beri in Marathi Short Stories by Trupti Deo books and stories PDF | बेरी

Featured Books
Categories
Share

बेरी





"तुपाची बेरी आणि आठवणींची गोडी…"
वाटीमध्ये साठवलेलं बालपण




आठवणींसाठी वेळ लागत नाही, सुगंध पुरेसा असतो…
आजही तुपाच्या डब्याजवळ गेलं, की नकळत नजर कढईकडे जाते… आणि मन मात्र उलट्या पावलांनी थेट लहानपणात पोहोचतं — तिथं, जिथं 'बेरी' नावाचं एक गोडसं स्वप्न तयार व्हायचं!

आई रोज दूध घ्यायची — गवळ्याकडून. ते हि फारसं घट्ट नसायचं, पण रोज येणाऱ्या त्यात दुधात सुद्धा घरात साय जमा व्हायची. ती साय आई जमवून एका डब्यात भरवायची.

साई लावणं हे तिचं एक मनोव्रतच होतं. रोजच्या दूधावरची साय – व्यवस्थित एका छोट्या डब्यात साठवलेली. ती साय जितकी खरं तर प्रेमाने लावलेली, तितकाच तिचा विरजणाचा सुगंधही खास असायचा!


 आठ-दहा दिवसात जरा चांगलीच साय तयार व्हायची की मग त्यातून लोणी काढायचं. हाताला लावलेलं पाणी, ताक काढतानाचा आवाज, आणि मग लोणी बाहेर यायचं… आईच्या हातून टपोऱ्या गोळ्यांसारखं.

पण खरी मजा यायची पुढे — तूप काढताना.

आई लोणी कढईत घालायची, आणि हळूहळू मंद आचेवर शिजवायचं. आधी बुडाखालून आवाज यायचा… फुर्रफुर्र… मग वास यायला लागायचा. तो वास म्हणजे एक आरोमाथेरपी! सगळं घर त्या तुपाच्या सुवासाने दरवळायचं. जणू तुपाच्या कढईत बालपणच शिजत असायचं. घरच्या तुपाचा सुगंध अरोमा वेगळाच 

आणि शेवटी… एक जादुई क्षण यायचा…
सगळं लोणी विरघळून, वर छानसे पिवळसर तूप तर खाली ती ‘बेरी’ तयार व्हायची!

कढईमधल्या त्या गडद तपकिरी थराकडे आमची नजर असायची. "आई,तूप गाळलंस का?" "आई, झाली का बेरी?" — आवाज येऊ लागायचे. आई गाळणीने तूप डब्यात गाळून टाकायची. पण आम्हाला वाटायचं, खरी गोष्ट आता उरली आहे — ती "खरवडलेली बेरी."

आई ती बेरी कढईतून खरवडून काढायची. गरम गरम असतानाच त्यात पिठीसाखर टाकायची. कधी ती नसेल तर साधी साखरही टाकायची. आणि मग चमच्यानं वाटीत वाढायची. त्या वाटीतल्या चमच्याच्या घासात केवढं सुख असायचं, ते फक्त ज्यांनी खालेलं. आहॆ त्यालाच कळेल.

आणि मला जास्त आणि त्याला कमी मग आई 
पुढच्या वेळेस तुला जास्त हं. त्या चमचा बेरीच आनंद च वेगळा होता.

 बेरी म्हणजे गोड आठवण होती — आईच्या हाताची, घरच्या दुधाची, आणि शेवटच्या घासातही गोडी राखण्याच्या संस्कृतीची.

बेरीचं वेगळेपण फक्त चवपुरतं नव्हतं. तिच्यात एक प्रकारचं समाधान असायचं. कधीकधी आई म्हणायची, "अगं, यातलं तूप संपल्यावर हे खाणं होत नाही. ते असताना खा." मग वाटायचं, ही बेरी म्हणजे घरातलं साठवलेलं सुख आहे… जे जुना वास ठेवून जातं, आणि नवीन आठवणी उगमाला घालतो.

कधी वड्यात किव्हा बेरीच लाडू घालायला आई थोडीशी ठेवायची. कधी पोळपाटावर ठेवलेली ती वाटी उगाच पुन्हा पुन्हा उचलली जायची. कोणी चमचा टाकला, तर त्याच्यामागे आणखी दोन चमचे लागायचे!
ती गडद रंगाची, कुरकुरीत, आणि सुगंधित बेरी – ती चव शब्दांत नाही मावणार.

त्या बेरीचा सुगंध हा आईच्या स्वयंपाकघरातल्या जिवंत आठवणींचा दरवळ होता.
त्या क्षणी वाटायचं – हे आयुष्य भरभरून जगलं जातंय एका वाटीमध्ये!


आज बाजारात मिळणाऱ्या क्रीमपासून बनवलेल्या तुपात ना तो वास आहे, ना ती बेरी आहे, ना त्या वाटीचं महत्त्व.
कारण त्यात आईच्या हाताचं प्रेम नाही, आणि बालपणाची आठवण नाही.



आजही कधी बेरी करायची वेळ आली, तर…

आज जेव्हा मी स्वतः दूध घेते, साय साठवते, लोणी काढते… तूप बनवते — तेव्हा मनात एकच विचार असतो…
“आईसारखं जमेल का?”

बेरी तर तयार होते… पण ती गोडी शोधते — ती आठवण, ती गडबड, तो आवाज — "आई, मला जास्त दे!"

बेरी ही फक्त एक उरलेली वस्तू नव्हती, ती आपल्या घरातल्या प्रेमाची, कष्टाची आणि जिव्हाळ्याची एक चव होती.
म्हणूनच आजही तूप घेताना तीच वाटी उचलते… आणि हळूच मनात म्हणते:

"आई, अजूनही तुझ्या हातची बेरी हवी आहे!"



"घरच्या तुपात जेवढं सोनं असतं, त्याच्या खालच्या बेरीत तेवढं लपलेलं स्वप्न असतं!"

सौ तृप्ती देव 
भिलाई छत्तीसगड.