शेअर मार्केट बेसिक्स – भाग २ : मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर व रिस्कचे प्रकार
मित्रांनो, आपण या भागात, मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर, व मार्केटमधील रिस्क याबद्दल माहिती घेऊ:
रोखे बाजारात व्यवहार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा स्टॉक एक्स्चेंज, क्लियरिंग कॉर्पोरेशन्स, डिपॉजिटरी याद्वारे पुरविल्या जातात, या संस्थांना ‘मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इंस्टीट्यूशन्स’ म्हटले जाते.
स्टॉक एक्स्चेंज:
स्टॉक एक्स्चेंज हे पूर्ण देशभर संगणक आधारित ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पुरवितात, ज्याद्वारे त्यांच्या नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर्सच्या मध्यस्थीने शेअर्सची खरेदी-विक्री करता येते. ही खरेदी विक्री एका निश्चित किंमतीला व न्याय्य रीतीने पार पडते. BSE लिमिटेड, NSE लिमिटेड, मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्स्चेंज (MSE) हे देशभर उपलब्ध असलेले मुख्य स्टॉक एक्स्चेंज आहेत.
क्लियरिंग कॉर्पोरेशन्स:
स्टॉक एक्स्चेंजवर झालेल्या व्यवहाराची हमी देणे हे प्रमुख कार्य क्लियरिंग कॉर्पोरेशनचे असते. म्हणजेच शेअर विकणाऱ्याला त्याचे पैसे मिळतील याची हमी व शेअर खरेदी करणाऱ्याला त्याचे शेअर मिळतील याची हमी.
डिपॉजिटरिज:
या अशा संस्था आहेत ज्या गुंतवणूकदारांचे रोखे डिमटेरियलाइज्ड किंवा इलेक्ट्रॉनिक रूपात होल्ड करतात, व त्यासंबंधी सुविधा पुरवितात. या सुविधा डिपॉजिटरी सदस्यांमार्फत गुंतवणूकदारांना पुरविल्या जातात. आपल्या देशात NSDL व CDSL अशा दोन डिपॉजिटरी आहेत. त्यांचे नोंदणीकृत सदस्य सर्वांसाठी डिमॅट अकाऊंट उघडणे, शेअर्स किंवा रोखे यांचे डिमटेरियलाइजेशन करणे, अकाऊंट मेंटेन करणे अशा सुविधा पुरवितात.
गुंतवणूकीची मूलभूत माहिती:
गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमची गुंतवणुकीची ध्येय, उद्देश आणि रिस्क घेण्याची क्षमता समजून घेऊन ते ओळखता आले पाहिजेत. गुंतवणुकीच्या प्रत्येक निर्णयामध्ये तुमच्या गरजा, आवश्यकता आणि त्यांचे प्राधान्य या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. जसे की तुम्हाला सुरक्षित उत्पादनांमध्ये गुंतवणूक करायची आहे जे स्थिर उत्पन्न देतील अथवा तुम्हाला थोडी रिस्क घेऊन अशा उत्पादनांमध्ये गुंतवणूक करायची आहे ज्यातून जास्त उत्पन्न मिळेल. प्रत्येक गुंतवणुकीमध्ये तिच्या मुळच्या किंमतीतील बदलाची रिस्क असतेच. जसे की एखाद्या बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर तिचे ग्राहक वाढणे किंवा कमी होणे, तिच्या तुलनेत एखादी दुसरी बँक जास्त ग्राहकांना आकर्षित करणे यांसारख्या गोष्टींमुळे त्या शेअरची किंमत कमी-जास्त होऊ शकते.
एकदा तुम्ही स्वतःची गुंतवणुकीची ध्येय व रिस्क घेण्याची क्षमता समजून घेतली की मग किती पैसे गुंतवायचे व किती काळासाठी गुंतवायचे हे निश्चित केले पाहिजे. प्रत्येकाची रिस्क घेण्याची क्षमताही वेगवेगळी असते, ती त्यांची ध्येयं व वय यावर आधारित असायला हवी.
गुंतवणूकदारांनी नेहमीच सूचित निर्णय घेतले पाहिजेत. सूचित म्हणजेच सत्य माहितीवर आधारित. एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांनी त्या कंपनीसंबंधी सर्व माहिती व्यवस्थित वाचली पाहिजे. जसे की कंपनीने प्रसिद्ध केलेले डॉक्युमेंट, त्यांच्या प्रोमोटर्सची माहिती, त्यांच्या प्रोजेक्टसंबंधी माहिती, त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती, वगैरे. अशा प्रकारची माहिती ही स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध असते. त्यासोबतच गुंतवणूकदार एखाद्या सेबी नोंदणीकृत सल्लागाराची माहिती घेऊन त्यांच्याकडून सल्ला घेऊ शकतात.
रोखे बाजारातील काही ठळक रिस्क:
१) मार्केट रिस्क: सर्वच मार्केटच्या कामगिरीमुळे व देशाच्या अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे संभवणारी रिस्क म्हणजे मार्केट रिस्क.
२) इनफ्लेशन रिस्क: महागाईमुळे चलणाची खरेदी क्षमता कमी होऊन संभवणारी रिस्क म्हणजे इनफ्लेशन रिस्क.
३) अनसिस्टमॅटिक रिस्क: विशिष्ट कंपनी किंवा क्षेत्राशी निगडीत रिस्क म्हणजे अनसिस्टमॅटिक रिस्क.
४) लिक्विडिटी रिस्क: जेव्हा एखादा शेअर किंवा रोखे सहजपणे व त्वरित विकता किंवा खरेदी करता येत नाहीत तेव्हा त्यामुळे संभवणारी रिस्क म्हणजे लिक्विडिटी रिस्क.
५) बिझनेस रिस्क: कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे संभवणारी रिस्क म्हणजे बिझनेस रिस्क. जसे की व्यवसाय चालवण्याबाबत त्रुटी असणे, मंदी, खराब आर्थिक स्थिती वगैरे.
६) करंसी रिस्क: विदेशी चलणाच्या विनिमय दरातील अस्थिरतेमुळे संभवणारी रिस्क म्हणजे करंसी रिस्क. जे लोक विदेशात अथवा विदेशी चलनात गुंतवणूक करतात त्यांच्यावर याचा परिणाम होतो.
७) वोलाटिलिटी रिस्क: शेअरच्या किंमतीतील सततचे बदल यामुळे जी अस्थिरता निर्माण होते तिला वोलाटिलिटी रिस्क म्हटले जाते.
मित्रांनो, शेअर मार्केट व्यवस्थित शिकायचे असेल तर https://t.me/mahadeva_academy1 या टेलेग्राम चॅनलला जॉइन करा. यासोबतच तुमच्या प्रतिक्रिया कळवा व पुढील भाग नक्की वाचा, धन्यवाद!