समीराचं आयुष्य एका छोट्याशा गावातल्या साध्या घरातून सुरू झालं. ती अभ्यासात नेहमी हुशार होती, शिक्षक तिला नेहमी कौतुकानं बघायचे. तिच्या डोळ्यांत स्वप्नं होती – मोठं होण्याची, आईबाबांना अभिमान वाटेल असं काहीतरी करण्याची. पण आयुष्य कधी आपल्याला आपल्या स्वप्नांच्या रस्त्यावर नेतं, तर कधी अगदी उलट दिशेनं फेकून देतं, हे तिच्या लक्षात आलं नव्हतं.
कॉलेज संपताच घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं. अनिल नावाचा मुलगा – दिसायला देखणा, शहरात नोकरी करणारा. घरच्यांना वाटलं, मुलगी सुखी राहील. समीरालाही सुरुवातीला तसंच वाटलं. लग्नानंतरचे पहिले काही महिने सुंदर गेले. घरातली सगळी कामं ती मन लावून करायची, नवऱ्याला प्रेम द्यायची, सासरच्या मंडळींशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करायची. काही दिवसांतच त्यांच्या संसारात एका गोड मुलाचा जन्म झाला. तिने त्याचं नाव ठेवलं – आरव. आई झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता.
पण काळ जसजसा पुढे गेला तसं वास्तव उघडं पडलं. घरात रोजचं भांडण सुरू झालं. सासू छोट्या छोट्या गोष्टींवर टोमणे मारायची – भाजी चांगली नाही, घर नीट नाही, सगळं चुकीचं करतेस. अनिल कामावरून थकून आला की तिच्यावर ओरडायचा. सुरुवातीला ती सहन करायची, “संसारात असंच असतं बहुतेक” असं स्वतःला समजवायची. पण हळूहळू भांडणं रोजचीच झाली.
त्यातच अनिलला दारूची सवय लागली. दिवसेंदिवस तो हिंसक होत गेला. दारू प्यायल्यावर तो समीरावर हात उचलायचा, शिव्या द्यायचा. तरीही ती गप्प राहायची कारण मुलगा लहान होता, त्याला आईवडिलांचं भांडण दिसू नये असं तिला वाटायचं. पण वेदना वाढत होत्या.
एक दिवस मात्र मर्यादा ओलांडल्या गेल्या. अनिलच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली. तो उशिरा घरी येऊ लागला, फोन लपवू लागला. समीराने विचारलं तर तो तिच्याच चारित्र्यावर शंका घ्यायचा. हे तिला सहन होईना. पण ती तरीही संसार वाचवण्यासाठी धडपडत राहिली – कदाचित एक दिवस तो बदलून जाईल अशी आशा होती. पण त्या रात्री घरातला वाद एवढा टोकाला गेला की अनिलने सगळ्यांसमोर तिच्यावर खोटं आरोप केलं आणि तिला व लहान आरवला घराबाहेर हाकलून दिलं.
रात्र काळी होती. हातात काही नव्हतं, फक्त मुलाचा छोटा हात घट्ट पकडलेला. आरव रडत म्हणाला, “आई, आपण आता कुठे राहणार?” तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ती म्हणाली, “जिथे आपण आहोत तिथेच आपलं घर आहे. देव आपल्याला सोडणार नाही.”
शहरातल्या एका छोट्याशा खोलीत तिने आयुष्य पुन्हा सुरू केलं. कुणाच्या घरी भांडी धुतली, कुणाच्या घरी साफसफाई केली, शिवणकाम केलं. दिवस काढणे कठीण होतं पण ती मुलाला चांगले शिक्षण द्यायचं ठरवून होती. स्वतः उपाशी राहिली तरी आरवला कधी उपाशी झोपू दिलं नाही.
हळूहळू तिला जाणवलं की आपल्याकडे स्वयंपाकाची कला आहे. तिने घरगुती पदार्थ बनवून विकायला सुरुवात केली – लाडू, चिवडा, भजी. शेजाऱ्यांनी कौतुक केलं, मागणी वाढली. “तुझं जेवण अप्रतिम आहे, अजून मिळेल का?” असं लोक विचारू लागले. त्यातूनच तिच्या मनात आशेचा किरण दिसला.
आरव लहान होता पण आईला मदत करायचा. पिशव्यांवर लेबल लावणं, ऑर्डर पोचवणं, हिशोब लिहिणं – तो लहानगा हातभार लावायचा. समीरा त्याला नेहमी शिकवायची – “बाळा, स्त्रियांना नेहमी मान द्यायचा. कधीही कुणी मुलीची चेष्टा केली तर थांबवायचं.” आरवने ते मनावर घेतलं. शाळेत कुणी मुलींना चिडवलं तर तो त्यांना थांबवायचा. शिक्षक म्हणायचे, “हा मुलगा वेगळाच आहे.”
व्यवसाय हळूहळू वाढत गेला. समीरा दिवस-रात्र राबली. नवीन पदार्थ शिकली, ऑनलाइन ऑर्डर्स घेऊ लागली. आरव मोठा झाला तसा त्याने डिजिटल मार्केटिंग, वेबसाईट तयार करणं, ऑर्डर सिस्टीम उभारणं या गोष्टी सांभाळल्या. आई-मुलगा ही फक्त नातं न राहता व्यवसायाची मजबूत टीम झाली.
आरवच्या कॉलेजमध्ये एकदा वादविवाद स्पर्धा झाली – विषय होता “महिलांचा सन्मान”. त्याने आईची गोष्ट सांगितली. सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं. तो म्हणाला, “माझी आई माझी सुपरहिरो आहे. तिच्यासारख्या प्रत्येक स्त्रीला मान दिला पाहिजे.” समीराला हे ऐकून अभिमानाने डोळ्यात पाणी आलं.
काही वर्षांतच समीराचा व्यवसाय लाखोंमध्ये पोहोचला. तिने एक मोठा बंगला विकत घेतला, कंपनी नोंदवली, शंभर महिलांना रोजगार दिला. गरीब मुलींसाठी शिष्यवृत्ती सुरू केली, विधवांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारलं, स्त्रियांना आधार देण्यासाठी आश्रयगृह सुरू केलं. संपत्ती आता तिच्यासाठी फक्त वैभव नव्हतं, तर समाजासाठी दिलेला हात होता.
आज ती आधीपेक्षा सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा तेज, डोळ्यांत चमक, वागण्यात सौंदर्य. लोक म्हणायचे, “समीरा खूप बदलली आहे, ती खूप strong दिसते.”
एकदा प्रवासात तिला अनिल दिसला. दारूने विद्ध चेहरा, थरथरणारे हात, बाजूला त्याच्यावर ओरडणारी स्त्री. तो एकेकाळी तिला कमी लेखणारा आज तिच्याकडे पाहायलाही लाजत होता. समीरा हसली आणि मनात देवाला धन्यवाद दिला – “जर त्या दिवशी मला घराबाहेर काढलं नसतं, तर मी आज इथवर आले नसते.”
त्या रात्री घरी आल्यावर ती बाल्कनीत उभी राहिली. आरव तिच्या शेजारी आला. तो म्हणाला, “आई, तू माझ्यासाठी फक्त आई नाहीस, तू माझी प्रेरणा आहेस. मी वचन देतो – मी प्रत्येक स्त्रीचा सन्मान करेन.” समीरा त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, “आणि मी वचन देते बाळा, की आपण अजून कित्येक स्त्रियांना नवं आयुष्य देऊ.”
दोघांचे डोळे चमकत होते. भूतकाळ मागे पडला होता. त्यांच्या समोर फक्त उज्ज्वल भविष्य होत..