Reunion - Part 9 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्मिलन - भाग 9

Featured Books
Categories
Share

पुनर्मिलन - भाग 9

ऊमाच्यापुनर्मिलन भाग ९ ऊमाच्या बाळंतपणाची वेळ जवळ आल्यावर काका स्वतः घरी येऊन तिला घेऊन गेले .ऊमाच्या अशा अवघडल्या अवस्थेत तिला आरामाची गरज आहे .तिला स्वतःच्या घरी कामाच्या व्यापामुळे आणि नोकरीमुळे तिला आराम मिळणार नाही .अशा विचाराने काकूने स्वतः काकांना पाठवले होते ऊमाला घेऊन यायला त्यावेळेस मात्र सतीशने सज्जनपणाचा“बुरखा” घेतला होता .आणि अगदी नाईलाजाने तिला माहेरी जायला परवानगी देत आहे ..त्याला तिच्याशिवाय अजिबात करमत नाही असे दाखवले .काकांची खरेतर ऊमाच्या बाळंतपणाचा खर्च करायची ऐपत नव्हती पण ऊमाचे पहिले बाळंतपण आपल्याकडे करायची त्या दोघांना हौस मात्र होती.  काकांच्या सोबत ऊमा आपले जुजबी सामान घेऊन काकांच्या घरी राहायला गेली .तिथूनच ती नोकरीला जायला लागली .सतीश दिवसाआड तिची खुशाली विचारायला येत असे .काका काकु पण त्याचे जावई म्हणून कौतुक करीत असत .आता एकटे कुठे जाऊन जेवता असे म्हणत अधेमध्ये अगदी आग्रहाने त्याला जेवायला थांबवून घेत असत .पोटातल्या बाळाच्या काळजीने ऊमा चूप असायची .आता बाळाची काळजी घेणे हेच तिचे पहिले काम होते. योग्य वेळेस एके दिवशी ऊमाने एका सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला . बाळंतपण फारच कठीण गेले ऊमाला पण आपल्या सुंदर लेकीला पहाताच तिचा सगळा शीण पळाला.मुलीच्या जन्माची बातमी ऐकताच क्षणी सतीश ताबडतोब दवाखान्यात आला होता .येताना नवजात मुलीसाठी खेळणी,कपडे तसेच आनंदाने सगळ्यांना वाटायला बर्फी घेऊन आला .खुप कौतुक केले सतीशने त्याच्या लेकीचे ...त्यात लेकीच्या गालावरच्या त्या तिळासकट ती अगदी त्याच्यासारखीच दिसायला होती त्यामुळे त्याला खूपच हर्ष झाला .तिचे नयना हे नाव सुद्धा लगेच ठरवून टाकले त्याने ऊमाचे हात हातात घेऊन इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल आभार मानले .आता पुढील आयुष्यात दोघींना सुखी ठेवायची वचने पण दिली .ऊमाला पण बरे वाटले ..लेकीच्या पायगुणाने आता सर्व ठीक होईल अशी आशा वाटली .ऊमाला बाळंतीण होऊन दोन महिने पूर्ण होताच त्याने त्या दोघींना घरी न्यायची गडबड सुरु केली .ऊमाला आणि बाळाला घरी घेऊन जातो असा त्याने काकांकडे आग्रह धरला  मी आता यानंतर दारू अजिबात पिणार नाही असे ऊमाला सांगू लागला .अगदी त्या वेळेस ऊमाला त्याने तसे पक्के वचन सुद्धा दिले.ऊमाने विचार केला आपल्या तिकडे जाण्याने आणि मुलीच्या पायगुणाने याची दारू सुटणार असेल तर उत्तमच होईल .तिने पण मग काका काकूंकडे घरी जायची इच्छा व्यक्त केली .काकू मात्र म्हणाली ऊमाला ,  “अग इतक्या लहान बाळाला घेऊन इतक्या लवकर कशाला तुझ्या घरी परत जातेस?अजुन तुझी तब्येतही फारशी सुधारलेली नाही .