यात्रा दोन दिवसांवर आली होती, त्यामुळे आजोबांकडे कामाची खूपच गडबड होती. आजोबा शेतातील अवजारे पासून ते बैलगाडीपर्यंत सर्व काम स्वतः करायचे. त्यामुळे त्यांच्याकडे खूप लोक लांबून काम करून घेण्यासाठी येत होते.
आजोबा आणि मी बाहेरच्या पत्र्याच्या शेडमध्ये काम करत होतो. मी आजोबांना मदत म्हणून आज त्यांच्या हाताखाली काम करत होतो.
तेवढ्यात शेजारच्या काकू आल्या.
“अरे, तू कवा आलायस? आणि कोण-कोण आलंय?” त्यांनी विचारलं.
मी: “सकाळीच आलोय. घरात सगळेच आहेत.”
काकू: “जा, आईला बोलवून आण.”
त्या उंबराखाली असलेल्या कट्ट्यावर बसल्या, आणि आजोबा म्हणाले,
“लवकर घेऊन ये आईला, आज खूप काम पडलंय. अजून या चार खुरप्यांना धार लावायची आहे, आणि त्या बैलगाडीचं पण काम करून द्यायचंय.”
मी आईला हाक मारली आणि परत कामाला लागलो. आजोबांना आम्ही अण्णा म्हणायचो. अण्णासोबत काम केलं की ते खाऊ आणायला आठ आणे हातावर ठेवायचे. पण त्या पैशांपेक्षा आज लक्ष दुसरीकडेच होतं, कारण सकाळपासून मिनू दिसली नव्हती.
कुठे गेली असेल ती?
मिनू माझी बालमैत्रीण होती. शाळेतून घरी आलो की मी, मिनू, रुपी, पिंट्या, संदीप — आम्ही सगळे एकत्र खेळायचो. लपंडाव, लगोरी, लंगडी, आंधळी कोशिंबीर हे आमचे आवडते खेळ. पण मागच्या चार वर्षांत मिनू दिसलीच नाही. फक्त एवढंच समजलं होतं की दहावीनंतर ती मामाकडे राहायला गेली आहे. आता आम्हालाही गाव सोडून पाच वर्षं झाली होती. गावाकडे यात्रेसाठी आलो होतो.
आई आणि काकू यांच्या गप्पा माझ्या कानावर येत होत्या, पण समोरच काम सुरु असल्यामुळे त्यांचे नेमके शब्द ऐकू येत नव्हते. फक्त एवढंच लक्षात येत होतं की चांगले सासर भेटले आहे, मुलगा कारखान्यावर कामाला आहे,असे काहीतरी बोलत होत्या.
मी एका हाताने भाता फिरवत होतो आणि कोळसा पूर्णपणे लाल होण्याची वाट पाहत होतो. थोड्याच वेळात खुरप्याची पाती लालबुंद झाली. अण्णांनी लगेच त्याला ऐरणीवर बडवायला सुरुवात केली, आणि टोक निमुळतं होईपर्यंत हातोड्याने आकार दिला. थोड्याच वेळात अण्णांनी मला पातेल्यातून पाणी आणायला सांगितलं.
मी झाडाखाली असलेल्या मोट्या भांड्यामधून पाणी आणण्यासाठी गेलो. त्या वेळी शेजारच्या काकूंचा लक्ष कधी माझ्याकडे जाईल, याची थोडी वाट बघत होतो, पण त्यांच्या गप्पा काही थांबतच नव्हत्या.
शेवटी मीच विचारलं —
“मिनू कुठं गेलीये काकू?”
आई म्हणाली, “मिनू नको म्हणूस आता. तिचं पूर्ण नाव घेऊन बोलव.”
काकू हसल्या आणि म्हणाल्या,
“मोठी झाली आहे ती. चार दिवस झाले आलीये माहेराला. लग्न झालंय आता तिचं.”
हे ऐकून मी थोडा दचकलो.
तेवढ्यात अण्णा ओरडले,
“कशाला पाहिजेत तुला नको त्या चौकश्या? कामाकडे लक्ष दे. नाहीतर भाजून घेशील हातपाय!”
मी रागाच्या भरात ऐरणीवर घणाचे गाव मारू लागलो.
तेव्हढ्यात, साडी नेसलेली, डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा आणि काखेत कळशी घेऊन एक मुलगी समोर आली. तिने हंडा खाली ठेवला, माझ्याकडे एक कटाक्ष टाकला, आणि काहीही न बोलता आत निघून गेली.
आणि त्याच क्षणी मला जाणवलं —
खरंच, मिनू मोठी झालीये…
पण मिनू एवढ्या लवकर मोठी का झाली आहे, याचं काहीसं वाईट वाटत होतं.
पाच वर्षांनंतर दिसली खरी, पण तिचं रूप बदललेलं होतं.
काही बदल आपल्याला कितीही नकोसे वाटले तरी ते अपरिहार्य असतात.
कालपर्यंत जी मिनू आमच्यासोबत खेळायची, हसत-खेळत गप्पा मारायची, लपाछपी खेळायची — तीच आता कोणाच्या तरी संसारात गुंतली होती.
बालपण एका क्षणात मागे सरकलं होतं, ही जाणीव झाली.
अण्णांचे शब्द कानात घुमत होते —
“ध्यान कुठं हाय तुझं रे? कामाकडे लक्ष दे.”
खरंच, लक्ष कुठं असतं आपलं?
बालपणाच्या रम्य आठवणींमध्ये?
भविष्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये?
की त्या क्षणभंगुर नात्यांमध्ये, जी आपल्या हातातून निसटून जातात?
माझ्यासाठी मिनू म्हणजे केवळ एक मैत्रीण नव्हती;
ती माझ्या बालपणाचा आरसा होती.
पण आता त्याच आरशात मिनूचं बदललेलं रूप दिसत होतं — मोठं झालेलं, आणि खूप दूर निघून गेलेलं.