ऊमाचे आता स्वयंपाकाचे काहीच काम शिल्लक नव्हते फक्त मोहन आल्यावर जेवायला बसताना पुरी आणि ताजे वडे तळायचे होते .संध्याकाळच्या बटाटेवड्याची पण तयारी झाली होती तिच्याकडे आता वाट बघणे इतकेच शिल्लक होते . शांतपणे बाहेरच्या खोलीत टीव्ही लाऊन ती बसली .काय लागले होते टीव्ही वर याकडे तिचे लक्षच नव्हते मनात विचार विचार आणि समोर नुसतीच चित्रे फिरत होती .काही वेळातच नयना धावत धावत आली .घड्याळ पाहून म्हणाली , “आई मोहनमामा कसा नाही आला अजून ?मला फार भूक लागलीय ..त्याला फोन कर ना कुठे पोचला आहे बघ तरी ..”नयनाचे अजून काही प्रश्न यायच्या आत ऊमा म्हणाली ,“हे बघ नयन ..मोहनमामाचा फोन आला होता आत्ताच ..त्याची गाडी रस्त्यात बंद पडली आहे आत्ता दुरुस्त झाली आहे आता निघाला आहे तिकडून पोचेल थोड्या वेळात ..तुला भूक लागली असेल तर वाढू का ? मोहनमामाला उशीर लागणार म्हणल्यावर नयना वैतागलीच ..“आई काय ग हे असा उशीर का होतोय मामाला ?“नयन अग तो काय मुद्दाम करतो आहे का ..?येईल न थोड्या वेळात ..मग नयनाने चार पुऱ्या तळून श्रीखंड एका वाटीत घातले आणि नयनाला जेवायला वाढले .आई वडा मात्र मी मामासोबत खाणार बर का असे म्हणून नयना खायला बसली .नयनाचे खाऊन झाल्यावर ऊमाने तिची ताटली उचलून ठेवली ऊमाला पण भूक लागली होती पण आता मोहन सोबत जेवायचे असे तिने ठरवले अर्धवट काही खाल्ले तर भूकमोड होणार होती .“नयन बाळा थोडा वेळ झोपतेस का ?मामा आला की उठवते तुला ...मग संध्याकाळी वाढदिवसाचा कार्यक्रम आहे न ?नयनाचे पण डोळे आता मिटायला लागले होते वाढदिवसाच्या आनंदात इकडे तिकडे पळून ती थकली होती .आईचे बोलणे ऐकताच ती लगेच झोपून गेली .ऊमा तिच्याजवळ बसून राहिली .अखेर दीड वाजता मोहन आला .आल्या आल्या त्याने हातपाय धुवून घेतले .झोपलेल्या नयनाच्या केसावर हलकेच हात फिरवला .मोहन चला मी वाढते तुम्हाला भूक लागली असेल न असे म्हणत ऊमाने मोहनचे ताट वाढायला घेतले आणि बटाटेवडे तळायला घेतले.मोहन टेबल वर येऊन बसला .“वहिनी काय झाले असेल हो ?का आला नसेल सतीश ?आणि का त्याचा फोन लागत नाही? याचा विचार करून डोके दुखायला लागले आहे ““मोहन माझी पण तीच अवस्था आहे हो .तुम्ही तिकडे आणि मी इकडे अस्वस्थ आहोत जाउदे आता शांतपणे जेवून घ्या ..भुकेने पण डोके दुखत असेल ..ऊमाने गरम पुऱ्या आणि वडे त्याच्या पानात वाढले .“वहिनी तुम्हाला पण भूक लागली असेल तुम्ही घ्या की जेवायला .नयना जेवली आहे का ?“मोहनने विचारले .. हो एव्हढे वडे आणि पुऱ्या झाल्या की नयनाला उठवते .बटाटेवडा ती तुमच्या सोबत खाणार आहे असे म्हणाली होती .नुसती श्रीखंड पुरी खाऊन झोपली आहे ती”मोहनचे अर्धे जेवण झाले आणि ऊमाचे पण तळण आवरले .तिने नयनाला उठवले ...जेवत असलेल्या मोहन मामाला बघताच नयना उल्हासित होऊन उठली “मामा किती वेळ वाट बघतेय मी ..माझे गिफ्ट आणले आहेस न ?का विसरलास ?ऊमा तिला दटावून म्हणाली ..नयन काय हे विचारणे? आत्ताच आलाय ना मामा नयनाचा प्रश्न ऐकून मोहन हसू लागला .“नयना गिफ्ट मी विसरेन असे होईल का ..आणलेय बरे..सगळे “नयना येऊन मामाच्या शेजारी बसली ऊमाने तिच्या प्लेटमध्ये गरम वडे वाढले आणि ती पण जेवायला बसली .गप्पा मारत जेवणे पार पडली ..