shraddha in Marathi Spiritual Stories by Trupti Deo books and stories PDF | श्रद्धा

Featured Books
Categories
Share

श्रद्धा



"आई म्हणायची... करतील स्वामी!"

माझं लहानपण गावाकडं गेलं. घर छोटंसं, पण त्यात एक मोठी गोष्ट होती – आईची नितांत श्रद्धा. रोज सकाळी. न चुकता स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ती, दिवा लावायची, मनापासून ती त्यांची पूजा करायचीआणि माळ जपायची.मला तेव्हा काही कळायचं नाही. मी चिडायचो "आई, रोज काय त्या स्वामीस्वामी करतेस!"
ती फक्त हसून म्हणायची, "स्वामी आहेत ना, चिंता करू नकोस."

कधी कधी विचारायचो, "तुला कधी त्यांच्या दर्शनात आले का ग?"
ती शांतपणे म्हणायची, "स्वामी दिसत नाहीत रे, पण समजून घेतात. त्यांच्या अस्तित्वाला डोळे नको, मन लागतं."

काळ पुढं गेला. शहरात आलो. नोकरी लागली. धकाधकीचं आयुष्य सुरू झालं. पण आईचं एक वाक्य कायम राहिलं – "करतील स्वामी!"
प्रत्येक फोनच्या शेवटी ती म्हणायची, "ताण घेऊ नकोस रे… करतील स्वामी!"


त्या वर्षी माझ्या आयुष्यात खूप मोठा वळण आलं.

एक मोठी डील होती – कंपनीचं भविष्य आणि माझं प्रमोशन दोन्ही त्यावर अवलंबून. पण शेवटच्या क्षणी क्लायंटने करार मोडला. कंपनीत गोंधळ, आणि सगळी जबाबदारी माझ्यावर.
वरून बॉसचा राग, खाली टीमचं बोट दाखवणं – संपलं सगळं.

त्या रात्री मी तसाच रस्त्यावर फिरत होतो. डोकं गरगरत होतं.
फोन आईला लावला, पण काही बोललो नाही. ती फक्त म्हणाली –
"अरे, काही नाही रे… करतील स्वामी समर्थ. तू त्यांना आठव तरी."

त्या रात्री मी पहिल्यांदा मनापासून स्वामींना हाक मारली.
"स्वामी… जर तुम्ही खरंच असाल, तर मला दिशा दाखवा. मी हरलोय!"

तेवढ्यात एका चौकात मी गाडी थांबवली. समोर एक वयोवृद्ध गृहस्थ दिसले – पांढरं धोतर, डोक्यावर फडफडणारी उपरण्याची घडी, आणि डोळ्यांत कमालीची शांतता.
ते हळूच माझ्या गाडीपाशी आले आणि म्हणाले,
"बाळा, जे हरवलेलं वाटतं, ते कायमचं हरवत नाही. सगळं वेळेवर सावरतं. तू फक्त योग्य मनानं पुढं चालत राहा… बाकी स्वामी पाहतील."

मी स्तब्ध झालो.

मी त्यांना थांबवायच्या आधी ते मागे वळले… आणि त्या संपूर्ण गर्दीत, एका क्षणात ते नाहीसे झाले.



त्या दुसऱ्याच दिवशी अचानक क्लायंटकडून कॉल आला –
"आम्हाला पुन्हा प्रोजेक्ट हवा आहे… आणि आम्ही फक्त तुमच्या टीमवर विश्वास ठेवतो."

सगळं बदललं.

प्रमोशन, विश्वास, मान – सगळं परत मिळालं. पण त्याहून मोठं, मी स्वामींना पुन्हा शोधलं होतं… आतल्या आत.

त्या दिवशी आईला फोन केला.
मी फक्त एवढंच म्हटलं,
"आई… स्वामी भेटले गं!"

ती गप्प झाली… क्षणभर काही बोललीच नाही. नंतर शांत आवाजात बोलली –
"ते कधीच दूर नसतात रे… फक्त आपल्या मनाला हाक ऐकायची सवय लागते."



आज मी जिथं आहे, तिथं पोहोचण्यात माझं कौशल्य किती आहे हे माहीत नाही… पण श्रद्धा, आईचं मन आणि स्वामींचं अस्तित्व – यांचं बळ नक्की आहे.

कारण स्वामी कधीच आरश्यात दिसत नाहीत… ते संकटात उमगतात.

कधी वाटते… मी बोललो नव्हतो काही,
पण आईच्या मनातली माझी वेदना,
ती रोज स्वामींच्या चरणी ठेवत होती.
आणि म्हणूनच,
मी गोंधळलो तेव्हा कोणीतरी माझा हात धरला.
अंधार होता, रस्ता हरवला होता…
पण ती आईची श्रद्धा,
स्वामींच्या रूपानं समोर आली.




श्रद्धा म्हणजे एक आर्त, पण निशब्द प्रार्थना…
आईसारखी – जी बोलत नाही, पण सगळं ऐकवत असते.
आणि स्वामी समर्थांसारखे – जे कुठून तरी ऐकतात…
आणि योग्य क्षणी आपल्याला सावरण्यासाठी उभे राहतात.


"श्रद्धा म्हणजे अंधपणा नाही… ती म्हणजे अंधारातही हात पुढं धरून चालणं — कारण कुठेतरी, कोणीतरी आपला हात पकडून चालवत असतो... जसं स्वामी समर्थ."स्वामी समर्थांवरची श्रद्धा ही अंधश्रद्धा नसून, ती म्हणजे आत्मविश्वासाला आधार देणारी शक्ति असते.

ती श्रद्धा आपल्याला वाट चुकल्यावर योग्य दिशा दाखवते, संकटात मानसिक बळ देते, आणि हताश क्षणी “करतील स्वामी” या विश्वासाने माणूस पुन्हा उभा राहतो


ज्यांच्यावर श्रद्धा आहे, त्यांच्यावर संकट आलं तरी मन कधी डगमगत नाही – उलट ती श्रद्धा आपल्याला तग धरायला शिकवते.

श्रद्धा म्हणजे चमत्कार घडण्याची वाट पाहणं नव्हे,
श्रद्धा म्हणजे चमत्कार घडवायला स्वतःमध्ये बळ निर्माण करणं.

 स्वामी कधीही थांबत नाहीत… आपण थांबतो.
स्वामी कधीही मागे घेत नाहीत… आपणच विसरतो की त्यांनी कितीदा आपला हात धरला होता.

ते दरवेळी काहीतरी देत असतात –
कधी धीर, कधी दिशा, कधी एखादी संधी…
आणि कधी फक्त मनात एक शांत स्पर्श…
जे बोलत नाही, पण आपल्याला खूप काही सांगून जातं.

"आई म्हणायची… करतील स्वामी!" हे वाक्य म्हणजे त्यांचं वचनच आहे असं वाटतं आता.

“श्रद्धा ही हवीच आहे… श्रद्धेशिवाय जीवन अपूर्ण आहे”श्रद्धा ही जीवनाला अर्थ देते, संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य देते, आणि न दिसणाऱ्या हातांवरही विसंबण्याचं सामर्थ्य देते.🙏🏽 श्री स्वामी समर्थ 🙏🏽


सौ तृप्ती देव 
भिलाई छत्तीसगड


.