दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ऊमाला नेहेमीप्रमाणे जाग आली .शेजारी नयना गाढ झोपली होती झोपेत तिच्या अंगावरचे पांधरूण सरकले होते .ते हाताने सारखे करीत ऊमा हळूच उठली .आणि आतल्या खोलीत जाऊन तिने मधले दार बंद करून घेतले .आज तिला बेसन लाडू आणि चिवडा करायचा होता .जसे जसे दुकानातले पदार्थ संपतील तसे ती थोड्या प्रमाणात आणि ताजेच तयार करीत असे .त्यामुळे पदार्थांची चव टिकून रहात असे .तिने स्वतःचा चहा करून घेतला आणि त्यानंतर आंघोळीला गेली .आंघोळ झाल्यावर तिने एकीकडे चिवड्याची तयारी करीत लाडूसाठी मोठ्या पातेल्यात बेसन भाजायला घेतले .बेसन भाजून झाल्यावर ते एका मोठ्या परातीत गार करीत ठेवले आणि दुसरीकडे दुसऱ्या एका मोठ्या पातेल्यात चिवडा फोडणीला टाकला .चिवडा झाल्यावर तो थंड करायला पेपरवर पसरून ठेवला आणि लाडू वळायला घेतले .पन्नास साठ लाडू होईपर्यंत घड्याळाचा काटा नऊकडे सरकला होता .आता नयनाला उठवावे असा विचार करून ऊमाने दरवाजा उघडला .तिने पाहिले तर नुकतीच नयना उठून अंथरूण पांघरूण घडी करीत होती .ऊमाला पाहताच ती म्हणाली , “अग आई मला उठवले का नाहीस ग ?हे काय नऊ वाजले की ग .. “अग तु इतकी छान झोपली होतीस ना ...आणि आज रविवार आहे ना .. क्लासला सुट्टी आहे ना तुझ्या म्हणून नाही उठवले ग . चहा टाकते तुझा दात घासून घे पाहु ..”.तिच्याकडे हसून पहात ऊमा म्हणाली आत पाउल टाकताच नयना म्हणाली .”आहाहा काय भन्नाट वास सुटला आहे ग !!!या खमंग वासानेच झोप चाळवली बघ माझी.. टेबलावर तयार असलेला लाडू ,चिवडा बघताच ती म्हणाली “अग एवढे सगळे कधी केलेस ?आणि मला का नाही उठवलेस ग मदतीला ?“असु दे ग नयन एकच दिवस असते सुट्टी तुला जरा निवांत आवरून घे ,आराम कर आज “नयनाला आत्तापर्यंत ऊमाने कोणतीच झळ कधी लागू दिली नव्हती .तिच्या नशिबात असे लहानपण आणि तरुणपण सुद्धा नव्हते .तिला आठवले ..एका छोट्या तालुक्याच्या गावात तिचा जन्म झाला होता .तिला थोडेसे समजु लागले तोवर दुर्दैवाने एका मोठ्या अपघातात एकाच वेळेस तिचे आई आणि वडील दोघेही दगावले .तिच्या आईच्या माहेरचे जवळचे असे कुणीच नव्हते .जवळच्या गावी वडिलांचा एक चुलत भाऊ आणि त्याची बायको मात्र होती .त्याच तिच्या चुलत काका काकूंनी त्यानंतर ऊमाचा सांभाळ केला .काका थोडे भविष्य वगैरे पहायचे ,जमेल तशी भिक्षुकीची पण कामे करायचे बाकी उत्पन्नाचे साधन असे काहीच नव्हते .मित्राच्या एका वाड्यात ते दोन खोल्यात अगदी नाममात्र भाड्याने रहात होते . त्यांच्या मित्राने त्यांच्यावर हे उपकारच केले होते . ऊमाचे वडील मात्र चांगल्या सरकारी नोकरीत होते .त्यांचा पगार चांगला असल्याने ते पूर्वी आपल्या या भावाला गरजेला थोडी आर्थिक मदत करीत असत .एका गावात जरी ते रहात नसले तरी त्यांनी आपले संबंध मात्र चांगले टिकवले होते .चुलत भाऊ असला तरी ऊमाचे वडील तसे कधी मानत नसत. पहिल्यापासून घरच्या सारखेच नाते ठेवले होते त्यांनी .म्हणूनच त्यांच्या आकस्मिक मृत्युनंतर काका ताबडतोब ऊमाला घरी घेउन आले होते. काका काकूंना अपत्य काहीच नव्हते .काका ऊमाच्या वडिलांच्यापेक्षा वयाने दहा पंधरा वर्षांनी मोठेच होते .त्यामुळे ऊमाच्या आई वडिलांच्या अशा अचानक मृत्यूच्या वेळी त्या दोघांनी पन्नाशी ओलांडली होती .ऊमा तेव्हा पाचव्या इयत्तेत होती .काका काकू दोघेही प्रेमळ होते . ऊमाच्या वडीलांचा आलेला थोडा पैसा आणि काही साठवलेली पुंजी मिळुन तिघांचे बरे चालू लागले .ऊमा आपल्या भावाची “अमानत” आहे तिचा सांभाळ करणे, तिला शिकवणे ही आपली जबाबदारी आहे याची काकांना जाणीव होती . ऊमाही खुप हुशार होती .लहान वयात पाहिलेल्या आईवडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ती जास्तच समंजस झाली होती .अबोल असलेल्या ऊमाचे काका काकुंवर खुप प्रेम होते .आई वडिलांच्या माघारी ते दोघेच तिची “दुनिया” होते .उत्तम मार्काने ऊमा दहावी उत्तीर्ण झाली .त्यानंतर तिने जिल्ह्याच्या गावी जाऊन आपले शिक्षण पुरे केले .पदवीधर झाल्यावर नोकरी करावी आणि घरात हातभार लावावा असा तिचा विचार होता .नोकरीसाठी जिल्ह्याच्या गावी जायची सुद्धा तिची इच्छा होती .पण तिच्या काकांना ते मान्य नव्हते .ऊमाला ते आपल्यापासून लांब जाऊ द्यायला इच्छुक नव्हते . आता काका काकू बरेच वृद्ध झाले होते .त्यामुळे जी मिळेल ती नोकरी तिने गावातच करावी असे त्यांचे म्हणणे होते .मार्क्स चांगले असल्याने तिला घराजवळच एक बरी नोकरी मिळाली होती .हे सगळे ऊमाला आत्ता आठवले ..परिस्थितीच्या रेट्यामुळे तिला बालपण किंवा तरुणपण फारसे आनंदाने नाही काढता आले .क्रमशः