सतीश अनाथ आश्रमातच लहानपणापासुन वाढला होता .त्याचे शिक्षण तिथेच पूर्ण झाले होते .त्यानंतर एकदोन प्रयत्नात सरकारी नोकरी पण मिळाली होती .पगार चांगला होता . त्याचे दोन खोल्याचे एक घर सुद्धा होते गावाबाहेर..थोडे पैसे शिल्लक टाकल्यावर आता त्याला लग्न करायचे होते .त्याच्या बाजुने लग्नाचे पाहायला कोणीच नव्हते.म्हणून त्याने स्वतःच ही स्थळे पाहायची मोहीम सुरु केली होती .आज तो ऑफिसमधील आपला मित्र मोहन याच्यासोबत आला होता .त्याने गावातच ऊमाला कधीतरी पाहिले होते .तिच्या लग्नाचे चालू आहे असेही ऐकले होते .साधीसुधी पण आकर्षक दिसणारी ऊमा त्याला आवडली होती .म्हणूनच तिच्या घरच्यांकडे तो आपलेच स्थळ घेऊन आला होता .त्या दिवशी संध्याकाळी ऊमा घरी आल्यावर काकांनी तिला सतीशचा प्रस्ताव सांगितला .ते म्हणाले,‘ हे बघ ऊमा पोरी तुही एकदा पहा त्याला, कसा वाटतो बघ बर .बोलून घे त्याच्याशी आणि तुला आवडले तरच सांग पसंती .आम्हाला तरी मुलगा बरा वाटला ,वागायला आणि बोलायला आणि दिसायला सुद्धा नोकरी बरी आहे ,घर पण आहे म्हणतो स्वतःचे म्हणजे ठीक दिसते आहे सारे आमची तुझ्यावर काहीच जबरदस्ती नाहीय . खरेच काकांची काहीच जबरदस्ती नव्हती ऊमावरते पुढे म्हणाले त्याला तु पसंत आहेस ,त्याने पाहिले आहे तुला आधीच आम्हालाही तुझे लग्न करायचेच आहे .आता आमचे आयुष्य किती दिवस असणार आहे ?त्याआधी तुझा सुखी संसार पहायची आम्हाला इच्छा आहे .ऊमा म्हणाली, “ काका एवढी काय गडबड आहे माझ्या लग्नाची ..?थोडे दिवस थांबुया न आपण .मी आणखी थोडे दिवस नोकरी करते तेवढेच चार पैसे शिल्लक पडतील .आपले सर्वांचेच राहणीमान सुधारेल आणि मग मी लग्न करेन ना... “नाही नाही असे नको बोलूस ..काका चटकन तिचे बोलणे अर्धे तोडून म्हणाले पोरी अग या गोष्टीला काही अंतच नाही .आणि आता जर तुझे भले होत असेल तर लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे ?आता तुझ्या पगाराच्या पैशापेक्षा तुला उत्तम स्थळ मिळणे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहे .माझ्या दिवंगत भावाची घेतलेली जबाबदारी आता मला पुरी केली पाहिजे “काकांचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून मग मात्र ऊमाने या गोष्टीला होकार दिला .तिचा स्वभाव मुळातच शांत आणि समजूतदार होता .काकांच्या शब्दाबाहेर ती कधीच गेली नव्हती .आताही तिने विचार केला इतके सारे जर बरे असेल या मुलाचे आणि जर त्यालाच आपण पसंत असु तर काहीच हरकत नव्हती लग्नाविषयी विचार करायला.निदान मुलाला भेटून तरी पाहूया कसा काय आहे तो .ज्याअर्थी काका इतका आग्रह करीत आहेत त्या अर्थी स्थळ चांगलेच असेल .काका तर आपल्या भल्याचाच कायम विचार करणार .त्यमुळे तिने सतीशला भेटायला होकार दिला .काकांनी तसा निरोप सतीशला कळवला .