आपल्या घरी गेले की काम पडेल तुला . त्यात बाळ पण अजून बाळसे धरते आहे .”खरेच या काही महिन्यात तिची तब्येत खुप खराब झाली होती .तिच्या मनातल्या चिंतांनी तिला ग्रासले होते .बाळंतपण तर अजिबात मानवले नव्हते .काकूला वाटत होते बाळंतपणाच्या त्रासामुळे तिची तब्येत सुधारत नसेल . पण खरी गोष्ट फक्त ऊमालाच ठाऊक होती .बाळ बाळंतीण दोघींची तब्येत तशी नाजूक असल्याने अजून बारसे पण झालेच नव्हते .ते जरा थाटात करावे असा काका काकुंचा विचार होता .पण मग जावयाच्या आग्रहामुळे काकांनी बाळाचे बारसे घरच्या घरीच थोडक्यात आटोपून घेतले.बाळाचे नाव सतीशने ठरवून ठेवल्याप्रमाणे नयना ठेवले.आणि नयनाला घेऊन ऊमा तिच्या स्वतःच्या घरी परतली .घरी जाताना मात्र काकूने तिला बजावले की इतक्यात नोकरीवर मात्र जायचे नाहीऊमा घरी तर गेली ..पण सतीशच्या वागण्यात काहीच बदल होत नव्हता नयनावर मात्र त्याचा फार जीव होता शुद्धीत असला कि तिचे खूप लाड करायचा तिच्याशी खेळायचा कधी कधी खेळणी सुद्धा आणायचा नयना कडे बघितले कि ऊमाला तिच्या भविष्याची काळजी वाटायची तशात एके दिवशी दोघे तिघे गुंड लोक सतीश कुठे आहे विचारत घरी आली त्यांचे अवतार पाहून उमा घाबरून गेली त्याना काय हवे आहे विचारताच त्यांनी सांगितले सतीश त्यांच्या जुगार अड्ड्यावर जुगार खेळायला येत असतो चार पाच दिवसापूर्वी तो जुगारात बरेच पैसे हरला होता त्यानंतर मात्र तो अड्ड्यावर आलाच नाही ते जुगारात सतीशने हरलेले पैसे त्यांना परत हवे होते ऊमाने त्यांना लवकरात लवकर सतीशला पाठवून पैसे द्यायची हमी दिली दुसरे काय करणार होती ती आला प्रसंग निभावून न्यायला हवा होतात्यांनी जाताना पंधरा दिवसाची मुदत दिली त्यानंतर मात्र ते काय करतील हे सांगता येणार नाही अशी धमकी पण दिली पण त्या दिवशी परत रात्री उशिरा सतीश पिऊन आला .आता त्याच्याशी या अवस्थेत बोलायचे बळ ऊमाच्या अंगात नव्हते .तो पण तसाच झोपून गेला . सकाळी मात्र ऊमाने विषय काढलाच पैशाचा ..तेव्हा तो म्हणाला, “बघूया कुठे मिळतात का बघतो इकडे तिकडे मागून ..त्यावर ऊमा चिडून म्हणाली  “पण तु इतका जुगार खेळलास कशाला ..?तुला आपली, आपल्या संसाराची ,आपल्या मुलीची काहीच काळजी नाहीय का ?एक तर आपल्याजवळ काही पैसा नाही कुणाचे पाठबळ नाही .त्यात तुला ही व्यसने ,कुठून आणणार आहोत आपण पैसे ?कोणाच्या जीवावर आपण आपल्या मुलीचा सांभाळ करणार आहोत ?”बोलताना ऊमाचा आवाज चांगलाच चढला होता . “हे बघ आता उगाच मला फालतुचे काही ऐकवत नको बसू त्यांनी वेळ दिलाय न पंधरा दिवस बघीन मी कसे करायचे ते .तु तुझ्यापुरते बघ ..यात तुझी काहीच मदत नाही होणार मला .तू तर सध्या नोकरीवर पण जात नाहीस असे म्हणून सतीशने ऊमाला झिडकारले. म्हणजे अजुन पंधरा दिवस ही टांगती तलवार राहणार होती डोक्यावर .काय करावे हेच समजत नव्हते ऊमालाडोक्याचा नुसता भुगा झाला होता तिच्या ..क्रमशः