ताजे घरगुती आणि चविष्ट पदार्थ असल्याने ऊमाच्या दुकानातल्या पदार्थांना लोकांची पसंती असेतिच्या पूर्वीच्या नोकरीपेक्षा या दुकानात तिला चांगल्यापैकी कमाई होत होती अर्थात दिवसभराचे कष्ट पण होतेच त्यात … बसची घंटा वाजली आणि ऊमा चटकन भानावर आली .तिचा स्टॉप आला होता . ती पटकन उतरली आणि दुकानाच्या दिशेने निघाली.दुकानाजवळ पोचताच तिने कुलूप काढून दुकानाचे शटर उघडले .तोपर्यंत शेजारच्या दुकानातून दुधाच्या पिशव्या घेऊन शेजारच्या त्या दुकानातील नोकर राजू आला.झाडू घेऊन झाडणाऱ्या ऊमाला पाहून पिशव्या ठेवून तो पुढे झाला .“मावशी इकडे आण तो झाडू ..मी झाडतो . असे म्हणत त्याने ऊमाच्या हातुन झाडू काढुन घेतला आणि तो स्वतः झाडू लागला .झाडताना त्याने विचारले ,मावशी आज सुजाता ताई नाही का आली ?“राजू अरे सुजाता ताई आज थोडी उशिरा येईल.आता दुकानात गर्दी व्हायला सुरवात होईल तु थोडा वेळ थांबशील का माझ्या मदतीला ?”असे ऊमाने राजूला विचारले .कधीही अडीअडचणीच्या वेळी हा शेजारच्या दुकानातला राजू तिच्या मदतीला येत असे .त्याच्या मालकांची यासाठी पूर्ण परवानगी असे .जवळच्या झोपडपट्टीत राहणारा राजू दिवसा शेजारच्या दुकानात काम करून रात्रशाळेत शिकत असे .राजू अतिशय चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता .राजू असा ऊमाच्या अडचणीला नेहेमी मदत करीत असे त्यामुळे ऊमाही त्याला त्याच्या शिक्षणासाठी मदत करीत असे .कधी वह्या ,कधी पुस्तके ,कधी फी अगदी आनंदाने देत असे .त्यामुळे राजुलाही ऊमाविषयी आपुलकी होती .तिच्या अशा मदतीमुळे त्यालाही शिकायला हुरूप येत असे . आजूबाजूच्या दुकानातील सगळेच लोक ऊमाच्या मदतीला कायमच तयार असत .ही कष्टाळू बाई आपल्या हिम्मतीवर खुप व्यवस्थित हे दुकान चालवते याचे सर्वांनाच कौतुक होते .आपल्या वागण्याचे ऊमाने सर्वाना आपलेसे केले होते .त्यामुळेच मागील वर्षभरात तिचा चांगला जम बसला होते तिथे. आता हळूहळू ऊमाने तिचे काम सुरु केले.दुधाच्या पिशव्या फोडून एका मोठ्या पातेल्यात ओतल्या . आणि मंद आचेवर ते दुध तापत ठेवले .पाण्याची घागर बाहेरच्या नळावरून भरून आणली .सोबत आणलेला नारळ सोलून तो फोडून घेतला .नारळ फोडून घेतल्यावर ..जवळची वेळी घेऊन तिने कांदा मिरच्या कोथिंबीर चिरायला घेतली नुकत्याच फोडलेल्या नारळाचे खोबरे खोवायला घेतले .दुसरीकडे उप्पीटसाठी मोठ्या पातेल्यात रवा भाजायला ठेवला .आता थोड्या वेळात शेजारच्या कॉलेज मधली दहा बारा जण उप्पीट खाण्यासाठी यायची होती .सोबत चहा आणि बिस्किटे पण लागत असत त्यांना .हे नियमित गिऱ्हाईक होते तिचे.ही ऊमाकडे रोजचीच पहिली ऑर्डर असायची...रवा भाजेपर्यंत ऊमाने इतर तयारी केली आणि दूध तापल्यावर त्याच गॅसवर उप्पीट करायला सुरू केले.तोपर्यंत राजूने दुकानात असलेली चार पाच टेबले खुर्च्या स्वच्छ पुसून त्यावर पाण्याचे मग आणि ग्लास ठेवले .इतक्यात ते सर्वजण आलेच.ते सर्व बसल्यावर गरम गरम उप्पीट प्लेटमध्ये भरून त्यावर ऊमाने खोबरे, कोथिंबीर, शेव टाकली आणि जवळ लिंबाची फोड ठेवली ,चमचा ठेवला .राजूने सगळ्या प्लेट सर्वांना नेऊन दिल्या .त्यांचे खाणे सुरु झाल्यावर ऊमाने सर्वांसाठी चहा टाकला .बरणीतील बिस्किटे एका प्लेटमध्ये ठेऊन राजूने ती प्लेट टेबलवर नेऊन ठेवली .सर्वांचे झाल्यावर ऊमाने चहाचे कप भरले .राजूने सर्वांना चहाचे कप दिले .नंतर राजूने उप्पीटच्या उष्ट्या प्लेट आणि कप बशा साबणाच्या पाण्याने धुवायला घेतल्या सगळ्यांचे खाऊन झाल्यावर त्या ग्रुपमधील एकजण बिल द्यायला आला.बिल देऊन तो ऊमाला म्हणाला ..“मावशी तुमचे उप्पीट आणि चहा मात्र नेहेमीच भन्नाट असते बर का ..!!!रोजच्या चवीत एक कणभर पण बदल नाही,अतिशय चविष्ट .. . नाहीतर आमच्या बायका एकदा केलेल्या चहा सारखा चहा दुसऱ्या वेळी जमत नाही त्यांना “असे म्हणून तो जोरात हसु लागला आणि इतर पण लोक हसु लागले .ऊमाने हलकेच हसून त्याला साथ दिली .आता ते सर्वजण बाहेर पडले .तोपर्यंत राजूने प्लेट ,कपबशा धुवून पालथ्या घातल्या होत्या .“राजू ये उप्पीट खाऊन जा असे म्हणून ऊमाने राजूला उप्पिटाची प्लेट भरून दिली .“सावकाश खा रे बाबा ..असे म्हणून ऊमा पुढच्या कामाला लागली .राजूने खुर्चीवर बसून खाऊन घेतले ,चहा घेतला .कधीही मदतीला आला की त्याला काही खायला दिल्याशिवाय ऊमा सोडत नसे.“मावशी मी निघतो बर का काही लागले तर हाक मार “असे म्हणून तो निघाला .“आता नाही लागणार मदत आता थोड्या वेळात सुजाता येईलच .”असे म्हणून ऊमा पण आता थोडा वेळ खुर्चीवर टेकली
.क्रमशः