Reunion - Part 28 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्मिलन - भाग 28

Featured Books
Categories
Share

पुनर्मिलन - भाग 28

"नुसते फोनवरच बोलत ठेवणार आहेस मला ..?की मला भेटायची इच्छाच नाहीय तुझी .?आणि माझा इतक्या वर्षाचा यातनामय प्रवास मी फोनवर असा दहा पंधरा मिनिटात सांगू असे तुझे म्हणणे आहे का ..?सतीश इतके बोलेपर्यंत अचानक फोन कट झाला .ऊमाने फोनकडे पाहिले ..आणि परत तो फोन नंबर रीकॉल केला .पण तो लागेना ..थोडा वेळ वाट पाहून परत लावला आता आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज ..असा मेसेज येत होता .ऊमाला वाटले.. तरी एक मात्र बरे झाले आत्ता सुजाता नुकतीच निघून गेली होती .नाहीतर हे फोनवरचे बोलणे तिला समजल्यावाचून राहिले नसते .ऊमा शांतपणे परत सतीशचा फोन येईल अशी वाट पाहत राहिली .विचारांची आवर्तने तर मनात चालूच होती... सतीशला भेटायची, त्याची खरेच काय अवस्था आहे हे जाणून घ्यायची इच्छा तर होतीच तिला .कितीही रागाने बोलली तरीही सतीश नवरा होता तिचा आणि तिच्या लाडक्या लेकीचा बाबा ...!शिवाय जोपर्यंत तो भेटत नाही तोपर्यंत तो सुधारला आहे का नाही हे समजायला मार्ग नव्हता आणि त्याने आता पुढे काय ठरवले आहे   हेही नव्हते कळत .मुख्य प्रश्न हा होता की जर खरेंच सतीश भेटायला येणार असेल तर आता नयनाला काय सांगायचे त्याच्या बद्दल ती कशी काय स्वीकारेल या गोष्टीला की नाकारेल ?आताचे नयनाचे वाढते वय अगदी विचित्र होते .तिच्या मनाला धक्का लागणार नाही अशा प्रकारे खुप नाजूकपणे ही गोष्ट हाताळायला लागणार होती .यात मुख्य म्हणजे मोहनचे सहकार्य अगदीच आवश्यक होते .हा सगळा गुंता सोडवायला तोच मदत करू शकणार होता .त्याला तर हे सगळे सांगायला लागणारच होते .आत्ताच करावा का फोन त्याला ..असा विचार करून तिने मोहनचा फोन नंबर फिरवला ..पण त्याचाही नंबर आता नेटवर्कच्या बाहेर लागत होता ..पुढे अर्धा तास ती वाट पहात राहिली ..एक तासभर होत आला ..तरीही सतीशचा फोन परत येईना.आणि तिलाही लागेना ..हळू हळू संध्याकाळ व्हायला लागली होती .इतका वेळ ती कधीच दुकानात थांबत नसे .तो परिसर कॉलेज आणि शाळेचा असल्याने आता तो निर्मनुष्य होऊ लागला .तशात ती तिथे एकटीच थांबली होती .नयना पण घरी वाट पाहत असणार .आता खरेच निघावे कि काय असा विचार करीत ती कुलूप घेऊन बाहेर पडायचा विचार करीत होती पण जर परत घरी गेल्यावर सतीशचा फोन आला तर नयनासमोर तिला त्याच्याशी काही बोलता येणार नव्हते .परत थोडा वेळ इथेच वाट पहायची ..असे ठरवून तिने नयनाला फोन करून थोडा उशीर होईल असे सांगितले .आणि खुर्चीत बसून राहिली .जवळच किराणा मालाचे दुकान होते .ते उघडे असल्याने थोडी वर्दळ तिथे होतीती माणसांची सोबत ऊमाला बरी वाटली .राजुही तिथेच अजून काम करीत होता .मावशी अजून दुकानात आहेत हे पाहून त्यालाही नवल वाटले .मध्येच येऊन तो पण ऊमाची चौकशी करून गेला .जवळजवळ तास दीड तास झाला तरी परत सतीशचा फोन येईना आणि ऊमाने केला तर लागतही नव्हता .आता किरण दुकान पण बंद व्हायची वेळ आली .दुकानाचे मालक स्वतः येऊन ऊमाला विचारू लागले त्या का थांबल्या आहेत ?कधी जाणार आहेत ?त्यांच्या सोबत कोणी थांबायला लागेल का वगैरे ...त्यांना काही ठोस उत्तरे देता येईनात आणि शिवाय उगाच त्यांना आपल्यासाठी थांबायला लागायला नको म्हणून तिने अखेर दुकान बंद करायला घेतले .