मग मोहनने नयनाला जवळ घेऊन तिला हैप्पी बर्थडे म्हणाला आणि तिच्या हातात रंगीत कागदात गुंडाळलेला बुद्धीबळ पट दिला .सोबत दोन मोठी चोकलेट..पण होती ..आणि एका पिशवीत असलेला परकर पोलका दाखवला “ते पाहून नयना आनंदाने म्हणाली ..मामा ही चोकलेट पण मला ...आणि हे काय आहे ?“हो बरे आणि हे परकर पोलके खास तुझ्यासाठी आजीने शिवून पाठवले आणि खूप आशीर्वाद पण दिलेत ..मोहनच्या आईने इतक्या आठवणीने पाठवलेले ते खणाचे हिरवेगार परकर पोलके पाहील्यावर ऊमाच्या डोळ्यात पाणी आले .“पण मामा तु मला काहीतरी सरप्राईज गिफ्ट आणणार होतास न.. ती कुठ आहे ?असे नयनाने विचारल्यावर ऊमा एकदम चपापली आणि तिने मोहनकडे बघितले .सतीश आलाच नाही म्हणल्यावर आता मोहन यावर काय उत्तर देणार हे तिला समजेना .पण मोहन शांत होता ..त्याने फक्त एक कटाक्ष ऊमाकडे टाकला आणि नयनाकडे पाहून तो म्हणाला ..“आहे तर ते सरप्राईज गिफ्ट खूप मोठे आहे ..अगदी आमच्या या नयना एव्हढे मोठे बर का “मग कुठे आहे ते दे ना मला ...नयना उत्सुकतेने म्हणाली .“देणार देणार पण ते तु केक कापल्यावर देणार आणि तुझ्या मित्र मैत्रीणीना पण ते दिसायला हवे ना ..तुझ्या मोहनमामाने आणलेले गिफ्ट पाहिल्यावर वाव काय गिफ्ट आहे असे त्यांनी म्हणायला हवे ना ..म्हणून ते मी तेव्हाच देणार ..”हे ऐकून नयनाचा चेहेरा चमकला आणि ती मान हलवून हसली .दुपारी थोडी विश्रांती घेतल्यावर ऊमा कामाला लागली .तिने बटाटेवडे तळायला घेतले ,चटणी केली .नयना आणि मोहनच्या मोहनच्या आणि तिच्या अनेक दिवस साठलेल्या गप्पा चालूच होत्या .पाच वाजता सगळी तयारी वाड्याच्या मधल्या चौकात नेऊन ठेवल्यावर ऊमाने नयनाला गुलाबी फ्रॉक घातला आणि तिचे छान आवरून दिले .छान छान कानातले गळ्यातले घातल्यावर नयना अगदीच देखणी दिसू लागली .ऊमाने हलकेच तिच्या कानाच्या मागे काळी तीट लावली दृष्ट लागू नये म्हणून ..!!तयार झालेल्या नयनाकडे पाहून ऊमा आणि मोहनदोघांनाही वाटले ...”अगदी सतीशची प्रतिकृती “ऊमा पण चांगली साडी नेसून आली आणि मग तिघेही चौकात आले .वाड्यातल्या मधल्या चौकात नयनाचे अनेक मित्र मैत्रिणी जमले होते .छान टेबल सजवले होते सगळ्या मुलांनी ..वाड्यातल्या सगळ्यांनी मिळुन एक मोठा केक आणला होता नयनाचे नाव लिहिलेला .ही त्या वाड्यातली पध्धतच होती .कोणाच्याही वाढदिवसाला वर्गणी काढून केक आणला जात असे .नयना फारच खुश होती .सुरी घेऊन तिने केक कापला ..आणि मुलामुलींनी हैप्पी बर्थडे चा एकच जल्लोष केला.सर्वांनी येऊन तिला हस्तांदोलन केले ,शुभेच्छा दिल्या .मग ऊमाने वाड्यातल्या मुलींच्या मदतीने डीश भरायला सुरवात केली सर्व मुलामुलींना डीश मध्ये एक एक तुकडा केकचा घालून डीश दिल्या त्यानंतर मोठ्या माणसाना ही डीश दिल्या गेल्या .सर्वजण आनंदात खाऊ लागले .खाऊन झाल्यावर सर्वांसाठी ग्लासमध्ये मस्त गार पन्हे पण होते नयना पण त्यांच्या सोबत खायला लागली .ऊमा इकडे तिकडे पहात होती पण मोहन तर कुठेच दिसेना नंतर पाच दहा मिनिटातच तिला मोहन वाड्यातून आत येताना दिसला .सोबत त्याचा मित्र म्हणजे ऊमाचे दुकान मालक होते .ऊमाने पुढे होऊन त्यांचे स्वागत केले व दोघांना बसायला खुर्च्या दिल्या .आणि खायचे जिन्नस त्यांच्या पुढे केले .ऊमाने केलेले सर्वच रुचकर पदार्थ सर्वांनी चवीने खाल्ले आणि प्रशंसा पण केली .क्रमशः