टी असतानाच्या आहेत.भोपटकर जर या कटात असता तर त्यने रीतसर सूज्ञाला सुट्टी दिली असती किंवा कामकाजाच्या वेळेतच विलासपूरला जाऊ दिले असते.” पाणिनी म्हणाला.
“ युअर ऑनर,आता मृगा गोमेद उर्फ मिसेस मिर्लेकर हिच्या बँक खात्याचा तपशील माझ्याकडे आला आहे. रायबगी कंपनीच्या खात्यातून मृगा च्या खात्यात अपहार केलेली रक्कम जमा झालेली दिसेल. खुनाचा हेतू स्पष्ट होण्यासाठी हे पुरेसे आहे.”
“ मिस्टर पटवर्धन, अपहाराची रक्कम मृगाच्या खात्यात जमा झाल्या नंतर तिने रायबागीचा खून करायला नकार दिला असता तर? म्हणजे पोटगीचे पैसे मिळवणे हा तिचा हेतू जर खून न करताच साध्य झाला होता तर ती खुनाच्या भानगडीत कशाला पडेल?” खांडेकरांनी विचारलं.
“याचं कारण असं आहे की खांडेकर,की या बाबतीत कणाद मिर्लेकर ने मृगाला चक्क गंडवलय.अपहाराची रक्कम जरी मृगाच्या खात्यात जमा केली असली तरी मृगा जेव्हा ते पैसे काढायला बँकेत गेली तेव्हा बँकेने तिला सांगितलं की खाते चालवण्याचे अधिकार फक्त कणाद ला आहेत. त्यामुळे तिचा नाईलाज झाला आणि ती खून करायला तयार झाली.”
“ हे कसं शक्य आहे. खाते जर मृगाच्या एकटीच्या नावाने असेल तर ते चालवायचे अधिकार तिलाच असणार.” खांडेकर उद्गारले.
“ अपहाराची रक्कम स्वत:च्या खात्यात जमा केली असती तर संशय आला असता म्हणून खाते मृगा गोमेद नावाने म्हणजे लग्नापूर्वीच्या नावाने उघडले. त्याचे पासबुक त्याने मृगाला दिले. खाते उघडतांना फॉर्म वर बऱ्याच सह्या करायला लागतात त्याच वेळी कणाद मिर्लेकरने काही कोऱ्या कागदावर तिच्या सह्या करून घेतल्या. अपहाराची रक्कम पचते आहे असे लक्षात येताच मृगाच्या सहीचा पहिला कोरा कागद वापरून त्या खात्यात कणाद मिर्लेकर हे नाव वाढवावे आणि खाते संयुक्त नावाने करावे, तसेच खाते दोघांच्या एकत्रित सहीने चालवावे असा अर्ज बँकेला दिला. बँकेने तसा बदल केला. काही दिवसांनी त्याने मृगाच्या सहीचा दुसरा कोरा कागद वापरून आणि त्यावर संयुक्त खातेदार म्हणून स्वत:ची ही सही करून बँकेला अर्ज दिला की आणि खाते चालवण्याचे अधिकार केवळ एकट्या कणाद मिर्लेकरच्या नावाने करावे. बँकेने तो बदल केला.”
हे निवेदन करत असतांना पाणिनी सतत मृगा च्या चेहेऱ्यावरचे भाव न्याहाळत होता.त्याच्या प्रत्येक वाक्याला ती अधिकाधिक चिडत असल्याचे त्याला जाणवले.आता पाणिनीने शेवटचे अस्त्र टाकायचे ठरवले.
“ युअर ऑनर,” पाणिनी म्हणाला.पण तो बोलायच्या आधीच न्यायाधीश ऋतुराज फडणीस म्हणाले,
“ हे सगळ तुम्ही अत्यंत तर्कशुद्ध आणि परिस्थितीजन्य पुराव्याला धरून बोलताय पण हे सर्व तुम्हाला कळल कसं आणि त्याला पुरावा काय आहे?”
“माझ्याकडचा पुरावा लगेचच मी सादर करतोय, त्याआधी मला शेवटच निवेदन करुदे.” पाणिनी म्हणाला. आणि त्याने पुन्हा मृगा गोमेद कडे पहिले,ती चिडून कणाद कडे पहात होती.
“ युअर ऑनर,कोर्टाला अशी शंका येणे रास्त आहे की मिर्लेकरच्या म्हणण्यानुसार खून केल्यावर सुद्धा मृगाला मिर्लेकरने रक्कम दिली नसती तर? तर, मृगाने कणादला घटस्फोटाच्या कागदावर सहीच दिली नसती. पण कणाद ने दिलेल्या साक्षी नुसार कणाद मिर्लेकर पोलिसांना जाऊन मृगाने खून केल्याचे सांगणार होता यामुळे मृगाला फाशीची शिक्षा झाली असती आणि घटस्फोट न देता तो सूज्ञाशी लग्न करायला मोकळा होणार होता.” पाणिनी म्हणाला.
पाणिनीचे वाक्य संपायच्या आतच मृगा जोरात किंचाळून कोर्टात बसलेल्या कणाद मिर्लेकरच्या अंगावर धावून गेली. “ हरामखोरा ! माझा वापर करून घेतलास आणि मलाच डबल क्रॉस करतो आहेस! मी खून केल्याची साक्ष दिलीस तू ! तुला सोडणार नाही मी. ”
कोर्टात एकदम सन्नाटा! न्यायाधीशांनी हातोडा आपटून कोर्ट शांत केलं.
“ तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन शपथ घेऊन बोला. तुम्ही जे बोलाल त्याचा वापर तुमच्याच विरुद्ध आरोप ठेवण्यासाठी केला जावू शकतो याची जाणीव ठेवा. कायद्याने तुम्हाला न बोलायचा सुद्धा अधिकार आहे.” फडणीस म्हणाले.पोलिसांनी मृगाला पकडून पिंजऱ्यात न्यायचा प्रयत्न केला पण तिने त्यांना थांबवलं आणि स्वत:च पिंजऱ्यात आली.
“ मी स्वाधीन होत्ये कोर्टाच्या. मी खून केल्याचं कबूल करते आहे पण मला हे करायला माझा नवरा कणादनेच भाग पाडलं.” मृगा म्हणाली. “ मला रक्कम मिळेपर्यंत या हरामखोराला मी घटस्फोटाच्या कागदावर सही करणार नव्हते.पण त्याने माझ्याविरुद्ध पोलिसांना सांगितलं आणि घटस्फोटाऐवजी मला फाशी द्यायचा प्लान करून माझा अडथळा दूर करायचा प्रयत्न केला हा मला धक्का आहे.”
खांडेकर उठून उभे राहिले, “ युअर ऑनर , मिर्लेकरांनी जे साक्षीत सांगितलं नाहीये ते मृगा गोमेद ना सांगून मिस्टर पटवर्धन हे साक्षीदाराची दिशाभूल करताहेत. ”
“ खांडेकर, मृगा गोमेद ने पिंजऱ्यात येऊन शपथेवर गुन्हा कबूल केलाय.मला पाणिनी पटवर्धन यांच्या नाट्यमय उलट तपासणीचा जो अनुभव आहे त्यावरून माझा अंदाज आहे की मृगा कडून गुन्ह्याची कबुली घेण्यासाठी ते हा डाव खेळले आहेत. ” न्यायाधीश म्हणाले,आणि पाणिनी मिस्कील पणे हसला.
“ युअर ऑनर, मृगा गोमेद ने आता शपथेवर गुन्हा कबूल केलाच आहे तर मी सुद्धा काही गोष्टी कबूल करतो. मृगा आणि कणाद च्या बँकेच्या खात्याबाबत मला मिळालेली माहिती ही मी वैयक्तिक ओळखीतून मिळवली. पुरावा म्हणून ती हवी असेल तर कोर्टाने समन्स बँकेला बजावून मिळवावी. ” पाणिनी म्हणाला.
न्यायाधीशांनी तशी कारवाई करायचे आदेश कोर्टाच्या लेखनिकाला दिले.
“ मी मगाशी उल्लेख केल्यानुसार सूज्ञा,कणाद मिर्लेकर आणि मृगा तिघांनी मिळूनच हा कट रचला.स्वत:ची अॅलिबी निर्माण करण्यासाठी मिर्लेकर खुनाच्या दिवशी हरीपुरला गेला. तिथे त्याच्या गाडीची नोंद टोल नाक्यावर आहे.मृगाला सुद्धा अॅलिबी निर्माण करण्यासाठी हरिपूरच्या टोल नाक्यावर तिच्या गाडीची नोंद होईल अशी व्यवस्था त्याने केली पण फक्त तिची गाडी ड्रायव्हर घेऊन गेला मृगा चैत्रापूरलाच होती.” पाणिनी म्हणाला.
“ पटवर्धन यांचे हे सर्व निवेदन म्हणजे त्यांचे अंदाज आहेत, पुराव्याशिवाय ते सर्व बोलत आहेत. भासवत मात्र असे आहेत की त्यांच्या समोरच हे सर्व घडलंय.” खांडेकर म्हणाले.
“ मी पुन्हा सांगतोय खांडेकर, मृगा गोमेद ने गुन्हा कबूल केलाय.आता जे काही घडलंय त्याचे पुरावे जमा करायची आणि मृगा विरुद्ध खटला उभा करायची जबाबदारी सरकार पक्षाची आहे. न्यायाचं मोठं तत्व हे आहे की हजारो अपराधी मोकळे सुटले तरी चालेल पण एका निरपराधी माणसाला शिक्षा होता कामा नये, त्यासाठी आरोपीवरील आरोप सिद्ध होतांना किंचितही शंका कोर्टाच्या मनात राहता कामा नये. या ठिकाणी मर्डर वेपन वर उमटलेले ठसे जरी रतीचे असले तरी ते खुनाच्या वेळी उमटलेले होते की आधीचे होते हे सिद्ध होवू शकलेले नाही.तसेच खुनाच्या हेतूचा विचार केला तर रती पेक्षा मिर्लेकर आणि मृगा यांनाच फायदा अधिक होता. मृगा ने गुन्हा मान्य केला ही बाब बचाव पक्षाला बोनस ठरली आहे हे खरं असलं तरी त्यासाठी अॅडव्होकेट पटवर्धन यांनी वापरलेली रणनीती कौतुकास्पद आहे.आणि ही रणनीती अयशस्वी ठरून मृगाने गुन्हा कबूल केला नसता तरी माझं मत असं आहे की रतीला नि:संधिग्ध आणि नि:संशयपणे दोषी सिद्ध करण्यात सरकार पक्ष सक्षम ठरलेला नाही. हे कोर्ट आरोपीला निर्दोष मुक्त करत आहे. ” न्यायाधीश म्हणाले.
प्रकरण १८ आणि संपूर्ण कादंबरी समाप्त.