Secret in Marathi Motivational Stories by Trupti Deo books and stories PDF | गुपित

Featured Books
Categories
Share

गुपित

गुपित 

गोडगोड संसाराच्या उंबरठ्यावर

(एका स्वानुभवातून उमललेली कथा)

पहाटेचा गारवा नुकताच गच्चीत पसरायला लागलेला. मीतालीने स्वयंपाकघरातून डोकावून विवेककडे पाहिलं. अजूनही झोपेत होता. तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू आलं.
"कालचा तोच माणूस का रे हा?" तिने कुजबुजत स्वतःलाच विचारलं.

पण ती ओठांवरची स्मितरेषा क्षणातच विरून गेली… कारण कालचं भांडण अजून मनात होतं.

“तुला काय वाटतंय, सासूबाईंना उत्तर दिलं म्हणजे मोठं झालं का मी?”
मीतालीचा आवाज थोडा चढलेलाच होता.
विवेकही थांबला नाही, “तू सारखं छोट्या छोट्या गोष्टीत माहेरच्या लोकांना सांगत राहशील, तर हा संसार आपण दोघं करतोय की तुझं माहेर?”

क्षणभर शांतता. आणि मग दार आपटून मीताली बेडरूममध्ये निघून गेली होती.

आज सकाळ मात्र निराळी होती. भांडणानंतरचा तो ‘गप्पांचा गारवा’ घरभर पसरलेला.

मीताली आईला फोन लावते… आणि पहिला शब्द निघतो, “आई…”
त्याचवेळी आई म्हणते, “काही सांगू नकोस. फक्त ऐक. तू तुझं घर बांधते आहेस. त्यात वाद असतील, चुकाही. पण त्या तुझ्याच असतील. त्या तुझ्याच घरात सोडव.”

मीताली चुपचाप ऐकते. डोळ्यात पाणी.
आई पुढे म्हणते, “मी जर प्रत्येकवेळी सांगायला गेले, तर तुझा नवरा माझ्याशी भांडेल. तुझं घर मोडेल, आणि तुला कळणारही नाही कधी. भांडणं होणारच, पण त्याचा आवाज घराबाहेर जायला नको, ग ”

मीतालीला आठवलं… तिच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आईने कानात कुजबुजून सांगितलेलं,"संसार म्हणजे रोजच्या जेवणासारखा असतो ग. काही दिवस गोड, काही दिवस तिखट, काही वेळा अगदी विरस वाटणारा. पण प्रेम, समजूत, आणि माफ करणं – हीच त्यात चव आणणारी फोडणी असते. भांडणं झालंच तर त्याचा आवाज बाहेर जाऊ देऊ नकोस, आणि प्रेम असेल तेव्हा एकमेकांच्या चुका मिठासारख्या पचवता यायला हव्यात. कारण नातं टिकवायला मोठ्या गोष्टी नाही लागत ग… लहानसहान क्षणांमध्ये समजून घेणं लागतं. त्या क्षणांची चवच आयुष्यभर टिकते."
“संसार म्हणजे रोज गोडगोड नसतो. पण जेव्हा तो बेचव होतो, तेव्हा मिठासारखी समजूत टाकायला शिक.”

त्या दिवशी पहिल्यांदा मीतालीने स्वतःहून विवेकजवळ जाऊन विचारलं, “कॉफी करते. घेणार?”
विवेक काही बोलला नाही. पण काही क्षणांनी म्हणाला, “जरा कमी साखर टाक. काल खूप गोड झाली होती…”
आणि दोघं हसले. वादाच्या राखेतून नवं नातं उसळी मारलं.

काही दिवसांनी मीतालीची मैत्रीण पूजा घरी आली. गप्पा मारता मारता म्हणाली,
“तू किती शांत दिसतेस. काय गं, सासूबाई कशी वागतात?”

मीताली गालात हसली,
“वागतात म्हणजे? कधी गोड, कधी तिखट. पण आता मी समजून घेते. कारण सासर हे युद्धभूमी नसतं, त्यांना जिंकायचं नसतं. तिथं प्रेम जपायचं असतं.”

पूजा आश्चर्यचकित झाली.
“आणि भांडणं?”

मीताली हसून म्हणाली,

“करतोच ना. पण ठरवलंय — "शब्दांच्या चकमकीचं युद्ध माहेरच्या रणांगणात नेऊच नको. संसार म्हणजे दोघांचा खासगी संवाद असतो… पब्लिक पोस्ट नाही! प्रत्येक वाक्याचं वजन असतं, आणि त्या वाक्यांचा फायरिंग जर इतरांसमोर झाला, तर नात्याच्या मुळांवरच घाव बसतो. भांडणं घरात असू देत, पण घराबाहेर त्यांची वासना जाऊ नये. प्रेम, समजूत, आणि मौन – हीच नात्यांची कवचकुंडलं असतात. ‘तिला सांगू का’ या विचाराऐवजी ‘तुला सांगतो’ असा संवाद जपला, तर संसाराला आधार मिळतो. नातं जपायचं असेल, तर त्यातली कुरबूर खासगी ठेवावी लागते… कारण जग मजा घेतं, समजून घेत नाही!"

