swaypak ghrat ugvlela purush in Marathi Motivational Stories by Trupti Deo books and stories PDF | स्वयंपाक घरात उगवलेला पुरुष

Featured Books
Categories
Share

स्वयंपाक घरात उगवलेला पुरुष



"स्वयंपाकघरात उगवलेला पुरुष"

(एका पोळीच्या तव्यावरून निघालेली माणूसपणाची गोष्ट)

"काय रे, काय बायकांसारखं स्वयंपाक शिकतोयस?"
दिपकचा आवाज खोलीत घुमला. त्याच्या हसण्यात थोडासा उपहास, थोडीशी गंमत आणि थोडासा तो पुरुषी अहंकार मिसळलेला होता.

गॅससमोर आदित्य उभा होता. निळ्या रंगाचा एप्रन त्याच्या अंगावर थोडासा विसंगत वाटत होता, किमान दिपकला तरी. आदित्यने हातातल्या बेलननं पोळी लाटत ठेवली होती. त्याच्या कपाळावर घामाची रेषा चमकत होती, आणि त्याचे डोळे पोळी फुगतेय का हे पाहण्यात गुंतले होते.

"बायकांसारखं नाही रे… माणसासारखं शिकतोय,"
आदित्यचं उत्तर शांत, पण ठाम होतं.

दिपक काही क्षण गप्प झाला, मग खुर्चीत बसत म्हणाला,
"अरे पण तुझ्याकडे आई आहे, बायको आहे. तुला कशाला गरज? आपल्याला काय करायचंय हे सगळं?"

आदित्यने पोळी तव्यावरून उचलली, एक पोळी पोळ्याच्या डब्यात ठेवली आणि हसत म्हणाला,
"गरज म्हणून नाही करत, समज म्हणून करतो."

खरं तर, ही गोष्ट काही आजची नव्हती. ही गोष्ट सुरू झाली होती त्या दिवशी, जेव्हा आदित्यच्या घरी सगळं आलबेल वाटत असताना, अचानक आई आजारी पडली. ताप, अशक्तपणा, औषधं... आणि त्याच वेळी बायकोचं ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टचं टेन्शन.

घरात तीन माणसं – एक आजारी, एक धावपळीमध्ये आणि एक ‘पुरुष’.
आणि स्वयंपाकघर? ते रिकामं.

"आज भाजी कुणी केली?"
"भात आहे का?"
"आई, मला भूक लागलीय."
हे सगळं विचारणारे आदित्य तेव्हा फक्त 'मुलगा' होता.

पण एका रात्री, जेव्हा आई डोळ्यांत पाणी घेऊन म्हणाली,
"बाळा, तू काहीतरी करून घे ना... माझं अंग दुखतंय खूप."
तेव्हा आदित्यनं फक्त गॅस चालवला, आणि आपल्या जीवनातलं पहिलं कढईमध्ये तेल तापवलं.

भाजी करायची म्हणून कांदा चिरायला घेतला, तर डोळ्यात पाणी आलं.
म्हटलं, मसाला घालायचा, तर हळद-मीठ-लाल तिखट कोण कुठे ठेवलंय काहीच माहीत नव्हतं.
पोळी तर इतकी कडक झाली की आपण ती फोडणीसाठी वापरावी की झाकण म्हणून, असं वाटावं.

पण त्या दिवशी पहिल्यांदा, त्याच्या हातून भाजी झाली.
आईने ती भाजी खाल्ली आणि नजरेतून ओलसर आभार व्यक्त केले.
ती नजर, त्या चवीनं नाही आली होती – ती "मी एकटी नाहीये" या भावनेनं आली होती.

तेव्हापासून आदित्यला स्वयंपाकाची भीती राहिली नाही. उलट, त्याला त्यात एक वेगळाच अर्थ सापडला –
"हाच तर खरा माणूसपणाचा स्वाद आहे."

त्याचं मन आठवणींच्या मोरपिसांनी गंधाळत होतं. कॉलेजमध्ये असताना आई दररोज डब्यात दोन पोळ्या, भाजी, आणि छोटं गोड काही तरी ठेवायची. स्वतः मात्र कधी कधी उपाशीच असायची.
तेव्हा आपण ‘आईचं काम’ म्हणून दुर्लक्ष केलं.
आज तेच काम ‘माणसाचं’ वाटत होतं.

आदित्य बोलतच होता.
दिपकच्या चेहऱ्यावर विचारांची सावली पसरत गेली.

"हे बघ दिपक, आपली पिढी घराबाहेरच्या जबाबदाऱ्या मोठ्या मर्दानं पेलते. पण घरातलं एखादं काम हातात घेतलं की लगेच – ‘हे काय, बायकांसारखं?’ – असा आवाज उठतो. पण हे कोण ठरवतं? समाज? की आपली चुकीची सवय?"

"स्वयंपाक करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं. ते आई करते, बायको करते, मग आपण का नाही करू शकत? पोट तर आपल्यालाही लागतो ना? मग अन्न बनवणं हे फक्त त्यांच्या नावावर कसं?"

दिपक गप्प होता. त्याच्या डोक्यातही काही आठवणी वळवळत होत्या. आईने त्याच्यासाठी किती वेळा उपास केला होता? पावसाळ्यात अंघोळीला गरम पाणी देऊन स्वतः थंड पाण्यानं अंघोळ केली होती. आणि आपण? एकही दिवस तिच्या कामात हातभार लावला होता का?

"स्वतःसाठी पोळी भाजणं म्हणजे कमीपणा नाही, ती आपल्या माणूसपणाची साक्ष आहे,"
आदित्यचं वाक्य दिपकच्या काळजात खोलवर पोचलं.

आदित्यने चहा कपात ओतला.
"साखर घाल स्वतः. कारण प्रत्येकाची चव वेगळी असते. तसंच आयुष्याची तयारीही स्वतःच करावी लागते."

दिपकने कप उचलला.
एक घोट घेतला.
हसत म्हणाला –
"चहा भारी झालाय! आता पोळी शिकव ना..."

आदित्यने बेलन त्याच्या हातात दिला.
"शिकवेन रे. पण पोळी लाटण्यापूर्वी ही सवय लाट – की घरात काम करणं हे लिंगावर नाही, तर संवेदनांवर अवलंबून असतं."

त्या दिवशी दिपकने पहिल्यांदा बेलन हातात घेतला.
पोळी वाकडी झाली, फुगली नाही.
पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं.

बाहेर सूर्य मावळत होता.
घरात एक नवीन उजेड पसरत होता – माणूसपणाचा.


"पुरुष स्वयंपाक करतो" हे आजही अनेक घरांमध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनतो. कारण आपली मानसिकता अजूनही ठराविक साच्यात अडकलेली आहे.स्वयंपाक म्हणजे केवळ घरगुती काम नाही, ती एक मूलभूत गरज आहे.
भूक स्त्री-पुरुष पाहून लागत नाही, आणि म्हणूनच अन्न बनवणं हे "स्त्रीचं काम" आहे, ही संकल्पना खूप कालबाह्य आहे.


शेवटी इतकंच:

तव्यावर पोळी फुगली की आपण म्हणतो – "हाय, छान झाली!"
पण तव्यासमोर उभं राहून ती पोळी बनवणाऱ्या 'पुरुषा'ला पाहूनही असंच म्हणता आलं पाहिजे –
"हाय, माणूस झाला!"

सौ तृप्ती देव 
भिलाई छत्तीसगड