आणि फोन वाजला ..अखेर सतीशचा परत फोन आला एकदाचा ..ऊमाने हायसे वाटून फोन उचलला  उचलताच सतीश म्हणाला ..“ऊमा अग फोनचा BALANCE संपला होता रिचार्ज करायला इतका वेळ गेला बघ ...आता प्लीज मला नवीन कोणतेही प्रश्न विचारू नकोस .तुझ्या कोणत्याही प्रश्नांना आता उत्तरे द्यायची माझ्या अंगात आता शक्ती नाही बघ ..जे काय बोलायचे ते आपण आता भेटूनच बोलूया ..मला भेटायचे आहे ग तुला आणि माझ्या प्रिन्सेसला सुद्धा ..होईल ना ग आपले तिघांचे “पुनर्मिलन “.....व्हायलाच हवे .खूप उत्सुक आहे बघ मी तुम्हा दोघींना भेटायला भेटीतच मग मी सगळे सांगेन काय काय घडले ते इतक्या वर्षात मला जी काही दुषणे द्यायची आहेत ती तु त्यावेळीच दे माझी तयारी आहे ..मला खरेच मंजूर आहे की माझ्याकडून खुप मोठी चुक झाली आहे त्यासाठी तू जी देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी पण आता मोठ्या मनाने माझा स्वीकार कर ग “फोनवर आता त्याचा स्वर अगदीच अगतिक झाला होता .ऊमाला अगदी भरून आले ...ती म्हणाली “ठीक आहे ये तु घरी ..कधी येतोस ?असे विचारल्यावर सतीश म्हणाला ..“तुम्ही दोघी कुठे राहताय हे कुठे मला माहित आहे सांग न कुठे आहात तुम्ही गाव सोडुन कुठे गेलात राहायला ... ?हा प्रश्न ऐकल्यावर रमा म्हणाली .आम्ही तर आता पुण्याजवळच्या एका उपनगरात रहात आहोततुला पत्ता मेसेज मध्ये पाठवू का ?पण तु कुठे आहेस आता ?त्यावर सतीश म्हणाला माझा पत्ता काय सांगणार ..?“अग तुमचा शोध घेत घेत मी असाच भटकतो आहे बघ माझा काही ठावठिकाणाच नाहीये ग ..पण तु तुझा पत्ता कर मला मेसेज ,मी रात्रीच गाडीत बसून उद्या सकाळपर्यंत तिथे पोचतो.”बोलताना मात्र त्याने त्याचा पत्ता अजिबात सांगितलाच नाही ..आणि फोनवरील बोलण्यात एकदाही मोहनचे नाव घेतले नव्हते पण आता उगाच कशाला सगळ्याला फाटे फोडत बसायचे म्हणून ऊमाने आणखी काहीच विचारले नाही .“ठीक आहे मी पाठवते पत्ता लगेच ... ,सकाळी इथे पोचलास की फोन कर मला ““हो ग कळवतो मी तुला पोचलो कीशोधून काढेन मी घर तुमचे काळजी करु नकोस पाठव पत्ता मला “असे म्हणत सतीशने तिचा निरोप घेतला मग उमानेही तिचा सविस्तर पत्ता टाईप करून त्याला फोन मेसेज मध्ये पाठवला .  त्याने मेसेज वाचल्याची निळी खुण तिला दिसली . अचानक तातडीने उद्याच सतीश येतो आहे म्हणल्यावर ऊमाला थोडी पंचाईत पडली कारण दुकानात रोजचे नियमित गिर्हाईक असल्याने त्यांना न कळवता असे अचानक दुकान बंद कसे ठेवता येणार ?मग तिने सुजाताला फोन करून उद्याच्या दिवस दुकान सांभाळ अशी विनंती केली .अशा वेळेस सुजाता तिच्या बहिणीला सोबत आणत असे आणि दोघी मिळून नीट दुकान सांभाळत असत .त्यामुळे ऊमाला काळजी नसे .मोबाईल बंद करून पर्समध्ये ठेवला .आणि ऊमाने दुकान बंद केले.रात्रीचे साडेनऊ वाजायला आले होते .आता बसची फ्रिक्वेन्सी पण कमी झाली होती .त्यामुळे बस तर मिळणारच नव्हती .रिक्षा थांब्याजवळ एकच रिक्षा उभी होती .पटकन जाऊन ती आत बसली .आणि ती घरी निघाली . रिक्षात बसताच तिने रिक्षावाल्याला पत्ता सांगितला आणि नयनाला फोन करूनमी दुकानातून निघाले आहे असे सांगितले .रिक्षात तिच्या डोक्यात हेच विचार घोंगावत होते ..आता उद्या सकाळी सतीश येऊन दाखल होईल ..कसे कसे करायचे बरे सगळे .?क्रमशः