दुसऱ्या दिवशी सतीश एकटाच संध्याकाळी तिला भेटायला त्यांच्या घरी आला.त्याने तिला आधीच पाहिले होतेच .मात्र सतीशला पाहताच ऊमा खरोखर चकीत झाली !!!अतिशय देखणा ,गोरापान, उंच आणि बांधेसूद असलेला सतीश त्याच्या उजव्या गालावर थोडा खाली एक ठळक तीळ होता .जणूकाही त्याच्या देखण्या रुपाला दृष्ट लागू नये म्हणून लावलेला !!!इतका देखणा मुलगा आपल्यासाठी स्थळ म्हणून आलाय हे पाहून मनातून ती अगदी खुष झाली होती !!!काकांनी सतीशला विचारले ,“तुझी आर्थिक परिस्थिती काय आहे ?तु ऊमा सोबत संसार कसा करणार आहेस ?तेव्हा त्याने सांगितले की ,“माझे एक स्वतःचे दोन खोल्याचे घर आहे .शिवाय बँकेत माझ्या नावावर थोडे पैसे पण शिल्लक आहेत .मला पगारही चांगला आहे ,आणि थोड्याच दिवसात मला प्रमोशन मिळायची शक्यता पण आहे .नंतर आणखीन पगार वाढू शकतो .ऊमाची नोकरी तिला हवी तर ती चालू ठेवू शकते .नको असेल तर सोडुन देऊ शकते .ते तिच्या मनावर अवलंबून राहील .तिच्या पगाराची मला अजिबात अपेक्षा नाही मी माझा संसार चालवायला सक्षम आहे .”हे त्याचे ठाम बोलणे ऐकुन काकांनी समाधानाने मान डोलावली .काकूंना पण खुप आनंद झाला .अखेर पोरीने नशीब काढले म्हणायचे ..!!ऊमाने पण आनंदाने होकार दिला . काकांची परवानगी घेऊन सतीश ऊमाला थोड्या वेळासाठी बाहेर घेऊन गेला होता.दोघेही जवळच्या एका बागेत जाऊन बसले .त्या वेळच्या गप्पामध्ये ऊमाला त्याचा स्वभाव समजूतदार वाटला होता .तुला सुखी ठेवायचा प्रयत्न करेन असेही त्याने तेव्हा ऊमाला वाचन दिले .नोकरी करायची नसेल तर तु ती सोडू शकतेस असाही पर्याय दिला . दोन दिवस ऊमाला विचार करायला सुद्धा वेळ दिला होता सतीशने .काकांना तर हे स्थळ चांगले वाटले .शिवाय लग्न साध्या पद्धतीने करायची सतीशची इच्छा होती .लग्नाचा सर्व खर्च तोच करणार होता .हुंडा म्हणून काकांकडून एक पैसाही त्याला नको होता .ऊमाला मंगळसूत्र ,बांगड्या असे दोन तीन दागीने तोच घेणार होता . त्याला फक्त पत्नी म्हणून ऊमासारखी मुलगी आणि नारळ पुरे होता .काकांना वाटले खरेच देवाच्या कृपेनेच असे स्थळ चालून आले आहे !!एकच गोष्ट खटकत होती काकांना ती म्हणजे या दोन तीन भेटीत त्याच्यासोबत कोणीच आले नव्हते .तो एकटाच सगळ्या गोष्टी करीत होता .पण तेही साहजिक होते म्हणा ,तो अनाथ असल्याने त्याच्या बाजुने कोण येणार ?ऊमाने सुद्धा परत दोन दिवस विचार केला .तिलाही सतीशच्या स्थळात काहीच खोट दिसेना.काही उणे काढावे अशी कोणतीच गोष्ट आढळेना.नवीन चांगल्या आयुष्याची स्वप्ने तिने पण पाहिलेली होतीच .ती पूर्ण होतील अशी तिलाही आशा वाटली .दोन दिवसांनी परत सतीश घरी आला .तेव्हा होकार घेऊनच परत गेला.पुढच्या आठवड्यात लग्नाचा मुहूर्त ठरला .थोडी गडबड होतेय असे एकवार वाटले काकांना.. पण कोणासाठी आणि कशासाठी थांबायचे होते आता ?क्रमशः