कधीकधी सासूबाईही तिच्याशी उगाच चिडचिड करत. पण आता मीताली लगेच रडत नसे. एकदा तर सासूबाई म्हणाल्या,
“आजकाल तू फारच समजूतदार झालीस गं, अगदी माझ्या मनातल्या सुनेसारखी वाटतेस…
मीताली डोळ्यात पाणी आणून म्हणाली,
“कारण आता तुम्हाला समजून घेणं शिकलेय. तुम्हीही कधी ना कधी नवं घर बांधलं होतं ना?”

एका संध्याकाळी मीताली आणि विवेक बसलेले असताना मीताली म्हणाली,
“माहितेय का, आपल्या भांडणांमध्ये मी नेहमी तुझी चूक शोधायचे. पण आता जेव्हा गोडीत बसतो, तेव्हा लक्षात येतं… माझी चूक जास्त होती.”
विवेक हसला, “मग मी ही सांगतो… तुझं शांत होणं, ते ही खूप बोलतं… तेव्हा मी ओळखतो, मी ओळखतो की मीच चुकीचा होतो.”

दोघं हसतात. आणि ती संध्याकाळ काहीतरी शिकवून जाते. परत नव्याने आयुष्याची सुरुवात होते.

एक दिवस मीतालीच्या लहान बहिणीचं लग्न ठरल म्हणून फोन आला.
आई म्हणते, “आता तिला तूच सल्ला दे. सासरी कस वागायचं कस बोलायचं कस राहायचं?”

मीताली काही वाक्य लिहून देते बहिणीसाठी —
"भांडणं कीतीही करा, पण त्याचा आवाज घराबाहेर जाऊ देऊ नकोस… आणि गोडीगोडीत त्या चुकांचं मीठ घालायला शिक.""भांडणं घरात होतील, पण ती घर मोडायला नकोत… माणसांनी राहण्यासाठी घर हवं, पण प्रेमाने टिकण्यासाठी माणसं हवीत.""गोड बोलून गाठी सैल करता येतात, तुटलेल्या नात्यांत गाठ बांधता येत नाही."

सासरचं प्रत्येक वाक्य माहेरी सांगितलं, तर नातं संवादाने नव्हे, शंकााने भरतं.

भांडणं होतच असतात, पण ती दोन मनात असावीत, दोन घरात नव्हे.
संसाराचा मूल उद्देश हाच — "मी" पासून "आपण" कडे वाटचाल करत, एकमेकांच्या हातात हात घालून जीवन सुंदर करणं.हेच लक्षात ठेव.
तुझा संसार सुखाचा होईल. हेच करा संसाराचा गुपित आहे.

"संसारात वाद असतात, चुकाही असतात. पण त्यावर माफी, समजूत आणि संयम हेच खरं औषध असतं. मीतालीसारख्या मुलींनी जर प्रत्येक किरकोळ गोष्ट माहेरी नेली, तर संसाराला बिघडायला वेळ लागणार नाही. घरातले क्षणिक वाद जर उंबरठा ओलांडले, तर ते नात्याच्या मुळालाच पोखरतात. पण त्या गोष्टी घरातच ठेवून, संवाद साधून, प्रेमाने गोड बोलून, समजून घेत संसार केला… तर प्रत्येक घर उबदार नात्यांचं घर होईल. रोजचं जेवण जसं कधी गोड, कधी तिखट असतं… तसंच संसार. फक्त त्यात समजूतचं मिठ घातलं, की प्रत्येक घर गोडगोड उंबरठ्यावर फुलणार!"

भांडणं होणारच, ती नात्याचा भाग असतात. पण ती फक्त दोघांच्यापुरती ठेवावी, कारण तिसऱ्याच्या कानावर गेलं की त्याचं रूपच बदलतं. इतरांचं काम फक्त मिठावर जखमा चोळणं असतं… त्यांनी कधी प्रेमाची फुंकर घातलेली नसते. नातं तेव्हाच टिकतं, जेव्हा आपण दोघं आपले वाद आपल्यातच मिटवतो. बाहेर सांगितलं, की ते मत होतं… आणि मतांत नात्याची समज हरवते. प्रेम असो, राग असो – दोघांनी एकमेकांपर्यंत मर्यादित ठेवावं. कारण प्रेमाचं काम त्या जखमा भरून काढण्याचं असतं, उगाळत बसण्याचं नव्हे!"

---घटस्फोटाचं कारण अनेक वेळा मोठं नसतं, पण समजून घेण्याची इच्छा फार छोटी असते.
संसार म्हणजे दोन अपूर्ण माणसांनी एकमेकांना पूर्ण करण्याचा प्रयत्न.हें विसरू नका. कायम लक्षात ठेवा.नात्यांत ‘तुझी चूक, माझं बरोबर’ असं नसतं… दोघंही थोडेसे चुकतात आणि दोघंच थोडेसे माफ 

संसार हे युद्ध नव्हे की कुणाला जिंकायचं आणि कुणाला हरवायचं… संसार ही संगत आहे — मनांची, भावनाांची आणि स्वप्नांची.
इथे "मी बरोबर, तू चुकलास" असं सिद्ध करण्यापेक्षा,
"चुकलंच असेल, पण आपण दोघं एकत्र आहोत" हे म्हणणं अधिक मोलाचं असतं.

संसार म्हणजे एक छोटं, सुख-आनंदाचं किल्ला, जो दोघांनी मिळून बांधायचा असतो. 

सौ तृप्ती देव 
Trupti dev@Copyright